অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोल्ट्री उद्योग फायद्याचा

पोल्ट्री उद्योग फायद्याचा

एकत्रित कुटुंबाची झाली मदत

उच्चशिक्षित मोहन शंकरराव साळुंके यांनी एकत्रित कुटुंबीयांच्या मदतीने लातूर जिल्ह्यातील शिवली (ता. औसा) येथे पोल्ट्री उद्योग उभा केला. शिक्षकाची नोकरी सोडून मोहन पोल्ट्री उद्योगाच्या माध्यमातून व्यवसायाचे धडे गिरवू लागले आहेत. व्यवस्थापन चांगले ठेवण्यावर सर्वाधिक भर देणाऱ्या साळुंके यांचा हा उद्योग तरुणांना उभारी देणारा ठरला आहे.

लातूर जिल्ह्यात औसा तालुका मुख्यालयापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवली गावात पोल्ट्री उद्योग करणाऱ्या तरुणांची संख्या वाढते आहे. एमए.बीएड. झाल्यानंतर अन्य तरुणांप्रमाणे गावातील मोहन साळुंके यांनीही एका संस्थेत नोकरी स्वीकारली. परंतु सेवेत कायमस्वरूपी सामावून न घेतले गेल्याने नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. वडिलोपार्जित शेती व पोल्ट्री उद्योगातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. सन 2006 मध्ये सुरू झालेला हा पोल्ट्री फार्म आज चांगलाच नावारूपाला आला आहे. सध्या पोल्ट्रीत दोन शेड असले तरी त्याची क्षमता दहा हजार पक्ष्यांची आहे. मात्र सध्या पाच हजार ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन केले जाते.

कोंबड्यासाठी हवेशीर शेड

शेताच्या प्रारंभीच कडूनिंबाची झाडे असून, या झाडालगतच खेळती हवा राहील, अशा स्थितीत शेडची उभारणी करण्यात आली आहे.

स्वच्छ पाणी व खाद्याला महत्त्व

पोल्ट्री उद्योगात मोहन यांनी व्यवस्थापनाला सर्वांत जास्त प्राधान्य दिले आहे. पाणी व खाद्य पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. कोंबड्यांच्या खाद्यावर विशेष लक्ष दिले जाते. मका, सोयाबीन अशा स्वरूपाचे शाकाहारी खाद्य दिले जातेच शिवाय दहा प्रकारचे घटक एकत्र करून खाद्य तयार केले जाते. त्यासाठी पोल्ट्री फार्मच्या आवारात "ग्राइंडर आणि मिक्‍सर' सुविधा बसविण्यात आली आहे. सकाळी सात व सायंकाळी सात असे दोन वेळा खाद्य देण्यात येते. खाद्य देण्याच्या वेळा तंतोतंत पाळल्या जातात. कोंबड्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. सहाव्या दिवशी लासोटा आणि चौदाव्या दिवशी गंबोरा लस डोळ्याद्वारा तर औषधे पाण्यातून दिली जातात. आजारी किंवा जखमी कोंबड्यांना स्वतंत्र ठेवले जाते. चाळीस दिवसांनी कोंबड्यांचे वजन केले जाते. स्वच्छ पाणी व स्वच्छ खाद्य यावर अधिक भर असतो.

पोल्ट्रीचे अर्थशास्त्र

पोल्ट्रीचे अर्थशास्त्र सांगताना मोहन म्हणाले, की साधारणतः 45 दिवसांला एक बॅच घेतली जाते. वर्षातून सुमारे दहा बॅच याप्रमाणे घेण्याचा प्रयत्न असतो. अंदाजे अडीच हजार कोंबड्यांची एक बॅच विक्रीला पाठविण्यात येते. पक्ष्याचे वजन अडीच किलोपर्यंत झाले की तो विक्रीसाठी तयार होतो. प्रति किलो 35 ते 90 रुपये दर मिळतो. तर वर्षभरात सरासरी 65 रुपये दर मिळतो. प्रत्येक बॅचचे वर्षभरातील अर्थशास्त्र वेगवेगळे आहे. पोल्ट्री व्यवस्थापनातील खर्च सुमारे सव्वादोन लाख रुपये वजा जाता महिन्याला 25 ते तीस हजार रुपये उत्पन्न हाती राहते.

व्यापारी विक्रीसाठी येतात थेट पोल्ट्रीवर

साळुंके यांना पक्षी बाजारपेठेत घेऊन जावे लागत नाहीत. गेल्या पाच वर्षांतील विश्‍वासू व्यवहाराने त्यांनी या बाजारपेठेत ओळख तयार केली आहे. उमरगा, लातूर व उस्मानाबाद भागांतून व्यापारी खरेदीसाठी थेट पोल्ट्रीवर येत असल्याने बाजारपेठेत जाण्याचा खर्च वाचतो. दरातही वर्षभर सतत चढ-उतार होत असल्याने मिळणाऱ्या रकमेतही बदल होत राहतात. व्यवसायातून वर्षभर कोंबडीखतही उपलब्ध होत राहते. त्याचा उपयोग पिकांसाठी केला जातो. या उद्योगाच्या माध्यमातून परिसरातल्या तरुणांनाही रोजगार मिळाला आहे.

एकत्रित कुटुंबाचा आदर्श

साळुंके कुटुंबाची गावात वेगळी ओळख आहे. शंकरराव व जनाबाई साळुंके यांच्या संस्कारातून वाढलेली चारही भावंडे एकत्र राहतात. वडिलोपार्जित चाळीस एकर शेती असून शेतीत आई, वडील, भाऊ महादेव यांची मदत होत असल्याचे मोहन सांगतात. शेतीत डाळिंब, ऊस आदी पिके आहेत. पीक उत्पादनवाढीसाठीही साळुंके कायम प्रयत्नशील असतात. यंदा त्यांनी रेशीमशेतीही केली आहे. तीन एकरांत तुतीची लागवड केली आहे. एक बॅच पूर्ण केली असून त्यापासून त्यांनी चाळीस हजार रुपयांचे उत्पन्नही घेतले आहे.

शेणखतासाठी गावरान जनावरांचे संगोपन

शेतीत शेणखताचे महत्त्व ओळखून साळुंके यांनी लहान-मोठ्या 25 जनावरांचे संगोपन केले आहे. चाळीस एकर शेतीसाठी त्यातून शेणखत उपलब्ध होते.

कष्टाळू जनाबाईंचा आदर्श

एकत्रित कुटुंबाचा गाडा ओढण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या जनाबाई साळुंके वयाच्या पासष्टीतही शेतीतील जबाबदारीत आघाडीवर असतात. या वयात शरीराला झेपतील तेवढी कामे त्या करतात. भाजीपाला व्यापाऱ्याला विकण्यापेक्षा बाजारात बसून थेट ग्राहकांना विकणे त्या पसंत करतात. कष्टाळू जनाबाईंचा उत्साह साळुंके परिवाराला शेतीत आत्मविश्‍वास देणारा ठरला आहे.

साळुंके यांच्या उद्योगातील महत्त्वाच्या बाबी

1. कोंबड्यांमध्ये मर होऊ नये म्हणून व्यवस्थापनावर अधिक लक्ष 
2. खाद्याची गुणवत्ता चांगली ठेवली. खाद्य देण्यास विलंब होऊ नये म्हणून वीजभारनियमनाचा अंदाज घेत खाद्याची उपलब्धता केली. 
3. पाणी, वेळ, जागा, मनुष्यबळ आदी घटकांमध्ये बचत करण्याचा प्रयत्न 
4. कुक्‍कुटपालन व्यवसायासंदर्भात अभ्यासू व प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या उत्पादकांकडून उपयुक्‍त माहिती मिळविण्याचा प्रयत्न 
5. पक्ष्यांचे खाद्य घरीच तयार केले जात असल्याने खर्चात बचत साधली आहे. 

संपर्क : मोहन साळुंके : ९६८९३५६५८४

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate