অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अर्धबंदिस्त शेळीपालनाची जोड

वालेवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील उद्धव सिरसाठ यांनी सरकारी नोकरीच्या बरोबरीने शेती तसेच शेळीपालनाकडे लक्ष दिले आहे. अर्धबंदिस्त पद्धतीने बोअर शेळीपालन त्यांना फायदेशीर दिसून आले आहे. शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापन आणि चाऱ्याचे योग्य नियोजन असेल, तर कमी व्यवस्थापन खर्चात शेळीपालनातून चांगला नफा मिळतो असा त्यांचा अनुभव आहे.

वालेवाडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील उद्धव ज्ञानोबा सिरसाठ यांची घरची तीन एकर कोरडवाहू शेती. लहानपणापासूनच शेतीतील धडे गिरवत, तसेच वेळप्रसंगी नोकरी करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. नव्वदच्या दरम्यान त्यांनी तलाठी पदासाठी परीक्षा दिली. त्यात त्यांची लातूर जिल्ह्यात तलाठी म्हणून पुढे निवडही झाली.

सध्या ते चाकूर येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नोकरी करतानाच त्यांच्या डोक्‍यामध्ये सुधारित पद्धतीने शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे नियोजन होते, त्यानुसार त्यांनी घरच्या तीन एकर शेतीमध्ये पीक नियोजनाची आखणी केली. भाऊ मजुरी करणारा. शेतीला पाणी पुरवण्यासाठी विहीर आणि कूपनलिका खणली. परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेत भाजीपाला, द्राक्ष, ऊस लागवड केली. भाजीपाल्यातून पैसा हाती शिल्लक राहिला. हा पैसा शेतीतच गुंतवला. पुढे टप्प्याटप्प्याने जमीन विकत घेतली. सध्या सिरसाठ कुटुंबीयांकडे अडीच एकर डाळिंब, एक एकर शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, 10 गुंठे टोमॅटो आणि उर्वरित भागात रोपवाटिका आहे.

तीन एकर शेवगा आणि तीन एकर ऊस लागवड आहे. जनावरे आणि शेळ्यांना वर्षभर चारा उपलब्ध होण्यासाठी अर्धा एकर मेथी गवत, अर्धा एकर यशवंत गवत, दोन एकरांवर शेवरी आणि सुबाभूळ लागवड आहे. शेतातून एक नाला जातो, त्या नाल्याचे खोलीकरण करून लहान बंधारा बांधून त्यात साठलेले पाणी कूपनलिका पुनर्भरणासाठी वापरले जाते. शेतीच्याबरोबरीने त्यांनी कमी खर्चाच्या आणि कमी व्यवस्थापनाच्या; परंतु शेतीला पूरक अशा शेळीपालन व्यवसायाची सन 2009 मध्ये सुरवात केली.

असे केले अर्धबंदिस्त शेळीपालन

शेळीपालन व्यवसायाबाबत माहिती देताना सिरसाठ म्हणाले, की शेतीमधील सुधारणेसाठी मी राज्यातील विविध कृषी प्रदर्शने, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देत असतो. या भेटीदरम्यान मला शेळीपालनाची माहिती मिळाली, त्याचे अर्थशास्त्र समजावून घेतले. त्यानुसार सन 2009 मध्ये दोन गाभण उस्मानाबादी शेळ्या घेऊन शेळीपालनाला सुरवात केली. या शेळ्यांना जुळी करडे झाली. पुन्हा चार महिन्यांनी दोन गाभण उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या, त्यांनादेखील जुळी करडे झाली. टप्प्याप्प्याने सहा महिन्यांत दहा करडे गोठ्यात तयार झाली. बाजारात या करडांना चांगला दर मिळाला. नर करडे विकून माद्या गोठ्यात ठेवल्या. याच वेळी बोअर जातीच्या शेळीची माहिती शेतकरी मित्रांकडून मिळाली. या जातीचे वजन चांगले मिळते.

चारा, कडबा कुट्टीवरही ही जात चांगल्या प्रकारे वाढते. यांची रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रजनन क्षमता चांगली आहे. मटणाची चव चांगली असल्याने बाजारपेठेत या जातीला चांगली मागणी असते. हा अभ्यास करून मी दोन वर्षांचा बोअर बोकड 15 हजारांना खरेदी खरेदी केला; तसेच वाशीम बाजारपेठेतून दोन बोअर जातीची नर करडे 12 हजारांना विकत आणली. गोठ्यातील शेळ्यांचा बोअर बोकडाशी संकर करून पहिल्यांदा 50 टक्के बोअर करडे तयार झाली. पुढे टप्प्याटप्प्याने 75 ते 90 टक्के बोअर जातीची करडे गोठ्याच तयार होत आहेत.

गोठ्यामध्ये केले बदल...

शेळ्यांची संख्या वाढू लागल्याने साध्या गोठ्यात लेंड्या- मूत्रामुळे माश्‍या, गोमाश्‍या वाढल्या. वास- दुर्गंधीमुळे करडांचे आरोग्य बिघडू लागले. हे लक्षात घेऊन शेळ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने सुधारित पद्धतीचा गोठा सिरसाठ यांनी बांधला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, की शेळ्यांसाठी फलाट पद्धतीने गोठा बांधताना 35 × 27 फुटांची जागा निश्‍चित केली. स्वतःची कल्पना आणि इतर शेतकऱ्यांशी चर्चा करून या जागेवर तीन फूट उंचीवर पाइप फाउंडेशन (फलाट) तयार केले. त्यावर चार इंच रुंद, एक इंच जाडीच्या फळ्या खालच्या अँगलला नटबोल्टने फिट केल्या. दोन फळ्यांत अर्धा इंच जागा ठेवली. अशा पद्धतीने लाकडी पट्ट्यांचा फलाट तयार केला.

फळ्यांच्या फटीतून शेळ्यांच्या लेंड्या, मूत्र खाली जमिनीवर पडते. लेंड्या दररोज गोळा केल्या जातात. या गोठ्याच्या भिंती करताना खालच्या निम्म्या भागात पत्रे आणि वरच्या भागात चारही बाजूने जाळी लावली, त्यामुळे गोठा हवेशीर झाला. छपरावर पत्रे लावले आहेत. जाळ्यांतून जास्तीची हवा आणि पाऊस आत येऊ नये म्हणून झडपा बसवल्या. शेळ्यांना फलाटाच्या शेडमध्ये जाणे सोपे होण्यासाठी दोन्ही दरवाजांसमोर लाकडी फळ्यांच्या उतरत्या पायऱ्या बसवल्या. 27 फूट रुंदीच्या गोठ्यामध्ये समांतर तीन कप्पे केले.

लोखंडी पिंप उभे कापून त्याला पाय जोडून कमी खर्चात गव्हाणी तयार केल्या. या गोठ्यामुळे लेंड्या आणि मूत्राची दुर्गंधी कमी झाली. शेळ्यांचे आरोग्य चांगले राहिले. या गोठ्याची क्षमता 100 शेळ्यांची आहे. सध्या गोठ्यामध्ये 70 शेळ्या आहेत. त्यामध्ये 27 नर करडे 13 मादी करडे आहेत. 30 शेळ्या गाभण आहेत. शेळ्यांची सर्व जबाबदारी पुतण्या अनिरुद्धकडे दिलेली आहे. तो लसीकरण, शेळ्यांचे आरोग्य व्यवस्थापनात पारंगत झाला आहे.

शेणखत निर्मिती

सिरसाट यांच्याकडे दोन बैल, दोन म्हशी आहेत. उपलब्ध शेण आणि लेंड्यांपासून कंपोस्ट खत तयार केले जाते. खतनिर्मितीसाठी चार टाक्‍या बांधल्या आहेत. दरवर्षी किमान 16 ट्रॉली खत तयार होते. सरासरी एक ट्रॉली खताचा दर दोन हजार रुपये असा आहे. सिरसाठ सर्व खत स्वतःच्या 11 एकर शेतीला वापरतात.

शेळ्यांचे व्यवस्थापन

1) शेळ्यांना विविध प्रकारचा चारा लागतो, हे लक्षात घेऊन सिरसाट यांनी अर्धा एकर मेथी गवत, अर्धा एकर यशवंत गवत, दोन एकरांवर शेवरी आणि सुबाभूळ लागवड केली आहे. 
2) एका शेळीला दररोज चार किलो कोरडा चारा, एक किलो वाळलेला चारा कुट्टी करून दिला जातो. रोज 70 शेळ्यांना 300 किलो चारा लागतो. 
3) जून ते जानेवारी या काळात शेतात पीक असल्याने शेळ्यांना गोठ्यातच चारा दिला जातो. जानेवारी ते मे या काळात चाऱ्याची उपलब्धता कमी होत जाते, त्यामुळे शेळ्या शेतात चराईला सोडल्या जातात, त्यासाठी दोन मजूर ठेवले आहेत. 
4) गरजेनुसार गाभण शेळ्या आणि करडांच्या वाढीसाठी खुराक दिला जातो. पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार खुराकात शेंगदाणा पेंड, मका, भात कोंडा वापरला जातो. 
5) शेळ्यांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी गोठ्याजवळच टाकी बांधली आहे. 
6) दररोज सकाळी तीन ते चार तास गोठ्याच्या परिसरातील शेतात शेळ्या चारण्यासाठी व पाय मोकळे होण्यासाठी बाहेर सोडल्या जातात. शेळ्यांना व्यायाम झाल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहिले आहे. 
7) पशुवैद्यकांकडून शेळ्यांचे लसीकरण, जंतनिर्मूलन याबाबत शास्त्रीय माहिती घेऊन शेळ्यांचे चांगले व्यवस्थापन ठेवले जाते. 
8) सहा महिन्यांच्या करडांचे वजन 30 किलोपेक्षा जास्त भरते. 
9) दररोजचा चारा, खुराक, पाणी, मजूर आणि इतर व्यवस्थापनाचा खर्च 600 ते 700 रुपये होतो. चारा घरचाच आहे, त्यामुळे शेळ्यांना पुरेसा चारा दिला जातो.

वजनावरच विकतो शेळ्या

शेळ्यांच्या विक्रीबाबत सिरसाठ म्हणाले, की मी बाजारपेठेचा अभ्यास करत असतो. शेळ्या आणि बोकडांचे चांगले आरोग्य ठेवले असल्याने त्यांची वाढ चांगली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून चांगली मागणी आहे. मला शेळ्यांची संख्या वाढवायची असल्याने मी शेळ्या विकत नाही. पुढील टप्प्यात शेळ्यांची संख्या वाढल्यावर महिन्याला सरासरी 15 करडांची विक्री होईल असे नियोजन केले आहे. गेल्या सहा महिन्यांत मी 20 नर करडे विकली आहेत. विक्री मी वजनावर करतो, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेपेक्षा चांगला दर मिळतो.

सहा महिने वयाचा 50 टक्के संकरित बोकड 250 रुपये प्रति किलो या दराने विकला; मात्र 90 टक्के बोअर जातीचा बोकड 450 रुपये प्रति किलो या दराने विकला जातो. सरासरी 11 महिने वयाचा बोकड मी विकतो. सात महिने वयाच्या शेळीला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. वजनावरच शेळी विकतो. माझ्याकडे शेतकरी येतात आणि शेळ्या, बोकडांची नोंद करून जातात, त्यामुळे सध्यातरी विक्रीची समस्या नाही. इतर जनावरांपेक्षा शेळ्यांच्या व्यवस्थापनाचा खर्च कमी आहे. बाजारपेठेतील शेळी आणि बोकडांचे दर स्थिर आहेत, त्यामुळे शेळीपालन मला शाश्‍वत व्यवसाय वाटतो. 


संपर्क - उद्धव सिरसाठ - 7588612821 
(लेखक लातूर येथे कृषी विभागात कार्यरत आहेत.)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate