অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्ड निर्माता...!

सामान्य शेतकरी ते दुग्ध व्यवसायातील ब्रॅण्ड निर्माता...!

थेट येथील युवा शेतकऱ्यांचा प्रवास.

दुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या बळावर असाध्य ही साध्य होते, हा विश्‍वास रुजविण्यात फाळेगाव थेट (ता. जि. वाशिम) येथील बालाजी कोरडे हा युवक यशस्वी झाला आहे. 10 वर्षापूर्वी दूधाळ जनावरांची खरेदी करीत हे दूध घरोघरी विक्री करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला. याच व्यवसायात सातत्य ठेवत त्यांनी पाकीटबंध दूधाचा प्रकल्प उभारला. त्यांचा हा आशावाद निश्‍चीतच विदर्भातील शेतीसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.

असे आहे फाळेगाव थेट

वाशिम पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या फाळेगाव थेट या गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजारावर आहे. याच गावातील बालाजी व गणेश कोरडे या दोन भावंडांनी शेतीपूरक व्यवसायासाठी पुढाकार घेतला. कोरडे कुटूंबियांची सात एकर कोरडवाहू शेती. या शेतीत सोयाबीन, तूर यासारखी पावसावर अवलंबून असलेली पीक घेतली जातात. सोयाबीनची एकरी उत्पादकता 8 क्‍विंटल तर तुरीची एकरी 5 क्‍विंटल होत होती. कुटूंबाला आर्थिक सक्षम करण्याचा उद्देश ठेवत या दोन्ही भावंडांनी कोरडवाहू शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षांपूर्वी दहा म्हशी व दहा गाईंची खरेदी त्यांनी केली. वाशिम तसेच बडनेरा येथील गुरांच्या बाजारातून मुऱ्हा तसेच जाफराबादी जातीच्या म्हशींची खरेदी झाली. गाईंच्या खरेदीसाठी त्यांनी थेट नगर जिल्ह्यातील लोणीचा बाजार गाठला. जनावरांच्या खरेदीसाठी पैसा नसल्याने त्यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया वाशिम शाखेकडून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासोबतच गाठिशी असलेला पैसाही जोडला. 45 ते 50 हजार रुपयांना म्हशीची खरेदी झाली तर हॉलेस्टाईन गाईची खरेदी 50 ते 55 हजार रुपयांना करण्यात आली. 20 जनावरांसाठी 30 बाय 50 फुट आकाराचा गोठा उभारण्यात आला. बंदिस्त गोठ्याच्या उभारणीवर 2 लाख रुपयांचा खर्च झाला.

जनावरांचे असे होते व्यवस्थापन

दूधाळ जनावरांना 2 किलो ढेप (30 रुपये किलो), मक्‍याचा भरडा 1 किलो (17 रुपये किलो) त्यासोबतच हिरवा चारा (कडबा 10 रुपये पेंडी), हरभरा कुटार सरासरी 7 किलो (वाहतुकीसह 4 हजार रुपये ट्रॉली) याप्रमाणे एका जनावराला पशुखाद्य दिले जाते.

सुरवातीला घरोघरी विक्री

10 गाईंपासून (एक गाय सरासरी 18 लिटर) 125 लिटर दूध मिळत होते. त्यासोबतच 10 म्हशीपासून 65 लीटर दूधाची उपलब्धता होत होती. दूध काढणीनंतर त्यांची दुचाकीने वाशिम येथे घरोघरी पोच करण्याचे काम बालाजी यांनी केले. त्यावेळी सुरूवातीला घरपोच म्हशीचे दूध 29 रुपये प्रती लिटरने तर गाईचे दूध 18 रुपये लिटर दूधाने विकल्या जात होते. त्यानंतर टप्याटप्याने दूधाचे दरात वाढ होत आज म्हशीचे दूध 50 रुपये तर गाईचे दूध 35 रुपये लिटरने ते विकतात.

शेतकरी मंडळाची केली स्थापना

शेतीपूरक व्यवसायाची बीज गावपातळीवर रुजविणाऱ्या बालाजी व गणेश या भावंडांनी त्यानंतर गावात जनसेवा शेतकरी मंडळाची बांधणी गावपातळीवर केली. गावातील युवकांना देखील व्यावसायिकतेचे धडे मिळावे असा हेतू त्यामागे होता. शेतकरी मंडळात गावातील 15 जणांचा समावेश आहे. नाबार्डकडे या मंडळाची नोंद करण्यात आली आहे.

पूर्वा दूधाचा ब्रॅण्ड

नाबार्डच्या अनुदान व अर्थसहाय्यातून पाकीटबंद दूधाचा प्रकल्प त्यांनी सुरु केला आहे. पाकीट बंदसाठीची पूर्ण यंत्रणा 12 लाख 55 हजार रुपयांची आहे. यातील 7 लाख 97 हजार रुपयांचे नाबार्डने अनुदान दिले आहे. उर्वरित रक्‍कम ही मंडळाच्या खात्यातून जोडले आहेत. पूर्वा ब्रॅण्डने या दूधाची विक्री होते. त्याकरिता लागणारे प्लॅस्टीक पिशव्या या औरंगाबाद येथे छापण्यात आल्या. त्यासोबतच आईस्क्रीम, श्रीखंड व दही सरकरीता लागणारे खास कपची खरेदी कराड (जि. सातारा) येथून केल्याचे गणेश यांनी सांगितले. आईस्क्रीम कपची खरेदी 90 पैसे, दही कप अडीच रुपये तर पावकिलो श्रीखंड कप 3 रुपये 60 पैसे याप्रमाणे खरेदी केल्याचे ते सांगतात. उन्हाळ्यातील चार महिने आईस्क्रीमला मागणी राहते. 20 ग्रॅम कप 5 रुपये, 40 ग्रॅम कप 10 रुपये तर 360 ग्रॅम फॅमिली पॅक 150 रुपयांना विक्री होतो. आईस्क्रीमवर सरासरी 30 टक्‍के नफा राहतो, असे त्यांनी सांगितले. आज केवळ गाईच्या दूधाचे पॅकींग त्यांच्याद्वारे होते. दही 60 रुपये किलो, श्रीखंड 20 रुपये 100 ग्रॅम, लोणी 350 रुपये किलो, पनीर 300 रुपये किलो या दराने विकल्या जाते. पाकीटबंद गाईच्या दूधाचा पुरवठा नवोदय विद्यालयाला देखील केला जातो. गुणवत्ता राखल्यानेच शासनाच्या नवोदय विद्यालयात दूधाची विक्री खेड्यातील एका सामान्य युवकाला करणे शक्‍य झाले. कोरडे भावंडाच्या असामान्य कल्पनाशक्‍तीची कल्पना या माध्यमातून आल्याशिवाय राहत नाही. आजही बालाजी कोरडे हे घरोघरी दूध पोहचविण्याचे काम करतात तर त्यांचे बंधू गणेश हे वाशिमच्या सिव्हील लाईन चौकात असलेले आऊटलेट सांभाळतात.

दूधाची होते खरेदी

पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने त्यांनी आपल्याकडील दूधाळ जनावरांची विक्री केली. आज त्यांच्याकडे 3 म्हशी आहेत. परंतू इतर दूग्ध उत्पादकांकडून ते दूधाची खरेदी करतात. 500 लिटर दूधाची खरेदी ते इतरांकडून करतात. म्हशीच्या 6.0 फॅट करिता 36 रुपये प्रती लिटरचा दर दिला जातो. कळंबा महाली, जांभरुण, शिरपुटी, फाळेगाव येथील दूध उत्पादकांकडून दूध खरेदी केले जाते. शासकीय दूधाचा खरेदी 31 रुपये दराने होत असताना कोरडे यांनी मात्र शेतकऱ्यांना 36 रुपये प्रती लिटरचा दर दिला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी होणाऱ्या 500 लिटर दूधाची दररोज विक्री होते. प्रक्रियेकामी 200 लिटर अतिरिक्‍त दूधाची खरेदी होते. उन्हाळ्यात आईस्क्रीमला मागणी राहते. त्यामुळे उर्वरित काळात 200 ऐवजी 150 लीटर दूधाचीच खरेदी केली जाते. त्यापासून लोणी, दही आणि पनीर यासारखे उपपदार्थ तयार करुन त्याची विक्री ते करतात. कौन कहेता हैं, आसमाँ में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयतसे उछालो यारो ! याच विश्‍वासातून सामान्य शेतकऱ्याने दुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या बळावर असाध्य ते साध्य करुन दाखविले.

शेतकरी संपर्क: बालाजी कोरडे – 9767620833

शब्दांकन:- दत्ता इंगोले

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate