नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चाकोरे गावातील विमल आचारी यांनी त्यांचे पती जगन आचारी यांच्या सहकार्याने शेतीत अनेक अनुकूल बदल घडवून आणीत उत्पन्न वाढविले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत त्यांनी शेतील घडवून आणलेले परिवर्तन शेतकऱ्यांसोबतच महिलांनादेखील प्रेरक ठरले आहेत.
नाशिकपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या चाकारे या आदिवासी भागात बहुतांशी शेतकरी पारंपरिक पद्धतीने भातशेती करीत असत. आचारी यांचे कुटुंब पूर्वी जवळच असलेल्या पेगलवाडी गावात पारंपरिक शेती करीत असे. शेती हेच संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यामुळे धरण बांधण्यासाठी भूसंपादनात जमीन गेल्यावर कुटुंब चाकोरे येथे स्थलांतरीत झाले.
चाकोरेचा संपूर्ण परिसर त्यावेळी उजाड असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अडीच एकर जागेवर आचारी कुटुंबाने शेती करण्यास सुरूवात केली. कृषी सहाय्यक राजेंद्र काळे यांनी विमल आचारी यांना भाताचे नवे बियाणे वापरण्याबाबत माहिती दिली. कृषी विभागामार्फत अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अधिक उत्पादन देणारे बियाणे आणि बीज प्रक्रीयेसाठी औषधे उपलब्ध करून देण्यात आले. सोबत औषध फवारणीसाठी स्प्रे पंप 50 टक्के अनुदानावर देण्यात आले. त्याचा परिणाम पहिल्याच हंगामात दिसून आला आणि एकरी 10 पोते येणारे उत्पादन दुप्पट होऊन 20 पोते झाले.
यानंतर स्वत:चे परिश्रम, कुटुंबाची साथ, बचत गटाच्या माध्यमातून समुह शेतीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या सुविधा आणि शेतीतील प्रयोगशिलतेच्या बळावर विमल यांनी मागे वळून पाहिले नाही. जगन आचारी यांनी त्यांना भक्कम साथ देत त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या विविध योजनांचा चांगला उपयोग करून घेत त्यांनी शेतातील उत्पादन वाढविण्यावर भर दिला.
कृषि विभागामार्फत आत्मा अंतर्गत फुले नाचणी, नागली, कांदा बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. दोन वर्षापूर्वी गोबर गॅससाठी अनुदान मिळाल्याने घरच्या स्वयंपाकासाठी इंधनाची व्यवस्था झाली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत ‘गतिमान मका’ योजने अंतर्गत ग्रीन फीड उत्पादनासाठी सहकार्य केले. कृषि विभागाने बांधावर तूर, फळझाडे लागवडीसाठी सहकार्य केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत शेतीची अवजारे, बियाणे, गिरीराज कोंबड्या आदीसाठी सहकार्य करण्यात आले. शेतीला जोडधंद्याची जोड मिळाल्याने उत्पन्नात आणखी भर पडत गेली. समुहशेतीच्या माध्यमातून त्यांनी ऑईल इंजिनची व्यवस्था केली आहे.
हे सर्व करताना विमल आचारी आणि त्यांचे पती विविध कृषी प्रदर्शन, कार्यशाळेत सहभागी होऊ लागले. शेतातील नवनव्या प्रयोगाची माहिती घेऊन शेतात त्याचा उपयोग करण्यावर त्यांनी भर दिला. सासू, सासरे, दीर अशा कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे आज आपल्या मामेसासऱ्यांची सात एकर जमीन बटाईवर घेऊन त्यातही चांगले उत्पादन घेतले आहे.
आज भाताबरोबरच कांदा, हरभरा, गहू, ऊस आणि आंतरपीक म्हणून बटाटा, लसूण, कोबी, टमाटा, वांगे, अशा विविध प्रकारचे उत्पादन ते घेत आहेत. मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा आचारी कुटुंबाचा प्रयत्न आहे. विमला आचारी यांच्या कार्यामुळे त्यांना बारामती येथील आप्पासाहेब पवार प्रगतीशील शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. चेन्नई येथे होणाऱ्या कार्यक्रमातही त्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. विविध संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
एक महिला असूनही पतीच्या खांद्याला खांदा लावून विमला यांनी शेतात घडवून आणलेला बदल इतर शेतकऱ्यांनाही प्रेरक ठरला आहे. आज गावातून भाजीपाल्याची एकतरी गाडी शहरातील बाजारात जाते. शेतीतील व्यवस्थापन आणि शासकीय योजनांचा लाभ घेत अधिक भरारी घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
लेखक - डॉ.किरण मोघे
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 6/3/2020
हवामानाच्या परिस्थितीत सध्या सातत्याने बदल जाणवत आ...
जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून...