অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डाळिंब विक्री प्रभावी नियोजन

वाशीम जिल्ह्यात मंगरूळपीर तालुक्‍यातील सावरगाव येथील प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भाच्या मातीत 23 एकरांत डाळिंबाची शेती फुलवून विदर्भातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. लागवडीच्या दुसऱ्या वर्षी त्यांनी एकरी 15 टन मालाचे उत्पादन घेत 23 एकरांत 350 टन माल पिकवला. मात्र, व्यापाऱ्यांना त्याची विक्री करताना चोख नियोजनाची चुणूक दाखवत विक्रीची जोखीम कमी केली.

योग्य नियोजनातून शेती केली तर विदर्भातही डाळिंबाची नगदी शेती होऊ शकते हे वाशीम जिल्ह्यातील सावरगाव येथील कुलदीप राऊत यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी "ऍग्रोवन''मधील डाळिंब शेतीबाबत तज्ज्ञांचे लेख व मार्गदर्शन या जोरावर डाळिंबाची शेती करण्याचा निर्धार केला. मंगरूळपीर येथे आयोजित बारामती येथील प्रगतिशील शेतकरी तात्यासाहेब तावरे यांच्या डाळिंब लागवडीवरील व्याख्यान व मार्गदर्शन शिबिराचा लाभ त्यांना मिळाला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली डाळिंबाची शेती सुरू केली. पत्नी सौ. सोनाली यांची साथ त्यांना लाभली. डाळिंबाच्या शेतीत यश मिळवण्यासाठी कोणत्या अडचणी पार कराव्या लागतात, यासंबंधीचे डाळिंब उत्पादकांचे अनुभव त्यांनी जाणून घेतले. सखोल व परिपूर्ण माहितीची शिदोरी घेऊन त्यांनी आपले गाव गाठले. 

डाळिंब शेतीचा प्रवास

संत्रा व पपई या पारंपरिक पिकांत यश संपादन करणारे राऊत यांनी मंगरूळपीर येथे सुमारे 19 महिन्यांपूर्वी बाजारातील मागणी लक्षात घेऊन भगवा जातीच्या डाळिंबाची कलमे चिखली येथून आणली. 13 बाय 10 फूट अंतरावर कलमांची 23 एकर शेतात लागवड केली. सोलापूर तालुक्‍यातील आटपाडी येथील डाळिंब उत्पादक प्रकाश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. 

पाण्याचे व्यवस्थापन सांभाळताना शेतापासून पाच किलोमीटर अंतरावरील धरणावरून दोन व चार कि.मी. अंतरावरील विहिरीवरून दोन अशा पाइप लाइन केल्या. खते, कीडनाशके यांचे व्यवस्थापन सल्लागार शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. झाडांना मोहर फुटायला सुरवात होताच त्यांनी परागीभवन करण्यासाठी मधमाश्‍यांची व्यवस्था केली. एकूण नियोजनातून पहिल्याच वर्षी झाडाला 250 ग्रॅमपासून ते अगदी 500 ग्रॅमपर्यंत वजनाची फळे लगडली. त्या वेळी सुमारे 23 एकर क्षेत्रातून 90 टन डाळिंबातून साठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. 

विदर्भात एवढ्या मोठ्या क्षेत्रावर हा प्रयोग यशस्वी झाला. आता पुढील वर्षी उत्पादनवाढ घ्यायची होती. त्याचबरोबर मिळणाऱ्या उत्पादनाची विक्रीही तेवढ्याच चांगल्या प्रकारे होणे गरजेचे होते. राऊत यांनी ती जबाबदारी निभावली. लातूर भागातील शेतकऱ्याकडून सुमारे 25 मधुमक्षिका पेट्या घेऊन त्यांनी बागेत परागीभवन यंदाही केले. मोठ्या क्षेत्रावर मधमाश्‍यांचा प्रयोग अधिक यशस्वी ठरतो असे ते म्हणतात. या वर्षी त्यांनी डबल लॅटरल ऐवजी सिंगल लॅटरल वापरून ठिबक सिंचन केले. यंदा उन्हाळ्यात तापमान 45 अंशांपेक्षा जास्त असूनही पिकाला तसा त्रास झाला नाही. पाऊसही चांगला झाला असल्याने पाण्याची टंचाई जाणवली नसल्याचे राऊत म्हणाले. यंदा चारशे ग्रॅमपासून ते अगदी आठशे ग्रॅमपर्यंत वजनाची डाळिंबे जवळपास प्रत्येक झाडाला लगडली होती. राज्यभरातील अनेक व्यापारी राऊत यांच्या बागेत डाळिंबाच्या मागणीसाठी आले होते. विशेष बाब म्हणजे वाशीम, यवतमाळ, अकोला, बुलडाणा अशा विदर्भातूनच नव्हे; तर मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी राऊत यांच्या बागेला भेट दिली आहे. पूर्ण वेळ शेतीकडेच लक्ष देता यावे यासाठी राऊत यांनी 
आपले कृषी सेवा केंद्रही बंद केले आहे. येत्या काळात अजून गुणवत्तापूर्ण शेती करणार आहेत. विदर्भातील अनेक शेतकरी आपल्यापासून प्रेरणा घेत डाळिंब शेतीकडे वळले आहेत, असे त्यांनी सांगितले. 
कुलदीप राऊत - 9923610581 

मार्केटसाठी व्यापाऱ्यांकडून घेतली हमी

राऊत म्हणाले, की लागवडीपासून डाळिंबाचे माझे हे तिसरे वर्ष व दुसरे उत्पादन. पहिल्या वर्षी 23 एकरांत 
सुमारे 90 टन उत्पादन घेतले. आता मागील वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी मी याच क्षेत्रातून सुमारे 450 टनांपर्यंत माल घेतला. यंदा रेसिड्यू फ्री म्हणजे कीडनाशक अवशेषमुक्त शेतीचे नियोजन होते; मात्र अनुभवाअभावी ते तितकेसे शक्‍य झाले नाही. त्यात सुमारे 100 टन मालाचे नुकसान झाले. 
एकूण उत्पादन 350 टन मिळाले. त्यातील 300 टन माल कोलकत्याच्या व्यापाऱ्याला विकला. त्याच्यामार्फत तो बांगला देशात निर्यात झाला. सुमारे 27 ते 28 दिवसांत माल पाठवण्याची प्रक्रिया सुरू होती. या मालाला जागेवर किलोला 85 रुपये दर मिळाला. सुमारे 23 एकरांतील एवढ्या मोठ्या स्वरूपातील मालाची विक्री एकाच वेळी करणे ही सोपी गोष्ट नव्हती. व्यापारी यात काही फसवणूक करतील अशी भीतीही होती. काही व्यापाऱ्यांनी 90 ते 92 रुपये दरानेही डाळिंब मागितले होते; मात्र मी पहिल्यापासून अशी भूमिका ठेवली, की जो व्यापारी दहा लाख रुपये ऍडव्हान्स रक्कम देईल त्यालाच मालाची विक्री केली जाईल. कोलकत्याच्या व्यापाऱ्याने ती अट मान्य केली. अधिक उत्पादन घेताना रिस्क काही कमी नसते. मी व्यापाऱ्यांना आणखी एक अट सांगितली की प्रत्येक गाडी भरताना पेमेंट रोखच करावे लागेल, अन्यथा पुढच्या गाडीत माल भरू देणार नाही. या सर्व शर्तीवर व्यापारी मान्य झाल्यानंतरच विक्री सुकर झाली. 
उत्पादनापैकी 50 टन माल मी लोकलमध्ये म्हणजे नागपूर, नाशिक येथे 50 ते 80 रुपये प्रति किलो या दरात विकला. राऊत म्हणाले, की यंदाही क्षेत्रात बदल करणार नाही. मात्र, नियोजन पहिल्या वर्षापासून इतके चोख ठेवणार आहे की फळ काढणीस येणार तेव्हापासून विक्रीचे नियोजन करणार, जे यंदा मला जमले नव्हते. अशा नियोजनातून मुंबईसारख्या बाजारपेठेतच व्यापाऱ्यांना माल विकणार आहे. युरोपला माल विकताना व्यापारी दोन टप्प्यांत पेमेंट करतात. मात्र, मला ते मंजूर नाही. दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील; मात्र जोखीम घेऊन फसवणूक होण्यापेक्षा ते चांगले असते. 
रामदास पद्मावार 

मूर्तिजापूर, परतवाडा या भागातून अनेक शेतकऱ्यांना 10- 12 वर्षांपूर्वी राऊत यांची सुमारे 23 एकर क्षेत्रावरील पपई शेती दाखवण्यासाठी मी सहकार्य केले, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन वाशीम जिल्ह्यात सुमारे पाच ते सहा हजार एकरांवर आता डाळिंबाची लागवड झाली आहे. या सर्व बागांची परिस्थिती चांगली आहे. हे पीक अत्यंत मेहनतीचे आहे. शेतकऱ्यांनी शक्‍यतो तेलकट डाग व मर रोगापासून मुक्त असलेली रोपे निवडावीत. विदर्भात नवीन पिकास नवीन दिशा देणारे शेतकरी दिसू लागले आहेत, ही समाधानाची बाब आहे. 
- अनिल बोंडे, 
उपविभागीय कृषी अधिकारी, 
वाशीम

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate