कळंबपासून 10 किमी अंतरावर असलेल्या चापर्डा या गावात बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबिन, तुर यासारखी पारंपरिक पिके घेतात. ओलिताची साधणे नसल्याने शेतकऱ्यांना जेमतेमच उत्पन्न मिळते. मात्र गावातीलच स्वप्निल नागपूरे या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीसोबतच भाजीपाला उत्पादनाचा प्रयोग आत्माच्या सहकार्याने राबविल्याने केवळ अर्धा एकर क्षेत्रात 60 हजार रुपयाचे भेंडीचे उत्पन्न मिळविले आहे.
पारंपरिक पिकांना खर्च अधिक व तुलनेत उत्पन्न कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे कमी खर्चाच्या भाजीपाला उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळावे म्हणून आत्माच्यावतीने प्रयत्न केले जात आहे. अनेक शेतकरी आत्मविश्वासाने भाजीपाला उत्पादनातुन स्वयंपुर्ण झाले आहे. चापर्डा येथे स्वप्निल नागपूरे हे सुध्दा पारंपरिकच शेती करायचे. आत्मा योजनेमुळे त्यांना भाजीपाला पिकांची माहिती झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या अर्धा एकर शेतात भेंडी हे पीक घेण्याचे ठरविले. 15 जूलै 2014 रोजी त्यांनी भेंडीची लागवड केली.
मात्र अपुऱ्या पावसामुळे भेंडीला फटका बसणार असतांनाच त्यांनी शेतात परिश्रमाने भेंडीचे पीक उभे केले. आत्मा योजनेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेले खत, औषधी आणि तुषार सिंचनाच्या प्रभावामुळे शेतात भेंडीचे पीक बहरले. त्यानंतर दर दोन दिवसांनी 50 ते 60 किलो भेंडीचे उत्पादन निघत होते. अद्यापही भेंडीचे पीक घेतले जात आहे. यवतमाळ येथील बाजारपेठेत प्रती किलो 30 ते 40 रुपये भाव मिळाल्याने केवळ अर्धा एकरात 60 हजार रुपयाचे भेंडीचे उत्पादन झाले. खरीब हंगामात पीक प्रात्यक्षिक या बाबीतुन भेंडी पिकाची निवड केल्यानंतर त्यांना बियाणे, रासायनिक खते, जैविक कल्चर, औषधी आदींचा पुरवठा करण्यात आला.
अर्धा एकरात 12 हजार रुपये खर्च जाता 48 हजार रुपयाचे निव्वळ उत्पन्न त्यांना शिल्लक राहिले आहे. श्री.नागपूरे यांना भाजीपाला पिकासाठी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही.के. गायकवाड यांनी प्रोत्साहित केले. त्यानंतर नागपूरे यांनी 8 एकरात भेंडी, पालक, वांगे, चवळी, कारले, कोबी, मिरची, वाल, दोडका, ढेमस, मेथी या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे.पुर्वी पारंपरिक पिकांना रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर केल्यानंतरही पदरी निराशाच येत होती. भाजीपाला पिकांना सुरुवात केल्यानंतर विशेषत: भेंडी उत्पादनासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केल्याने चांगले उत्पन्न हाती येत आहे. शेतात रसायनांचे प्रमाण कमी केल्याने आरोग्यासाठी चांगल्या शेतमालाची निर्मिती माझ्या हातून होत असल्याचे स्वप्निल नागपूरे या शेतकऱ्यांनी सांगितले.-
लेखक - मंगेश वरकड
जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
परतुर (जि. जालना) तालुक्यातील खांडवीवाडी येथील प्र...
अभ्यास, ज्ञान मिळवण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि...
ऊस हे आपले प्रमुख नगदी पीक असून करार शेती असल्याने...
उत्पादनसंस्थेला वस्तूचे उत्पादन करण्यासाठी निरनिरा...