राजकारण व समाजकारणाचा व्याप सांभाळून पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे क्षेत्रात वर्षभर विविध भाजीपाला व फळे उत्पादित करण्याचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले आहे. उत्पादित सर्व शेतमाल शंभर टक्के सेंद्रिय व सकस असल्याने आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य निरोगी ठेवण्याचे वेगळे समाधान त्यांनी मिळवले आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे शेती क्षेत्रात घट होत आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक कुटुंबांना सकस, रसायनविरहित शेतमाल हवा असतो. त्यासाठी जादा किंमत देण्याचीही तयारी असते. मात्र अनेक वेळा असा सेंद्रिय माल वर्षभर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतोच असे नाही. मात्र पुणे शहरातील हडपसर या उपनगरात वास्तव्यास असलेल्या राजलक्ष्मी भोसले यांनी वर्षभर विविध भाजीपाला व फळे सेंद्रिय पद्धतीने व तेही थोडक्या क्षेत्रात पिकवून आदर्श उदाहरण तयार केले आहे.
राजलक्ष्मी भोसले यांचे वडील वकील होते. घरी तशी शेतीची पार्श्वभूमी नव्हती. मात्र त्यांचे सासर शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. भोसलेताईंनीही सन 1977 च्या सुमारास सासरची शेती मन लावून केली. प्रत्येक गोष्टीत झोकून देऊन काम करण्याची वृत्ती जोपासली. कर्ज घेऊन म्हैस घेतली. त्यातून म्हशींची संख्याही वाढवली. त्यादरम्यान ब्रॉयलर कोंबड्यांचा 50 हजार पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसायही त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळला. शेतीकामातील त्यांचा अनुभव वाढला. आत्मविश्वास तयार झाला. पुढे आपल्या पतीबरोबर बांधकाम व्यवसायातील व्यवस्थापनही त्यांनी तितक्याच क्षमतेने यशस्वीपणे पेलले. शेतीतील समस्या माहीत असल्याने पुढे समाजकारण, राजकारणात त्यांनी लक्ष घातले. 15 वर्षे नगरसेविका व पावणेतीन वर्षे पुणे शहराचे महापौरपद त्यांनी ताकदीने सांभाळले. आताही समाजसेवेचे विविध व्याप सांभाळताना आपल्या घरच्या शेतीकडे त्यांनी जराही दुर्लक्ष केलेले नाही. नित्यनेमाने त्या शेतीला वेळ देतात. त्यात राबतात. त्याचे त्यांना कष्ट वाटत नाहीत. उलट शेतीतील सर्व कामे करताना आपल्याला पदोपदी आनंदच वाटत असल्याचे त्या सांगतात. भोसलेताईंचे आठ ते दहा व्यक्तींचे कुटुंब आहे. आपल्या सर्व कुटुंबाला आपण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले सकस अन्न खाऊ घालतो, याचे त्यांना मनस्वी समाधान आहे. त्याचबरोबर नवीन पिढीला किंवा देशातील नागरिकांनाही असेच अन्न मिळावे असे त्यांना वाटते.
स्वतःच्या बंगल्यापासून काही अंतरावर भोसलेताईंची सुमारे 35 गुंठे क्षेत्र आहे. सुरवातीला त्यात दहा गुंठ्यापासून सुरवात केली. आपल्या कुटुंबाला दररोज किती भाजीपाला लागतो याचा अंदाज टप्प्याटप्प्याने मिळू लागला. त्यानुसार वर्षभर आपल्या शेतात विविध पिके कशी उपलब्ध होत राहतील, याचे व्यवस्थापन सुरू केले. आता सर्वच क्षेत्रांत शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने शेतमाल पिकवला जातो. भाजीपाला व फळांची चव, त्यांची गुणवत्ता अत्यंत चांगली असल्याचे भोसलेताई सांगतात.
1)सध्या शेतात प्रामुख्याने गाजर, कांदे, वांगे, पावटा, पापडी, घेवडा, चवळी, गवार, भेंडी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, लसूण, नवलकोल यांची लागवड केली जाते. परदेशी भाजीपाल्यांमध्ये सॅलरी, रोमन सॅलेड, लोलोरा सॅलड, लिक, ब्रोकोली, लाल मुळा आहेत.
2) फळांमध्ये पेरू, मोसंबी, शेवगा, केळी, सीताफळ, पपई, लिंबू ही पिके आहेत.
3) एखादे पीक वर्षातून किमान दोनदा घेण्याचा प्रयत्न असतो. उदा. कोबी-प्लॉवर फुलांवर आला, की अन्य मोकळ्या होणाऱ्या क्षेत्रात त्याच्या पुढील लागवडीचे नियोजन सुरू होते.
4) मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू आदी पिके अत्यंत कमी कालावधीची असल्याने त्यांचे वर्षभर उत्पादन सुरू असतेच.
5) सॅलेड, सेलेरी, लीक, ब्रोकोली यांचे सूप तर वर्षभर घरी तयार केले जाते.
6) बांधावर तूर घेऊन 14 किलोपर्यंत त्याचे उत्पादनही घेतले आहे.
7) मिरचीचे सात वाफ्यांत उत्पादन घेतले. 8 ते 10 किलो वाळलेली मिरची मिळून घरासाठीची मसाल्यांची गरज पूर्ण झाली.
8)शेतात अनेकवेळा काही भाजीपाल्यांचे बी पडून त्याचे रोप तयार होते. त्याचाही योग्य उपयोग करून घेतला जातो. त्यामुळे बियाणासाठी लागणाऱ्या रकमेमध्ये बचत झाली आहे.
9) कुटुंबासाठी वर्षभर सेंद्रिय भाजीपाला उपलब्ध करण्याचे तंत्र भोसलेताईंनी अशा रीतीने चांगले आत्मसात केले आहे.
"किचनवेस्ट' म्हणजे स्वयंपाकगृहातील टाकाऊ पदार्थांचा वापर खत म्हणून केला जातो. पुणे महापालिकेने रामटेकडी येथे उभारलेल्या गांडूळ खत प्रकल्पातून खताची (व्हर्मिकंपोस्ट) खरेदी करून ते पिकांना दिले जाते. व्हर्मिकंपोस्टचा वापर प्रत्येक पिकाला एक ते दोन वेळा केला जातो. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन पिकांची चांगली वाढ होण्यास मदत झाली आहे. भाजीपाल्यांवर रोग-किडीचे प्रमाण कमी होऊन दर्जेदार उत्पादन मिळत आहे. येत्या काळात सूक्ष्म जीवांवर आधारित सेंद्रिय खते तयार करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे भोसलेताईंनी सांगितले.
भोसलेताई म्हणाल्या की रोग-किडीच्या नियंत्रणासाठी गोमूत्र, दशपर्णी अर्क व कामगंध सापळे यांचा वापर केला जातो. मात्र अलीकडील वर्षांत असा अनुभव आला, की "किचन वेस्ट'वर आधारित ओल्या कचऱ्यापासून तयार केलेले कंपोस्ट खत वापरल्यामुळे झाडांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाली आहे.
कुटुंबाला सदस्यसंख्येनुसार दररोज चार ते पाच किलोपर्यंत म्हणजे चारशे- पाचशे रुपयांचा भाजीपाला लागतो. मात्र शेतातूनच ही गरज पूर्ण होत आहे. प्रति कांद्याचे त्यांना दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत वजन मिळाले आहे.
छोट्या शेतकऱ्यांनी आपण राबवलेल्या शेती पद्धतीचा "पॅटर्न' राबवला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळू शकते. आज शहरांमध्ये सेंद्रिय भाजीपाल्याला वाढती मागणी आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारणे, सकस अन्न मिळणे याचबरोबर शेतमालाचे मूल्यवर्धन, गुणवत्तावाढ या गोष्टी साध्य होऊन शेतकऱ्यांच्या मालाला अधिक दर मिळणे शक्य होईल. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती आवर्जून सुरू करावी. त्यांना घरीही असेच सकस अन्न सेवन करता येईल. शेतकऱ्यांना त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
भोसलेताईंनी दक्षिणेकडे आढळणाऱ्या लाल केळ्यांची तीन-चार झाडे लावली आहेत. सेंद्रिय पद्धतीने पोसलेल्या या केळ्यांची चव अत्यंत चांगली असून, मागील दीड वर्षांपासून त्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. या केळ्यांचा एक घड 35 ते 50 किलोपर्यंतही मिळाला आहे.
-सकस अन्न खाल्याने आपले स्वास्थ्य निरोगी राहते.
-नातेवाइकांना आपण उत्पादित केलेल्या सेंद्रिय मालाचा वानवळा दिला जातो. या भाजीपाल्याची चव घेतल्यानंतर त्यांच्याकडून जेव्हा चांगली प्रतिक्रिया ऐकायला मिळते, तेव्हा मिळणारे समाधान वेगळेच असते.
राजलक्ष्मी भोसले-9822012960
हडपसर, ता- हवेली, जि - पुणे
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत - अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...