कमी धारणक्षेत्रामध्ये किफायतशीर शेती होऊ शकत नाही, या संकल्पनेला बाभूळगाव तालुक्यातील उमरी (स्मारक) येथील महादेव छत्रपती ढेपे या शेतकऱ्याने खोटे ठरविले आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत भाजीपाला पिकांपासून वार्षिक दोन लाखाचे उत्पन्न मिळविणाऱ्या या शेतकऱ्याने परिसरातील शेतकऱ्यांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
श्री.ढेपे यांच्याकडे वडीलोपार्जीत 3.50 एकर इतकी शेतजमीन आहे. या शेतीवर दरवर्षी परंपरेने सोयाबीन, कापसाचे पीक घेतले जायचे. या पिकांना खर्च अधिक आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न कमी अशी स्थिती असल्याने त्यांनी भाजापाला पिकाकडे लक्ष दिले. काही वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या मदतीने शेतात विहीर व मोटर बसवून सिंचनाची सुविधा उपलब्ध केली. ओलिताची सोय उपलब्ध झाल्याने त्यांनी पहिल्या वर्षी अर्धा एकर क्षेत्रावर भाजीपाला पिके घेण्यास सुरूवात केली. त्यातून त्यांना चांगला नफा मिळू लागला.
श्री. ढेपे यांना आत्मा योजनेची माहिती झाल्यानंतर त्यांनी या योजनेंतर्गत भाजीपाला पिकाचे प्रशिक्षण, अभ्यास दौरे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताला भेटी दिल्यानंतर त्यांचा भाजीपाला पिकांबाबत आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी या पिकाखालील क्षेत्रात वाढ केली. आजमितीस ते दरवर्षी 2.50 एकर क्षेत्रावर टोमॅटो, सांभार, भेंडी, चवळी सारख्या भाजीपाला पिकांची लागवड करीत आहेत. उर्वरीत एक एकर क्षेत्रावर कापूस अथवा सोयाबीनचे पीक घेतात.आत्मा योजनेंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान, पिकांची लागवड, खर्चात बचत, पिकांचे संगोपन आदी बाबी त्यांनी आत्मसात केल्याने गेल्या तीन वर्षात त्यांच्या भाजीपाला उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. सन 2011-12 मध्ये त्यांना भाजीपाल्यापासून 1 लाख 30 हजाराचे उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्या वर्षी 2012-13 मध्ये 1 लाख 55 हजार तर गेल्यावर्षी 2 लाखाचे उत्पन्न त्यांना मिळाले. सदर भाजीपाला स्थानिक बाजारासह बाभूळगाव व यवतमाळ येथे विक्री करतात. शेतीसाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी ते कुटुंबासह स्वत: शेतीची कामे करतात त्यामुळे उत्पादन खर्चातही बरीच कपात त्यांनी केली आहे.
दैनंदिन स्वयंपाकासाठी बऱ्याच वस्तू लागत असतात. त्यातील बहुतांश वस्तू खरेदी कराव्या लागतात. मात्र ढेपे हे स्वयंपाकासाठी दररोज लागणाऱ्या मोहरी, जीरे, सोप, ओवा, कांदा यासारख्या वस्तू स्वत: थोड्या क्षेत्रात लागवड करून उत्पादीत करतात त्यामुळे त्यांना या वस्तू बाहेरून पैसे देऊन विकत आणाव्या लागत नाही.
लेखक - मंगेश वरकड जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ
स्त्रोत : महान्युजअंतिम सुधारित : 1/29/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...