অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विविध फुलपिकांतून यश

सातत्य, प्रयोगशीलता आणि वैविध्य या वैशिष्ट्यांमुळे पुणे जिल्ह्यातील शिरोली बुद्रुक येथील राजाराम चौधरी यांनी फूलशेती यशस्वी केली आहे. घरचेच बियाणे, गांडूळखत निर्मितीबरोबरच मजूरखर्चात बचत करीत दर्जेदार फुलांचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. शेतकऱ्यांमध्ये आपल्या शेतीतील तंत्रज्ञानाचा प्रसारही केला आहे.

 

शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील राजाराम चौधरी यांची एकूण दीड एकर शेती. त्यातील एक एकरवर ऊस, तर अर्धा एकर क्षेत्रावर ते बाजरी, गहू, भेंडी, हरभरा, ज्वारी अशी पिके घ्यायचे. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी दिगंबर देशमुख यांनी शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी त्यांची निवड केली. त्यात म्हैसूर, दिल्ली, बंगळूर, काश्‍मीर येथील फुलांची शेती पाहण्याची संधी चौधरी यांना मिळाली. त्यानंतर फूलशेतीची आवड निर्माण होऊन प्रेरणा घेत त्यांनी 12 ते 15 गुंठ्यावर ही शेती करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून फूलशेतीचा अनुभव त्यांच्या गाठीस जमा झाला आहे.

शेवंती ठरले किफायतशीर पीक

शेवंती हे चौधरी यांचे मुख्य फूलपीक आहे. ऍस्टर फुलाची शेतीही त्यांनी सात ते आठ वर्षे केली. मात्र शेवंतीच्या तुलनेत हे पीक आर्थिकदृष्ट्या अधिक किफायतशीर असल्याचे ते म्हणतात. 
सुमारे 12 ते 15 गुंठे क्षेत्र ते दरवर्षी फूलशेतीसाठी निवडतात. फुले तोडणी सतत सुरू ठेवावी लागत असल्याने 
मजूर व त्यावरील खर्च परवडत नसल्याने त्यांनी हे क्षेत्र कमी ठेवले आहे. एका फूल पिकानंतर बाजरी व त्यानंतर पुन्हा खरिपात पुढचे फूलपीक असे त्यांचे नियोजन असते.
गेल्या हंगामात शेवंती उत्पादनातून त्यांनी 12 ते 15 गुंठे क्षेत्रात सुमारे पावणेदोन लाख रूपयांचे उत्पन्न मिळविले. कंदांपासून लागवड केली जाते. दोन ओळीतील अंतर दीड फूट तर दोन झाडांमधील अंतर अर्धा फूट ठेवले जाते. 
-रोपांच्या वाढीसाठी जिवाणू संवर्धक व गांडुळ खतांची मात्रा दिली जाते. कळी धरण्याच्या अवस्थेत दर आठवड्याला बुरशीनाशक व कीटकनाशक यांची फवारणी केली जाते. प्रत्येक 15 दिवसांनी खुरपणी होते. तणनाशकाचा वापर केला जात नाही.
घर परिसरातील आणि शेतातील काडी-कचरा परस बागेत केळीच्या झाडांखाली एकत्र करून गांडुळ खताची निर्मिती केली जाते. गेल्या दहा वर्षांपासून फुलांचे उत्पादन घेत असल्याने पुढील वर्षात करावयाच्या फूलशेतीसाठी बियाणे घरचेच उपलब्ध होते. यामुळे बियाणे आणि खतांवरील खर्च कमी करण्यात चौधरी यशस्वी ठरले आहेत. लागवडीपासून ते काढणीपर्यंत पत्नी, दोन मुली आणि मुलगा यांची मदत त्यांना मिळते. त्यामुळे मजुरीच्या खर्चातही कपात होते. गरजेनुसार दोन-तीन महिला मजुरांची मदत शेतीत घेण्यात येते.

विक्री व्यवस्थापन

-फुलांची तोडणी करून क्रेट भरले जातात. मुंबईला भुलेश्‍वर येथे ते विक्रीस पाठविले जातात. उत्तम गुणवत्तेची फुले असल्याने व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असते. ओझर (गणपती) हे अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध ठिकाण असल्याने येथे विविध हार विक्रेत्यांना फुलांची विक्री केली जाते. प्रतिकिलो 50 ते कमाल 100 रुपयांपर्यंत दर फुलांना मिळतो. सणासुदी, लग्नसराईच्या काळातच कमाल दर मिळतो.

मागील वर्षीचे हंगामातील उत्पादन आणि उत्पन्नाचा ताळमेळ

  • लागवडीनंतर सुमारे सव्वा महिन्यांनी फुले काढणीस येतात.
  • उत्पादन असे मिळते.
  • पहिले 15 दिवस प्रतिदिन 2 क्रेट (40 किलो) - (प्रतिक्रेट 20 किलोचा)
  • नंतरचे तीस दिवस प्रतिदिन 4 क्रेट (80 किलो) -
ृ- शेवटच्या टप्प्यात तीस दिवस- प्रतिदिन सरासरी 2 क्रेट (40 किलो) -
एकूण उत्पादन - सरासरी 4 हजार दोनशे किलो. 
सरासरी दर - 50 रुपये प्रतिकिलो 
एकूण मिळालेले उत्पन्न - 2 लाख 10 हजार. 
---------------------------------- 
एकूण उत्पादन खर्च सुमारे सुमारे 15 हजार रुपये आला.

बिजली फुलांचा प्रयोगही

गेल्या हंगामात शेवंतीचे उत्पादन घेतल्यानंतर यंदाच्या वर्षी सप्टेंबरमध्ये चौधरी यांनी 2013 मध्ये बिजली फुलांची लागवड केली आहे. सध्या उत्पादन सुरु झाले आहे. नोव्हेंबर अखेर काढणी सुरु झाली असून पहिले दोन आठवडे सुमारे एक क्रेट (20 किलो) उत्पादन मिळत होते. आतापर्यंत सुमारे 400 किलोपर्यंत उत्पादन मिळाले आहे. सध्या प्रतिकिलोला 70 रुपये दर मिळत आहे. फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या हंगामात सुमारे तीन हजार पाचशे किलो उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले असून सरासरी 50 रुपये प्रतिकिलो दराने सुमारे एक लाख 75 हजार रुपये उत्पन्नाची अपेक्षित आहे.

घरचेच बियाणे, शेतकऱ्यांनाही विक्री

गेल्या दहा वर्षांतील फूलशेतीच्या अनुभवातून चौधरी फूल पिकांच्या बियाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहेत. पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणचे शेतकरी त्यांच्याकडून शेवंतीचे कंद, बिजली आणि ऍस्टरचे बियाणे घेऊन जातात. शेवंतीचे कंद खरेदी करण्यासाठी 50 फूट लांब सरीमागे एक हजार रुपये असा दर जमेत धरला जातो. बिजली आणि ऍस्टरचे बियाणे तीन हजार रुपये प्रतिकिलोने शेतकरी त्यांच्याकडून खरेदी करतात. शेवंतीच्या एका सरीवरील कंद शेतकऱ्यांना तीन गुंठ्यासाठी पुरतात असे चौधरी म्हणाले. भविष्यात सर्व फूलशेती ठिबक सिंचनावर करणार असून 10 गुंठ्यावर पॉलिहाऊस उभारण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

केवळ शेती नव्हे, तंत्रज्ञानाचा प्रसारही

चौधरी यांनी गेल्या दहा वर्षांत फूलशेतीत सातत्य ठेवले आहे. आपल्या अनुभवांचा अन्य शेतकऱ्यांना लाभ त्यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांसह ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, वाडा, जव्हार या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, बारामती कृषी विज्ञान केंद्र व नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र येथून ते तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांपर्यंत पोचवतात.

पुरस्काराने सन्मानित

फूलशेतीतील प्रयोगशीलतेमुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेतकरी- शास्त्रज्ञ सल्लागार समितीचे सदस्य, जुन्नर तालुका "आत्मा'प्रकल्पाचे अध्यक्ष आदी पदांवर चौधरी कार्यरत आहेत. नवी दिल्ली येथे भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) आणि नॅशनल स्किल्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने चौधरी यांना भारतीय शेती क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण निर्मिती आणि योगदानासाठी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

संपर्क -गणेश कोरे
राजाराम चौधरी - 9860594934

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate