অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध

अवर्षणग्रस्त झिल्पा झाले जलसमृद्ध

ग्रामस्थांची दुर्दम्य इच्छाशक्‍ती आणि त्याला कृषी विभागाच्या प्रयत्नांची जोड मिळाल्याने कधीकाळी अवर्षग्रस्तांच्या यादीत असलेले झिल्पा (ता. काटोल, जि. नागपूर) गाव आज जलसमृद्ध म्हणून नावारुपास आले आहे.

अवर्षणग्रस्त झिल्पा


काटोल तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. नैसर्गीक तसेच सेंद्रीय शेतीपध्दतीची अंगीकार या भागातील शेतकऱ्यांव्दारे करण्यात आला आहे. नवनवे प्रयोगही या भागातील शेतीत होता. संत्रा व मोसंबी बागांची संख्या अधिक असल्याने त्याकरीता पाण्याची गरजही शेतकऱ्यांना अधिक भासते. परंतू नजीकच्या काळात तालुक्‍यातील जलस्त्रोताची पाणी पातळी कमी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याच तालुक्‍यातील झिल्पा देखील अवर्षणग्रस्त गाव म्हणून नजीकच्या काळात ओळखले जात होते.पाण्याचा उपसा बेसुमार.. तुलनेत पुनर्भरण अत्यल्प अशी अनेक कारणे त्यामागे असल्याचे जलतज्ज्ञ सांगतात. झिल्पा गावाची लोकसंख्या चार हजारावर आहे. या गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर गावालगतच वाहणाऱ्या नाल्याच्या काठावर आहे. परंतू नाल्यात जलसंचय होत नसल्याच्या परिणामी शेतीसोबतच गावाला देखील पाणीटंचाईचे चटके सोसावे लागले होते. विहीरीतील पाणी टाकीमध्ये सोडत तेथून नळाव्दारे पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोचविले जाते. परंतू आडातच नाही तर पोहरात कोठून येणार या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव झिल्पा ग्रामस्थांनी घेतला.

झिल्पा गावात झाली जलक्रांती


झिल्पा ग्रामस्थ पाणीटंचाईचे चटके सोसत असतानाच शासनाची जलयुक्‍त शिवार अभियान योजना जाहीर झाली. योजनेअंतर्गत आपल्या गावाचा समावेश व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून कृषी विभागाकडे झाली. कृषी विभागाने देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. गावातील पाणीलोटाची माहिती संकलीत करण्यात आली. गावालगत वाहणाऱ्या नाल्याचे सर्व्हेक्षण झाले. याप्रमाणे सारे प्रशासकीय सोपस्कार पूर्णत्वास गेल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा आराखडा तयार झाला.

पाणलोट क्रमांक डब्ल्यु.आर.जे.तीन-1, गट क्रमांक 1/1, मध्ये नाला खोलीकरण करण्यात आले. त्याकरीता 21 एप्रिल रोजी मंजूरी घेण्यात आली. त्याला प्रशासकीय मंजूरी 28 एप्रिल रोजी मिळाली. 16 हजार 800 घनमिटरचे काम मंजूर झाले. 16.80 हजारी घनमीटरला मंजूरात मिळाली होती. त्याकरीता 970403 रुपयांची मंजूर होती. प्रत्यक्षात मात्र 500 मिटर खोलीकरण करण्यात आले. 18132.53 घनमिटर काम झाले. या कामामुळे 18.13 हजारी घनमिटर पाणी साठा उपलब्ध झाला. कामावरील खर्चातही त्यामुळे वाढ होत 947293 रुपयांपर्यंत खर्च गेला. ग्रामस्थांचा वाढता उत्साह पाहता कृषी विभागाने देखील निधी तरतूदीत हात आखडता घेतला नाही. त्याचे दृष्य परिणाम आज अनुभवण्यासारखे आहेत.

आणि नाले झाले जलयुक्‍त


झिल्पा गावालगत वाहणारा हा नाला असल्याने त्याची ओळख झिल्पा नाला अशी आहे. 550 मिटरवर कोल्हापूरी बंधारे जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून घेण्यात आले होते. त्या बंधाऱ्यावरील पाट्या वाहून गेल्या होत्या. त्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी पाणी साठवण न होता ते वाहून जात होते. त्यासोबतच नाला गाळाने भरला होता. नाल्यात पाणी साचल्यास त्यामुळे भुगर्भातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार होती. तसे न झाल्याने परिसरातील विहीरीचे स्त्रोतही कोरडे पडले होते. तालुका कृषी अधिकारी बबन जुनघरे, मंडळ कृषी अधिकारी डी.के.काळे, पर्यवेक्षक रामदास खरबकर यांच्या प्रयत्नातून हे नाले सिमेंट काँक्रीटने कायमस्वरुपी बांधण्यात आले. त्याच नाल्याचे 500 मिटर लांब व तीन ते चार मिटर खोल काम करण्यात आले.

तालुका जलयुक्‍त शिवार समिती काटोल यांच्या आदेशानुसार कृषी विभागाने पुढाकार घेत या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी पुढाकार घेतला होता. नाल्यावर तीन ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण झाले आहे. त्या माध्यमातून 18.13 टि.सी.एम. एका नाल्यात, दुसऱ्या नाल्यात 9.67 तर तिसऱ्या नाल्यात 4.30 टि.सी.एम. पाणी साठा उपलब्ध झाला आहे. आजच्या घडीला देखील नाला पाण्याने भरुन परिसरातील जलस्त्रोतही तुडूंब आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील विहीरींची पातळीही या कामामुळे वाढण्यास मदत झाली. त्यामुळे शेतकरी देखील सुखावले आहेत. स्थानिकांचे सहकार्यही या कामास मिळाल्याने हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी काळे यांनी दिली.

लोकप्रतिनिधींकडूनही समाधान


काटोलचे आमदार आशिष देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी भेट देत कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्‍त केले. पाण्याने तुडूंब भरलेल्या या नाल्याचा उपयोग मत्स्यपालनाकरीता व्हावा, अशी अपेक्षा आमदार देशमुख यांनी व्यक्‍त केली. मुख्यमंत्री कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी देखील याची दखल घेत कामाची पाहणी करीत समाधान व्यक्‍त केले.

शेतकरी म्हणतात...


रोशन दादासाहेब काळे यांचे शेत सर्व्हे क्रमांक 209 झिल्पा शिवारात आहे. कपाशी, तूर, संत्रा ही पिके त्यांच्याव्दारे घेतली जातात. झिल्पा नाल्या त्यांच्या शेतालगतच्या भागातूनच वाहतो. नाल्याच्या पाण्याच पातळी तसेच रोशन काळे यांच्या शेतातील विहीरीच्या पाण्याची पातळी एकसारखी आहे. गतवर्षी त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागता होता, असे त्यांनी सांगीतले. संत्रा बाग जगविण्याकरीता दरवर्षी पाण्याअभावी मोठा संघर्ष करावा लागत होता, नाला खोलीकरण व रुंदीकरणामुळे हा संघर्ष थांबल्याचे समाधान बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरुन स्पष्टपणे झळकत होते.

पिण्याचे आणि शेतीचे पाणीही दुर्लभ होते

झिल्पा गावातीलच विनायक दादाराव राऊत यांची पाच एकर शेती. कपाशी व तूर असा त्यांचा खरीप हंगामातील पीक पॅटर्न, रबी हंगामात निसर्गाने साथ दिली आणि ओल कायम राहिली तर पीक घेणे शक्‍य होत होते. यावेळी मात्र जलसंधारणाच्या कामामुळे नाल्यात जलसाठा असल्याने शेतातील विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. परिणामी यावर्षी रबी पीक घेणे शक्‍य होणार असल्याचे त्यांनी आत्मविश्‍वासाने सांगितले.

आता आली स्वयंपूर्णता...


महादेव निंबूरकर यांची झिल्पा शिवारात जेमतेम चार एकर शेती. पाण्याअभावी त्यांनी देखील प्रयोगशीलतेचे किंवा पीक फेरपालटाचे धाडस केले नसल्याचे त्यांनी सांगितले. कपाशी व तूर हाच पीक पॅटर्न असलेल्या माधव निंबूरकर यांच्या शेतातील विहीर देखील पाण्याने तुडूंब भरली. परिणामी यावेळी उत्पादकता वाढीचा त्यांचा अंदाज आहे.


लेखक - चैताली बाळू नानोटे
निंभारा, पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला.

स्त्रोत - महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate