कोकण म्हटलं की हापूसची आठवण येणारच. इथल्या डोंगर उतरावर आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आंब्यांनी लगडलेले डौलदार वृक्ष नजरेत भरतात. मात्र अधिक वयाच्या काही कलमांची पानांवर मात्र इतर झाडांप्रमाणे लकाकी दिसत नाही. अशा कलमांना फळधारणाही कमी होते. इस्त्रायलमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या आणि डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या कॅनोपी तंत्राच्या सहाय्याने कलमांची फळधारणा वाढविता येते. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील राजेंद्र निमकर या प्रयोगशील शेतकऱ्यांने या तंत्राचा यशस्वी वापर केला आहे.
असोरे गावात निमकर यांची 7 एकरावर बागायत शेती आहे. पैकी 5 एकरात 200 ते 250 आंबा कलमे आहेत. उर्वरीत भागात सुपारीची 150 झाडे आहेत. सुपारीच्या बागांपासून वर्षाला 250 किलो सुपारीचे उत्पादन होते. त्यातून वर्षाला 35 हजारापर्यंत उत्पन्न मिळते. सुपारीच्या बागांमध्ये पारंपरिक तंत्रात बदल आधुनिक सिंचन पद्धतीचा प्रभावी वापर केला आहे. संपूर्ण बागेला विहीरीवर सबमर्सिबल पंप बसवून पाण्याची सोय करण्यात आली आहे. हीच प्रयोगशीलता त्यांनी आंब्याच्या कलमांबाबतही वापरली आहे.
निमकर यांनी कॅनोपी तंत्राचा वापर करण्यासाठी 18 ते 20 वर्षाच्या 41 जुन्या आंबा कलमांची निवड केली. या 41 कलमांंपासून केवळ 50 ते 60 पेटी उत्पन्न मिळत होते. या कलमांना 7 ते 8 फुटांपर्यंत छाटण्यात आले आहे. जास्त उंचीच्या कलमांची 13 फुटापर्यंत छाटणी करण्यात आली. कलमांना नियमितपणे फवारणी करण्यात येत आहे. या नव्या तंत्रामुळे नव्याने आलेल्या फांद्यांना लागलेल्या पानांचा तजेलदारपणा चटकन नजरेत भरतो. एक वर्षानंतर म्हणजेच पुढच्या वर्षी सर्व कलमे आंब्यांनी लगडलेली असतील, असा विश्वास निमकर यांनी व्यक्त केला.
या प्रक्रीयेसाठी कृषि विभागामार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रक्रियेअंतर्गत खोडकिडा नियंत्रण फवारणी आणि इतर देखभालीसाठी 200 ते 250 रुपये खर्च येतो. कलमांना एक महिन्याने फवारणी करण्यात येते. मात्र हा खर्च मिळणाऱ्या लाभाच्या तुलनेत अल्प आहे. जुन्या लागवडीतील असलेले 30 फुटाचे अंतर कमी होऊन दोन कलमांमध्ये नवी लागवड करणे शक्य होणार आहे. तसेच कलमाची उंची कमी झाल्याने घेर वाढून आंबा तोडणीत होणारे नुकसान कमी होणार आहे. छाटनी केल्याने दोन झाडांमध्ये आणखी एका कलमाची लागवड करणे शक्य होणार असल्याने एकूण मिळणारे उत्पादन 400 किलोवरुन 1 टनाच्या पुढे उत्पन्न जाण्याचा अंदाज आहे. या तुलनेत खर्च मात्र केवळ एकरी 8 ते 10 हजार होणार आहे. शिवाय फलधारणेत नियमितता येईल, असे निमकर यांनी सांगितले.
निमकर यांनी बागेत 10 लोकांना रोजगार दिला आहे. प्रक्रीया उद्योगाचे युनिटही कृषि विभागाच्या सहकार्याने स्थापीत करून ब्रँण्डींग केलेले पदार्थ बाजारात पाठविले जात आहेत. लोणचे, मुरब्बा, सरबत आदी विविध उत्पादनांना बाजारात मागणी आहे. वर्षाची एकूण उलाढाल 20 लाखापर्यंत पोहोचली आहे. प्रक्रीया उद्योग आणखी विस्तारीत करण्याचा निमकर यांचा मानस आहे. फळबागेचे नवे 'तंत्र' आत्मसात करताना विकासाचा नवा 'मंत्र' त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे.
लेखक : - डॉ.किरण मोघे
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 5/1/2020
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...