অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पपईतील आंतरपीक कलिंगड

जळगाव जिल्ह्यातील वेले (ता. चोपडा) येथील विनोद पाटील यांनी आपले वडील सुधाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पपई पिकात कलिंगडाचे आंतरपीक घेतले. रमजान सणाचे ध्येय ठेवून केलेले हे नियोजन यशस्वी ठरले आहे. मध्यस्थांनी कलिंगडे खरेदी व्यवहारात साथ न दिल्याने सूरत, इंदूर येथील मार्केट शोधून विनोद यांनी स्वतः विक्रीचे धाडस केले व पपईतील उत्पादनखर्च चांगल्या प्रमाणात कमीही केला.
प्रक्रिया उद्योगांकडून वाढती मागणी लक्षात घेता पपईला अलीकडे चांगले मार्केट उपलब्ध होत आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील बरेच शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला चोपडा तालुकाही त्यात आघाडीवर आहे. तालुक्‍यातील वेले येथे सुधाकर पाटील यांची शेती आहे. आता ही शेती प्रामुख्याने त्यांचे विनोद व प्रवीण हे दोन मुलगे पाहतात. विनोद शेतीचा तर प्रवीण दुग्ध व्यवसायाचा व्याप सांभाळतात.

पपई व त्यात कलिंगडाचा प्रयोग

विनोद यांनी गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत सुमारे दीड एकरावर प्लॅस्टिक पेपरचे मल्चिंग करून प्रथमच कलिंगडाचे पीक घेतले होते. त्याचे सुमारे 12 ते 13 टन उत्पादन मिळाले होते. या प्रयोगातून त्यांना आणखी नवे प्रयोग करण्याबाबत आत्मविश्‍वास निर्माण झाला. उन्हाळ्यात सर्वत्र कलिंगडाची लागवड होत असल्याने बाजारात स्पर्धा निर्माण होते. प्रसंगी मनाजोगते दरही मिळत नाहीत, हे लक्षात घेऊन कलिंगड रमजान सणाच्या कालावधीत विक्रीस येईल, या पद्धतीने घेण्याचे ठरविले. लागवडीआधी तज्ज्ञांसह अनुभवी शेतकऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा खरिपात केवळ कलिंगड घेण्याऐवजी पपईत ते आंतरपीक घेण्याविषयीचा सल्ला त्यांना मिळाला.

गादी वाफ्यांवर लागवड

पाच एकरांवर प्रयोगाचे नियोजन करताना पाटील यांनी शेतीची उन्हाळ्यात खोल नांगरणी करून घेतली. रोटाव्हेटरच्या साह्याने मशागत केली. सुमारे 65 ट्रॉली शेणखत पसरवून घेतले. कलिंगड लागवडीचा मागील अनुभव होता; पण पपई लागवडीची फार माहिती नव्हती. त्यामुळे सुधाकर यांनी मुलगा विनोद यांस चोरवड (ता. पारोळा) येथील मनोहर माने, दहेती (ता. मालेगाव) येथील अण्णासाहेब कचवे या प्रयोगशील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेण्यास सुचवले. पाण्याची उपलब्धता, जमिनीचा प्रकार या विषयी चर्चा झाल्यानंतर वेले शिवारातील काळी कसदार, खोल व पाण्याचा व्यवस्थित निचरा न होणारी जमीन पपई लागवडीसाठी योग्य नसल्याचे अनुभवी शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र पपई लागवडीवर ठाम असलेल्या पाटील पिता- पुत्रांनी अडचणींवर तोडगा काढला. जमीन खोदणाऱ्या यंत्राच्या साह्याने पाच एकरांवर प्रत्येकी दहा फूट अंतराप्रमाणे तीन फूट उंचीचे व साडेतीन फूट रुंदीचे गादीवाफे तयार केले. ठिबकने पाणी देण्याची सोय करून मे महिन्यात सहा तारखेला गादी वाफ्यांवर सात फूट अंतरावर तैवान 786 जातीच्या पपईची रोपे लावली. दोन दिवस आधी पपईच्या दोन रोपांमधील रिकाम्या जागेत गादीवाफ्यांवर कलिंगडाचे बीदेखील टोकून घेतले.

40 टक्के रोपांची मरतूक

गादीवाफ्यांवर लागवड केल्यामुळे वाफसा स्थिती कायम राहून पपईसह कलिंगडाच्या रोपांची सुवातीपासूनच जोमदार वाढ झाली. ठिबकवाटे विद्राव्य खते देताना सूक्ष्मअन्नद्रव्ये, कॅल्शिअम नायट्रेट, ऍमिनो ऍसिड, ह्युमिक ऍसिडची मात्राही दिली. वाढीच्या अवस्थेनुसार सुरवातीला दिवसांतून तासभर, फळधारणेनंतर दिवसातून सात ते आठ तास ठिबकद्वारा पाणी दिले. नागअळी, पांढरी माशी, मावा, तुडतुडे या किडींपासून पिकाचे संरक्षण रासायनिक पद्धतीने केले. दरम्यान, लागवड होऊन बरेच दिवस उलटले तरी पावसाचे आगमन झाले नाही. तापमानाचा पाराही 38-40 अंशावर कायम राहिला. त्याचा रोप उगवणक्षमतेवर परिणाम झाला. सुमारे 30 ते 40 टक्के रोपे अशा रितीने नुकसानात गेली, तरीही जिद्दीने ठिबकच्या पाण्यावर कलिंगडाचे पीक वाढविण्यात आले.

स्वतः शोधले परराज्यातील मार्केट

लागवडीनंतर सुमारे 70 दिवसांनी कलिंगडाची फळे काढणीयोग्य होतील याचा अंदाज घेऊन विनोद यांनी फळ खरेदी- विक्री व्यवसायातील काही व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. काही व्यापारी प्रत्यक्ष शेतात येऊनदेखील गेले. शेतकरी स्वतःहून संपर्क साधून गरज दाखवतोय म्हटल्यावर व्यापाऱ्यांनी कलिंगड खूप कमी दरात मागितले. काही व्यापारी तर भ्रमणध्वनीवरून आज येतो, उद्या येतो असे सांगून आलेच नाहीत. चोहोबाजूंनी कोंडी झाल्यानंतर कदाचित शेतकरी कमी दराने कलिंगड विकण्यास तयार होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी बांधला होता. मात्र नाशवंत फळ असल्याने फळ शेतात ठेवून चालणार नव्हते. हिमतीने विनोद यांनी त्यावर मार्ग काढला. मध्य प्रदेशातील इंदूर, तसेच गुजरात राज्यातील सूरत मार्केटची चौकशी करून तेथील कलिंगडाच्या दरांची माहिती काढली. भाडे ठरवून ट्रकमधून कलिंगडे मार्केटला नेली. तेथे किलोला 10 ते 11 रुपये दर होता. स्थानिक मार्केटसह दोन्ही मार्केटला आतापर्यंत एकूण 30 टन मालाची विक्री झाली आहे. प्रति फळाचे वजन साडेतीन ते चार किलो आहे. फळाची चवही चांगली आहे. त्यास वाहतूक खर्च वगळता सरासरी साडेआठ रुपये दर मिळाला. विनोद यांना अजून 10 टन उत्पादनाची विक्री अपेक्षित आहे. त्याला सहा ते आठ रुपये प्रति किलो धरल्यास 60 ते 80 हजार रुपयांचे उत्पन्न हाती पडेल. आतापर्यंत सुमारे सव्वा दोन लाख रुपयांची कमाई झाली आहे.

पपईतील खर्च झाला कमी

गादी वाफ्यांसाठी वापरलेले खड्डेखुदाई यंत्र, पपई, कलिंगड रोपे, मजुरी, शेणखत, अन्य खते, किडनाशके, ठिबक सिंचन यांच्यावरील बहुतांश खर्च कलिंगडाच्या विक्रीतून भरून निघाला, त्यामुळे पपई किफायतशीर ठरणार आहे. कलिंगडाच्या काढणीनंतर वाळलेले वेल पपई पिकात आच्छादन म्हणून वापरता येणार आहेत.

इतर शेतकरी यशस्वी, मी का नाही

विनोद पूर्वी भाडेतत्त्वावरील ट्रॅक्‍टर व्यवसाय करायचे. मात्र स्पर्धेमुळे तो परवडेनासा झाला. आपल्या शेतीतच अधिक लक्ष देऊन त्यात प्रगती करावी असे विनोद यांना वाटू लागले. "ऍग्रोवनमधील यशकथांनीच यासाठी बळ दिले. इतर शेतकरी यशस्वी होतात. मग आपण का नाही, असे सतत वाटे, एकही दिवस ऍग्रोवन न वाचता गेला असे झालेले नाही,' असे विनोद म्हणतात.
पपईला समाधानकारक दर मिळतील का नाही याची चिंता नाही. आपण प्रत्येक पिकाचे एकरी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करायचा. वाढणारे प्रत्येक उत्पादन पैसेच असल्याचे विनोद म्हणतात.

संपर्क-विनोद पाटील 9823568497,
प्रवीण पाटील-9764898904

स्त्रोत:  अग्रोवन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate