অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर

आंतरपीक, मल्चिंग पद्धत ठरली कपाशीला फायदेशीर

उत्पादन, मशागतीचा खर्च झाला कमी 
धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील प्रकाश सीताराम पाटील यांनी प्लॅस्टिक आच्छादनावर कलिंगड, त्यानंतर त्याच मल्चिंगवर कपाशी, शून्य मशागत व त्या शेतात कलिंगडाचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग केला. कपाशीतील उत्पादन खर्च कमी होणे, मशागतीचा, निंदणीचा खर्च वाचणे आदी मुख्य फायद्यांबरोबर अन्य फायदेही या प्रयोगामुळे पाटील यांना झाले आहेत. कपाशीचे पीक त्यांच्यासाठी जणू बोनसच ठरणार आहे. 
आदिवासी विकास विभागातील नोकरीच्या निमित्ताने प्रकाश पाटील यांची शिरपूर, नंदुरबार आदी ठिकाणी बदली होत राहिली. तरीही त्यांनी कापडणे (ता. धुळे) येथील वडिलोपार्जित आठ एकर शेतीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. शेतीला मुख्य व्यवसाय मानून नोकरीला पूरक दर्जा दिला. भाजीपाला व फळपिके घेण्याची धडपड सुरू ठेवली. त्यांच्या पत्नी मंगलाताई यांनी पती नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्यानंतर शेतीची व घराची सूत्रे समर्थपणे सांभाळली. मुलगी स्मिताच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिले. फारच ओढाताण होऊ लागल्यावर मात्र पाटील यांनी 2006 मध्ये नोकरीचा मुदतपूर्व राजीनामा देऊन पूर्णवेळ शेतीत झोकून दिले.

संकटाला धैर्याने तोंड दिले

नोकरीत असताना शेतीतील भांडवलाची गरज भागविण्यासाठी पाटील यांनी खासगी सावकाराकडून पैसे घेतले होते. दरम्यानच्या काळात मुलीचे लग्न पार पाडले. भावाकडून गावालगत 30 गुंठे शेती विकत घेतली. पारंपरिक पद्धतीने शेती करीत असताना वाढता उत्पादन खर्च व त्यामानाने मिळणारे तोकडे उत्पन्न यांचा ताळमेळ घालताना नाकी नऊ आले. कर्ज वेळेवर न फिटल्याने आवाक्‍याबाहेर गेले. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले पेन्शनचे सर्व पैसे भरूनही सहा लाखांचे कर्ज डोक्‍यावर शिल्लक राहिले. एवढी बिकट परिस्थिती ओढवल्यानंतरही त्यांनी हिंमत सोडली नाही.

सांडपाण्यावर फुलवली शेती...

संरक्षित पाणी उपलब्ध नसल्याने पाटील यांना बागायती पिके घेता येत नव्हती. त्यावर उपाय म्हणून कापडणे गावाचे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या पाण्यावर डाळिंब, लिंबू, भाजीपाला पिके घेण्यावर भर दिला. नगदी पिकांमुळे कर्जाचा भार थोडा हलका झाला. तेवढ्यात, गारपीट व वादळाने डाळिंबाची शेती उद्‌ध्वस्त झाली. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तशात गावकऱ्यांनी सांडपाणी वापरण्यावर मनाई केली. नाइलाज झाल्याने पाटील यांनी सावकाराकडून पुन्हा पैसे उचलले. शेतात विहीर व ट्यूबवेल खोदली. डोक्‍यावरील कर्जाचा भार आणखी जड झाला. मात्र पाटील खचले नाहीत. भावाकडून खरेदी केलेला 30 गुंठे शेतीचा तुकडा विकून सर्व कर्ज फेडले.

आधुनिक शेतीची धरली कास...

डोक्‍यावरील कर्जाचा भार हलका झाल्यानंतर पुन्हा नव्या दमाने व उत्साहाने शेतीला सुरवात केली. भांडवलासाठी कोणापुढे हात पसरण्याची गरज नव्हती. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचन बसवले. भाजीपाला रोपांसाठी शेतात नर्सरी उभी केली. फेब्रुवारी 2014 मध्ये प्रथमच प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करीत तीन एकर कलिंगड फेब्रुवारी व त्यापुढे आसपास तीन टप्प्यांत लावले. पैकी एका एकरात 28 टन, अन्य दोन एकरांत प्रत्येकी 15 टन उत्पादन मिळाले. मुंबई, सुरत, धुळे मार्केटला पाच ते सहा रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री झाली.

पॉलिमल्चिंगवर कपाशी

कलिंगडाच्या या प्रयोगातून आत्मविश्‍वास वाढलेल्या पाटील यांनी त्याच तीन एकरांत कपाशीचे नियोजन केले. मात्र शेतीची मशागत केली नाही. प्लॅस्टिक आच्छादन तसेच ठेवून 28 मे रोजी झिकझॅक पद्धतीने कपाशीची पूर्वहंगामी लागवड केली. तेवढ्यावरच न थांबता कपाशीत आंतरपीक म्हणून पुन्हा कलिंगड घेण्याच्या दृष्टीने नियोजन केले. खासगी नर्सरीतून आणलेली तीन आठवडे वयाची रोपे त्यासाठी वापरली. प्रति रोप अडीच रुपये खर्च आला. कपाशीला ठिबकद्वारा दिलेली खते कलिंगडास मिळाली. तुरळक फवारणी केली. लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी म्हणजे जुलैअखेर कलिंगड काढणीयोग्य झाले. एकरी 10 टन याप्रमाणे तीन एकरांत सुमारे 27 ते 30 टन उत्पादन मिळाले. सुरत मार्केटला पाच ते साडेपाच रुपये दर मिळाला. त्यातून सुमारे दीड लाख 
रुपयांचे उत्पन्न झाले. या प्रयोगात पाटील यांना झालेला मुख्य फायदा म्हणजे कपाशीचा उत्पादन खर्च भरून निघाला. जो दरवर्षी एकरी किमान 20 हजार रुपये येतो. दरवर्षी कपाशीचे एकरी उत्पादन 10 क्विंटलपर्यंत होते.

यंदा चार एकरांत 35 क्विंटल कापसाची वेचणी झाली आहे. बाकी वेचणी सुरू आहे. त्यामुळे जे काही उत्पादन मिळेल त्यात नफ्याचे प्रमाण वाढेल.

अन्य एकरांतही कलिंगड

त्याच वेळी लगतच्या शेतातही 21 जूनच्या दरम्यान प्लॅस्टिक आच्छादनावर एक एकरात कपाशीत कलिंगड घेतले. मात्र त्यासाठी प्लॅस्टिकचा वेगळा खर्च करावा लागला. या प्रयोगातून 50 हजार रुपयांची कमाई झाली.

कलिंगडातील मल्चिंग ठरले कपाशीत असे उपयोगी

  • पूर्वमशागतीचा म्हणजे नांगरट, पुन्हा रोटाव्हेटर, सऱ्या पाडणे आदींचा एकरी तीन हजार रुपये म्हणजे तीन एकरांत नऊ हजार रुपयांचा खर्च कमी झाला.
  • आंतरमशागतीच्या खर्चात बचत. मल्चिंगमुळे तणनियंत्रण झाल्याने त्यावरील एकरी किमान सहाशे ते एक हजार रुपयांचा खर्च वाचला.
  • कपाशीची सुरवातीपासूनच जोमदार वाढ झाली.
  • बाष्पीभवन कमी झाल्याने पाण्याची गरज कमी भासली.
  • फूल-पात्यांची गळ कमी होऊन बोंडांची संख्या वाढली.
  • कलिंगडासाठीचे बेड असल्याने जास्त पावसाच्या काळात शेतात पाणी साचून राहिले नाही.
  • उत्पादन खर्चात भरपूर बचत झाली.

निर्माल्याचे लिंबू बागेत आच्छादन...

पाटील यांची दीड एकरांवर 15 वर्षे जुनी लिंबू शेती आहे. तेथे परिसरातील देवस्थानांच्या परिसरात सहज मिळणारे निर्माल्य (उदा. नारळाची साल) नैसर्गिक आच्छादन म्हणून वापरले जाते. जागेवरच कुजल्याने त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत तयार होते. जमिनीत पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते. फळांचा चांगला बहर मिळतो. लिंबाच्या शेतीतून दरवर्षी दीड ते दोन लाख रुपयांची कमाई होते.

दुग्ध व्यवसायाची जोड

पाटील यांच्याकडे दोन म्हशी असून, शेतात गोठा बांधला आहे. दररोज दोन्ही वेळचे मिळून सरासरी 12 लिटर दूध मिळते. 50 रुपये प्रति लिटर प्रमाणे ग्राहक घरून दूध घेऊन जातात. दूध विक्रीतून दैनंदिन 600 रुपयांचे उत्पन्न मिळते. वर्षाकाठी मिळणारे शेणखत घरच्या शेतीसाठी वापरले जाते. गोठ्यातील मलमूत्र ठिबकवाटे कपाशी, लिंबू पिकांना देण्याची सोय केली आहे. त्यामुळे जमिनीचा पोत चांगल्या प्रकारे टिकून असल्याचा अनुभव पाटील यांना आला आहे. 

संपर्क - प्रकाश पाटील

 

स्त्रोत: अग्रोवन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate