राज्यातील शेतमाल मोठ्या प्रमाणावर पिकवला जात असला तरी तो शेतमाल योग्य भावात विक्री करणे हे शेतकऱ्याला शक्य होत नव्हते. राज्यातील शेतकऱ्याला येथील व्यवस्थेने फक्त पिकविण्याचीच मुभा दिली होती. शेतकऱ्याने पिकविलेला शेतमाल बाजार समिती वा थेट मार्केटमध्ये विकण्याची व्यवस्था नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की शेतकरी शेतात पिकविण्यापुरताच त्या मालाचा मालक असे. एकदा त्याने तो माल बाजार समिती वा मार्केटमध्ये टाकला की तो कोणत्या भावाने विकायचा, हे त्याच्या हाती राहत नसे. त्यानंतर त्या मालाचा मालक हा अडत्या किंवा दलाल असे.
मातीत राबून मातीतून सोने पिकविणाऱ्या शेतकऱ्याला अडत्या वा व्यापाऱ्याकडे मिळेल त्या भावाने विकण्याशिवाय पर्याय नसे आणि हे अडते वा दलाल आणि किरकोळ तसेच ठोक भावाने विकत घेणारे व्यापारी यांच्यातील सहमतीने होत असे. त्यामुळे आदल्या दिवशी चांगला भाव असणारा भाजीपाला दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये आवक वाढल्याच्या नावाखाली किरकोळ दराने विकावा लागे किंवा मग रस्त्यावर फेकून द्यावा लागे, ही वस्तुस्थिती होती.
जो या शेतमालाचा खरा मालक आहे, त्या शेतकऱ्या थेट ग्राहकांपर्यंत पोहचून आपला शेतमाल विकण्याची कल्पना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या डोक्यात आली. आपणच शेतकरी आणि ग्राहकांत आर्थिक देवाण-घेवाणीच्या व्यवहारात संवादाचा पूल का बनू नये? म्हणून त्यांनी लगेच ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा दृढ निश्चय केला.रविनगर शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माफक दरात भाजीपाला मिळावा आणि शेतकऱ्यालाही आपल्या मालासाठी बाजारपेठ मिळावी या हेतूने विभागीय आयुक्तांनी प्रत्यक्ष लक्ष घातले. त्यातून रविनगर शासकीय वसाहतीत जन्माला आला शेतकरी ते ग्राहक थेट आठवडी बाजार.
नोकरीनिमित्त येथे राहणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचारी एरव्ही दैनंदिनीच्या रेट्यात शेजाऱ्याशी असलेला संवादच हरवला होता. या आठवडी बाजाराच्या निमित्ताने त्यांच्यात विभागीय आयुक्तांनी संवाद घडवून आणला. शेतकरी आणि अधिकारी वर्गातही संवाद वाढल्याने आज या आठवडी बाजाराच्या निमित्ताने येथील ग्राहकांना पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांचे, त्यांच्या जनावरांचे, त्यांच्या मुलांचे, मुलांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी, केवळ पाणी नसल्यामुळे अडणारे विवाह अशा समस्यांचे आकलन अधिकारी व कर्मचाऱ्यांना झाले.
या अडीअडचणींवर जाणून घेऊन त्यावर तोडगा काढला जात आहे. त्यांची दु:ख जाणून घेतली जात आहेत. खचलेल्या शेतकऱ्यांना शासकीय वसाहतीतील रहिवाशांकडून धीर दिला जात आहे. सोबतच त्यांनी पिकविलेला शेतमाल थेट ग्राहकांना विकता येत आहे. त्यातून त्यांनाही चार पैसे जास्तीचे मिळत आहेत. शिवाय खचलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्याचे कामही होत आहे. आपल्याही पाठीशी शासकीय व्यक्ती खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास या आठवडी बाजारानिमित्ताने गांजलेल्या, जगण्याची उमेद हरवलेल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला जात आहे.या जगात आपण एकटेच आहोत, ही भावना बळावलेल्या शेतकऱ्यांना जगण्याची नवी उमेद देण्याचे काम या शेतकरी ते थेट ग्राहक आठवडी बाजार या अनूप संकल्पनेतून केले जात आहे. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया...
श्वेता जानराव (गृहिणी)– रविनगर येथे दर आठवड्याला भरणारा बाजार एक गृहिणी म्हणून खूप फायदेशीर ठरला असून, ताजी व हिरवीगार भाजी, फळे मिळतात. व्यापाऱ्यांपेक्षा स्वस्त दरात आणि घराजवळ उपलब्ध होत असल्यामुळे वेळेची बचत होते.
शितल मौदेकर (शिकवणी वर्ग, संचालिका)– शेतकरी ते थेट ग्राहक आठवडी बाजारामुळे वेळेची बचत होत असून, दोन शिकवणी वर्गाच्या अंतरात बाजारात जाऊन भाजीपाला विकत आणता येतो. शिवाय थेट शेतकऱ्याकडून भाजीपाला व फळे विकत घेतल्याचे समाधानही मिळते. आता आली आपल्या दारी ताजी भाजी शेतातली
हे घोषवाक्य असलेले वर्ध्याचे रविंद्र खोडके म्हणतात, आम्ही माझ्या स्वत:च्या शेतातील तर भाजीपाला आणतोच शिवाय शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करतो. यातून आमचे सौहार्दपूर्ण संबंधही वाढत आहेत. शेतकऱ्यांपासून थेट ग्राहकांना ताजा भाजीपाला, फळे मिळत आहेत. शेतकरी व ग्राहकांमध्ये दलालांचा वाटा संपल्यामुळे चार जास्तीचे पैसे मिळत असून, ग्राहकांनाही तुलनेने ताजा आणि स्वच्छ भाजीपाला स्वस्त आणि दारात मिळत आहे.
यामध्ये महिला वर्गही मागे नसून, भंडारा जिल्ह्यातील बोरी येथील सखी महिला बचत गटाकडून भाजीपाला विक्रीचा हा व्यवसाय केला जात आहे. सेंद्रीय पद्धतीने पिकविला जाणारा भाजीपाला त्यात दोडके, कारले, तोंडले, सांभार (कोंथिंबीर), भेंडी, गवार, टमाटे, बटाटे, चवळी, मेथी, पालक, टरबूज, वांगे, फुलकोबी, पानकोबी यांसह इतरही भाजीपाल्यांचा समावेश आहे. नागपूर विभागातील फॉर्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चाईल्ड ॲन्ड यूथ डेव्हलपमेंट नागपूर, सहारा शेतकरी समूहाचे रोशन माथूरकर आणि तुळशीराम डोंगरे हे तर मोबाईलवरही भाजीपाल्याच्या ऑर्डर घेत असल्याचे सांगतात. सती अनुसया माता तसेच ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडही शेतकरी ते थेट ग्राहकच्या आठवडी बाजारात आणत आहेत.
तर गृहोद्योगाच्या माध्यमातून विविध चटण्या, लोणचे, उन्हाळी बनविलेले पदार्थ, पापड, कुरड्या, मसाले, पावडर विकणारे संत शिरोमणी सावता माळी गृहोद्योगाचे संचालक विजय जगदीश दररोज ऑर्डरप्रमाणे वरील पदार्थ बनवून ग्राहकांना विकतात. दररोज बनविले जाणारे मसाल्याचे पदार्थ, चटण्या रोजच्या रोज बनवून विकल्यामुळे त्या खराब होत नाहीत. घरगुती बनविलेले असल्यामुळे त्याचा स्वाद ताजा आणि चांगला राहतो. आम्हाला जर शुद्ध आणि ताजे पदार्थ देताना चार पैसे मिळत असतील आणि येथील ग्राहकांना बाजारभावाच्या तुलनेत स्वस्त चटण्या आणि मसाल्याचे पदार्थ, जीरे पुड, पापड, लोणचे मिळते. त्यामुळे त्यांनाही या आठवडी बाजाराच्या माध्यमातून फायदा होत असल्याचे ते सांगतात.
लेखक - प्रभाकर बारहाते
माहिती सहाय्यक, नागपूर
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
या उद्योगाच्या गरजा लक्षात घेत, सहकार विभागांतर्गत...
सहकार आयुक्त व सहकारी संस्था नोंदणी निबंधक यांचा क...