नगर जिल्ह्यातील वाकी या आदिवासी गावात प्रभाताई फलके यांनी आपल्या पावणेचार एकर शेतीची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. पती नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने शेतीचे सारे व्यवस्थापन प्रभाताईंनी आपल्या अंगावरच पेलले आहे. खरिपात भात तर उन्हाळ्यात भाजीपाला व झेंडू पिकातून त्यांनी आपल्या यशाची चुणूक दाखवली आहे.
नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात वाकी हे आदिवासी गाव आहे. भंडारदरा हे प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण याच परिसरात आहे. याच वाकी परिसरात फलके कुटुंबाची सुमारे पाच एकर शेती आहे. त्यातील सुमारे पावणेचार एकर शेतीचा विकास करण्याची जबाबदारी कुटुंबातील प्रभाताईंनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.प्रभाताईंचे पती तानाजी फलके यांचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा आहे. मात्र, पाण्याची कमतरता असल्याने येथे शेतीवर अनेक मर्यादा आल्या, त्यामुळे त्यांनी वाकी गावात शेती विकत घेतली. ते नाशिक जिल्ह्यातील घोटी (इगतपुरीनजिक) येथे राष्ट्रीय बॅंकेत शाखाधिकारी पदी कार्यरत आहेत. त्यामुळे आपल्या शेतीकडे लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. मात्र, माहेरघरापासून शेतीची आवड जोपासलेल्या प्रभाताईंनी ही शेती फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. खडकाळ माळरानावर शेती करून आदिवासी भागाला आदर्शवत ठरावी, अशी शेती त्यांच्याकडून होत आहे.
प्रभाताई भंडारदरा कॉलनीत राहतात. तेथून शेतीचे अंतर सुमारे अडीच किलोमीटरवर आहे. घरची सर्व कामे आटोपून त्या सकाळी 10 वाजेपर्यंत शेतात येतात. सध्या खरीप हंगामात भातशेतीच्या कामात त्या व्यस्त आहेत.
वाकी भागाचे भात हे मुख्य पीक आहे. खरिपात हेच आमचे मुख्य पीक असल्याचे प्रभाताई सांगतात. भाताचे संकरीत बियाणे त्या वापरतात. मात्र, पारंपरिक जातीच्या लागवडीचा त्यांचा प्रयत्न आहे. बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्या शोध घेत आहेत.
रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खत वापरावर त्यांचा अधिक भर आहे. जनावरांनाही सेंद्रिय चारा मिळेल असे त्यांचे नियोजन आहे. आपले शेत पर्यावरण प्रदूषणविरहित असेल असा त्यांचा प्रयत्न आहे.
शेताच्या चोहोबाजूंच्या बांधावरही विविध झाडे त्यांनी लावली आहेत. प्रभाताई शेतात स्वतः राबतातच, शिवाय आदिवासी महिला मजुरांची मदतही त्या घेतात. प्रभाताईंची दोन्ही मुले शिक्षण व व्यवसायासाठी बाहेरगावी असतात. मात्र, सवड मिळेल तेव्हा मुलांचीही त्यांना मदत होते.
आपल्या शेतीचा विकास करताना त्यांनी प्रथम जमिनीचे सपाटीकरण केले. अन्यत्र ठिकाणाहून काळी व तांबडी माती आणून ती सर्व क्षेत्रात पसरवली. आता पाण्याची सोय करणे सर्वात महत्त्वाचे होते. त्यासाठी गेल्यावर्षी कृष्णवंती नदीवरून पाइपलाइन करून शेतात पाणी आणले. ठिबक सिंचन योजनेचाही फायदा त्यांनी घेतला आहे.
अर्थात शेती उभी करताना अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, न डगमगता दिवसभर शेतात राबून त्यांनी शेतीत आत्मविश्वास कमावला आहे. मागील वर्षी भाताचे दीड ते दोन एकर क्षेत्रात त्यांनी 15 ते 20 पोती (प्रति पोते 90 किलो) उत्पादन घेतले. उन्हाळी हंगामात त्यांनी टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कोबी, प्लॉवर, भेंडी आदी विविध प्रकारचा भाजीपाला थोड्या थोड्या प्रमाणात घेतला. टोमॅटो, मिरचीची रोपे त्यांनी स्वतः तयार केली. व्यापाऱ्यांमार्फत वाशी मार्केटला माल पाठवला. टोमॅटोला दर चांगले असल्याने खर्च वजा जाता दीड ते दोन लाख रुपये नफा त्यांनी कमावला. अन्य भाजीपाला पिकांमधून मात्र फार नाही; मात्र 25 ते 30 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले.
पुढील काळात पॉलिहाउसच्या शेतीकडे वळण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या प्रभाताईंनी यंदाच्या उन्हाळ्यात झेंडूच्या दोनहजार रोपांची लागवड केली. त्यातून त्यांनी सुमारे 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. अकोले, राजूर भागातील व्यापाऱ्यांमार्फत त्यांनी वाशीला फुलांची विक्री केली.
दर किलोला 15 रुपयांपासून ते 30, 35 रुपये तर काही कालावधीत ते उच्चांकी 55 रुपयांपर्यंत मिळाले. प्रभाताईंची शेती वाकी-भंडारदरा रस्त्यावर आहे. साहजिकच भंडारदऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांचे या शेतीकडे लक्ष न गेल्यासच नवल. काही परदेशी पाहुण्यांनी म्हणूनच प्रभाताईंच्या झेंडूच्या शेतीत उभे राहून छायाचित्रे काढण्याचा मोह आवरला नाही.
आपल्या शेतीत आशादायी वाटचाल करताना आजूबाजूच्या आदिवासी शेतकरी वर्गालाही प्रभाताई आपले अनुभव सांगतात. त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे वाकी परिसरातून भाजीपाला आता मुंबईला जाऊ लागला आहे. शेतीत स्वतः पिकवण्यासारखा दुसरा आनंद नसल्याचे प्रभाताई म्हणतात. शेती विकसित करण्याची त्यांची धडपड आदिवासी भागाला आदर्शवत अशीच आहे. भविष्यात या माळरानावर शेतकरी मार्गदर्शन केंद्र काढण्याचा तसेच शेतीसाठी वीज वापरता येईल, असा सौरउर्जा प्रकल्प उभारणे शक्य आहे का, याचाही विचार त्या करीत आहेत. वाकी परिसरात नाचणीचे पीकही घेतले जाते. नाचणीपासून पापडनिर्मिती करण्याचाही त्यांचा विचार आहे.
प्रभाताईंनी लोककलांची आवड जोपासली आहे. वाकी परिसर आदिवासी पार्श्वभूमीचा असून येथील संस्कृती, साहित्य, पारंपरिक लोकगीते यांविषयी प्रभाताईंचा चांगला अभ्यास आहे. पूर्वीच्या काळात गायली जाणारी आदिवासी गीते, जात्यावरची गाणी त्यांना आजच्या काळातही माहीत आहेत. त्या स्वतः ही गाणी गातातही. त्या म्हणाल्या की, पूर्वी आदिवासींना विशेषतः महिलांना लिहिता-वाचता येत नसे. त्यामुळे आदिवासी आई आपल्या मुलांवर संस्कार करताना ओव्या गायची, त्यामुळे या ओव्यांना वेगळे महत्त्व आहे. या साहित्याचे टिपण त्यांच्याकडे असून ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचा मुलगा तेजस हा चित्रपट व लघुचित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. सवड मिळेल त्या वेळी शेती व शेतमाल विक्रीत त्याची मोठी मदत होत असल्याचे प्रभाताईंनी सांगितले. शेती व लिखाण कामासाठी पती तानाजी यांचे त्यांना मोठे पाठबळ लाभले आहे.
शांताराम काळे
प्रभाताई फलके- 9702158136
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...