অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जपली द्राक्ष घडाची गुणवत्ता

मातेरेवाडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील सदाशिव शेळके यांची सुमारे 55 एकर शेती आहे. दर पाच वर्षांनी ते जुनी बाग काढून तेथे पाच एकर नवी बाग घेतात. क्षेत्र मोठे म्हणजे समस्याही मोठ्याच. पूर्वी ते हाय व्हॉल्यूम (मोठ्या थेंबाच्या आकाराची फवारणी, ज्यात पाणी जास्त लागते. उदा. एचटीपी पंप) फवारणी यंत्राचा वापर करायचे. गेल्या तीन वर्षांपासून ते संपूर्ण 55 एकरांत "लो व्हॉल्यूम' प्रकारातील आधुनिक फवारणी यंत्रांचा व त्यासाठी छोट्या ट्रॅक्‍टरचा वापर करतात.

"लो व्हॉल्यूम' यंत्राने काय साधले?

  • तीन वर्षांपासून डीपिंग बंद झाले.
  • पूर्वी "हाय व्हॉल्यूम' प्रकारात एकरी 250 ते 300 लिटर पाणी लागायचे.
  • सध्या संपूर्ण क्षेत्रासाठी तीन लो व्हॉल्यूम स्प्रेअर आहेत.
  • प्रति यंत्रातून आता एकरी फक्त 100 लिटर पाणी लागते. आर्द्रता अधिक असेल तर पाणी 80 लिटर व कोरड्या वातावरणात 100 लिटर लागते. शिफारस केलेला रसायनाचा एकरी डोस मात्र तेवढाच ठेवला जातो, त्यात बदल नाही.
  • 100 मायक्रॉन आकाराचा पाण्याचा थेंब या पद्धतीत मिळतो.
2) वेळ व श्रम वाचले - पूर्वी एक ब्लोअर बंद पडल्यानंतर पुन्हा दुसरा आणा, त्यातील पाणी काढा अशा प्रकारातून वेळ, रसायन व इंधन वाया जायचे. वेळेत काम झाले नाही तर होणारा मनस्ताप वेगळाच. आता या गोष्टी होत नाहीत.
3) क्वालिटी स्प्रेइंग होते - फवारणीनंतर पानावर कुठे "स्कॉर्चिंग' वा डाग राहात नाही. पानावर रसायनाचा (बुरशीनाशक) थर साचत नाही. ते वाया वा पानांवरून ओघळून जात नाही. त्याचे अधिकाधिक (95 टक्‍क्‍यांपर्यंत) कव्हरेज मिळते. बोर्डो मिश्रणही फवारले जाते.
4) त्यामुळे अनावश्‍यक फवारण्यांची संख्या कमी झाली. पूर्वी जिथे तीन ते चार स्प्रे घ्यावे लागत, तेथे दोन स्प्रे पुरेसे ठरतात.
5) डीपिंग होते यंत्राद्वारे - पूर्वी मजुरांकडून संजीवकांचे डीपिंग करताना घड कमी-जास्त वा अर्धवट बुडवला जाणे यासारख्या चुका होत. आता फवारणी यंत्रांच्या साह्याने हे काम झाल्याने अंतिम गुणवत्तेत 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.
- संजीवक पानांमध्ये योग्यप्रकारे पोचून पानांची कार्यक्षमता पर्यायाने पुढे मालाचे वजन वाढते.

द्राक्षाचा कुरकुरीतपणा कसा वाढवला? ( स्प्रे शेड्यूल- प्रति एकरी प्रमाण)

1) गोडी छाटणीनंतर 20 किंवा 21 व्या दिवशी पहिला स्प्रे - एकरी पाच ते सहा ग्रॅम जीए
2) दुसरा स्प्रे - एक दिवसाआड - पाच ते सहा ग्रॅम जीए
3) तिसरा स्प्रे - 20 टक्के फुलोरा - पाच ते सहा ग्रॅम जीए
4) चौथा स्प्रे - 40 टक्के फुलोरा - आठ ग्रॅम जीए
5) पाचवा स्प्रे - 80 टक्के फुलोरा - आठ ग्रॅम जीए
6) सहावा स्प्रे - ज्वारीच्या आकाराचा मणी - एक लिटर ब्रासिनोस्टेरॉईड्‌स वर्गातील संजीवक अधिक जीए 35 ग्रॅम
7) सातवा स्प्रे - त्यानंतर सहाव्या दिवशी - एक लिटर सीपीपीयू अधिक जीए तीस ग्रॅम
8) आठवा स्प्रे - मण्यात शंभर टक्के पाणी उतरल्यानंतर 15 ग्रॅम जीए व ब्रासिनोस्टेरॉईड्‌स गटातील संजीवक एक लिटर. ब्लॅक वाणासाठी. त्यामुळे रंग चांगला येतो. व्हाईट वाणाला हेच संजीवक अर्धा लिटर. यामुळे मालाला कुरकुरीतपणा वा कडकपणा येतो.
9) डीपिंगऐवजी योग्य अवस्थेत योग्य फवारणी केल्याने विरळणीचे कामही आपोआप होऊन जाते.

रोगांचे प्रभावी नियंत्रण

1) शेळके म्हणतात, की अर्ली बागांत पानांत कोवळेपणा असताना डाऊनीचा जास्त प्रादुर्भाव होतो. यासाठी गोड्या छाटणीनंतर पोंगा स्टेजपासून एक ते दोन पानांच्या अवस्थेपासून आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या फवारण्यांवर भर देतो. यासोबत 00:00:50 हे विद्राव्य खत एक ते दीड ग्रॅम प्रमाणात घेतो. वाढीचा अंदाज घेऊन हे दोन ते तीन स्प्रे दर पाच ते सहा दिवसांच्या अंतराने घेतल्यास पाने पक्व होण्यास मदत होते आणि डाऊनीही नियंत्रणात राहतो. झायरम वगळता अन्य प्रकारच्या बुरशीनाशकांत 0:0:50 या विद्राव्य खताचा वापर करीत आलो आहे. जेवढी कोवळी पाने, तितका रोगाचा धोका अधिक असतो.
2) दोन आंतरप्रवाही बुरशीनाशक फवारण्यांमध्ये एक फवारणी स्पर्शजन्य बुरशीनाशकाची होते.
3) लो व्हॉल्यूम यंत्र व 25 एचपी क्षमतेचा ट्रॅक्‍टर वापरल्यास फवारणीस ताशी पाच किलोमीटर वेग हा महत्त्वाचा मानला जातो. त्यातही कॅनोपीत लपलेले आतील घड योग्य "कव्हर' होण्यासाठी ताशी 3.75 ते 4 ते 5 किलोमीटर वेग ठेवल्यास फवारणीचा चांगला रिझल्ट मिळतो, असे दिसून आल्याचे शेळके म्हणाले.
4) हवामान व पाऊस परिस्थिती पाहून फवारण्यांचा निर्णय घेतला जातो.
5) भुरीसाठी उपाय - शेळके म्हणतात की गोड्या छाटणीनंतर सुमारे 16 ते 17 दिवसांत 5 ते 7 पानांच्या अवस्थेत भुरीसाठी पहिला स्प्रे घेतला पाहिजे. डाऊनीप्रमाणे फवारण्यांचा कालावधी जवळ-जवळ ठेवण्याची गरज नाही. मात्र, 10 ते 12 दिवसांच्या अंतराने आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा स्प्रे घेणे उपयोगाचे ठरते. बुरशीनाशकाचा ग्रुप मात्र बदलून घ्यायला हवा.
6) आता आधुनिक स्वरूपाचे डस्टर (धुरळणी यंत्र) आल्याने रसायनांची धुरळणी अधिक कार्यक्षमतेने होते. एकरी 4 ते 5 किलो सल्फरच्या धुरळणीने भुरीसोबत लालकोळीही नियंत्रणात राहतो.
7) अर्ली कटिंगच्या बागेत मागील वर्षी सतत पाऊस सुरू असतानाही एकरी एक किलो सल्फर, त्यात अडीच किलो मॅन्कोझेब आणि थोडी टाल्कम पावडर (एकजीव मिश्रणासाठी) वापरून धुरळणी केली, त्यामुळे डाऊनी व भुरीचे चांगले नियंत्रण मिळाले.
संपूर्ण 55 एकर बागेत आधुनिक लो व्हॉल्यूम फवारणी यंत्राचा वापर, तो करण्याच्या पद्धतीचा अभ्यास, हवामान, पाऊस यांची परिस्थिती पाहून बुरशीनाशकांची निवड व वापर आणि गोड्या छाटणीचे टप्प्याटप्प्याचे नियोजन आणि एकूण व्यवस्थापन यातून गेल्या तीन वर्षांपासून रोगांचा धोका, फवारण्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी करण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला.
सदाशिव शेळके - 9423081055, 9011515135

सदाशिव शेळके यांची द्राक्षशेती दृष्टिक्षेपात


  • सुमारे 1987 पासून द्राक्षशेतीचा अनुभव
  • द्राक्षवाण : जम्बो (काळी द्राक्षे), थॉमसन, क्‍लोन टू आदी
  • बहर छाटणी कालावधी : 5 सप्टेंबर ते 20 ऑक्‍टोबर
  • छाटणीपासून ते बाजारापर्यंतचे नियोजन अचूक ठेवण्यावर भर
  • एकरी उत्पादनक्षमता (अलीकडील काळातील) - 12 ते 14 टन
  • गोड चव, कडकपणा, आकर्षक रंग आणि टिकवणक्षमता या निकषांवर त्यांचा द्राक्षमाल बाजारपेठेत विकला जातो. काळी द्राक्षे व्यापाऱ्यांमार्फत बांगला देश, मलेशियात जातात, त्याला किलोला 70 ते 90 रुपयांपर्यंत दर मिळतो.
  • युरोपला व्हाईट वाणांना हाच दर 50 ते 60 रुपये मिळतो.
  • सर्व खर्च वजा जाता एकरी एक ते दीड लाख रुपये नफा मिळतो.
  • देशभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी नेहमी संपर्क. वर्षभरात राज्यातून सुमारो दोन हजार अभ्यासू शेतकरी त्यांच्या द्राक्षशेतीस आवर्जून भेट देतात.
-------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate