অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली

आधुनिक शेतीची कास धरली, शेतात प्रगती साधली

खरीप हंगामावर शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. यातच शेतीवरील खर्च ही सर्वात मोठी बाब आज बनली आहे. अशाही स्थितीत उत्‍तम नियोजन, इच्‍छाशक्‍ती असल्‍यास सर्व काही शक्‍य होते.... असाच अनुभव आहे तो मारेगाव तालुक्‍यातील केगाव येथील देवराव सखाराम ठावरी यांचा. परीसरातील बाजारपेठांचा अभ्‍यास करून वर्षातील तीनही हंगामात पिकांची लागवड करून ग्राहकांपुढे विविधता ठेवणे, स्‍वतः मालाची विक्री करणे आदी वैशिष्‍ट्यांमुळे शेतीमध्‍ये आर्थिक प्रगती साधली आहे. पारंपरिक शेतीला बगल देत सर्व कुटुंबाच्‍या मदतीने नियंत्रित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. यातून शेती फायदेशीर व शाश्‍वत होऊ लागली. शेतीचे तंत्र अधिकाधिक समजावून घेतल्‍याने अनावश्‍यक खर्च टाळता येऊन शेतीचा विकास घडवून आणता आला. नुकतीच जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी त्‍यांच्‍या शेतीला भेट दिली.

मारेगाव तालुक्‍याच्‍या ठिकाणावरून ५ किलोमीटरवर अंतरावर आदिवासी बहुल हजार लोकसंख्‍येच ‘केगाव’ हे छोटसं गाव. १० पर्यत शिक्षण घेतलेले देवराव ठावरी यांच्‍याकडे वडीलोपा‍र्जित ८ एकर शेती. पूर्वापारपासून कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांची लागवड करीत. कधी नैसर्गिक आपत्‍तीत पिकांचे नुकसान तर कधी कोरड्या दुष्‍काळामुळे पिकांचे कोवळे अंकुर करपायचे. ना नफा ना तोटा लावलेला खर्च तेवढा या शेतीतून निघायचा. पत्‍नी, तीन मुले, सुना यांची साथ मिळाली. पुणे जिल्‍ह्यातील तळेगाव दाभाडे येथील काढणी पश्‍चात तंत्रज्ञान केंद्रात प्रशिक्षणात सहभाग घेतला. यातून बदलत्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा, हवामानाचा, बाजारपेठेचा अभ्‍यास करून शेतीचे नियोजन केल्‍यास शेती फायद्याची ठरू शकते हे त्‍यांनी हेरले यातूनच शेतीत विविध प्रयोग राबविण्‍यास सुरवात झाली.

संपूर्ण शेती ठिबक सिंचनाखाली

जमीन मध्‍यम स्‍वरूपाची असून चढ उताराची होती. शेतात विहिरीची सुविधा असूनही पाणी देण्‍यास मोठी अडचण यायची. यातून केवळ दोन एकर क्षेत्रच हंगामी ओलीताखाली यायची. यातून पाणी असूनही पिके घेण्‍यास अडचण याचची. त्‍यामुळे संपूर्ण शेतीचे सपाटीकरण करून शेती समतल केली. कृषी विभागाच्‍या विविध प्रशिक्षण कार्यशाळेतून ज्ञान आत्‍मसात करून संपूर्ण शेती ओलीताखाली आणण्‍याचे ठरविले. पुढे विदर्भ सघन सिंचन योजनेअंतर्गत वडीलोपार्जित ८ एकर शेती सुरूवातीला ठिबक सिंचनाखाली आणली. यात फुलकोबी, टमाटर, काकडी, पालक मेथी, तर दोन एकर क्षेत्रावर सायोबीन व रब्‍बीत हरभरा, उन्‍हाळी भूईमुग ही पिके ठिबक सिंनाखाली घेतात.

पारंपरिक पिकांना तिलांजली

आठ एकर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड पारंपरिक पद्धतीने खरीप हंगामात करायचे. मात्र, निर्सगाच्‍या लहरीपणामुळे जेमतेम उत्‍पन्‍न पदरी पडायचे. संयुक्‍त कुटुंब असल्‍याने कुटुंबाचा गाडा चालविणे म्‍हणजे तारेवरची कसरत व्‍हायची. यातून पीक पद्धतीत बदल केल्‍यास विस्‍कटलेली आर्थिक घडी बसू शकते. असा कुटुंबातील सर्वांनीच निर्यण घेतला आणि आज तो प्रत्‍यक्षात आणला. शेडनेट, ठिबक, पॉलिमल्‍चिंग (प्‍लास्‍टीक आच्‍छादन) करून भाजीपाला पिके घेण्‍याचे ठरविले. यातून दररोज उत्‍पन्‍न हातात येऊ लागले.

कुटुंबच राबतेय शेतीवर

कुटुंब प्रमुख वडील देवराव ठावरी आजपर्यंत शेतीत राबत होते. मात्र, आता याला जोड मिळाली राहुल, प्रफुल्‍ल आणि अतुल या तिनही मुलांची. पत्‍नी छबूबाई, सुन मनीषा, सुनंदा हे सर्वजण शेतावर राहत असून शेतीत काम करीत आहेत. शेती उत्‍तम व्‍हावी, त्‍यातून भरघोस उत्‍पन्‍न निघावे यासाठी सर्व कुटुंब झटत आहे. कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍य नियोजन करून आपली जबाबदारी पार पाडतात. कुठल्‍या दिवशी शेतामध्‍ये काय काम करावे याचे नियोजन वडील, मुले, पत्‍नी चर्चेने ठरवितात. बाजारपेठ, वाहतूक, माल काढणी अशी शेतातील 60 टक्‍के कामे घरातील सदस्‍य करीत असून 40 टक्‍के कामे मजूराकरवी करून घेण्‍यात येतात.

अर्ध्‍या एकरावर शेडनेट

आपल्‍या जवळ असलेल्‍या 7 एकरावरील शेतामधील अर्धा एकर जागेवर कृषी विभागाच्‍या सहाकार्याने शेडनेटची उभारणी केली. यामध्‍ये पहिल्‍याच हंगामात शेडनेटमध्‍ये काकडी व पालक, मेथी लागवडीतून तर उर्वरित क्षेत्रावर मल्‍चींग आच्‍छादनाचा वापर करून टमाटर व फुलकोबी या भाजीपाला पिकांची लागवड केली. यातून एक लाख १ लाख ४० हजार रूपयांचे उत्‍पन्‍न हाती आले. त्‍यामुळे शेडनेट व मल्‍चींग पद्धतीने लागवड केलेल्‍या शेतीत पाण्‍याचा अपव्‍यय टाळता आला आणि उत्‍पादनही घेता आले.

आधुनिक अवजारांचा वापर

शेतातील उत्‍पन्‍नावर सुधारणा होत असताना आता शेतीत आधुनिक यंत्राचा वापर करण्‍याकडे कुटुंबाचा कल वाढला. यातून ट्रॅक्‍टर, पेरणीयंत्र, रोटाव्‍हेटर, पंजी, बीबीएफ यंत्र, दोनफाळी नांगर आणि इतर यंत्र खरेदी करण्‍यात आली. स्‍वतःच ही सर्व यंत्रे तीनही भाऊ चालवित असल्‍याने शेत मशागतीचे काम हलके होऊन शेतमजूरांचा खर्च वाचू लागला. इतकेच नव्‍हेतर ही यंत्रे इतर शेतकऱ्यांना किरायाने देत असून यातून शेतीला जोडधंदाही लाभला आहे.

मे महिन्‍यापासून लागवडीचे नियोजन

कोबी, टमाटर, काकडी, मेथी, पालक यासारख्या भाजीपाले पिकांचे रोप व लागवडीचे नियोजन मे महिन्‍यापासून करण्‍यात येते. याकाळात भाजीपाला उत्‍पादन मंदावत असल्‍याने पिकांना चांगला दरही मिळतो. तर कोबी आणि काकडी मल्‍चींग पद्धतीवर शेटनेटमध्‍ये लागवड करण्‍यात येत असून सणासुदीच्‍या हंगामात भाजीपाला पिकांची मागणी वाढते. अशाच प्रकारचे नियोजन पावसाठी व हिवाळी हंगामात करीत असल्‍याने बाराही महिने भाजीपाला पिकांना चांगली मागणी असते.

परिसरातील बाजारपेठेत विक्री

मारेगावपासून वणी, भद्रावती, करंजी, पांढरकवडा, मारेगाव कुंभा या ठिकाणी बाजार भरत असल्‍याने याठिकाणी स्‍वतः भाजीपाल्‍याची विक्रीचे दुकान लावतात. यातून खर्च वजा जाता चांगला नफाही मिळत आहे. तीनही भावंडे आदल्‍या दिवशी मालाची काढणी काढणीपासून तर विक्रीपर्यंतचे काम करतात.

जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची शेताला भेट

देवराव ठावरी यांच्‍या शेतीला जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी भेट देऊन त्‍यांच्‍या शेतीची पाहणी केली. शेतामध्‍ये राबवित असलेल्‍या विविध नाविण्‍यपूर्ण प्रयोगांची माहिती घेतली. शेडनेट मधील पिके, यातून निघणारे उत्‍पादन, बाजारपेठ, विक्रीतंत्र, वाहतून शेतीत बदल कसा घडविला, आंतरपिके, भाजीपाला, लागवड तंत्र आदिंची माहिती जाणून घेतली. जिल्‍ह्यातील अशा प्रगतीशील शेतकऱ्यांची माहिती जिल्‍ह्यातीलच इतर शेतकऱ्यांपर्यत पोहचली पाहिजे. जेणेकरून इतर शेतकऱ्यांनी त्‍यांचा आदर्श घेऊन अशा पिकांकडे वळतील आणि शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी येईल.

पीक बदलामुळेच प्रगती

पांरपरिक पिके घेताना निर्सगाचा लहरीपणा आणि शेतातून मोजकेच उत्‍पन्‍न पदरी पडत होते. मात्र, आता पिकांत बदल आणि शेडनेटमुळे शेतातून उत्‍पन्‍न निघत आहे. याला कुटुंबातील मुलांची साथ मोलाची ठरली. तसेच तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांची वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

देवराव ठावरी, शेतकरी, केगाव (मो. नं. ९६०४३६८१८२)


लेखक - नीलेश फाळके
मोबाईल नंबर : ९९२२९२०६५६

स्त्रोत - महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate