ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना गटाद्वारे एकत्र आणून सेंद्रिय शेती व त्याची बाजारपेठ सुकर करण्याचे मोफ्का व डॉ. ढवळे ट्रस्ट यांच्या माध्यमातून झालेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत. उत्पादन ते विक्रीपर्यंतचे सर्व प्रत्यक्ष मार्गदर्शन या शेतकऱ्यांना झाले. आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या या मालाला मुंबई शहरात सक्षम बाजारपेठ मिळाली. आदिवासींचे जीवनमान त्यातून उंचावले आहे. विशेष म्हणजे उच्चशिक्षित व्यक्तींनी पुढाकार घेऊन नियोजनबद्धपणे केलेल्या कार्याचे हे फलित आहे.
मुंबई शहरात सावरकर मार्गाने दादरमधील सेनाभवनाकडे येण्यापूर्वी उजवीकडे वळणे घेऊन माहीम स्टेशनच्या दिशेने जाताना औद्योगिक वसाहतीची इमारत नजरेस पडते. उद्योग क्षेत्रातील (कार्पोरेट) नोकऱ्या व व्यवसायाला तिलांजली देऊन शेतकरी झालेले पस्तिशीतील तरुण-तरुणी इमारतीतील कार्यालयात काम करताना दिसतात. मुंबई शहरापासून दीडशे किलोमीटर दूर डहाणू, वाडा, विक्रमगडमधील आदिवासी शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक आराखडा योजना (बिझनेस प्लॅन) तयार करण्याचे काम येथे केले जाते.
"आयबीएम' या माहिती- तंत्रज्ञान उद्योगातील जगप्रसिद्ध कंपनीतून राजीनामा देऊन पेठ (ता. डहाणू, जि. ठाणे) येथे शेती करणारे वेंकट अय्यर असोत, की स्वतःचा पिढीजात प्लॅस्टिकचा व्यवसाय सोडून शेतीकडे वळणारे विपुल मेहता असोत. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी "मुंबई ऑरगॅनिक फार्मर्स ऍण्ड कंझ्युमर असोसिएशन (मोफ्का) ही संस्था स्थापन केली आहे. अद्याप त्याचे नोंदणीकरण झालेले नाही. संस्थेचे पाच शेतकरी व अन्य दोन, असे सात सदस्य आहेत. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करणे, त्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न ही संस्था करते. या संस्थेला महत्त्वाची मदत मिळाली ती डॉ. एम. एल. ढवळे ट्रस्टची. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात ही संस्था कार्य करते. एकमेकांच्या समन्वयातून काम करण्यातून परिसरातील सेंद्रिय शेती बचत गटांची स्थापना करण्यात आली.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्गाने जाताना मनोरवरून डावीकडे वळून सुमारे 20-25 किलोमीटर अंतर कापले, की ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाडे नजरेस पडायला सुरवात होते. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेले आदिवासी शेतकरी या टापूत बहुसंख्येने पाहण्यास मिळतात. भात, नाचणी ही त्यांची पारंपरिक पिके. अलीकडे मोगरा आणि भाजीपाला शेतीही त्यांनी सुरू केली. मात्र व्यापारी अत्यंत कमी भाव देऊन त्यांच्याकडून माल खरेदी करतात. अशा वेळी "मोफ्का' संस्थेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत.
ढवळे ट्रस्टच्या माध्यमातून या आदिवासी भागाला माफक किमतीत आरोग्यसेवा दिली जाते. आदिवासींचे पोषण होण्याच्या उद्देशाने सेंद्रिय सकस अन्न आणि त्यासाठी सेंद्रिय शेतीची संकल्पना पुढे आली होती. परंतु सेंद्रिय बाजारपेठेचा प्रश्न ट्रस्टच्या विश्वस्त उज्ज्वला पेंडसे यांच्यापुढे उभा राहिला.
त्याच वेळी "मोफ्का'च्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविलेला सेंद्रिय भाजीपाला वितरित केला जात होता. मागणी प्रचंड, परंतु पुरवठा अत्यल्प अशी मोफ्काची अवस्था झाली होती. ट्रस्टच्या मध्यस्थीने आदिवासी शेतकऱ्यांना या चळवळीत सहभागी करून घेण्यात आले. अट फक्त एकच, म्हणजे कटाक्षाने सेंद्रिय शेती करायची.
"मोफ्का'ने भाजीपाल्याचे प्रति किलोचे दर हंगामाच्या सुरवातीलाच निश्चित केले होते. त्यामुळे फसवणुकीचा प्रश्नच नव्हता. मोफ्काची भाजीपाला वाहतूक, प्रक्रिया आणि वितरणाची यंत्रणा आदिवासी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली. "मार्केटिंग'चा प्रश्न चटदिशी सुटला.
मोफ्का व "ढवळे ट्रस्ट'च्या पुढाकाराने बोपोली गावात पूर्णवेळ कार्यरत समन्वय केंद्र उभारले आहे. जयेंद्र सुतार आणि संतोष नाखवा या ठिकाणी सर्व सेंद्रिय शेतकऱ्यांशी रोजच्या रोज संपर्कात असतात. त्यांच्या शेतांनाही भेटी देतात. काही गुंठे ते दोन एकर क्षेत्रधारक शेतकऱ्यांचा सदगुरू कृपा सेंद्रिय शेती बचत गटाचे मोफ्काच्या मदतीने नोंदणीकरण करण्यात आले आहे. त्यात सोळा सदस्य आहेत. बोपोली- -------कसरूड------- परिसरातील या गटाचे अध्यक्ष विष्णू भोये, तर सचिव नारायण डबके आहेत.
सेंद्रिय शेतीमाल उत्पादन ते विक्रीचे मोफ्काचे मॉडेल तयार केले आहे. खरीप, रब्बी हंगामांनुसार पिकांचे नियोजन ठरते. शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा केला जातो. भेंडी, गवार, दुधी, कारली, घोसाळी, शिराळी, चवळी, मका, भोपळा, काकडी, अंबाडी, वाल, कांदा, पडवळ, तोंडली आदींचे उत्पादन घेतले जाते. कुणा शेतकऱ्याचे किती क्षेत्र याची लेखी नोंद ट्रस्टच्या कार्यालयात उपलब्ध असते. सेंद्रिय भाजीपाल्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कार्पोरेट कंपन्यांच्या धर्तीवर गुणवत्ता परीक्षण (अप्रायझल) केले जाते. त्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, शेती उत्पादनाची सखोल माहिती, बियाणे रोपे, शेतावरील पाळीव प्राणी, जमिनीचे आरोग्य, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सुपीकता वाढविण्यासाठी केलेल्या व्यवस्थापनाची इत्थंभूत माहिती नोंद केलेली असते.
"गुगल मॅपिंग'च्या साहाय्याने गटातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. एका शेतकऱ्याच्या शेतातील माती पावसाळ्यातील पाणी वाहून घेऊन जायची. त्यावर उपाय शोधण्यासाठी शेतजमिनीचा उतार किंवा जलसंधारणाचे कोणते उपाय करता येतील हे पाहण्यासाठी या नकाशाचा उपयोग होणार आहे.
उत्पादित सेंद्रिय भाजीपाला आणि धान्याचे एकत्रीकरण ढवळे ट्रस्टच्या संकलन केंद्रावर होते. तेथून "पिकअप व्हॅन'ने शेतीमाल मोफ्काच्या भिवंडीतील केंद्रावर पाठविण्यात येतो. या ठिकाणी प्रतवारी आणि "ब्राऊन पेपर"मध्ये पॅकिंग केले जाते. हे काम एका महिला बचत गटाकडे दिले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार "हरी-भरी टोकरी' तयार करण्यात येते. मोफ्काचे ग्राहक ठरलेले आहेत.
सोळा आठवड्यांचा एक हंगाम यानुसार त्या कालावधीत जेवढी भाजी ग्राहक वापरतात त्या हिशेबाने
त्या कालावधीसाठी विशिष्ट रक्कम ग्राहकांकडून आगावू जमा करून घेतली जाते. मोफ्काने मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या परिसरातील काही दुकानांमध्येही भाजीपाला पॅकिंग ठेवण्याचे प्रयत्न केले. अपेक्षित असे होते, की ग्राहकांनी तिथे येऊन भाजीपाला घेऊन जावा. या पद्धतीला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
बहुतांश ग्राहकांची मागणी होती, की भाजी घरपोच यावी. मोफ्काकडे स्वतःची वितरण यंत्रणा नव्हती. त्यामुळे मुंबईतील प्रसिद्ध डबेवाल्यांची मदत घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. सेकंद आणि मिनिटांवर काम करणारे मुंबईतील डबेवाले आता आदिवासींनी पिकविलेला सेंद्रिय भाजीपाला मुंबईत पोचवू लागले. मोफ्काचे सध्याचे वितरण या डबेवाल्यांच्या सहकार्यानेच सुरू आहे आणि माल पोचविण्यात अचूकता पाळली जाते. सध्या सुमारे दोनशे कुटुंबात प्रति आठवडा माल पोचवला जातो.
मुंबईसारख्या महानगरात सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यांना माल पुरवायचा तर तेवढी सेंद्रिय शेती आपल्याकडे उपलब्ध आहे का, असा प्रश्न मोफ्काचे महत्त्वाचे सदस्य वेंकट अय्यर उपस्थित करतात. संस्थेच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत शेतीमाल उत्पादन ते विक्री यंत्रणेचे "कंपनीत रूपांतर करण्याचा निर्णय झाला आहे. सदगुरू बचत गटाचे शेतकरी आणि भविष्यात सेंद्रिय चळवळीमध्ये सहभागी होणारे शेतकरी या कंपनीचे भागधारक होऊ शकतील.
आपल्या सेंद्रिय मालाचे मिळणारे उत्पादन व उत्पन्न पाहता गटाचे आदिवासी शेतकरी समाधानी आहेत. रासायनिक शेतीत होणारा खर्च, उत्पादन व दर यांची तुलना करता सेंद्रिय शेती त्यांना फायदेशीर ठरू लागली आहे. मोफ्काने त्यांना त्याचे अर्थशास्त्र प्रत्यक्ष दाखवले आहे. पीक व क्षेत्रनिहाय शेतकऱ्यांना प्रति हंगाम 25 हजार ते एक लाख रुपये निव्वळ नफा आता मिळू लागला आहे. सेंद्रिय पद्धतीचा वापर होत असल्याने जमिनीही सुपीक होत असल्याचा वेगळा फायदा त्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठीही डॉ. ढवळे ट्रस्ट आणि मोफ्का संस्थेकडून मदत केली जाते. शेती उत्पादन सुरू झाल्यानंतर ठराविक हप्त्याने भांडवलाची बिनव्याजी वसुली केली जाते. शेतीपंप घ्यायचाय, शेततळी उभारायचीय, ठिबक सिंचन प्रणाली उभारायची आहे यासाठी हे अर्थसाह्य केले जाते.
सेंद्रिय गटशेती यशस्वी होण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांचा सहभाग हा सर्वांत महत्त्वाचा घटक होता. उत्पन्नाची मर्यादित साधने होती. मोफ्काने विश्वास आणि हमी दिल्याने शेतकरी उत्साहाने सहभागी झाले. सेंद्रिय शेतीमालाबाबत खात्री देण्यासाठी मुंबईतील ग्राहकांना आदिवासी शेतकऱ्यांचे शेत व त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आवर्जून बोलावले जाते. विक्रीचे दर आठवड्याला शेतकरी बैठकीतून ठरवले जातात. बोपोलीमधील केंद्रावर सर्वच शेतकऱ्यांच्या मालाचे वजन करून एकत्रीकरण करण्यात येते. रासायनिक अंश सापडला, तर शेतीमाल "रिजेक्ट' होणार या भीतीने प्रत्येक जण गुणवत्तेवर लक्ष ठेवून असतो.
मूळचे केरळचे, परंतु मुंबईत जन्मलेले, अस्खलित मराठी बोलणारे वेंकट अय्यर. दहा वर्षांपूर्वी आयबीएम कंपनीत संगणक अभियंते म्हणून कार्यरत होते. मुळातच निसर्गाची आवड असल्याने गिर्यारोहण आणि भटकंतीमुळे शेतीच्या प्रेमात पडले. गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीच करण्याचा निर्णय घेतला. अर्थातच घरातून प्रचंड विरोध झाला. मात्र मागे हटायचे नाही असा निर्णय घेतला. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर भविष्य निर्वाह निधी आणि बचतीच्या पैशातून डहाणू तालुक्यातील पेठमध्ये शेतजमीन खरेदी केली. शेती करायची तर सेंद्रिय शेतीच. या हट्टाने अय्यर यांनी दहा वर्षांत परिसरातील आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. ज्यांना शेतीत रस आहे अशा असंख्य युवकांना ते मार्गदर्शनही करतात. मोफ्कातर्फे सुरू असलेल्या सेंद्रिय शेतीमाल विक्रीच्या अनेक संकल्पना त्यांच्या पुढाकारातूनच विकसित झाल्या आहेत. मुंबईतील डबेवाल्यांमार्फत सेंद्रिय शेतीमालाचे वितरण, नव्याने कंपनी स्थापण्याचा प्रस्ताव अशा सर्व आघाड्यांवर ते निर्णायक भूमिका वठवीत आहेत.
डॉ. ढवळे ट्रस्ट आणि मोफ्का संस्थेच्या माध्यमातून गुणवत्ता परीक्षणासाठी शेतकऱ्यांना लेखी अर्जांचे सुरवातीला वाटप झाले. लेखी फॉर्म आणि अक्षरे पाहिली, की हे अशिक्षित शेतकरी बावरायचे. अखेर मोफ्काने शक्कल लढवली. गुणवत्ता परीक्षणासाठी चित्रांचा आधार घेतला. चित्रे पाहून अर्जावर खूण करायची असे ठरले. शब्दांऐवजी चित्र दिसल्याने आदिवासींचे चेहरे खुलले. त्यामुळे गुणवत्ता परीक्षणाचे काम सोपे झाले त्याच बरोबरच आदिवासी शेतकऱ्यांमधील अंतर कमी होऊन विश्वास वाढीस लागला.
- सौ. उज्ज्वला पेंडसे, विश्वस्त, डॉ. एम. एल. ढवळे ट्रस्ट, विक्रमगड (ठाणे)
दबकतच सुरवातीला चार गुंठे क्षेत्रावर सुरू केलेली सेंद्रिय शेती दुसऱ्या वर्षात दहा गुंठ्यांवर नेली. सुरवातीला उत्पादन कमी मिळायचे. आता ते वाढले आहे. रासायनिक फवारणी आणि खतांवरील खर्चातील बचत पाहता आता फायद्यात आलो आहे. बचत गटाच्या माध्यमातून यापुढील काळात प्रक्रियेकडे वळायचे आहे.
- विष्णू विक्रम भोये, 8381034834
अध्यक्ष, समर्थ सेंद्रिय शेती बचत गट, करसूड, ता. विक्रमगड, जि. ठाणे
----------------------------------------------------------------
वांगी, मेथी आणि भेंडीची सेंद्रिय शेती करतो. तीन वर्षांपासून बचत गटात सहभागी आहे. ट्रस्ट आणि मोफ्काच्या सहकार्यामुळे शेती सुलभ झाली. व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबली.
-प्रफुल्ल लक्ष्मण महाले
मु. खोरीपाडा, पो. करसूडमोफ्काने सेंद्रिय शेतीचे व्रत स्वीकारले आहे. आम्ही आदिवासी शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले आहे. अनेक अडचणींवर मात करत ही चळवळ आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोचलीय. जगात आणि देशात झपाट्याने होणारे बदल पाहता सेंद्रिय शेतीमध्ये काम करण्याऱ्या सर्वांचेच भवितव्य उज्ज्वल आहे.
- वेंकट अय्यर, 9820052606
----------------------------------------------------------------
रविशेठची वाडी, पेठगाव, पो. तवा. ता. डहाणू, जि. ठाणे संपर्क -- ९८२००५२६०६
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...