অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कपाशीची शेती पिक व्यवस्थापन

राजकारणासोबतच शेतीचा व्यासंग जपणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील तिगावच्या प्रशांत इंगळे यांनी पीक व्यवस्थापन सुधारणेच्या बळावर कापसाची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. पिकाची उत्पादकता वाढली तर शेतकऱ्याचे शेतीतील आर्थिक स्थैर्य वाढून विदर्भातील शेतकरी आत्महत्येची समस्या कमी होण्यास मदत मिळेल, असे ते म्हणतात.

विदर्भात वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे आठ किलोमीटरवर तिगाव येथे प्रशांत इंगळे राहतात. गावाच्या हद्दीत त्यांची वडिलोपार्जित 50 एकर शेती आहे. खरिपात कापूस, सोयाबीन, तर रब्बीत गहू या पारंपरिक पिकासोबत वांग्यासारख्या भाजीपाला पिकावर त्यांचा भर राहतो. हा भाग तसा जिरायती आहे. मात्र 50 एकरांवरील क्षेत्राच्या सिंचनासाठी त्यांच्याकडे दोन विहिरींचा पर्याय आहे. एका विहिरीला पाण्याची मुबलकता असल्याने त्यावर पाण्याचा उपसा करण्यासाठी पाच अश्‍वशक्‍तीचे तीन पंप बसविण्यात आले आहेत, तर एक विहीर उन्हाळ्यात तळ गाठत असल्याने त्यावर पाच अश्‍वशक्‍तीचा केवळ एक पंप आहे.

कपाशीची वाढवली उत्पादकता

इंगळे सुमारे पंचवीस ते तीस एकरांवर कपाशी घेतात.

पूर्वी त्यांची या पिकाची एकरी उत्पादकता तीन ते चार क्विंटल होती. मात्र पीक उत्पादकता वाढवणे हाच शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्याचा चांगला मार्ग आहे, अशी विचारधारा इंगळे यांनी जोपासली आहे. त्यामुळे केवळ उत्पादन वाढवा असे सांगण्यापेक्षा आपल्या शेतापासून ही गोष्ट सुरू करण्याचे व विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवण्याचे त्यांनी ठरवले. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नदेखील सुरू केले.
कपाशीच्या सुधारित तंत्राचा वापर सुरवातीला केवळ काही क्षेत्रापुरता केला जातो व पुढे तो वाढवण्याचा निर्णय घेतला जातो. केवळ एकच वाण न निवडता लाल्या विकृती प्रतिकारक, रसशोषक किडी सहनशील, अधिक बोंडे देणारे अशी वाणांतील गुणवैशिष्ट्य तपासून सात ते आठ विविध वाण निवडले जातात.
कपाशीची लागवड पाच बाय एक फूट अंतरावर केली जाते. सात गाई, तीन बैलजोड्या आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर केला जातो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो. पाण्याचे व्यवस्थापन पाटपाण्याच्या माध्यमातून होते. ठिबक सिंचन तंत्र चांगले आहे, मात्र अजून त्याची गरज भासली नसल्याचे इंगळे म्हणाले. मॉन्सूनच्या पावसाने खंड दिल्यानंतर पिकाची गरज लक्षात घेता कपाशीला पाणी देण्यावर भर राहतो. या वर्षी विदर्भात संततधार पावसामुळे दहा एकर क्षेत्रावरील कपाशीला मूळकुजीसारख्या रोगाचा सामना करावा लागला. कापूस पीक फायदेशीर ठरले असले तरी इंगळे यांना सोयाबीनचे दर वर्षी चार क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन काही मिळत नाही. ते वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
अन्नद्रव्यांच्या वापराविषयी इंगळे जागरूक आहेत. "एनपीके" या मुख्य अन्नद्रव्यांसह सल्फर व मॅग्नेशियम यांचा वापर ते दर वर्षी करतातच, शिवाय झिंक, फेरस ही सूक्ष्म अन्नद्रव्येही तितकीच महत्त्वाची असल्याचे ते म्हणतात. अन्नद्रव्यांचा पुरवठा जमिनीतून करण्यावर त्यांचा भर आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर लाल्या आला असताना आपल्या शेतात त्याचे प्रमाण दिसले नसल्याचे इंगळे म्हणाले.

उत्पादन वाढवले

सुधारित तंत्रज्ञानाच्या वापरातून इंगळे यांनी कापसाचे एकरी उत्पादन फरदडीसह आता 20, 22, 24 क्विंटलपर्यंत नेले आहे. वर्धा येथील जिनिंग व्यावसायिकांना विक्री केली जाते. एकरी 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च होतो. यंदाच्या वर्षी त्यांना फरदडसहित एकरी 25 क्‍विंटल उत्पादन अपेक्षित आहे. 

अन्य पिकांमध्ये गहू, वांगी ही पिकेही आर्थिक आधार देतात, असे इंगळे म्हणतात. यंदाच्या वर्षी एकरी 20 हजार रुपयांचा खर्च वजा जाता सुमारे 40 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना वांगी पिकातून मिळाले. वर्धा बाजारपेठेत अडत्यांमार्फत वांगी विक्री केली जाते. एका राजकीय पक्षात सक्रियपणे काम करताना शेतीकडे आपले दुर्लक्ष झाले नसल्याचे इंगळे म्हणाले. अधिकाधिक वेळ शेतीसाठीच देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 
ब्राझील, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील कापूस पिकाची उत्पादकता व भारतीय कापसाची उत्पादकता यांचा तुलनात्मक अभ्यासही ते करतात. तज्ज्ञांची मदत घेत उत्पादनवाढीचे उद्दिष्ट साध्य करीत असल्याचेही ते म्हणतात.

कपाशीची बाजारपेठ

वर्धा ही विदर्भातील कपाशीच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट ही राज्यातील सर्वांत मोठी कपाशी बाजारपेठ म्हणून लौकिकप्राप्त आहे. त्यासोबतच 27 जिनिंग व्यावसायिक येथे आहेत. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांच्या संपर्कात राहत प्रशांत कपाशीची विक्री करतात.

शेतीतील समस्या

कापूस वेचणीचे काम वेळेच्या दृष्टीने अत्यंत खर्चिक आहे. शेतमजुरी दरातही झालेली वाढ आणि मजुरांच्या उपलब्धतेतील अडचण पाहता हे काम यंत्राद्वारा होण्याची गरज आहे. त्याकरिता सुलभ व कमी खर्चाचे कापूस वेचणी यंत्र उपलब्ध होण्याची गरज प्रशांत यांनी व्यक्‍त केली. 

संपर्क - 
प्रशांत इंगळे-8007076895

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate