विदर्भातील नामदेव ढोकणे या युवा शेतकऱ्याची शेती
विदर्भात शेतीत उतरणारी नवी पिढी संख्येने कमी असली तरी नावीन्यपूर्ण प्रयत्नांमधून आपला वेगळा ठसा उमटविण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पोखरीच्या नामदेव ढोकणे या तरुण शेतकऱ्याने नव्या शेतीतील पाऊले ओळखताना ऍस्टर फुलशेतीवर भर दिला. शेतीबरोबरच आपल्या कुटुंबाचे जीवनमानही चांगल्या प्रकारे फुलवले आहे.
पुसद (जि. यवतमाळ)पासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरील पोखरी गावशिवाराला लागूनच नामदेव ढोकणे यांचे नऊ एकर शेत आहे. जवळूनच वाहणाऱ्या पूस नदीमुळे वर्षातील काही दिवस पाणी उपलब्ध असते. याच नदीवरील वेणी धरणाचा "बॅक फ्लो' पोखरीपर्यंत येतो, त्यामुळे उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होते. म्हणूनच या भागात ओलिताची पिके घेतली जातात. ढोकणे यांनी नदीवरून साडेतीन किलोमीटर पाइप टाकून ओलिताची सोय केली आहे. यासाठी चार लाख रुपये खर्च आला. बॅंकेने दोन लाखांचे कर्ज दिले. उर्वरित काही घरचे व काही उसने घेतले.
मागील खरिपात त्यांनी 10 गुंठे स्वीटकॉर्न व दोन एकरात 20 पोते सोयाबीन घेतले. प्रत्येकी एक एकर पपई व हळद लावली. एक एकरात 10 क्विंटल कापूस घेतला. ज्वारी, गहू, हरभरा आदी बहुविध पिके घेऊन शेतीतील जोखीम कमी करतानाच नफा वाढविण्याचे नामदेव यांचे अशा प्रकारे नियोजन असते. कुटुंबातील आई, वडील, लहान भाऊ साऱ्यांचीच मदत मिळते. शेतीतून अधिक उत्पन्न घेण्यासाठी त्यांना फुलशेतीचा मार्ग फायदेशीर वाटला. ही शेती सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास करायला ते विसरले नाहीत. परिसरातील फुलवाल्यांकडून कळाले, की ऍस्टरच्या फुलांना वर्षभर मार्केट उपलब्ध असते. वर्षभर विक्री व रोज पैसा हाती येईल या उद्देशाने त्यांनी ऍस्टर शेतीचे नियोजन केले.
ऍस्टर लागवडीचे नियोजन
पूर्वी तीन बाय एक व चार बाय दोन अंतरावर लागवड होती. ओळींतील अंतर कमी असल्याने झाडे दाटायची. फुले तोडताना अडचण व्हायची. आता सुमारे 20 गुंठ्यांत पाच बाय दोन फूट अंतरावर सुमारे 1500 ऍस्टर रोपे आहेत. लागवड वरंब्यावर होते. रोपे नांदेडवरून 100 रुपये प्रति शेकडा भावाने खरेदी केली. लाल, पिवळा, पांढरा, भगवा, गुलाबी रंगाच्या जाती आहेत. लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिमच्या द्रावणात बुडवून काढतात.
तंत्रज्ञान वापराची वैशिष्ट्ये
- वरंब्यावर रोपांची लागवड
- रोपांची लागवड सायंकाळच्या सुमारास
- तुषार सिंचनाने पाणी व्यवस्थापन
- कळ्या लागल्यावर पाण्याचा ताण पडू देत नाहीत
- उत्पादनात सातत्य
- एका प्लॉटवरील उत्पादन संपण्यापूर्वी दुसरा प्लॉट तयार असतो
- तुषार सिंचनाचा उपयोग, काही वेळा पाटाने पाणी देतात.
- उन्हाळ्यात दोन ते तीन दिवसांनी, तर हिवाळ्यात आठ दिवसांनी तुषार सिंचनाने पाणी. प्रत्येक पाळीला तीन तास लागतात.
- मशागतीसोबत शेणखत पसरवून दिले जाते, प्रत्येक रोपाच्या बुडाशीही शेणखताचा वापर.
- जैविक खतांचे ड्रेंचिंग
खते - युरिया, पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट एकत्रित करून दिले जाते. लागवडीपासून 15 दिवसांनी व पुढे पिकाची आवश्यकता पाहून दोन वेळा हीच खते दिली जातात. पीक संरक्षण - ऍस्टरवर मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जाणवतो, त्यावर कीडनाशकाची फवारणी केली जाते.
शिकण्यासारखे काही
- उत्पादनात नियमितता, त्यामुळे फुलविक्रेते, ग्राहक तीन वर्षांपासून टिकून आहेत.
- कष्टाचा कंटाळा नाही.
- नामदेव यांनी ऍस्टर शेतीचे प्रशिक्षण घेतले नसले तरी गावातील कृषी पदवीधर प्रदीप शिंदे व वडील दगडूजी ढोकणे यांचे मार्गदर्शन मिळते.
- परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतीचे नियोजन.
- फुलांच्या किरकोळ व थेट विक्रीवर भर.
- लागवडीपूर्वी मार्केटचा अभ्यास.
- हळद, स्वीटकॉर्न अशा नव्या पिकांची लागवड.
- अपूर्ण राहिलेले शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण करणार.
अर्थशास्त्र
प्रत्येक रोपापासून प्रति हंगामात 20 किलोपर्यंत फुले मिळतात. 20 गुंठ्यांत सुमारे 1500 रोपांपासून एका हंगामात 2.5 ते तीन टन फुलांची विक्री. फुलांचे दोन हंगाम घेतले जातात. वर्षभर फुले मिळतील असे नियोजन. एक प्लॉट संपायच्या आधीच दुसऱ्याचे उत्पादन सुरू झालेले असते.
20 रु. प्रति किलोप्रमाणे दर मिळतो. किरकोळ व ठोक फूल विक्रीतून दररोज 200 ते 300 रु. उत्पन्न मिळते.
पाच, चार व दोन किलो याप्रमाणे पुसद शहरातील तीन फूल विक्रेत्यांना नियमित फुले पुरविली जातात. दररोज किमान 10 ते 15 किलो फुलांची काढणी केली जाते. मागणीप्रमाणे हे प्रमाण कमी- जास्त असते. गावातील लग्नसमारंभ व भागवत सप्ताहाला फुलांचे हार पुरवतात. या वेळी 200 ते 300 रुपयांपर्यंत फुलांची अतिरिक्त विक्री होते. काही शुभप्रसंगी फुलांना 30 रु. प्रति किलोप्रमाणे जास्तीचा दर मिळतो.
खर्च
रोपे, सऱ्या पाडणे, कीडनाशक फवारणी, रासायनिक खते, निंदणी, वाहतूक असा एकूण 10 हजार 840 रुपये खर्च प्रति हंगामात येतो. प्रति हंगाम फूल विक्रीतील 55 हजार रुपयांतून खर्च वजा जाता 44 हजार 160 रुपये निव्वळ नफा उरतो. वार्षिक सुमारे 88 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न अर्धा एकर क्षेत्रातून मिळते.
नामदेव म्हणतात, की फुलांतून दररोज पैसा मिळतो. कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविता येतात.
या पैशांतून शेतीचे व्यवस्थापन करणे सोयीचे होते. फूल विक्रीसाठी पुसदला जाणे- येणे करण्यासाठी गाडी घेतली आहे. स्वीटकॉर्न, कोथिंबीर, पपई, हळद या परिसरात नव्या असणाऱ्या नगदी पिकांची लागवड नामदेव करू लागले आहेत. फुलशेतीला मधमाशीपालनाची जोड देण्याचा त्यांचा मानस आहे. शेतीसाठी शिक्षण अर्धवट सोडावे लागल्याने मुक्त विद्यापीठातून त्यांना कृषीविषयक पदविका पूर्ण करायची आहे. फुलशेतीच्या भरवशावरच नामदेव यांनी किराणा दुकान सुरू केले आहे.
ऍस्टरमध्ये आंतरपीक
या वर्षी प्रथमच ऍस्टर लागवडीनंतर 15 दिवसांनी कोथिंबीर लावली, त्याची विक्री पुसदला केली. फुले येईपर्यंत त्यातून सुमारे सात हजार रुपये मिळविले. यंदा मेथीचेही आंतरपीक घेणार आहेत.
स्वीटकॉर्नने वाढविला गोडवा...
गेल्या खरिपात 10 गुंठ्यांत स्वीटकॉर्नपासून 12 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. सध्या फुलांबरोबर 10 गुंठे स्वीटकॉर्न आहे. गणेशोत्सवादरम्यान स्वीटकॉर्न काढणीला येईल. दुर्गोत्सवापर्यंत त्याच्या विक्रीचे नियोजन आहे.
संपर्क - नामदेव ढोकणे - 9405382366,
पोखरी (हूडी), ता. पुसद, जि. यवतमाळ. मो. 9405382366