অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकत्रित कृती मिळवून देते फायदे

एकत्रित कृती मिळवून देते फायदे

भालूकगजर गांव, पश्चिम बंगालच्या पुरुलियामधील काशीपूर गटाच्या पूर्वेकडे वसलेलं आहे. इथली माती खडकाळ वालुकाष्म प्रकारची आहे त्यामुळं त्यात पाणी फारसं साठत नाही. वार्षिक पाऊसमान १२०० ते १४०० मिलीमीटर आहे पण हा सगळा पाऊस एका वर्षात २ महिनेच पडतो. हा संपूर्ण अर्धशुष्क प्रदेश एक-पीक पद्धतीचा आहे आणि पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाणी नसल्यानं बाकीच्या ८-९ महिन्यांत कोणतंही पीक घेता येत नाही. पावसावर येणारं एकमेव पीक घेताना देखील हवामानातील लहरी बदलांमुळं गडबड होते. त्यामुळं बहुतांश जमिनी दीर्घकाळपर्यंत वापल्याच जात नाहीत. अन्नाच्या टंचाईमुळं इथली धडधाकट माणसं कामाच्या शोधात जवळच्या सधन जिल्ह्यांमध्ये स्थलांतर करतात. अशा पडीक जमिनी देखील भालूकगजर गांवात सहजपणे पाहायला मिळतात.

विहीर भरणे

पण भालूकगजर शेतक-यांच्या एका गटानं ३००-३५० बिघे जमीन एक-पीक पद्धतीतून दुहेरीच काय तिहेरी पिक पद्धतीत बदलणं शक्य करुन दाखवलं आहे. द्वारकेश्वर नदी या गांवाजवळून वाहते. त्यांनी या नदीजवळ एक विहिरी खोदली आणि चर खोदले, त्यामुळं नदीला पूर येतो तेव्हा तिचं पाणी या चरांमधून विहिरीत पडेल.

पाणी नियोजन

कोरड्या मोसमात या विहिरीचं पाणी जवळच्या शेतांना देण्यासाठी त्यांनी नियोजन केलं. हे खोदकाम करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. पण अनेक अडथळे पार करुन ते १६ फूट परिघाची १५ फूट खोल विहीर खोदण्यात यशस्वी झाले. १० अश्वशक्तीच्या पंपाच्या मदतीनं ते आता या विहिरीजवळच्या ३००-३५० बिघे जमिनीवर सिंचन करु शकतात. पावसावर आधारीत भाताखेरीज, विहिरीच्या उपसा सिंचन यंत्रणेद्वारे आणखी दोन पिकं घेता येतात.

या गटाचे बहुतांश सदस्य भूमीहीन मजूर आहेत. या गटानं शेतमालकांसोबत केलेल्या करारानुसार, मालक पावसाळ्यात भात पेरतील आणि गटाच्या सदस्यांना ती जमीन उर्वरित वर्षासाठी कसण्याची परवानगी देतील. गेल्या वर्षी, त्यांनी गहू, मोहरी, करडई, लाख, हरभरा, चवळी, पावटा, टोमॅटो, भोपळा, वांगी, बटाटे, कांदे अशी हिवाळी पिके घेतली.

त्यांनी ११० क्विंटल गहू, ७०० किलो मोहरी, ३५किलो चवळी, १० किलो लाख, ५५ किलो पावटा, ५ किलो करडई, २१० किलो टोमॅटो, २२ किलो दोडके, ४०० किलो भोपळा असं उत्पन्न घेतलं त्याची किंमत १,२०,००० रुपये आली. अशी आशा आहे की पुढील २-३ वर्षात या गटाच्या सदस्यांना टंचाईच्या हंगामात अन्य जिल्ह्यांमधे स्थलांतर करण्याची गरज राहणार नाही.

 

स्रोतः DRCSC बातमीपत्र, अंक क्र.१ एप्रिल-ऑगस्ट, २००८

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate