অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एका एकरात स्वाभिमानाने जगता येते

एका एकरात स्वाभिमानाने जगता येते

आजकाल आजूबाजूला शेतीला नावे ठेवणा-यांची कमी नाही, शेकडा नव्यानव लोक ती कशी परवडत नाही, हे पटवून देण्यातच स्वतःला धन्य समजतात. जमीन कमी असेल तर जास्तीची हवी म्हणतील. कुणी शासन अनुदान देत नाही म्हणेल. बेभरवशाच्या निसर्गामुळे शेतीतून फारसे हाती लागत नाही. कधी ओला, कोरडा दुष्काळ, कधी गारपीट अशा कारणाने शेतीत स्थैर्य नाही म्हणणारे अनेक आहेत. कुणाला सोसायटी, बँक वेळेवर कर्ज देत नाही. कुणाचे कुटुंब मोठे असल्याने तिच्यावर गुजराण होत नाही. मग काही जणांच्याकडे शेतीला जोडधंदा असतो. घरात एखादा नोकरदार असता. म्हणून त्याला शेती परवडत. अशा हजार कारणांच्या मागे आम्ही लपत असतो.

वरीलपैकी कोणतेही कारण न सांगता व कुठलीही जमेची बाजू नसताना केवळ अन् केवळ त्रेचाळीस गुंठे वडिलोपार्जित शेतीतून पाच माणसाचे कुटुंब गेले चाळीस वर्षे चांगले व स्वाभिमानाने जगते आहे. कुणाच्या शेतावर एक दिवसही रोजंदारी न करता कुणापुढे हात न पसरता, परिस्थितीला दोष न देता त्याच शेतीतून कल्पकतेने वीस गुंठे लिंबूबागेवर जगता येते, हे तमाम सुशिक्षित शेतक-यांना दाखवून दिले, ते दुष्काळी औसा तालुक्यातील आपचुंदा येथील केवळ जुनी तिसरी पास, पासष्ट वर्षीय श्री. लक्ष्मण नारायण अलमल या हाडाच्या तज्ज्ञ शतक-यानं. सव्वापाच एकर शेती.

पुढे वंशाला पाच पांडव झाली. खायचे वांदे तिथं शिक्षणाचे काय घेऊन बसलात. सर्वात मोठे बंधू श्री. राम अलमले हे कळते झाल्यानंतर अशाच ओळखीतून पुण्याजवळच्या घोडनदी येथे एका बागायतदाराकडे सालगडी म्हणून नोकरी करीत. तर बाकीचे गावात कुणी गुराखी व सालगडी म्हणून राबत. श्री. लक्ष्मण अलमले हे भावाला भेटायला व ख्याली खुशालीला घोडनदीला गेले. त्या मालकाकडे चारपाचशे झाडांची लिंबाची बाग होती. येताना त्यांच्याकडून लोणच्यासाठी पाचपन्नास लिंबू मागून आणली. लोणचे करून बिया शेणाच्या खड्ड्यात कचरा म्हणून टाकल्या

त्याच दरम्यान वडील वारले. पाचही भाऊ राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व हनुमान बाजूला राहिले. हिश्शाला त्रेचाळीस गुंठे प्रत्येकी जमीन आली. बापाच्या काळात खड्यावजा विहीर होती. एकत्रच्या खड्ड्यातले शेणखत पाचही भावांनी गाडी-गाडी स्वत:च्या हिश्शाच्या शेतात टाकले. पावसानंतर ज्वारीत वेगळी वाटणारी तीन चार रोपटे दिसली ती लक्ष्मणरावांनी खुरपणीमध्ये तशीच ठेवली. त्याला तुराष्ट्या लावून बुडाला शेणखत टाकुन वाढवली. पुढे ज्वारी निघाल्यावर पाणी व खत टाकले. पाहता पाहता. लिंबोणीची झाडे मोठी झाली.

दोन तीन वर्षांनी काही फळेलागली. त्याच्या बियापासून आणखी रोपे बनवून ती एका कडेकडून शेतात लावली. निघणारी लिंबे औसा बाजारात स्वतः विकून येणा-या पैशावर गुजराण होऊ लागली. दुस-या भावांनीही मोठ्या भावाच्या अनुभवावर आपापल्या शेतात रोपे बनवून लावली. असे करीत आज श्री. लक्ष्मण अलमले यांच्याकडे दहा ते तीस वर्षांची पंच्याहतर झाडे वीस गुंठ्यात आहेत. उत्पादित लिंबू फळे ढोबा व हॉटेलवर वर्षभर बोलीने देतात. त्यामुळे त्यांना बाजारात बसून विकण्याची कृचित वेळ येते. तो वाचलेला वेळ शेतीला देता येतो. शेत गावापासून दूर असल्याने ये-जा करण्यापेक्षा ते शेतातच झोपडे बांधून राहू लागले. दगडमातीचे गावातले घर भूकंपानंतर पडले. आधीच दाटीवाटीने राहणारी भावंडे शेतात आली आणि पाच सहा जणांची वस्ती झाली. दररोज किमान अर्धा किंटल लिंबू पत्रास ग्रॅमचे एक फळ, कमी बिया, सेंद्रिय खते टाकून वाढवल्याने टिकायला चांगले असल्याने ग्राहकांना आवडू लागली. आलेल्या पैशातून घर भागत.


उर्वरित अर्धा एकरात ज्वारी, तूर, मूग, उडीद व गहू अशी पिके आलटून पालटून घेत. घराला लागणारे धान्य व डाळी त्यातून निघत. ते बाजारातून येईपर्यंत दुस-या दिवशीची फळे पत्नी निलूबाई काढून ठेवीत. नेहमीच्या निरीक्षणातून नर व मादी फुले केव्हा लागतात, त्यांना खते पाणी केव्हा द्यावीत हे त्यांनी निरीक्षणातून आत्मसात केले. वर्षातील मृग, आंबे व हस्त अशा तीनही बहाराची फळे झाडावर एकामागे एक लागत असल्याने बागेतून एकही दिवस फळे मिळाली नाहीत, असे होत नाही. म्हणजे वर्षांची तीनशे पासस्ट दिवस त्यांना लिंबूफळे विकून रोज पैसा मिळतो. उन्हाळ्यात भाव चांगला मिळतो. तेव्हा दरदिवशी किमान तीन ते चार हजाराची फळे मिळतात. तर पावसाळ्यात एक ते दीड महिना कमी म्हणजे चारशे ते पाचशेची फळे निघतात. सरासरी तीन साडेतीन लाखाची फळे वर्षात निघतात. झाडांना सेंद्रिय खतांबरोबर १८:१८:१o हे खत हस्त बहाराच्या वेळी जमिनीत देतात. नंतर जमीन खोडून वाफे केले जातात. सर्वांकडेच थोडी थोडी झाडे असल्याने वडिलोपार्जित विहीर सर्वांनी खोल केली व यातून बागेपुरते पाणी मिळते. रानात राहिल्याचा फायदा म्हणजे उठल्यापासून दिवसभर काहीना

काही काम चालू असते. फुकटचा वेळ वाया जात नाही. गावात राहिल्याने वेळ वाया जातो. शेतीकडे दुर्लक्ष होते. पैसा खर्च होतो मात्र उत्पन्न न मिळाल्याने होणारे नुकसान त्याहीपेक्षा वेगळे असते. शेतात राहिल्यावर लक्ष्मणरावांनी शेतात मोकळ्या जागेत घरखर्चापुरती भाजीपाल्याची वेगवेगळी पिके तसेच कांदा, लसूण लावले. त्यामुळे तो खर्च वाचला तसेच एक देवणी गाय त्यांनी घेतली असून तिचे दूध विकून मिळणा-या उत्पन्नाबरोबर शेणखत व गोमूत्र बागेसाठी मिळते. जळणासाठी झाडांच्या वाळलेल्या फांद्या, सर्व अन्त्रधान्य घरच्या घरी स्वस्तात मिळाल्याने घरखर्च मोठ्या दोन्ही मुलींचे शिक्षण केले व त्यांचे लग्र चांगल्या घरातल्या होतकरू मुलांशी लावून दिले. त्यांचे येणे जाणे, बाळांतपण, मानपान कशातच कमी केली नाही.

एकुलता एक मुलगा सतीश मॅट्रिक करून गेले दहा-बारा वर्षापासून बापाची शेती पुढे चालवतो आहे. त्याच्या सोयरिकीच्या वेळेस पाहुण्याला पोरगी देताना विचारले तेव्हा ते म्हणाले, मुलगा तर होतकरू आहे. पण महत्वाचे म्हणजे लिंबाची बाग पाहूनच मुलगी देतोय. म्हणजे शेती किती आहे, यापेक्षा तिच्यातून किती व कोणते उत्पन्न निघते हे महत्वाचे आहे. घर शेतात असल्याने कामाच्या रगड्यामुळे बायकांना एकदुस-याच्या संसारात डोकावयाला वेळच नसतो. त्यामुळे नातेसंबंध बिघडत नाहीत. लिंबावर सहसा कुठली कोड व रोग पडत नाही. त्यामुळे फवारणीचा खर्च येत नाही. वर्षात दोन वेळा रासायनिक खत तेवढे टाकावे लागते.

दोन मेहनत, त्यामुळे चार हजाराच्यावर संपूर्ण बागेचा खर्च जात नाही. सेंद्रिय बागेत फवारणी नसल्याने मोठ्या प्रमाणात मधमाशा परागीभवनाचे काम करतात. त्यामुळे फळधारणा व्यवस्थित होते. निचल्याची जमीन असल्याने व भरखते यामुळे फुलगळ होत नसल्याने पाचच्या घोसात प्रत्येक बहराची फळे लगडलेली दिसतात. सतीश दर दिवशी औसा, किल्लारी, निलंगा किंवा लातूर येथे स्वत: फळे विकून दररोज किमान हजार रुपये घेऊन येतो. त्यासाठी किमान ५0 ते ८0 कि.मी.वर फळे घेऊन जावी लागतात. तेवढी फळे त्याची पत्नी सौ. उषा ही खास बनविलेल्या काठीच्या खुडीने दररोज काढते. करून त्यांनी बॅक बॅलन्सही केला आहे. काम करताना सतीशच्या आईचा पाय घसरून पडून पायाला दुखापत झाली. त्यासाठी दवाखान्याला सव्वा लाखापर्यंत खर्च आला पण एक पैसाही कर्ज काढावे लागले नाही की कुणाकडून उधारी, उसनवारी करावी लागली नाही. लक्ष्मणरावच्या स्वतःच्या कामावर व शेतीवर एवढा विश्वास आहे की, सत्य अन् सुंदरतेत भगवंत पांडुरंग असतो, असे ते मानतात. लिंबाच्या सोबतीने जिथे जुने झाड वाळले, मोडले तिथे मोकळ्या झाडे लावलीत. फळे घरी खाऊन पाहुण्या-रावळ्यांना वानवळा देऊन शिल्लक फळे लिंबाबरोबर ते विक्री करतात.

स्वत:बरोबर आपल्या चार भावाकडे पन्नास ते शंभर झाडांच्या बागा त्यांनी लावून दिल्या. तसेच गावातील, परिसरातील व पाहुण्या-रावळ्यांकडे लिंबाची झाडे लावण्यास मदत केली. हे समाधान त्यांना पैशात मोजता येत नाही. शेतात कुठले वर्तमानपत्र येत नाही की टि.व्ही सुद्धा नाही. केवळ आकाशवाणी केंद्रावरील रेडिओच्या बातम्या व कार्यक्रम ऐकत आनंदाने सर्व कुटुंब शेतातील पत्र्यांच्या घरात आनंदाने नांदते. आता दोन भाऊ व पुतणेही एकमेकांच्या मदतीने रानात घर करून आहेत. त्यामुळे लिंबू व पेरूच्या पिकासाठी जास्तीची जमीन नसल्याने केवळ एखादी देशी गाय प्रत्येकाकडे आहे. स्वतःचे कुटुंब मोठे झाल्यावर मुलींची मुलंही शिक्षणाकडे आजोबाकडे असतात. त्यांचा खर्चही ते करतात.

गावातील राजकारणापेक्षा हेवेदाव्यापेक्षा दूर शेतीत, एकांतात ते झाडाशी एकरूप होतात. झाडांशीच सुख- दु: ख वाटून घेतल्याने मनःशांती मिळते. सर्वजण आनंदी व आत्मविश्वासाने जगतात, हे विशेष होय. कुठल्या सरकारी योजनांसाठी त्यांनी कधी सरकारी कमी पडले नाही. जवळच्या श्री.ततापुरे या मित्राने शेतीवर एवढी श्रद्धा ठेवून जगणा-या आपल्या मित्रासाठी एक बोअरवेल पाडून दिली असून ते पाणी घरासाठी व बागेसाठी वापरत. पण गेले तीनेक वर्ष अवर्षणामुळे मागच्या उन्हाळ्यात दहा हजाराचे पाणी विकत घेऊन बाग जगवावी लागली. एवढाच काय तो खर्च. शेतात  राहिल्याने त्यांचेकडे येणा-यांचे ते फार स्वागत करतात.

घरी आहेत ती फळे देतात. लोकांनी आपल्याकडे यावे, असे त्यांना वाटते . शेतात दंगामस्ती करतात. पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या सहवासात राहून निसर्गानंद जो असतो तो हाच. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, सकस अन्न हे कुठल्याही महालात किंवा गगनचुंबी इमारतीतील घरात न मिळणारा आनंद ते निसर्गात घेतात. एवढेच नव्हे तर त्यांना कुठलाच आजार सुद्धा नाही. कमी क्षेत्रावर पाय रोवून जिद्दीने उभे राहिल्यास शेती परवडते, हा शेतीत आत्मविश्वासाने उभे राहण्याचे बळ दिले आहे. म्हणून मुलगा सतीश बापाची गादी चालवतो आहे. पैसे असूनही दुसरी शेती न घेता आहे तीच चांगली करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. आज केवळ वीस गुंठ्याच्या बागेतून दिवसाला हजार रुपयांचे उत्पन्न घरी येते. अशाप्रकारे श्री. अलमले यांची शेतीवरची श्रद्धा व विश्वास इतर वीसपंचवीस शेतक-यांना तरी शेतीत घट्ट पाय रोवून उभे राहायला कारणीभूत ठरतो, हे विशेष होय.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate