অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकात्मिक पद्धतीचा आदर्श शेती

कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्‍यातील पतिहाळ हे सुमारे दोन ते अडीच हजार लोकसंख्येचे गाव. येथील महादेवप्पा बसप्पा त्रिकन्नावार यांचे नाव प्रयोगशील शेतकरी म्हणून घेतले जाते. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत फायद्याची शेती त्यांनी केली आहे. विविध पिके घेतानाच कोंबडी, मत्स्यपालन व दुग्ध व्यवसायही ते करतात. शेतीत कमी गुंतवणूक वा खर्च करणे व पूरक व्यवसायाची जोड शेतीला देणे या बाबींमधून त्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे.
कर्नाटक राज्यात बैलहोंगल तालुक्‍यातील पतिहाळ येथील महादेवप्पा त्रिकन्नावार यांनी एकात्मिक शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत शेतकऱ्यांसमोर आदर्श तयार केला आहे. त्यांचे मूळ गाव वकुंद (ता. बैलहोंगल) आहे. मलप्रभा प्रकल्पाच्या पाणी फुगवट्यामुळे या गावाचे पुनर्वसन करण्यात आले. त्यातूनच सन 1976 मध्ये महादेवप्पा यांचे कुटुंब पतिहाळ गावात स्थलांतरित झाले. महादेवप्पा यांची गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर सात एकर 14 गुंठे जमीन आहे. ही सर्व जमीन मुरमाड व खडकाळ आहे.

पिकांचे केले योग्य नियोजन

महादेवप्पा यांनी आपल्या शेतीचा विकास करताना प्रत्येक वर्षी जमिनीची सुधारणा केली. बांधबंदिस्ती व जमिनीचे सपाटीकरण केले. शेतात पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाल्याने शेतीतील विहिरीलाही पाणी वाढले. फारसे शिक्षण झाले नसले तरी शेतीतील अभ्यासूवृत्ती, मेहनतीची तयारी, व्यवहारचातुर्य यांच्या जोरावर महादेवप्पा शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात. चहापूड सोडून शक्‍यतो काही खरेदी करावे लागू नये व आपल्याच शेतात कौटुंबिक गरजेनुसार शेतीमाल पिकावा यादृष्टीने त्यांचे पीक नियोजन असते.
सुमारे सात एकरांत असलेल्या शेतीक्षेत्रात व बांधांवर विविध पिके लावण्यात आली आहेत. आंबा 35, चिकू 20, कढीपत्ता 4, फणस व पपई प्रत्येकी सहा व सागवानाची दोनशे झाडे आहेत.
महादेवप्पा यांच्या शेतात हंगामानुसार कापूस, ऊस, मका, केळी, भुईमूग, उडीद व भाजीपाला आदी पिके घेतली जातात. आंतरपीक पद्धतीही वापरली जाते. उत्पादन खर्च कमी केल्यामुळे बाजारपेठेत शेतीमालाचे दर घसरले तरी नुकसानीची तीव्रता कमी होते. शेतात सध्या चार विंधन विहिरी आणि एक विहीर आहे. सर्व विंधन विहिरींचे पाणी विहिरीत एकत्र केले आहे. तेथून शेतीला ते पुरवले जाते. उसाचे व कपाशीचे प्रत्येकी दोन एकर, तर केळीचे एक एकर क्षेत्र आहे. लावण उसाचे ते एकरी 70 टन, तर खोडव्याचे 60 टन उत्पादन घेतात. केळीचा 32 किलोचा घड उत्पादित केला जातो. बीटी कपाशीचे एकरी 13 क्विंटल उत्पादन ते घेतात. त्यासाठी सुमारे 16 हजार रुपये उत्पादन खर्च होतो.

पूरक व्यवसायातही हातखंडा...

रासायनिक व शेणखताचे दर गगनाला भिडले आहेत. मशागतीचा खर्चही आवाक्‍याच्या बाहेर गेला आहे. या तुलनेत शेतीमालाला बाजारपेठेत दर मिळत नाही. यामुळे शेती परवडत नसल्याचे चित्र आहे. मात्र बियाणे, खते आदी निविष्ठा खरेदी, दवाखाना अशा कारणांसाठी गरजेच्या वेळी पैसे मिळावेत यासाठी महादेवप्पा आपल्याला झेपेल इतक्‍याच छोट्या प्रमाणात शेतीपूरक व्यवसाय करतात. कमी गुंतवणूक असल्यामुळे त्यांचे हे व्यवसाय फायद्यात आहेत.

शेतातील विहिरीत मत्स्य व्यवसाय

दहा वर्षांपासून शेतातील विहिरीत मत्स्य व्यवसाय केला जातो. तीन ते चार महिन्यांतून एकदा विहिरीत माशांची पिल्ले सोडली जातात. सुमारे तीन ते चार महिन्यांनी हे मासे विक्रीयोग्य होतात. विहिरीवर येऊन मासे पकडून नेले जातात. या व्यवसायातून वर्षाला 8 ते 10 हजार रुपये उत्पन्न मिळते.

कोंबडीपालन..

शेतातील लाकूड व काठ्यांचा वापर करून कमी खर्चात कोंबडी पालनासाठी घराशेजारीच शेड तयार केले आहे. शेडमध्ये सुमारे 100 कोंबड्या आहेत. कोंबडीला खाद्य म्हणून मका भरडून दिला जातो. शेडमध्ये दुर्गंधी येऊ नये यासाठी प्रत्येक वर्षी नदीतील माती आणून टाकली जाते. वर्षातून एकदा ही कोंबडीखत मिश्रित माती खत म्हणून पिकांना दिली जाते.

दुग्ध व्यवसाय

महादेवप्पा यांच्याकडे तीन गाई आणि एक मुऱ्हा जातीची म्हैस, दोन बैल आहेत. पाच शेळ्या आहेत. शेळीच्या पिल्लांची विक्री केली जाते. केळीच्या शेताभोवती संरक्षक भिंत म्हणून लावलेल्या सुबाभूळ व अन्य झाडांचा पाला शेळ्यांना खाद्य म्हणून दिला जातो. 
महादेवप्पा यांनी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिला आहे. प्रत्येक वर्षी शेतीमध्ये नदीकाठची माती व शेणखत दिले जाते. मातीत गांडुळांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केला जातो.

पैरा पद्धत..

सध्या शेतमजुरांची सर्वत्र चणचण आहे; मात्र महादेवप्पा यांनी त्यावर उपाय शोधला आहे. त्यांचे चार भाऊ विभक्त झाले असले तरी राहायला ते परिसरातच आहेत. ज्या वेळी मजुरांची वानवा भासते, त्या वेळी घरातील सदस्य प्रत्येकाच्या शेतात एक दिवस पैरा पद्धतीने काम करतात. अशा पद्धतीने मजूरटंचाईवर मात करून त्यावर होणारा खर्चही वाचवला आहे.

कृषिमंत्र्यांनी केली प्रसंशा

कमी खर्चात आणि काटकसरीने शेती फायदेशीर करणाऱ्या महादेवप्पा यांची शेती व त्यातील प्रयोग पाहण्यासाठी कर्नाटकचे कृषिमंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी अलीकडेच आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्या शेतीला भेट दिली. तब्बल दोन तास त्यांनी महादेवप्पा यांच्यासोबत वेळ व्यतीत केला. त्यांच्या प्रयोगांची प्रसंशा केली.

पुरस्काराने सन्मानित

महादेवप्पा आपल्या शेतीच्या अनुभवाविषयी म्हणतात, की बालपणापासून मी शेतीत आहे. आजही मी प्रत्येक वर्षी नवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असतो. कमी खर्च, अधिक नफा असे माझ्या शेतीचे गणित आहे. विविध प्रकारची पिके मी घेतो. एका पिकाला कमी दर मिळाला तरी दुसऱ्या पिकातून तो भरून निघू शकतो. यामुळे शेतीतील जोखीम कमी होते. धारवाड कृषी विद्यापीठाने यंदा आदर्श प्रगतिशील शेतकरी म्हणून महादेवप्पा यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. शेतात हाडाची काडं करून राबणारे प्रयोगशील वृत्तीचे महादेवप्पा वयाच्या 58 व्या वर्षी मिळालेल्या पुरस्कारामुळे प्रोत्साहित झाले आहेत.

मुलावरही शेतीचे संस्कार

महादेवप्पा यांचा मुलगा सोमलिंगप्पा व सून प्राथमिक शिक्षक आहेत. मुलावर शेतीतील संस्कार झाले आहेत. शिक्षकी पेशा सांभाळत ते सुट्टीच्या दिवशी आणि एरवी दररोज वेळेचे नियोजन करीत पत्नीसह शेतात काम करतात. अलीकडेच बंगळूरमध्ये झालेल्या कृषी प्रदर्शन व मेळाव्यात शिक्षण आणि शेती या विषयावर व्याख्यान देण्यासाठी सोमलिंगप्पा यांना आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या वडिलांचे शेतीतील अनुभव व आपल्याला मिळालेले संस्कार त्यांनी या वेळी विशद केले. 

संपर्क - महादेवप्पा त्रिकन्नावार - 09741529218

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate