অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा

एकीचे बळ - बाजारपेठेत दबदबा

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आहेत. त्यामुळेच एकमेकांना आधार, पाठबळ देत येथील शेतकरी विविध पिकांत सुधारित तंत्रज्ञान वापरताना विक्री व्यवस्थाही भक्कम करू लागले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या कृषक आश्रम गटाच्या "मॉडेल'मुळे शेती शाश्‍वत होण्यास मदत मिळत आहे.

कृषक आश्रम मॉडेलला गटशेतीचा आधार

शेतीतून उत्पादनवाढ महत्त्वाची आहेच, पण विक्री व्यवस्थेची "प्रणाली" (सिस्टीम) भक्कम झाली तरच शेतकऱ्याच्या हाती दोन पैसे अधिक पडतात. त्याच्या श्रमांचे चीज होते. पुणेस्थित श्रीरंग सुपनेकर यांचा सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी (ता. फलटण) येथे "कृषक आश्रम' असून, 15 एकरांवर जिरायती शेती आहे. त्यांनी शाश्‍वत शेतीतून शाश्‍वत बाजारपेठ या सिद्धान्तावर आधारित उत्पादन व विक्रीचे 'कृषक आश्रम मॉडेल' तयार केले. पत्नी सौ. नीता व मुलगा अमेय यांनीही त्यासाठी परिश्रम घेतले. "मॉडेल'ला चांगले यश मिळाले. यात त्यांना सर्वांत मोठी साथ मिळाली ती गटशेतीची. म्हणजे निनामसह परिसरातील खामगाव, मुरूम, होळ, साखरवाडी या परिसरातील गावच्या भाजीपाला उत्पादकांची. या सर्वांचा मिळून संकलित झालेला माल पुण्यात विक्री केंद्र व सुमारे 20 निवासी सोसायट्यांना थेट विकण्यात येऊ लागला. प्रत्येक सोसायटीसाठी आठवड्यातील वार निश्‍चित करून सुमारे पाचशे किलो ते एक टन मालाची विक्री होऊ लागली.

प्रचंड मागणीसाठी यंत्रणेत होतेय सुधारणा

ग्राहकांना भाज्यांमध्ये विविधता हवी असते. त्या दृष्टीने गटातील शेतकरी थोड्या थोड्या गुंठ्यांवर विविध भाजीपाला घेऊ लागले. कोणी काय लावायचे, याचे नियोजन बैठकांद्वारे व्हायचे. या पद्धतीतून एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे निवासी सोसायट्यांकडून मागणी प्रचंड आहे, पण ती पुरवण्यात शेतकऱ्यांची संख्या व पर्यायाने शेतमालाचा "व्हॉल्युम' कमी पडतो आहे. त्यामुळे ही "सिस्टीम' अजून कार्यक्षम व भक्कम करण्याचे प्रयत्न सुपनेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केले. पुण्यातील थेट विक्री त्यासाठी तूर्त स्थगित ठेवली. त्याच वेळी दुसरी जबाबदारी खांद्यावर येऊन पडली, ती म्हणजे गोवा राज्यातील जनतेला दैनंदिन भाजीपाला पुरवण्याची.

विक्रीवेळी शेतकरी उपस्थित

कृषक आश्रमाला जोडलेले शेतकरी निवासी सोसायट्यांच्या ठिकाणी विक्रीवेळी प्रत्यक्ष उपस्थित असायचे. हा माल विकणारे व्यापारी नाहीत, हा विश्‍वास त्यामुळे ग्राहकांत तयार झाला. ग्राहकांनाही थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणे शक्‍य झाले.

गोव्यात सुरू केलीय थेट विक्री

गोव्यात मोठ्या प्रमाणात बेळगावातून (जि. कर्नाटक) भाजीपाला जातो, याची माहिती मिळाल्यानंतर सुपनेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे भेट दिली. तेथील भाजीपाल्याची मागणी, दर यांचा अभ्यास केला. गोवा फलोत्पादन विभागाशी संपर्क साधण्यात आला. ऑगस्ट 2013 मध्ये गोवा फलोत्पादन विभागासोबत गटशेतीतील शेतकऱ्यांची कृषक आश्रमात बैठक झाली. तेथील अधिकाऱ्यांनी "मॉडेल' अभ्यासले. त्यांच्या मागणीनुसार आपण भाजीपाला पुरवू शकतो, दरही चांगला मिळू शकतो, याचा अंदाज शेतकऱ्यांना आला. मागणी मोठी आहे, यामुळे भाजीपाला तेवढ्या प्रमाणात लागणार. यासाठी शेतकऱ्यांच्या संख्येतही वाढ करणे गरजेचे होते. दररोज 30 टन मालाची गोवा सरकारची "ऑर्डर' आहे. सर्व भाजीपाला त्वरित उपलब्ध करणे सोपी गोष्ट नव्हती. त्या दृष्टीने टोमॅटो व भेंडी या दोनच पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मालाची उपलब्धता, वाहतूक, विक्री ही एकूणच पद्धत कसे काम करते आहे, याची चाचणी घेण्यात आली. त्या वेळी कोबी, फ्लॉवर आदी माल पाठवण्यात आला.

'ऍग्रोवन'मुळे गटशेतीस चालना

श्रीरंग सुपनेकर यांच्या कृषक आश्रमाची यशकथा ऍग्रोवनमध्ये 2013 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर राज्यभरातील विविध एक हजार शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून गटात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. गोवा फलोत्पादन विभागासोबतच्या बैठकीची बातमीही प्रसिद्ध झाली. यातून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात संपर्क केल्याने पुढील यंत्रणा सुरळीत झाली. आमची गटशेती यशस्वी होण्यात ऍग्रोवनचा मोठा हात असल्याचे सुपनेकर सांगतात.

कृषक आश्रमाच्या गटशेतीची कार्यपद्धती

 • परिसरातील सुमारे सात गावांतील शेतकरी कृषक आश्रमाशी जोडले गेले आहेत. खामगाव व मुरूम परिसरातील शेतकऱ्यांची संख्या अधिक म्हणजे 80 ते 100 पर्यंत. अजिंक्‍यतारा गटाचा वाटा मोठा आहे.
 • गटांची "आत्मा'अंतर्गत नोंदणी महत्त्वाची मानली आहे.
 • नारायणगाव (जि. पुणे) येथील टोमॅटो उत्पादकांकडूनही माल घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
 • हंगामनिहाय पिके, क्षेत्र, मागणी यांचे एकत्र बसून नियोजन होते. चांगल्या दर्जाचा भाजीपाला पुरवला तर ग्राहकांकडून तसा दर घेऊ शकतो, यासंदर्भात शेतकऱ्यांत आत्मविश्‍वास निर्माण झाला.
 • कृषक आश्रम शेतकऱ्यांना विक्रीच्या एक दिवस आधी आपला शेतीमाल दर कळवते. त्यामुळे माल कोठे विकायचा, याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना असते. -खामगावसारख्या ठिकाणी माल संकलन केंद्र ठेवले आहे. तेथे शेतकऱ्यांच्या समक्ष मालाचे वजन केले जाते.
 • शेतकरी आपल्या मालाची प्रतवारी स्वतःच चांगल्या प्रकारे करू शकतो, हे लक्षात घेऊन कृषक आश्रमाच्या मॉडेलमध्ये प्रतवारी शेतकऱ्यांना करण्यास सांगितले जाते. त्याचे वेगळे पैसेही त्यांना दिले जातात.

अन्य गटही आहेत सक्रिय

फलटण तालुक्‍यातील खामगावात पाण्याची उपलब्धता असल्याने फळपिके, भाजीपाला मोठ्या प्रमाणात होतो. गावात सुमारे सात शेतकरी गट कार्यरत आहेत. 'अजिंक्‍यतारा', 'भैरवनाथ', 'गुरुदेव दत्त', 'मोरया', 'सद्‌गुरू', 'मयूरेश्‍वर', 'सेवागिरी' अशी त्यांची नावे आहेत. रावसाहेब वैद्य, समीर शिंदे, हणमंत भोसले, शशिकांत झाडकर, विकास भोजने, उस्मान पठाण, तय्यब मुजावर, संतोष सावळकर ही गटांतील काही प्रमुख मंडळी. प्रत्येक गटात सुमारे 18 ते 20 शेतकरी असून, एकूण संख्येचा विचार केल्यास सव्वाशेहून अधिक शेतकरी परस्परांच्या पाठबळावर शेतीतील आव्हाने पेलण्यास समर्थ झाले आहेत. टोमॅटो, भेंडी, झेंडू, केळी ही गटसदस्यांची काही मुख्य पिके आहेत. शेतकरीनिहाय दोन एकर ते 15 एकरांपर्यंत क्षेत्र आहे.

पीक नियोजन थोडक्‍यात

श्रावणकाळात केळी, लग्नसराईत झेंडू, मे-जूनमध्ये टोमॅटोचे उत्पादन सुरू व्हावे, असे पीक लागवडीचे नियोजन असते. भेंडीची लागवड संक्रांतीदरम्यान होते- जेणेकरून कडक उन्हाळ्यापूर्वी फळधारणेस सुरवात व्हावी. कोबी- फ्लॉवर लागवड जून-जुलैत होते. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने ही आंतरपिके घेण्यावर भर असतो. केळीचे किमान दोन हंगाम मिळवण्याचा प्रयत्न असतो.

दर कसे ठरतात

गणपती मंदिरात गटातील शेतीमालाला अधिक दर मिळावा, उत्पादित माल जागेवरून नेला जावा, यासाठी घंटानाद करून बैठकीद्वारा दर गणपती मंदिरात ठरवण्याची प्रथा आहे. या वेळी गुजरात, नांदेड किंवा अन्य ठिकाणचे व्यापारी उपस्थित असतात. शेतकरी व व्यापाऱ्यांतील चर्चेतून दरनिश्‍चिती होते. त्यामुळे दरांबाबत पारदर्शकता राहते. कमी क्षेत्रधारकांचा मालही जागेवरून विक्री झाल्याने त्यांचा फायदा होतो. शेतमाल एकाच जागेवर मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने विविध ठिकाणचे व्यापारीही थेट गटांना संपर्क करून माल बांधावरून वजन करून घेऊन जातात.
गटशेतीमुळे भांडवली खर्चात सुमारे 30-35 टक्के बचत झाली आहे. टोमॅटोचे मी चांगले पीक घेतो. शेतातील नफ्याचे प्रमाण वाढले आहे. आता नवीन जीपही खरेदी केली आहे.

प्रतिक्रिया

 • फिरोज पठाण, शेतकरी, खामगाव
 • गटाच्या माध्यमातून शेती निविष्ठांची मागणी केली जाते. मागील वर्षी बांधावर खत योजनेतून 50 टन रासायनिक खत एकाच वेळी खरेदी केले, त्यामुळे पोत्यामागे सुमारे 30 रुपये बचत झाली.
 • मधुकर संकपाळ, शेतकरी, खामगाव.
 • अजिंक्‍यतारा गटाचे प्रमुख रावसाहेब वैद्य म्हणाले, की पूर्वी आम्ही केळी घ्यायचो, पण स्थानिक मार्केटमध्ये व्यापारी दर अत्यंत पाडून मागायचे. एकदा पुणे मार्केटमधील व्यापाऱ्याला आमच्या केळीची गुणवत्ता आवडून त्याने दहा टन मालाची ऑर्डर दिली. आम्हीही तेवढा माल उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पीक नियोजन केले. आता व्यापारी गाडी पाठवून एकाच ठिकाणी माल लोड करून घेतो. त्याचेही कष्ट वाचले. यंदा बांधावरच किलोला 13 ते 15 रुपयांपर्यंत दर मिळाला. हा फायदा गटामुळेच झाला. एका गटातर्फे दुसऱ्या गटालाही माल दिला जातो.
 • अजिंक्‍यतारा गटाने केळीच्या उतिसंवर्धित रोपांचे सामूहिक म्हणजे 14 हजार रोपांचे बुकिंग जळगावस्थित जैन इरिगेशन कंपनीकडे केले. एवढे बुकिंग असल्याने दरात सवलत मिळालीच, शिवाय तेथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कंपनीचे प्रक्षेत्र भेट आदी सुविधांचा लाभ घेणे शक्‍य झाले.
 • अजिंक्‍यतारा गट व्यापाऱ्यांतर्फे भेंडीचीही निर्यात करतो. निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात माल लागतो. गटाद्वारा तेवढा उत्पादित करता येतो. मुंबईतील एका व्यापाऱ्याने या भेंडीला किलोला 34 रुपये दर दिला. फलटणनजीक निर्यातविषयक कंपनीलाही रासायनिक अवशेषरहित भेंडी या गटाद्वारा देण्यात आली.
 • कीड नियंत्रणांसाठी गटातील शेतकऱ्यांनी कामगंध सापळ्यांचा वापर केला. त्यामुळे फवारणींची संख्या कमी होऊन त्यावरील सुमारे 30 टक्के खर्च वाचला.
 • गटातील 90 टक्के शेतकऱ्यांकडे विविध पिकांसाठी ठिबक सिंचन आहे. त्यामुळे वीजभारनियमन समस्येतही खते देणे शक्‍य झाले. उत्पादनवाढीस मदत झाली.
 • खामगावातील दीडशे शेतकऱ्यांकडील माती व पाणी परीक्षण नमुन्यांविषयी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राकडे विचारणा झाली. नमुन्यांची मोठी संख्या पाहता तेथील तज्ज्ञांनी गावातच येऊन ही सुविधा देण्याचे ठरवले. शेतकऱ्यांनी त्यांच्या निवासाची सोय केली. मोहीम यशस्वी झाली.

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन
© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate