অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार

भाजीपाला रोपवाटिकेतून फुलला संसार

कर्तबगार मंगलताई शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा

शेती परवडत नाही, असे म्‍हणणाऱ्यांनी एकदा रायते (ता. संगमनेर) येथील मंगलताईंच्‍या शेतीला भेट द्यावी. थोडी मेहनत, थोडे नियोजन व थोडे मार्गदर्शन या त्रिसूत्रीतून मंगलताईंनी आठ एकरातील शेती फुलवली. नुसती फुलवलीच नाही तर आर्थिक अडचणीचा संसार थाटात उभा केला. अर्थातच यासाठी शासनाच्‍या कृषी विभागाची त्‍यांना भरपूर साथ मिळाली. कधीकाळी अत्‍यंत काटसरीच्‍या परिस्थितीत संसार चालविणाऱ्या या कुटुंबाची आज वर्षाकाठी साठ लाख रूपयांची वार्षिक उलाढाल आहे. शेडनेटमध्‍ये रोपवाटिकेतून आर्थिक परिस्थिती सावरलेल्‍या मंगलताईंच्‍या कुटुंबाला छोट्याशा घरातून चक्‍क टुमदार बंगल्‍यात स्‍थानांतरित केले आहे.

संगमनेर तालुका मुख्‍यालयापासून अवघ्‍या तीन किलोमीटर अंतरावर रायते नावाचे छोटेसे गाव आहे. शेती हाच गावचा मुख्‍य व्‍यवसाय. गावात बहुतांश शेतकरी ऊस पिकासह डाळींब, प्‍लॉवर, टोमॅटो अशी भाजीपाला पिके घेतात. याच गावात जगन्‍नाथ शिवराम शिंदे यांची आठ एकर शेती आहे. पारंपरिक पिकात खर्च आणि उत्‍पन्‍नाचे गणित जुळत नव्‍हते. गावात राहून शेती केली तर परवडणार नाही, हा विचार मंगलताई व त्‍यांचे पती जगन्‍नाथ यांच्‍या मनात पक्‍का झाला आणि थेट शिवारात वास्‍तव्‍याचा निर्णय घेतला. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्‍या मंगलाताईंनी गृहिणी म्‍हणून जबाबादारीसोबतच पुर्णवेळ शेती करण्‍याचा निर्णय घेतला. शेतीत नवीन काही तरी करू, या जिद्दीने कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्‍पन्‍न देणाऱ्या पिकाचा शोध घेताना रोपवाटिका हा नवीन पर्याय त्‍यांना मिळाला. शेडनेट उभारण्‍याचा घेतलेला निर्णयही फेब्रुवारी 2011 ला कृतीत उतरविला. या व्‍यवसायातील यशाने या कुटुंबाला चक्‍क टुमदार बंगल्‍यात स्‍थानांतरित केले आहे.

10 गुंठे शेडनेट ते एक एकर पॉलीहाऊसचा प्रवास


शेती आधुनिक पद्धतीने करण्‍याचा निर्णय कृतीत उतरविताना असंख्‍य आव्‍हानांना तोंड देत मंगलताई व त्‍यांचे पती जगन्‍नाथ शिंदे यांनी फेब्रुवारी 2011 मध्‍ये अवघ्‍या 10 गुंठे क्षेत्रात शेडनेटची उभारणी केली. 10 गुंठ्यातील यशानंतर विस्‍ताराचा निर्णय घेतला आणि तब्‍बल एक एकरावर आज रोपवाटिकेसाठी सुसज्‍य पॉलीहाऊस उभे आहे. पॉलीहाऊस उभारणी करताना 10 एमएमचे पाईप वापरण्‍यात आले. प्रत्‍येक पोल जमिनीत खाली 2 फुट गाडण्‍यात आला. 50 टक्‍केची अल्‍ट्राव्‍हायलेट नेट वापरली. अत्‍यंत सुसज्‍य अशा पॉलीहाऊसमध्‍ये व्‍यवस्‍थापनही तेवढेच काटेकोर असल्‍याने रोपांची गुणवत्‍ता टिकून आहे.

पॉलीहाऊसमध्‍ये रोपांची लागवड


पॉलीहाऊसमध्‍ये हंगामानुसार बीजरोपण करण्‍यात येते. जानेवारी महिन्‍यात उन्‍हाळी, मे महिन्‍यात पावसाळी तर ऑक्‍टोबर महिन्‍यात हिवाळी हंगाम असतो, यानुसार बीज रोपण केले जाते. 20 ते 25 दिवसात रोप लागवड योग्‍य तयार होते. शेतकरी ग्राहकांनी नोंदविलेल्‍या मागणीनुसार रोपांची विक्री करण्‍यात येते. प्रथम मागणी नोंदविलेल्‍या शेतकऱ्याला प्रथम रोपे देण्‍यात येतात.

पंधरापेक्षा अधिक गरजूंना वर्षभर रोजगार


चूल आणि मूल एवढेच विश्‍व, असे समजून त्‍यातच धन्‍यता मानणाऱ्या महिला आपण पाहतो. परंतू यापलीकडे जाऊन महिला काय करू शकते, याचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे मंगलताई शिंदे आहेत. योग्‍य मार्गदर्शन, अथक मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून शेतीतील उत्‍पन्‍नात कमालीची वाढ केली आहे. पॉलीहाऊसमध्‍ये भाजीपाला रोपवाटिका उभारून इतर महिलांना त्‍यांनी रोजगार दिला आहे. वर्षभर पॉलीहाऊसमध्‍ये 10 ते 12 महिलांना रोजगार दिला जातो तर शेतीमध्‍ये तीन जोडप्‍यांना वर्षभर रोजगार दिला जातो. रोजगार दिलेल्‍या महिलांना मंगलताईंनी चांगलाच जिव्‍हाळा लावला आहे, आपल्‍या घरातील जबाबदारी समजून या महिला काम करतात. या महिलांना आपल्‍या कामाचे समाधान आहे.

साठ लाखांची उलाढाल


मंगलताई व जगन्‍नाथ शिंदे यांनी शेडनेट उभारले त्‍यावेळी एक लाख रोपे बसतील एवढी क्षमता होती. नंतरच्‍या काळात रोपांची वाढती मागणी लक्षात घेत विस्‍तार केला. आज एकाचवेळी तब्‍बल 12 लाख रोपे बसतील एवढ्या क्षमतेचे पॉलीहाऊस आहे. टोमॅटो, कलिंगड, खरबूज, मिरची, वांगी, ऊस व झेंडूची रोपे मिळतात. एक ते दोन रूपये प्रती रोपाप्रमाणे रोपांची विक्री होते. हंगामाप्रमाणे रोपे तयार केली जातात. यातून वर्षाकाठी तब्‍बल 60 लाख रूपयांची उलाढाल होते.

जगन्‍नाथ शिंदे यांच्‍याकडे मार्केटिंगची जबाबदारी


पत्‍नीकडे शेती व्‍यवस्‍थापनाची जबाबदारी देणारे जगन्‍नाथ शिंदे कृषी पदवीधर आहेत. आपल्‍या शेतीक्षेत्रातील अभ्‍यासातून शेतीत विशेष करून रोपवाटिकेतील रोपांच्‍या विक्रीसह शेतीमालाच्‍या विक्रीची जबाबदारी स्‍वतःकडे ठेवली आहे. शेती क्षेत्रातील व्‍यवस्‍थापनासोबतच जगन्‍नाथ शिंदे यांचा बाजारपेठेचाही चांगला अभ्‍यास झाला आहे. रोपांचे दर ठरलेले आहेत, त्‍याप्रमाणे रोपांची विक्री केली जाते. ग्राहकांना चांगल्‍या गुणवत्‍तेची रोपे मिळत असल्‍याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. रोपवाटिकेतून वर्षभर रोपांची विक्री करून त्‍यांनी आपला व्‍यवसाय फायद्याचा केला आहे.

राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचा लाभ


10 गुंठ्यापासून सुरूवात केलेल्‍या शिंदे यांना शेडनेट विस्‍तारात शासनाच्‍या राष्‍ट्रीय फलोत्‍पादन अभियानाचा लाभ मिळाला. या माध्‍यमातून 30 गुंठे शेडनेटची उभारणी त्‍यांनी केली असून रोपविक्रीचा व्‍यवसाय वाढविला आहे.

लेखक - गणेश फुंदे

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 6/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate