অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सालगडी बनला शेतकरी !

जिरायती शेतीतून फार काही पिकत नव्हते. दोन वेळच्या जेवणाचीही गैरसोय झाली होती. अशा वेळी कजगाव पिंप्री (जि. जळगाव) येथील शिवराम पाटील यांच्यासमोर दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. तब्बल 20 वर्षे सालगडी म्हणून त्यांनी रात्रंदिवस काबाडकष्ट केले. कमावलेले पैसे शिल्लक टाकले. त्यातून विहिरीचे खोदकाम करुन शेतीत पाणी खेळवले आणि बागायती शेतीचा मालक बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. अवघ्या तीन एकरांवरील शेतीत चोख व्यवस्थापनातून पाटील कुटुंब आर्थिक दृष्ट्या स्थिरसावर झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील कजगावसह पिंप्री गावचा (ता. पाचोरा)चा परिसर कधी काळी केळी पिकात अग्रेसर होता. येथील रेल्वे स्थानकाहून केळीने भरलेल्या वॅगन दिल्ली, कानपूरला रवाना होत. मात्र असमतोल पर्जन्यमानामुळे विहिरींची पाणीपातळी खालावू लागली. करपा रोग, चरका विकृती अशा विविध कारणांमुळे पीक उत्पादकता कमी होऊ लागली, केळी लागवड झपाट्याने घटू लागली. बागायती शेतकऱ्यांनाही किफायतशीर शेती करणे कठीण झाले. वाढता उत्पादनखर्च व मिळणारा नफा यांचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येऊ लागले. अशा परिस्थितीत गावातील अल्पभूधारक शेतकरी शिवराम पाटील यांनी मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शेती केली.

मेहनतीच्या जोरावर मालक होण्याचे ध्येय बाळगले

ज्या जमिनीत बाभळींशिवाय दुसरे काही उगवत नव्हते, अशी तीन एकर जमीन हिस्सेवाटणीतून पदरी पडल्यावर उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्‍न पाटील यांच्यासमोर होता. अखेर गावातील एका मोठ्या शेतकऱ्याकडे वार्षिक कराराने सालगडी म्हणून त्यांनी काम पत्करले. पाहता पाहता 20 वर्षे कोठे निघून गेली समजलेच नाही. पती-पत्नी काबाडकष्ट करून दोन मुली व मुलाचे पालनपोषण करीत शक्‍य होईल तेवढी आर्थिक बचत करीत होते. अर्थात मोलमजुरीत आयुष्य घालविण्यापेक्षा शेतकरी बनून स्वतःच्या शेतीत मेहनतीच्या जोरावर मोती पिकविण्याची मनीषा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. 
अखेर 2002 मध्ये स्वतःजवळचे काही पैसे व नातेवाइकांकडून उसनवार घेतलेले 45 हजार रुपये गुंतवून पाटील यांनी विहिरीचे काम सुरू केले. सुदैवाने पहिल्याच प्रयत्नात विहिरीला चांगले पाणीही लागले. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी 2004 मध्ये संपूर्ण शेतात ठिबक सिंचन यंत्रणा बसवून घेतली. केळी किंवा कपाशीची लागवड शक्‍य होईल या पद्धतीने आराखडा तयार करून घेतला.

तीन एकरांतील कमाईतून बांधले पक्के घर.....

सालगडी म्हणून काम करीत असताना असलेली अत्यंत हालाखीची आर्थिक परिस्थिती मेहनत, प्रामाणिकपणा व कष्टांच्या बळावर पालटविण्यात अखेर पाटील यांना यश आले. सिंचित शेती झाल्यानंतर केळी, कपाशी, भेंडी, टोमॅटो यांसारख्या नगदी पिकांच्या माध्यमातून उत्पादन व उत्पन्नात वाढ केली. पै- पै जमवून नातेवाइकांकडून घेतलेली उधार उसनवारी तर फेडलीच; शिवाय मातीच्या घराऐवजी त्या जागी पक्के सिमेंट कॉंक्रीटचे घर बांधले. एका मुलीचे लग्न लावून देणेही शक्‍य झाले. मुलास चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याला धुळे शहरात शिक्षणासाठी दाखल केले. "परिस्थितीमुळे स्वतः शिक्षण घेऊ शकलो नाही; पण मुलांना शिकवून मी माझे स्वप्न पूर्ण करणार,' असे पाटील बोलून दाखवितात. 
------------------

पाटील यांची शेती दृष्टिक्षेपात -----

कपाशीचे पीक पाटील पूर्वीपासून घेतात. पूर्वी एकरी 20 क्विंटलपर्यंतही उत्पादन त्यांनी घेतले आहे. यंदा दोन एकरांवर त्यांना कपाशीचे 30 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. उर्वरित एक एकरावर पाच बाय दहा फूट अंतरावर कोईमतूर शेवगा वाण लावला आहे. त्याच्या मधल्या ओळीत कपाशी पीक घेतले आहे. त्यात सुमारे सात क्विंटल उत्पादन मिळाले आहे. सध्या कपाशीला क्विंटलला 4700 रुपये दर सुरू आहे; मात्र पाटील यांनी अद्याप विक्री केलेली नाही. फरदडीपासून अजून काही उत्पादन अपेक्षित आहे. केळीच्या तुलनेत कमी पाणी लागणारे पीक म्हणून शेवगा दर वर्षी घेतला जातो. डिसेंबरच्या सुमारास त्याला किलोला 60 रुपयांपर्यंत दर मिळतो; पण उन्हाळ्यात दहा क्विंटलपर्यंत उत्पादन निघून, दर मात्र किलोला 12 ते 15 रुपयांपर्यंतच मिळतो.

पाटील यांच्या शेतीची वैशिष्ट्ये......

-पिकांसाठी रासायनिक खतांऐवजी शेणखताचा वापर करण्यावर भर असतो. 
- ठिबक सिंचनाद्वारा विद्राव्य खते दिली जातात. 
-कपाशीमध्ये तुरीच्या दोन ओळी घेतल्या आहेत, त्यामुळे पक्षी येऊन अळ्याही वेचून खातात. 
-कमी शेती असल्याने बैलजोडी ठेवणे परवडत नाही. शेतीकामांसाठी शेजारील शेतकऱ्यांकडून मदत घेतात. 
-कपाशीचे शेत रिकामे झाल्यानंतर त्या ठिकाणी भेंडी, टोमॅटो आदी पिकांचे प्रयोग केले आहेत. 
-मुख्य पिकासह उन्हाळी हंगामातील कमी कालावधीच्या पिकांपासून वार्षिक सरासरी अडीच लाखांचे उत्पन्न पाटील घेतात. उत्पादन खर्च वजा जाता, दीड ते पावणेदोन लाख रुपयांची कमाई त्यांना होते. 
-पाटील यांच्या पत्नी सौ. अलकाबाईही कापूसवेचणीसाठी मदत करतात. साहजिकच मजुरांवरील खर्च कमी केला जातो.

शेताच्या बांधावरच दुग्ध व्यवसाय.....

पाटील यांनी सालगडी म्हणून काम करीत असताना मुलांच्या दुधाची गरज भागविण्यासाठी एक गाय विकत घेतली होती. वासरांचे काळजीपूर्वक संगोपन केल्याने आता गोठ्यात गायींची संख्या चार झाली आहे. त्यात एका शेळीची भर पडली आहे. सर्व गायी शेतातच राहतात. त्यामुळे चारा-पाण्याची सोय व्यवस्थितपणे होते. दररोज मिळणारे दूध गावातील डेअरीत 22 ते 23 रुपये प्रतिलिटरने विकले जाते. त्यातून दररोज 350 रुपयांची आर्थिक आवक सुरू राहते. त्यातून घरखर्च भागविणे सोपे होते. वर्षभराच्या कालावधीत गायींपासून सुमारे 30 बैलगाड्या शेणखत मिळते. त्याचा वापर शेतीत केला जातो.

शेवगा पिकाने दिला मदतीचा हात......

पाटील स्वमालकीच्या तीन एकरांवरील शेतीत विहिरीच्या पाण्याचा अंदाज घेऊन दर वर्षी पीक फेरपालट करतात. कपाशी, केळी आदी दीर्घ मुदतीच्या पिकांसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज भासते. मात्र सावकार, बॅंकांचे पाय न धरता दुसऱ्याची शेती बटाईने करीत शेवग्याचे पीक पाटील घेत असतात. सध्याही अन्य शेतकऱ्याच्या दोन एकरांवर त्यांनी घेतलेला शेवगा उभा आहे. भागीदारीचा हिस्सा जाऊन एक लाख रुपयांची कमाई त्यांना झाली होती. शेवग्यात खरिपात घेतलेले काकडीचे आंतरपीकही सुमारे एक लाख रुपयांची बोनस कमाई देऊन गेले होते. स्वमालकीच्या एक एकरातही यंदा लावलेला शेवगा फुलोऱ्यावर आहे. 

संपर्क- शिवराम पाटील-8975100351

लेखक : जितेंद्र पाटील

माहिती संदर्भ : - अग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate