অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हळद प्रक्रियेत घेतली भरारी

"प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' हा वाक्‍प्रचार सार्थकी लावत अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्‍यातील माटोडा गावच्या राजेश चोपडे यांनी हळद प्रक्रिया उद्योगात भरारी घेतली आहे. पावडरनिर्मिती, लोणचे आदी पदार्थांची विविध प्रदर्शने व थेट विक्री करीत या व्यवसायात त्यांनी जम बसवला आहे.


अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्‍यातील माटोडा येथील राजेश चोपडे यांची वडिलोपार्जित अठरा एकर शेती. त्यांचे वडील कपाशी, तुरीसह ज्वारीसारखी पारंपरिक पिके घ्यायचे. राजेश यांनीही वडिलांकडून शेतीचे धडे गिरवीत त्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या बारा एकरांवर सिंचनाची सोय विहिरीच्या माध्यमातून होते. सन 1995-96 मध्ये त्यांनी पाच एकरांवर ऊस लागवड केली. ऐनवेळी कारखान्याकडून उसाची उचल झाली नाही. नुकसान झाल्यानंतर या प्रयोगाला रामराम करीत पारंपरिक पिकांवरच लक्ष केंद्रित केले.

प्रयोगशील होण्याची धडपड

कपाशी पाच एकरांवर होती. आपल्या कापसासह गावातील काही शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून ते त्याची विक्री खासगी जिनिंग व्यावसायिकांना करायचे. यातून अर्थार्जन होत असले तरी ते त्यात समाधानी नव्हते. पर्यायी पिकाच्या शोधात असलेल्या राजेश यांना "ऍग्रोवन'मधील शेतकऱ्यांच्या यशोगाथांमधूनही प्रेरणा मिळत होती. राज्यभरातील विविध ठिकाणी कृषीविषयक प्रदर्शनांमधूनही त्यांनी ज्ञानाची पुंजी जमा केली.


हळदीतून मिळाला सक्षम पर्याय

हिंगोली जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रदर्शनात राजेश यांना हळद पिकाची प्रेरणा मिळाली. उत्पादकता व उत्पन्नाचा ताळेबंद समाधानकारक वाटल्यानंतर 2004 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एक एकरावर लागवड केली. पीक व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात केले.

हळद लागवड व व्यवस्थापन

सन 2004 मध्ये ओल्या हळदीचे एकरी 100 क्‍विंटल, तर वाळलेल्या हळदीचे 22 क्‍विंटल उत्पादन मिळाले. तीन हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने हिंगोली बाजारपेठेत विक्री केली. 31 हजार रुपयांचा एकरी निव्वळ नफा झाला. सन 2009 मध्ये पावणेदोन एकरांवर लागवड केली. त्या वर्षी हळदीच्या दराने उच्चांक गाठला. प्रति क्‍विंटल 21 हजार रुपये दर मिळाला. साहजिकच परिसरातील शेतकऱ्यांकडून बेण्याला मागणी वाढली. त्या वर्षी बेण्याची विक्री सरासरी साडेपाच हजार रुपये दराने केली. हळद दरातील तेजीमुळे उत्साह वाढलेल्या राजेश यांनी त्या वर्षी लागवड क्षेत्र पाच एकरांवर नेले; मात्र 2010 मध्ये दर अवघ्या तीन हजार रुपयांवर आला. मात्र, खचून न जाता राजेश यांनी हळदीवर प्रक्रिया करून पावडर विक्रीचा निर्णय घेतला.

हळद प्रक्रिया उद्योगाला प्रयत्नांची जोड

प्रक्रिया उद्योगाकडे वळण्यापूर्वी राजेश यांनी उद्योजकांकडून त्यातील बारकावे जाणून घेतले. त्यांच्या शेतावर कृषी विज्ञान केंद्राने घेतलेल्या हळद प्रक्रिया उद्योग कार्यशाळेचाही फायदा झाला. केंद्रातील तज्ज्ञ डॉ. गजानन तुपकर यांनी मार्गदर्शन केले. सुरवातीला अमरावती येथून हळकुंडापासून पावडर तयार करून आणली. दरम्यान, माटोडा येथील जय जवान- जय किसान शेतकरी समूहाने हळद कांडप यंत्र खरेदी केले. आता त्यांच्याकडूनच राजेश सात रुपये प्रति किलोप्रमाणे पावडर तयार करून घेत आहेत.

मार्केटिंग व विक्री

  • एक किलो हळकुंडापासून सुमारे 950 ग्रॅम हळद पावडर मिळते.
  • हळकुंड किंमत, कांडप, पॅकिंग, लेबल आदी धरून एक किलो पावडरनिर्मितीसाठी 89 रुपये खर्च होतो.
  • राज्यात ठिकठिकाणी भरणाऱ्या कृषी प्रदर्शनांसह धान्य महोत्सवांच्या माध्यमातून ते आपल्या उत्पादनांची विक्री करतात.
  • वर्षभरात सुमारे 20 ते 25 कृषी प्रदर्शने, तर 30 हून अधिक धान्य महोत्सवांत भाग घेतला जातो.
  • सरासरी पाच दिवसांच्या मोठ्या शहरांतील प्रदर्शनात पाच क्विंटलपर्यंत पावडरची विक्री होते.
  • प्रदर्शनातून 160 रुपये प्रति किलो दराने पावडरची विक्री होते.
  • हळद पावडर विक्रीतून चांगले अर्थार्जन होत असल्याचे पाहून राजेश यांचा उत्साह वाढीस लागला. त्यानंतर त्यांनी हळदीचे अन्य पदार्थ तयार करून त्यांची विक्री सुरू केली.
  • हळदीचे लोणचे 200 ग्रॅम पॅकिंगमधून 50 रुपयांना विकले जाते.
  • ओली हळद मागणीनुसार किलोला शंभर रुपयांनी विकली जाते.
  • गेल्या वर्षी दहा क्‍विंटल हळद लोणचे विक्री झाले, त्यासाठीही पॅकिंगचा पर्याय अवलंबिला आहे.

घरोघरी जाऊन विक्री

व्यापाऱ्यांऐवजी थेट ग्राहकांनाच कृषी प्रदर्शने व धान्य महोत्सवांसह माल विक्री करून नफ्याचे मार्जिन वाढविण्याचा प्रयत्न राजेश यांनी केला आहे. राजेश प्रदर्शन व धान्य महोत्सवांत विक्रीची जबाबदारी सांभाळतात. तर, मूर्तिजापूर- अमरावती पट्ट्यातील सुमारे 80 हून अधिक गावांत 
घरोघरी जाऊन किलोला 140 रुपये दराने पावडर विकली जाते, त्याची जबाबदारी राजेश यांचे वडील सांभाळतात. दररोज सुमारे 15 किलोपर्यंत खप होतो. उत्तम दर्जाची पावडर असल्याने मागणी भरपूर असून, ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे राजेश म्हणतात. अनेक ग्राहक शेतावर येऊनही पदार्थ खरेदी करतात.

मदत व मार्गदर्शन

राजेश यांना प्रक्रिया उद्योगात पत्नी सौ. अर्चना, आई नलिनीबाई, मुलगा कृष्णा यांची मदत मिळते. 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, "आत्मा' प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, मूर्तिजापूरचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी विजय शिराळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

उर्वरित शेतीचे व्यवस्थापन

हळदीचे एकरी उत्पादन 30 ते 32 क्विंटल (वाळलेल्या) आहे. अन्य क्षेत्रात कपाशी, तूर, सोयाबीन, हरभरा घेतला जातो. प्रक्रिया उद्योगातून अधिक चांगले अर्थार्जन होत असल्याचे राजेश यांनी सांगितले.

राजेश चोपडे यांच्याकडून शिकण्यासारख

  • हळदीच्या पाच एकरांवर ठिबक
  • जय महालक्ष्मी हळद उत्पादक शेतकरी समूहाची स्थापना
  • समूहाच्या माध्यमातूनही हळद प्रक्रिया
  • समूहातील सदस्यांकडून पावडरची खेडोपाडी विक्री
  • प्रक्रियेतून नफा वाढवण्याचा प्रयत्न
  • सन 2012 पासून सेंद्रिय शेतीवर भर
  • सेलम जातीच्या हळदीची लागवड
  • कृष्णा ब्रॅंडने हळदीच्या पदार्थांची विक्री
  • व्यापाऱ्यांऐवजी थेट ग्राहकांना विक्रीवर भर, त्यातून आडत व अन्य खर्चांत बचत
  • राजेश यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील शेतकऱ्यांना मिळाली पावडरनिर्मितीची प्रेरणा

समस्या

हळद प्रक्रिया उद्योगाकरिता लागणाऱ्या संयंत्राच्या भांडवलासाठी बिनव्याजी कर्जाची उपलब्धता झाल्यास हा उद्योग भरभराटीस येईल असे राजेश यांना वाटते, त्याकरिता आवश्‍यक लाभार्थी हिस्साही भरण्यास तयार असल्याचे ते म्हणतात.

"ऍग्रोवन'मुळे भरभराट

"ऍग्रोवन'मधील यशोगाथांमधूनच प्रेरणा घेत आजवरची वाटचाल व उत्कर्ष साधता आल्याची प्रामाणिक कबुली प्रयोगशीलता व उद्योजकतेचा वारसा जपणाऱ्या राजेश यांनी दिली. यशोगाथा वाचून कृषी अधिकारी व विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून पीक पद्धतीतील बारकावे जाणून घेण्याचा सदोदित प्रयत्न त्यांनी केला. ऍग्रोवनच्या कृषी प्रदर्शनातही ते नेहमी भाग घेतात. 
संपर्क- राजेश चोपडे - 9405167173

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate