অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योग्य व्यवस्थापनातून ऊस शेती

यंदा गाठला 134 टन उत्पादनाचा आकडा

सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील मोहन दत्तात्रेय पाटील यांनी एकरी 80 ते 90 टन ऊसउत्पादनात कायम सातत्य जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासातून घडवलेले एकात्मिक पद्घतीचे सुधारित व्यवस्थापन, रोजचे काटेकोर नियोजन व कष्ट यातून आपल्या ऊसशेतीचा विकास त्यांनी साधला आहे.

श्‍यामराव गावडे


पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडपासून थोडे पुढे आले की सांगली जिल्ह्याच्या हद्दीतील कासेगावचे शिवार लागते. कृष्णा नदीच्या पाण्याने संपन्न झालेला हा भाग उसाचा हुकमी पट्‌टा म्हणून ओळखला जातो. निचऱ्याच्या जमिनीमुळे केळी व ऊसपिके घेण्याकडे येथील शेतकऱ्यांचा हातखंडा आहे.

कुटुंबाला दिला आधार...

गावातील मोहन पाटील हे प्रयोगशील ऊसउत्पादक म्हणून आता ओळखले जाऊ लागले आहेत. सन 1985 च्या सुमारास वडिलांचे निधन झाल्याने अल्पवयातच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. पारंपरिक पद्धतीची शेती, मोठे कुटुंब यामुळे आर्थिकदृष्ट्या लवकरात लवकर सावरणे गरजेचे होते. शेतीतील प्रगतीच आपणाला तारू शकते, हे ओळखलेल्या मोहन यांनी अशोक व बाबासाहेब या दोन बंधूंना सोबत घेऊन पूर्ण वेळ शेती करण्यास सुरवात केली. प्रगतीचा मंत्र हळूहळू जपण्यास सुरवात केली.

केळी लागवड

कष्टांची तयारी असलेल्या पाटील बंधूंनी सुरवातीला केळीची लागवड केली. योग्य व्यवस्थापनातून ती चांगली फोफावली. केळीच्या यशस्वी उत्पादनातून विश्वास वाढला. त्यातून उत्पादनाची घोडदौड कायम ठेवली. सन 2011-12 मध्ये लागवड व खोडवा अशी 17 महिन्यांत दोन पिके घेतली. उत्पादन एकरी 35 टनांपुढे नेण्याचा केला प्रयत्न.

लक्ष्य एकरी शंभर टन योजनेत सहभाग

साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने 2005- 06 मध्ये उसाचे एकरी उत्पादन वाढावे यासाठी लक्ष्य एकरी 100 टन ही योजना राबवली होती. कारखान्याच्या ऊसशेती अधिकाऱ्यांनी ऊसशेतीत काम करणाऱ्या युवा शेतकऱ्यांना निवडून त्यांच्याकडे ही योजना यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. मोहन या योजनेत सहभागी झाले. त्यांनी टप्प्याटप्प्याने आपल्या ऊसशेतीत सुधारणा करीत नेली. सुधारित तंत्रज्ञान वापरण्यास सुरवात केली. उत्पादनवाढीचे तंत्र विविध तज्ज्ञांमार्फत अभ्यासले.

एकात्मिक पीक व्यवस्थापनातून वाढवले उत्पादन

  • पूर्वी उसाचे एकरी उत्पादन होते 60 ते 70 टन.
  • अलीकडील 2010, 11 व 2012 पर्यंत दर वर्षीचे उत्पादन- एकरी 80 ते 90 व 100 टनांपर्यंत
  • दर वर्षी उसाचे सरासरी क्षेत्र- चार एकर
  • उसाची जात- को 86032, हंगाम-आडसाली
  • अलीकडील लागवड पद्धत- चार फुटांच्या सरीवर
  • यंदाचे ऊस उत्पादन-
  • 70 गुंठ्यांत सुमारे 235 टन
  • त्यातील साखर कारखान्याला पाठवलेला ऊस- 220 टन
  • बेण्यासाठी ठेवलेला- 15 टन
  • एकरी मिळालेले उत्पादन- 134 टन
  • उत्पादन खर्च- एकरी (दर वर्षीचा)- सुमारे एक लाख रुपये
  • यंदाचे लागवड अंतर- सहा फुटांची सरी व दोन बेण्यांतील अंतर दोन फूट.

मोहन पाटील यांच्या ऊसशेतीची वैशिष्ट्ये

  • फेरपालटावर भर- एकूण क्षेत्र 10 एकर असून, ते वेगवेगळ्या ठिकाणी आहे. उसाचे जादा उत्पादन घेताना जमिनीची उत्पादकता टिकून राहावी यासाठी प्रयत्न असतो. सुरवातीला केळी लागवड, खोडवा घेतात. त्यानंतर हरभरा व त्यानंतर आडसाली ऊस घेतात. फेरपालटामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
  • मातीपरीक्षण नेहमी करतात. सेंद्रिय कर्ब चांगला ठेवण्याचा प्रयत्न.
  • "लक्ष्य एकरी 100 टन' योजनेतून अधिक उत्पादनाकडे कल वाढला.
  • उसाच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती विविध ठिकाणांहून घेतात.
  • एकरी उत्पादनवाढ केली, तरच शेती परवडते, अशा विचारसरणीतून काम.
  • पूर्वमशागत करताना दोन वेळा नांगरट व रोटर मारणे गरजेचे
  • एकरी 10 टन शेणखताचा दर वर्षी वापर, घरची सुमारे सात ते आठ जनावरे, घरचे शेणखत कमी पडले तर बाहेरून खरेदी करण्याचीही तयारी.
  • दर वर्षी जत विभागातून मेंढपाळांच्या माध्यमातून सुमारे 15 दिवस मेंढ्या शेतात बसवतात.
  • बेणे प्रक्रिया गरजेची.
  • लागवड सुधारित पद्धतीने
  • सरी सोडताना डीएपी व गंधकाचा बेसल डोस देतात.
  • लागवडीनंतर दीड महिन्याने जेठा कोंब कापतात. त्यामुळे फुटवे जोमदार येतात.
  • सुमारे आठ एकर क्षेत्राला स्वयंचलित पद्धतीने ठिबक सिंचन
  • खते जमिनीतून तसेच फर्टिगेशन पद्धतीनेही. विद्राव्य खतांचा वापर गरजेचा.
  • काम रोजच्या-रोज व वेळच्या-वेळी हाच नियोजनाचा मंत्र

जनावरांचे आदर्श संगोपन

पाटील कुटुंबाने पशुधनावरही जिवापाड प्रेम केले आहे. वेगवेगळ्या जनावरांच्या प्रदर्शनात त्यांनी भरपूर बक्षिसे मिळवली आहेत. त्यांच्याकडे सध्या मुऱ्हा जातीची दहाव्या वेताची म्हैस व एक खिलार गाय आहे.

शेतीतून प्रगती

मोहन यांनी वडिलार्जित दहा एकर शेतीतून आता 25 एकर जमीन खरेदी केली आहे. दहा एकर क्षेत्रावर स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा बसवली. पाण्यासाठी पाइपलाइन केली. राष्ट्रीय महामार्गानजीकच घर असल्याने, अंगणातच गाड्यांसाठीचे सर्व्हिसिंग सेंटर सुरू केले आहे.

मुलांना उच्च शिक्षण

मोहन व त्यांच्या भावाची चार मुले सध्या उच्च शिक्षण घेत आहेत.

मोहिनी, मयूरा, मयूरेश ही मुले अभियांत्रिकीच्या पदवी वर्गात, तर विश्वजित बी.एस्सीला आहे. मुलांना उच्च शिक्षण देण्याचा मनोदय यातून दिसून येतो. पाटील यांना ऊसशेतीसाठी ए. एन. साळुंखे यांच्याबरोबर संदीप पाटील, संभाजी पाटील, एस. एम. पाटील, पी. डी. पवार, ए. जे. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. 

मोहन पाटील- 9689583115

माहिती संदर्भ : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate