অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ

काळभात टिकविण्यासाठी व्यापक मोहिम संवर्धन ते बाजारपेठ

पार्श्वभूमी

लोकपंचायत संस्थेने संगमनेर तालुक्यात शाश्वत शेतीच्या प्रचार व प्रसारासाठी कृषक-पंचायत कार्यक्रम सुरु केला. गावपातळीवर पाणलोट क्षेत्र विकास कामानंतरचा पुढील टप्पा म्हणून गाव पातळीवर शाश्वत शेतीशी संबंधित मूलगामी उपक्रम हाती घेतले. त्यात स्थानिक हवामानानुसार येणारी पिके, पाण्याचे काटेकोर नियोजन, बीज स्वावलंबन- त्यात स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण वाणाचे संगोपन व संवर्धन, इरवड व माळीव या मिश्र पिक पद्धतीला प्रोत्साहन, तसेच सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब या पंचसुत्रीचा अवलंब सुरु केला. ही प्रक्रिया महिला व पुरुष शेतकऱ्यांचे गट बांधून सुरु केली, तिचे नामकरण कृषक-पंचायत असे केले.

स्थानिक पिकांच्या वाणाचा शोध घेण्याची मोहीम लोकपंचायतमधील कार्यकर्त्यांनी हाती घेतली. कृषक पंचायत कार्यक्रमात काम करणारे कार्यकर्ते वेडे होवून संगमनेरसह अकोले, पारनेर,सिन्नर, जुन्नर या शेजारच्या तालुक्यात भटकत होते. त्या भटकंती मागचा हेतू एकच होता की, दुर्मिळ होत चाललेले गावरान वाणाचे संवर्धन व्हावे.

आठ वर्षापूर्वी शेजारच्या अकोले तालुक्यातील कोतूळ पट्ट्यात प्रयोगशील शेतकरी श्री.देवराम कातोरे व विजय सांबरे हे भाताच्या वाणाचा शोध घेत फिरत होते. लहान-मोठी गाव, वाड्या, वस्त्या व पै पाहुणे यांच्या भेटी घेत होते. ऑक्टोबर महिना होता. भाताच्या विविध जातींचे पिक पोटऱ्यात आलेले होते. लोम्ब्या बाहेर पडून त्यांचा सुगंध (Aroma) सर्वदूर पसरलेला होता. एका ठिकाणी लहानश्या खाचरात काळपट-विटकरी रंगाच्या लोम्ब्या लक्ष वेधून घेत होत्या. बाजूला काही स्री-पुरुष शेतकरी काम करत होते. त्यांच्याशी या वेगळ्या भाताविषयी गप्पा सुरु झाल्या. तो “काळभात” होता. खाण्यासाठी उत्तम व मध्यम उत्पादकता असणारे ते स्थानिक वाण होते, अशी माहिती आदिवासी शेतकऱ्यानी दिली. काळ भात हा निम गरवा(१०० ते ११० दिवसात पक्व होणारा) प्रकारात मोडतो, असेही समजले. पण अशुद्ध बियाणामुळे गुणवत्ता कमी होते आहे व उत्पादनही घटल्यामुळे शेतकरी काळ भात करण्यास इच्छुक नव्हते. या वाणाविषयी उत्पादकांच्या मनातील आदर व प्रेम त्यांच्याशी बोलताना ध्यानी आला. परतीच्या वाटेत काळभाताचे शास्रशुद्ध पद्धतीने संवर्धन करण्याचा निश्चय केला. संगमनेरला परतल्यावर कृषक-पंचायत प्रतिनिधींच्या मासिक बैठकीत या वाणावर विशेष चर्चा झाली. बियाणात शुद्धता आणली, उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न केले, सेंद्रिय खत पद्धतीने उत्पादन घेतले तर काळभात बाजार पेठेत राज्य करेल, यावर सर्वांचे एकमत झाले.

प्रत्यक्ष कामास सुरुवात

काळ भाताच्या निमित्त्याने सह्याद्रीच्या उपरांगामध्ये पिक वाण संवर्धन कामास सुरुवात झाली. अकोले तालुक्यात काळ भात कुठे पिकतो? कोणते वातावरणात त्याला अनुकूल आहे? काळ भाताची विक्री कोणत्या बाजार पेठेत होते? ग्राहक वर्ग कोण आहेत ? कृषी विद्यापीठात काही दस्त ऐवज आहे का ? अशा विविध प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण केले. पहिली दोन वर्ष अंदाज घेण्यासाठी अकोले व संगमनेर तालुक्यातील विविध गावात, अति पाऊस ते कमी पावसाच्या प्रदेशात लागवडीचा प्रयत्न झाला. पण मध्यम पर्जन्यमान (१५०० ते २००० मि.मी.) असणाऱ्या प्रदेशातच हे वाण चांगले उत्पादन देते, लक्ष्यात आले. महाराष्ट्राचे एकूण नऊ कृषी हवामान विभाग (Agro-Climatic Zone) केले आहेत, त्यातील पाचव्या क्रमांकाच्या म्हणजे Transition 2 Greyish Black Soil Zone या सूक्ष्म हवामान विभागात काळ भात चांगला पिकतो, असे म्हणता येईल.

सोमलवाडीत काम सुरु

काळभात पिकविणाऱ्या गावांचा शोध घेतल्यानंतर एक महत्वाची बाब लक्षात आली. हे वाण अति पावसाच्या प्रदेशात (३ हजार मि. मी.पेक्षा अधिक पाऊस) टिकत नाही. त्यामुळे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेशात, जेथे १ ते २ हजार मि.मी. पाऊस पडतो, अशा ठिकाणी काळभात चांगला पिकतो. त्यानुसार सोमलवाडी परिसरातील १५ गावात काळभात संवर्धन कार्यक्रम सुरु केला.

शुद्ध बीज निर्मिती

काळभाताकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमुख कारण अशुद्ध बियाणे हेच होते. इच्छा असूनही भेसळीमुळे शेतकरी काळभात पेरत नव्हते. शुद्ध बियाणे तयार करण्यासाठी गावातील निवडक तीन शेतकऱ्याची निवड केली. पारंपारिक व शास्त्रीय ज्ञानाचा आधारे शुद्ध बीज तयार करण्याचे पक्के नियोजन केले. एकूण तीनशे किलो बियाणे सहा वर्षापूर्वी लोकपंचायत बीज कोशात जमा झाले.

काळभात संवर्धनाच्या कामात कृषी विभागाकडे ठोस कार्यक्रम नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यात आजार परिसरात ‘घनसाळ’ या स्थानिक भातावर पथदर्शक प्रकल्प राज्य शासनाने राबविला होता.  अहमदनगर जिल्ह्यात काळभातावर असा प्रकल्प घेता येईल, अशी मागणी व पाठपुरावा कृषी विभागाकडे केला. त्याला मंजुरीही मिळाली. सोमलवाडी परिसरातील निवडक दहा गावांसाठी हा प्रकल्प होता. त्यात ३५० शेतकरी सहभागी झाले. या कामात पथदर्शक काम करता आले.

कृती संशोधन

महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमात पिक वाण संवर्धन प्रकल्पामध्ये काळभात या पारंपारिक भाताच्या जातीचे शास्रशुद्ध पद्धतीने जतन-संवर्धन करण्यासाठी कामास सुरुवात झाली. काळभाताच्या बाह्य-गुणधर्माची (Morphological Characters) नोंद दरवर्षी घेणे, ते पडताळून पहाणे, अकोले तालुक्यात दोन प्रकारचा काळभात आढळतो. एक कुसळाचा व दुसरा बिगर कुसळाचा. त्याच्यातील फरक तपासणे, शुद्ध बीज निर्मितीसाठी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक घेणे, त्यासाठी शुद्ध बियाणे तयार करण्यासाठीच्या पारंपारिक कौशल्य व आधुनिक पद्धतीचा अवलंब करणे.

काळभाताचा सुगंध (Aroma) कमी होत असल्याचे उत्पादकही सांगतात व ग्राहकाचे पण तेच म्हणणे आहे. याची करणे शोधण्यासाठी मागील वर्षापासून अभ्यास सुरु केला आहे. १०० काळ भात उत्पादक शेतकरी, निवडक व्यापारी व ग्राहक यांच्यासोबत पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यातील निष्कर्षाच्या आधारे पुढील टप्प्यात प्रयोगशाळेत पण याचा अभ्यास होईल व सुवास कमी होण्याची कारणे व सुगंध टिकविण्यासाठी उपाय योजना विकसित करता येतील.

सहभागी पद्धतीने सेन्द्रीयमालाची हमी (Participatory

Guarantee  System)

काळ भात संवर्धन करताना सेंद्रिय पद्धतीने पिक घेण्यावर भर दिला. त्यासाठी शेती शाळांचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या बाजूला उत्पादित माल हे सेंद्रिय आहे, हे पटवून देणे महत्वाचे होते. त्यासाठी अत्यंत सोपी व स्वस्त अशी सहभागी पद्धतीने सेंद्रिय मालाची हमी देण्याची पद्धत वापरली. यासाठी चार गावात गट बांधणी केली. ओफाय संस्थेच्या मार्फत प्रमाणपत्र मिळाले. त्याआधारे बाजार पेठेत काळभात हा सेन्द्रीयच आहे, अशी मोहोर उमटली.

आज अखेर १५ गावातील १३० शेतकऱ्याकडील  ६ टन काळभाताला  बळीराजा कंपनी विक्रीची हमी देत आहे. सात वर्षांपूर्वी १५ ते २० शेतकरी काळभात पिकवायचे. मजल दर मजल करत १५० पेक्षा अधिक शेतकरी फक्त संवर्धन न करता विक्रीतून चार पैसेही कमावत आहेत. देशभरातील विविध ठिकाणी काळभात पोहचला आहे. या उपक्रमाची नोंद केंद्रीय कृषी मंत्रालय, यु.एन.डी.पी., सी.बी.डी. कॉप (Conservation on Biodiversity) तसेच  विविध सामाजिक व संवर्धन संस्थांनी घेतली आहे.

बळीराजा कृषक उत्पादक कंपनीच्या माध्यमातून बाजारपेठ

सोमलवाडी परिसरात दरवर्षी टप्प्या टप्प्याने काळभात उत्पादक शेतकरी वाढू लागले. त्यांचा भात खरेदी करण्याची व्यवस्था होणे गरजेचे होते. त्यासाठी संगमनेर येथील बळीराजा कृषक उत्पादक कंपनीने पुढाकार घेतला. गाव पातळीवरच भात खरेदीचे नियोजन केले. स्थानिक व्यापारी १२ ते १४ रु. किलो दराने भात खरेदी करायचे. त्यासाठी राजूर किंवा कोतूळ येथे माल न्यावा लागत असे. बळीराजा कंपनीने मात्र प्रति किलो १७ ते १८ रु. असा न्याय्य भाव दिला. त्यातून काळभात संवर्धनाला चालना मिळाली. आज अखेर साळीचा प्रती किलो भाव किमान रु.३०/- झाला आहे व तांदळाचा भाव Polished तांदुळाला रु.६०/- व Brown Rice काळ भाताला रु.८०/- इतका मिळत आहे.

काळ भाताच्या मूल्यवर्धन करण्याच्या कामाला महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमात गती आली. काळ भाताच्या हातसडी तांदळाला बाजार पेठेतून मागणी येत होती. पण घरगुती उखळात मुसळाने कांडला तर तांदळाचे तुकडे व्हायचे, जास्त कणी तयार व्हायची. हातसडी तांदूळ तयार करण्याचे कमी उर्जेवर चालणारे मशिन विकसित करण्याचे ठरले. त्यासाठी पाबळ जि. पुणे येथील विज्ञान आश्रमाची मदत घेतली. अनेक प्रयत्नातून साळीचे फक्त साल काढणारे Dehusking Machine तयार झाले. त्याचा वापर करून काळभातापासून Brown Rice ची निर्मिती सध्या होत आहे. बाजार पेठेत एका वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाची(Niche Product) भर पडली आहे.

पिक वाण संरक्षण व शेतकरी शेतकरी हक्क कायदा २००१ (PPVFR Act 2001) अंमलबजावणी

हा कायदा शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या पारंपारिक वाणांना (Farmers Variety) संरक्षण देणारा कायदा आहे. वर्षानुवर्षे जे कृषी:वल गट (Farmers Group) काळभातासारख्या वैशिष्टपूर्ण वाणाची लागवड करतात, अशा गटांना या कायद्यांतर्गत त्या वाणावर कायदेशीर हक्क मिळतो. लोकपंचायत ने यासंबंधी प्रक्रिया हाती घेतली आहे. काळभात उत्पादक गटांना प्रोत्साहन देऊन त्यांचा प्रस्ताव राहुरी कृषी विद्यापीठामार्फत PPVFR Authority, New Delhi येथे पाठविला आहे. सरकारमान्य प्रक्षेत्रावर या वाणाची लागवड होईल व त्याचे गुणधर्म तपासल्यावर हक्क द्यायचा की नाही, हे ठरविले जाईल.

सारांश

एकूणच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कृषी जैवविविधता वाचविणे व तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे. या मध्ये पारंपारिक उत्पादक शेतकरी (महिला व पुरुष), शालेय मुले, सरकारी यंत्रणा यांचा सहभाग घेणे व त्यांना याबाबत संवेदनशील बनविणे, हा या कामाचा गाभा आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील असणाऱ्या पश्चिम घाटातील गावरान भात पिकांच्या संवर्धन कामाला या निमित्ताने सुरुवात झाली आहे.

 

लेखक - विजय सांबरे

लोकपंचायत | संगमनेर© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate