सातारा जिल्ह्यातील गोळेवाडी (ता. कोरेगाव) येथील नानासाहेब व जगन्नाथ दाजीराम गोळे या बंधूंनी प्रतिकूल परिस्थितीत स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन घेतले आहे. शेतीमध्ये काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान व काटेकोर पीक व्यवस्थापनात बदल करत दर्जेदार उत्पादन घेतले आहे. कुटुंबाच्या एकजुटीतून शेतीच्या व्यवस्थापनाचा चांगला आदर्श घालून दिला आहे.
कोरेगाव शहराच्या पूर्वेस तीन किलोमीटरवर गोळेवाडी हे गाव आहे. तालुक्यात ऊस व आले या मुख्य पिकांबरोबर अलीकडे स्ट्रॉबेरी पीक लागवडीखालील क्षेत्रही वाढले आहे. नानासाहेब व जगन्नाथ दाजीराम गोळे या गोळे बंधूंकडे एकत्रित 20 एकर वडिलोपार्जित शेती आहे. गोळे बंधू शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. त्यांच्या शेतीला धोम धरणाच्या डावा कालव्याद्वारे पाणी मिळायचे. पाळीने मिळणाऱ्या पाण्याची शाश्वती नसल्याने बागायती पिके घेण्यामध्ये अडचणी येत. परिणामी शेतीचे उत्पादन व उत्पन्नही तुटपुंजे होते.
मात्र घरातील नानासाहेब यांची मुले दीपक व सुहास, तर जगन्नाथ यांच्या गणेश व महेश या मुलांनी गेल्या तीन-चार वर्षांमध्ये शेतीमध्ये नव्या पिकांचा समावेश केला असून, उत्पादन व उत्पन्नामध्ये वाढ साधली आहे. शिक्षक असलेल्या सुहास यांनी धोम कालव्यापासून जवळच्या शेतीत विहीर खोदली. पाण्याचा शाश्वत स्रोत झाल्याने हळूहळू बागायती पिके ते घेऊ लागले.
पारंपरिक पिकाऐवजी नवी पिके घेण्यासाठी उमेश जगदाळे (रा. कुमठे) व रवी देशमुख या प्रगतीशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन उपयुक्त ठरले.
दृष्टिक्षेपात शेती
सध्या दीड एकर स्ट्रॉबेरी, सव्वा एकर पेरू व सव्वा एकर आंब्याची फळबाग, साडेतीन एकर आले, एक एकर डाळिंब लागवड त्यामध्ये फरसबी व कांद्याचे आंतरपिक, 3 एकर ऊस, साडेतीन एकर ज्वारी व उर्वरित क्षेत्रावर पीक फेरपालटासाठी नियोजन सुरू आहे.
स्ट्रॉबेरी लागवड ठरली फायद्याची...
कोरेगाव परिसरात स्ट्रॉबेरीसाठी वातावरण अनुकूल असल्याचे तज्ज्ञांकडून कळल्याने गोळे यांनी या पिकाची लागवड केली. मागील दोन वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड गोळे कुटुंबीय करतात. गत वर्षी सव्वा एकरावर स्ट्रॉबेरी लागवड होती. भिलार - महाबळेश्वरवरून आणून मातृरोपांपासून स्वतः तयार केलेली रोपे वापरली. या रोपवाटिकेसाठी तुषार सिंचनाचा वापर करतात. त्यातून उरलेल्या 60 हजार रोपांची प्रतिरोप 7 रुपयांनी विक्री केली. यातून खर्च वजा जाता 3 लाख 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
- पीक लागवडीपूर्वी एकरी 8 ते 10 ट्रेलर शेणखत वापरून मेंढ्यांचा कळपही बसवतात.
- रोप लागवडीवेळी बेडवर बेसल डोस देतात. त्यानंतर चार दिवसांच्या फरकाने बारा दिवसांपर्यंत पीएसबी, ट्रायकोडर्मा तसेच ह्युमिक ऍसिडच्या आळवणी घेतात. त्यानंतर दर चार ते पाच दिवसांनी संतुलित प्रमाणात विद्राव्य खते देतात.
- थ्रिप्स व करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. यासाठी प्रतिबंधात्मक व प्रादुर्भाव आढळल्यानंतर वेळेत फवारण्या घेतात.
- ठिबक सिंचनाद्वारे जमिनीतील पाणी वाफसा अवस्थेत ठेवतात.
- ऑक्टोबरनंतर फळ काढणी सुरू केली. सुरवातीला एक महिना एक दिवसाआड तोडा मिळाला. त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत दररोज तोडा केला. तोडे राहिले. संपूर्ण तोड्यातून सुमारे 14 टन माल निघाला.
- या मालाची प्रतवारी करून दोन किलोच्या ट्रेमध्ये माल पॅक केला जातो. पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पनेटचा वापर केला. कुटुंबातील महिला तोडणी, हाताळणी, प्रतवारी व पॅकिंगमध्ये पारंगत झाल्या आहेत.
स्ट्रॉबेरीचा ताळेबंद
- बेंगलोर, हैदराबाद, पुणे व मुंबई येथे विक्री केली, तसेच एका कंपनीत ज्यूससाठी काही माल विकला. प्रति ट्रेस सुरवातीला 450 ते 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. पुढे दरामध्ये कमी-जास्त होत प्रति ट्रे किमान 100 रुपयापर्यंत दर मिळाला. दीड एकरमधून एकूण उत्पादन चौदा टन मिळाले असून प्रति किलोस सरासरी 50 रुपये दराप्रमाणे सात लाख रुपये उत्पन्न मिळाले.
- स्ट्रॉबेरीचा उत्पादन खर्च - ठिबक सिंचनासाठी एकरी 50 हजार रुपये, खते व कीडनाशकांसाठी 1 लाख रुपये, पॅकिंग मटेरियलसाठी एक लाख रुपये, 50 हजारांचे शेणखत व मजुरीकामी 80 हजार रुपये, किरकोळ बाबीसाठी 20 हजार रुपये असा एकूण चार लाख रुपये इतका खर्च झाला.
ऑगस्ट 2013 मध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली. साडेचार फुटी वाफ्यावर दोन ओळीत रोपांची लागवड केली जाते. स्ट्रॉबेरीमध्ये या वर्षी मल्चिंगपेपरचा वापर केला. रोपातील अंतर एक फूट ठेवले. एकरी 20 हजार रोपे लागली आहेत. या वर्षीही मातृरोपांपासून शेतावरच रोपे तयार केली होती. उर्वरित 20 हजार रोपांची विक्री केली असून, त्यापासून 1 लाख 40 हजारांचे उत्पन्न मिळाले. या पिकाचे तोड ऑक्टोबरपासून सुरू झाले. आतापर्यंत 40 तोडे झाले असून, 3 टन उत्पादन मिळाले आहे. विक्रीयोग्य दोन किलोच्या ट्रेस सुरवातीस 400 रुपये दर मिळाला. आता 200 रुपयांनी दर मिळत आहे. अजून दोन महिने तोडे सुरू राहतील.
गोळे यांच्या शेतीतील चांगल्या बाबी...
- 20 एकरपैकी आठ एकर शेती ठिबकखाली.
- शेणखत, मेंढी खताचा अधिक वापर. सोबतच गांडूळखताची निर्मिती व वापर.
- एकत्र कुटुंबामुळे मजुरावरील खर्चामध्ये बचत.
- किडीसाठी सापळ्यांचा वापर.
- रासायनिक, सेंद्रिय, जैविक खतांचा संतुलित वापर. विद्राव्य खतांचा योग्य वापर.
- कीडनाशकांच्या गरजेनुसार प्रतिबंधात्मक व नियंत्रणासाठी वेळेवर फवारण्या.
एकत्रित कुटुंबाचे फायदे
- कुटुंबातील एकजुटीमुळे कामाची विभागणी होते. पुरुषांच्या बरोबरीने नानासाहेब यांच्या पत्नी सौ. विमल, मुलगा सुहास यांची पत्नी सौ. शुभांगी, दीपक यांच्या पत्नी सौ. विद्या, तसेच जगन्नाथ यांच्या पत्नी सौ. कांता शेतीतील कष्टाची सर्व कामे सांभाळतात. गोळे बंधूंच्या बहीण रत्ना निकम यांचीही त्यांना मोलाची साथ मिळते.
गोळे यांच्या अन्य पिकांविषयी थोडक्यात
- 1992 मध्ये 50 गुंठे क्षेत्रावर पेरूच्या 140 रोपांची लागवड केली होती. त्या बागेतून प्रति झाड 75 किलोपर्यंत उत्पादन मिळते. दर वर्षी खात्रीशीर 10 टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याचा दर सरासरी 20 रुपये मिळतो. उत्पादन खर्च 25 हजार रुपये होतो.
- एक एकर क्षेत्रावर डाळिंबाच्या भगवा जातीची नुकतीच लागवड केली आहे. त्यात आंतरपीक म्हणून फरसबी व कांद्याची लागवड केली आहे.
- गेल्या वर्षी दीड एकर मध्ये आल्याची लागवड केली होती. त्यामधून 45 गाड्या (500 किलोची एक गाडी) उत्पादन मिळाले. जुलै अखेरपर्यंत झालेल्या काढणीला प्रति गाडीस 60 हजार रुपये इतका दर मिळाला. उत्पादन खर्च 3 लाख 25 हजार रुपये इतका झाला होता.
- या वर्षी आडसाली हंगामात ऊस लागवडीमध्ये 30 गुंठ्यात झेंडूची दोन हजार रोपे लावली होती. फुलांचे उत्पादन 1750 किलो झाले असून, सरासरी दर 35 रु. असा मिळून 61 हजार 250 रुपये मिळाले. त्यासाठी रोपांची खरेदी व अन्य खर्च 20 हजार रुपये झाला.
- शेताभोवतीच्या निसर्गरम्य परिसरामुळे भविष्यात कृषी पर्यटन केंद्र उभारणीचे कुटुंबातील तरुणांचे नियोजन आहे.
- सुहास गोळे, मो. 9850895667.
- नानासाहेब गोळे, मो. 8975811509.
माहिती संदर्भ : अग्रोवन