অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उत्कृष्ट नियोजन शेती यशस्वी

शेतीचे क्षेत्र कमी असले म्हणून काय झाले; तुमचे पीक नियोजन चांगले असेल आणि सकारात्मक वृत्ती ठेवून कष्टाने सर्व साध्य करण्याची तयारी असेल, तर छोट्या क्षेत्रातूनही शेती आणि पर्यायाने उत्तम जीवन जगता येते. सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील संदीप व धनाजी या पारगावकर बंधूंबाबत हेच सांगता येईल. ऊस आणि भाजीपाला या पिकांद्वारे केवळ अडीच एकर शेतीतून त्यांनी आपली प्रगती साधली आहे. आपला माल स्वतःच बाजारात बसून विकून फायद्याचे गणित तयार केले आहे. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पेठ नाक्‍यापासून 20 किलोमीटर अंतरावर सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडीचे (ता. वाळवा) शिवार लागते. वारणा नदीच्या पाण्याने हा भाग समृद्ध झाला आहे. उसाचे चांगले उत्पादन घेणारे शेतकरी जसे या भागात आढळतात, तसे अनेक अल्पभूधारक शेतकरीही येथे आहेत. तरीही, कष्टांच्या व प्रामाणिकपणाच्या सचोटीवर अनेकांनी आपली शेती समृद्ध केली आहे.

पारगावकर बंधूंची शेती

संतोष व धनाजी बंधूंच्या वडिलांचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले. संसार उघड्यावर पडला. आई बबूताई यांनी आपली अडीच एकर जमीन सांभाळत या मुलांना वाढवले. दहावी, बारावीपर्यंत त्यांना शिकवले. मात्र, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न "आ' वासून उभा होता. शेतीत सर्वजण राबू लागले. त्या वेळी पारंपरिक पद्धतीची ऊस शेती होती. म्हणावे तसे उत्पादन व उत्पन्न येत नव्हते. पर्यायाने प्रगतीला मर्यादा पडत होत्या.

भाजीपाला शेतीने दाखवला मार्ग

अशातच एके दिवशी कृषी सेवा विक्री केंद्र चालकांशी चर्चा सुरू असताना, तुमच्याकडे मनुष्यबळ आहे, तुम्ही भाजीपाला शेती सुरू करा, असा सल्ला मिळाला. ही 2008 ची गोष्ट. कोल्हापुरी म्हणतात त्या काकडीचे पीक घेतले. दुर्दैवाने त्या वर्षी दर पडले. कोणताही फायदा झाला नाही. सुरवात निराशाजनक झाली; परंतु दोन्ही बंधूंनी जिद्द सोडली नाही. सन 2009 मध्ये पूर्ण नियोजन करून काकडीचे पीक घेतले. 30 गुंठ्यांत खर्च वजा जाता 90 हजार रुपयांचा फायदा झाला. पुढे त्यात वाढ होत गेली.

उसाला आधार दिला भाजीपाला पिकांचा

गेल्या दहा वर्षांपासून पारगावकर बंधूंनी आपले शेती नियोजन निश्‍चित स्वरूपाचे ठेवले आहे. सुमारे सव्वा ते दीड एकरात आडसाली ऊस असतो. हा ऊस डिसेंबरमध्ये गळितास गेला, की खोडवा पीक ते ठेवत नाहीत. कारण अल्प क्षेत्रामुळे कमी उत्पादन देणारे पीक ठेवणे फायदेशीर होत नसल्याचे ते म्हणतात. ऊस तुटून गेल्यानंतर नांगरून मशागत केली जाते. त्या जमिनीत सरीत मेथीचे पीक घेतले जाते. वरंब्यावर काकडी, दोडका ही पिके लावली जातात. सुमारे एका महिन्यात मेथी निघते. रिकाम्या जागेत पुन्हा रोटर मारून ती भर काकडी, दोडका पिकाला लावली जाते. पारगावकर यांच्या मते बियाणे खर्च सोडला, तर मेथीला कोणताही जादा खर्च येत नाही. मे महिन्यापर्यंत काकडी व दोडका यांचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर हे क्षेत्र पुढे आडसाली लावणीसाठी तयार केले जाते.

हातविक्रीतूनच सुधारले आर्थिक नियोजन

काकडी, दोडका आणि यंदा वांगी अशी पिके घेताना पारगावकर यांनी स्वतःच बाजारपेठ शोधली. थोड्या क्षेत्रावर थोडाच माल उत्पादित होत असल्याने व्यापाऱ्यांना तो देणे परवडत नाही, त्यामुळे परिसरातील गावांत आठवडा बाजारात थांबून स्वतः हातविक्री केली जाते. त्यामुळे हमाली, मध्यस्थीपासून सुटका मिळाली. थेट विक्रीमुळे चार पैसे जादा मिळतात. परिसरातील बहादूरवाडी, कोरेगाव, येलूर, तांदूळवाडी, किणी या गावांच्या बाजाराच्या दिवशी भाजीपाल्याची विक्री होते. ज्या वेळी जादा माल असेल, त्या वेळी बाजारात स्थानिक व्यापाऱ्यांना तो दिला जातो. भाजीपाला पिकांतून दर वर्षी अडीच लाख रुपये उत्पन्न हाती येते, त्यात 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. प्रगतिशील शेतकरी सुरेंद्र तोडकर, कृषी सेवा केंद्राचे निळूभाऊ गायकवाड यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे.

उसाचे एकरी उत्पादन वाढले

भाजीपाला पीक घेताना ऊस शेतीकडेही पारगावकर बंधूंनी दुर्लक्ष केलेले नाही. पूर्वी एकरी 65 ते 70 टनांपर्यंत ऊस उत्पादन घेणाऱ्या या बंधूंनी मागील वर्षी वीस गुंठ्यांत आडसाली उसाच्या को- 86032 वाणाचे 74 टन 309 किलो उत्पादन घेण्याची किमया केली आहे. परिसरातील साखर कारखान्याच्या शेती विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली असल्याचे संदीप म्हणाले.

भुईमुगाच्या ओल्या शेंगांची विक्री

आडसाली उसात आंतरपीक म्हणून भुईमुगाची टोकण केली जाते. एकरी सुमारे 30 पोती (प्रति पोते 60 ते 65 किलो) उत्पादन मिळते. ओल्या शेंगांची विक्री सरासरी चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने परिसरातील एका संघाकडे केली जाते. तेथून शेंगा मुंबईत पाठवल्या जातात. यंदा हा भाव 4800 रुपये मिळाला. पारगावकर यांचे घर रानातच मध्यभागी आहे. जवळच विहीर आहे, गोठा आहे. घरची सात ते आठ जनावरे असल्यामुळे शेणाचा वापर खतासाठी होतो. जनावरांचे दूध घरच्यांसाठी उपयोगात येते. जनावरांचे मल-मूत्र पाटात सोडून ते पिकांना दिले जाते.

नोंदवही मार्गदर्शक

शेतीची नोंदवही ठेवली आहे. लागवडीपासून ते कोणत्या बाजारात किती विक्री झाली, जमा-खर्च अशा नोंदी त्यात आहेत. शेतकऱ्यांसाठी ती मार्गदर्शक आहे.

अडीच एकरांतील शेतीतून खूप साध्य झाले

पूर्ण उदरनिर्वाह शेतीवरच असून, त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून तीन वर्षांपूर्वी सुमारे तीन लाख रुपये खर्च करून विहीर खोदली. पुन्हा पाणी कमी पडू लागल्याने सहा लाख रुपये खर्च करून नऊ हजार फूट पाइपलाइन थेट नदीवरून केली. घर बांधले आहे. दोघा बंधूंच्या मोटरसायकली आहेत. संदीप पारगावकर - ७५०७०३१८४८

स्त्रोत: अग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate