অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खडकाळ जमिन - शेती यशस्वी

 

काऊरवाडी ईजारा (जि. यवतमाळ,) येथील युवा शेतकरी शिवशंकर मारुतराव वाटोळे यांनी खडकाळ जमिनीत फळे, फुले, भाजीपाला, ऊस, कापूस यांसारखी विविध पिके घेत आपली शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतीला पाणी, कष्ट करण्याची हिंमत आणि नव्या तंत्रज्ञानाची जोड दिल्यास पडीक, खडकाळ रानामध्येही चांगले उत्पादन मिळवता येते. त्याचा प्रत्यय यवतमाळ येथील काऊरवाडी-ईजारा (ता. महागाव) येथील शिवशंकर वाटोळे या 23 वर्षीय युवा शेतकऱ्याच्या मिश्र शेतीतून येतो.

शिवशंकर यांचे वडील मारुतराव हे अन्य शेतकऱ्यांकडे सालाने कष्ट करीत असत. असे करत त्यांनी अडीच एकर शेती खरेदी केली. त्यातून पुसद जवळील देवी तांडा येथे आठ एकर शेती केली. मात्र पाणी नसल्याने पीक उत्पादनामध्ये मर्यादा येत. ही शेती विकून शिवशंकर यांनी अडीच वर्षांपूर्वी काऊरवाडी येथे पाण्याची उपलब्धता होऊ शकेल, अशा 13 एकर पडीक व खडकाळ जमिनीची खरेदी केली. माळरानावरील झाडे-झुडपे स्वच्छ करीत जमिनीच्या चढ-उताराप्रमाणे भाग केले. या ठिकाणी चाळीस फूट खोल विहीर खोदूनही आवश्‍यक तितके पाणी लागले नाही. मग एक विंधन विहीर घेतली. तिला भरपूर पाणी लागले. हे पाणी विहिरीत सोडून सर्वत्र पाइपलाइन करून ठिबक आणि तुषार पद्धतीचा वापर सुरू केला.

शेतीला झाली सुरवात


खडकाळ जमिनीत प्रथम शिवशंकरने तीन एकरांत दहा बाय बारा फूट अंतराप्रमाणे एक हजार 200 डाळिंबाची रोपे लावली. ही बाग 17 महिन्यांची आहे. तसेच एक एकरामध्ये 6 बाय 5 फूट अंतरावर एक हजार 100 पपई रोपांची लागवड केली. त्यातून पहिल्या वर्षी शिवशंकरला एक लाख रुपयांचे, तर दुसऱ्या वर्षी 40 हजारांचे उत्पन्न हाती आले.

डाळिंब आणि पपईत घेतली आंतरपिके

या डाळिंबामध्ये उडीद, मुगाचे आंतरपीक घेतले होते. त्यातून पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर काकडीपासून 25 हजार रुपये उत्पन्न मिळाले. 
पपई पिकात त्याने हरभरा पीक घेतले. त्यापासून पाच क्विंटल उत्पादन मिळाले असून, 2000 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दहा हजार रुपये उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी पपईत आंतरपीक म्हणून कपाशीची एक एकर लागवड केली. त्याचे उत्पादन आठ क्विंटल मिळून, दर 4500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 36 हजार रुपये उत्पन्न मिळाले. त्यासाठी 16 हजार रुपये उत्पादन खर्च झाला. 
यंदा शिवशंकरने एक एकर क्षेत्रामध्ये 5 फूट बाय 6 फूट अंतरावर 1200 पपई रोपांची लागवड केली होती. आतापर्यंत या पपईपासून 200 क्विंटल उत्पादन मिळाले असून, प्रति क्विंटल दर 700 ते 800 रुपये मिळाला. 90 हजार रु. उत्पादन खर्च वजा जाता 50 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. अजून काढणी सुरू आहे. या पपईमध्ये शिवशंकरने उन्हाळी भुईमूग घेतले. त्याचे उत्पादन सात क्विंटल आले व दर 4000 प्रति क्विंटल मिळाला. पावसाळ्यात चवळीचे आंतरपीक घेतले. त्यापासून त्याला 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आंतरपीक भुईमूग आणि चवळी संपताच पपईचे उत्पादन सुरू झाले. 
शिवशंकर यांनी शेतापासून काही किलोमीटरवर असणाऱ्या नांदेड महामार्गावर थेट विक्रीसाठी पपई फळे ठेवली असून, विक्रीतून प्रति दिन किमान सहाशे रुपये मिळत आहेत. 
  • जानेवारी 2014 मध्ये शिवशंकरने आणखी अडीच एकरामध्ये तैवान पपईची लागवड केली असून, 5 फूट बाय 6 फूट अंतरावर 2400 झाडे लावली आहेत. या पपईत टोमॅटो, फुलकोबी, गॅलार्डिया, फुलकोबी, कांदा, भाजीपाला अशी मिश्र आंतरपिके लावली आहेत. या टोमॅटोपासून शिवशंकर यांना 50 हजार रुपयांचे, तर फुलकोबीपासून 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. ऋतुचक्राप्रमाणे एक पीक संपले, की दुसरे पीक खिशात पैसा ठेवून जाते.
  • गेल्या वर्षी मे महिन्यात एक एकरामध्ये लावलेल्या वांग्यापासून आतापर्यंत एक लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे.
  • मे 2012 मध्ये शिवशंकरने एक एकर क्षेत्रामध्ये मिरची पीक लावले होते. मात्र किडी-रोगाच्या प्रादुर्भावामुळे चांगले उत्पादन मिळाले नाही.
  • शिवशंकरने यंदा स्वतंत्रपणे दीड एकरामध्ये सोयाबीन पीक घेतले होते. त्याचे उत्पादन 15 क्विंटल मिळाले असून, दर 3000 रुपये प्रति क्विंटल मिळाला. उत्पादन खर्च 18 हजार रुपये झाला. यातच त्यांनी हरभरा पेरला आहे.
  • दोन वर्षांपासून गॅलार्डिया या फूलपिकाची लागवड शिवशंकर करतात. सुरवातीला केवळ पाच गुंठ्यांवर असलेली लागवड या वर्षी जानेवारीमध्ये 20 गुंठ्यांपर्यंत वाढवली आहे. पाच गुंठ्यांमधून 17 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. 20 गुंठ्यांतून आतापर्यंत 15 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अजून उत्पादन चालू आहे. रोख व अडचणीच्या वेळी पैसे मिळत असल्याने फूलशेती परवडत असल्याचे शिवशंकर यांनी सांगितले.
  • या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये शिवशंकरने लखनौ पेरूची दहा बाय दहा फूट अंतरावर "मिडो' पद्धतीने लागवड केली असून, एक एकरात 400 झाडे आहेत.
  • तीन गुंठे क्षेत्रांत भेंडी पीक उभे असून, अजून उत्पादन सुरू आहे.
  • सध्या पपई वगळता अन्य फळपिकांपासून उत्पन्न सुरू झालेले नसले, तरी भविष्यात उत्पन्न सुरू होणार आहे.

पाण्याचा करतात काटेकोर वापर

खडकाळ आणि पडीक जमिनीतून फळ पिके आणि आंतरपिकांच्या लागवडीतून शिवशंकर आपली शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोअर पूस प्रकल्पाचा कालवा त्यांच्या शेतातून जातो. त्यामुळे सिंचनाची काळजी नसली, तरी त्यांचा भर कार्यक्षमपणे पाणी वापर करण्याकडे असतो. त्यांच्याकडे नऊ एकर क्षेत्रामध्ये ठिबक व चार एकर क्षेत्रासाठी तुषार सिंचन व्यवस्था आहे.

धुरे बनली पैशाचे देव्हारे !

  • शेतजमिनीची इंच इंच जागा पिकाऊ बनविण्याचा ध्यास घेऊन शेताच्या धुऱ्यांवर शिवशंकर यांनी फणस 20 झाडे, हादगा 50, चिकू 5, आवळा 4, बांबू 5, आंबा 20, शेवगा 5 अशा विविध झाडांची लागवड केली आहे. तसेच धुऱ्यावरील संत्रा व मोसंबीची 50 झाडे अडीच वर्षांची झाली आहे.
  • पाच एकराच्या धुऱ्यावर घरच्या जनावरांसाठी चारा पीक म्हणून स्टायलो गवताची लागवड केली आहे.

कायम मुक्काम शेतावर...

शेतावरच शिवशंकरने झोपडी थाटली असून, आई-वडिलांबरोबर तो दिवसभर शेतात राबतो. मशागतीसाठी एक बैल जोडी, ट्रॅक्‍टर असून, त्याच्या शेतीवर कायम चार महिला मजुरांना रोजगार मिळतो. शिवशंकरच्या अपार कष्ट घेण्याच्या वृत्तीमुळे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सलगीमुळे वडीलही शेतीत रमले आहेत. त्याच्याकडे शेतावरच दोन बकऱ्या, एक दुभती म्हैस व काही कोंबड्या असून, त्याचे कुटुंब आत्मनिर्भर झाले आहे.

गाळाची माती, उत्पन्न हाती

माळाच्या पायथ्याशी खडकाळ भागावर काहीच उगवत नाही हे लक्षात आल्यानंतर एक एकर क्षेत्रात त्याने 100 ट्रॅक्‍टर एवढी गाळाची माती टाकली. त्यातून भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळाले.

मिश्र शेतीचे "मॉडेल' !

प्रत्येक महिन्याला वेगवेगळी पिके हाती आल्यास पैसा उपयोगी येऊ शकतो, हे हेरून शिवशंकरने मिश्र शेतीची रचना केली आहे. त्यामुळे वर्षभर हाती पगारासारखा पैसा खेळता राहतो. त्यातच सरळ विक्रीतून थोडा अधिक फायदा होतो. 
  • राजकुमार रणवीर (9881216375) तालुका कृषी अधिकारी, महागाव
  • कृषी प्रदर्शने, प्रशिक्षणे, क्षेत्रभेट या उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेत शिवशंकरने शेतीज्ञान वाढविले असून, पुसद येथील कृषी प्रदर्शनात शिवशंकर यांच्या गॅलार्डिया फुलांनी लोकांना आकर्षित केले होते.
  • गणेश राठोड, कृषी सहायक, महागाव (7588589660)

संपर्क - शिवशंकर वाटोळे, 9011207992

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत - अॅग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate