অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खडकाळ माळरानावर शेतीफार्म

विनोद इंगोले अमरावती जिल्ह्यातील भानखेड (खुर्द) येथे धनंजय धवड यांनी एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंबकरीत मॉडल फार्म विकसित केला आहे. पारंपरिक पिकांच्या बरोबरीने फळबाग, शेडनेटमध्ये ढोबळी मिरची तसेच भाजीपाला लागवड त्यांनी केली आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार पीक नियोजनावर त्यांचा भर आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्‍यातील हरणपूरी येथे धनंजय धवड यांची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचे वडील विठ्ठलराव यांनी नोकरीनंतर गावाकडची शेती 32 वर्षे कसली. लहान वयापासूनच त्यांना शेतीचा लळा लागला. सेवानिवृत्तीनंतर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत धनंजय धवड यांनीदेखील शेतीत कष्ट उपसण्यास सुरवात केली. धनंजय धवड हे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये तीन वर्षे सचिव होते. नोकरीनंतर त्यांनी शेतीच्या विकासाकडे लक्ष घातले. अमरावती जिल्ह्यातील भानखेड (खुर्द) शिवारात धनंजय धवड यांनी वीस वर्षांपूर्वी 29 एकर पडीक, मुरमाड जमीन विकत घेतली. एप्रिल 2012 मध्ये धवड सरकारी सेवेतून निवृत्त झाले. मात्र त्यापूर्वीच पंधरा वर्षे आधी त्यांनी पडीक जमिनीच्या विकासाकडे लक्ष देण्यास सुरवात केली. पहिल्यांदा त्यांनी जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष केंद्रित केले. जमिनीची हलकी मशागत करून त्यात शेणखत मिसळले, शेतातील काडीकचरा, गवत नांगरून जमिनीत मिसळले. दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने जमीन लागवड योग्य बनविली. साधारणपणे 2002 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जमीन लागवडीखाली आणली. उताराच्या जमिनीची आडवी मशागत आणि पेरणी करण्यास सुरवात केली. जमिनीत 15 फुटांखाली खडक असल्याने त्याखाली पाणी संचय होणार नाही हे लक्षात घेऊन पाण्याचे ओघळ पाहून त्यांनी रिचार्जपीट तयार केले. त्याचा उपयोग भूगर्भातील जलसाठ्याच्या वाढीसाठी झाला. धवड यांनी 2002 ते 2009 या कालावधीत पारंपरिक पीकपद्धतीवर भर दिला. सोयाबीन, मूग, उडीद, तूर, तीळ, खरीप ज्वारी लागवडीस सुरवात केली. पहिल्या वर्षी पाच एकरांतून सोयाबीनचे अवघे दोन क्‍विंटल उत्पादन मिळाले. मात्र जसजशी जमिनीची सुपीकता वाढत गेली तसा उत्पादनात फरक पडू लागला. गेल्या वर्षी त्यांना सोयाबीनचे एकरी आठ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याचबरोबरीने एकरी मुगाचे दोन क्‍विंटल, उडीदाचे दीड क्‍विंटल, तुरीचे चार क्‍विंटल, खरीप ज्वारीचे चार क्‍विंटल उत्पादन मिळाले. दोन एकर मुरमाड जमिनीत यंदाच्या वर्षी सीताफळ आणि शेवगा लागवड केली आहे. तसेच शेताच्या कडेनेही शेवगा लावला आहे.

फळबाग लागवडीवर भर

जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढविण्यास सुरवात केल्यानंतर पारंपरिक पीकपद्धतीच्या उत्पादनात वाढ होऊ लागली, त्यामुळे उत्साह वाढलेल्या श्री. धवड यांनी फळलागवडीचे नियोजन केले. लागवडीपूर्वी जेसीबीच्या साहाय्याने जमीन भुसभुशीत केली. सन 2009 मध्ये त्यांनी दहा एकरांवर भगवा डाळिंबाची लागवड केली. रोपांची खरेदी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून केली. दोन ओळीत पंधरा फूट तर दोन रोपांत दहा फूट अंतर ठेवत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लागवड केली. रोपांना शिफारशीनुसार शेणखत, निंबोळी पेंड, जिवाणू खतांचा वापर केला. जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केल्याने रोपांची वाढ जोमदार झाली. वेळोवेळी राहुरी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. संतोष कुलकर्णी यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले. बागेला पूर्णपणे ठिबक सिंचन केले आहे.
1) डाळिंब रोपांच्या दोन्ही बाजूस एक ते सव्वा फुटावर पावसाळ्यात झेंडू लागवड, यामुळे सूत्रकृमींच्या नियंत्रणास फायदा. 
2) दर आठवड्याला प्रति झाडाला एक लिटर गोमूत्र आणि शेणस्लरी दिली जाते, त्यामुळे जमीन चांगली राहते. उपयोगी जिवाणूंची संख्या वाढीस लागली. जमीन सुपीक राहिली. 
3) योग्य वाढीनंतर रोपांना साडेपाच फूट रुंद आणि सव्वादोन फूट उंच गादी वाफा केला, त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर झाला. जमीन वाफसा स्थितीत राहिली, मुळ्यांची वाढ चांगली झाली. 
4) तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कीड, रोगांचे नियंत्रण, बागेची स्वच्छता ठेवली. 
5) पाण्याच्या योग्य वापरासाठी डाळिंबाला डिफ्यूजर बसविले आहेत. जमिनीखाली सहा इंच तर जमिनीवर दोन इंच डिफ्यूजर बसवून त्यात ठिबकची लॅटरल सोडली आहे. डिफ्यूजर जमिनीत बसविताना तळाशी 60 टक्‍के माती व 40 टक्‍के शेणखताचे मिश्रण टाकले. या तंत्रामुळे मुळांना गरजेनुसार पुरेसे पाणी मिळते. 
6) बागेचे योग्य खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोग नियंत्रणावर भर दिल्याने फळांचे दर्जेदार उत्पादन सुरू झाले. सन 2011 मध्ये एकरी सहा टन फळांचे उत्पादन मिळाले. यंदाच्या वर्षी नऊ टन फळांचे उत्पादन मिळाले. प्रति किलो 50 रुपयांचा दर मिळाला. त्यानुसार तीस लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. एकरी 55 हजार रुपयांचा व्यवस्थापनावर खर्च झाला. फळांची विक्री मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती येथील व्यापाऱ्यांना केली जाते.

शेडनेटमधील ढोबळी मिरची

1) धवड यांनी 2013 मध्ये तीन एकरांवर शेडनेट उभारले. बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी या शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीची लागवड केली आहे. 
2) रोपांच्या लागवडीसाठी दोन गादीवाफ्यांतील अंतर पाच फूट, रुंदी दोन फूट तर उंची दीड फूट ठेवली आहे. पिकाला इनलाइन ठिबक केले आहे. जुलैमध्ये लागवड केली. तज्ज्ञांच्या सल्ल्याने पिकाचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे. साधारणपणे चार सप्टेंबरपासून मिरचीचे उत्पादन सुरू झाले. आत्तापर्यंत एकरी 45 टन मालाची विक्री झाली असून, 10 टन उत्पादन अजून निघेल असा अंदाज आहे. 
3) अमरावती बाजारपेठेत ढोबळी मिरचीची विक्री केली जाते. सुरवातीला बाजारात आवक कमी असल्याने 55 रुपये प्रति किलोचा दर मिळाला. त्यानंतर आवक वाढल्याने 12 रुपये प्रति किलोपर्यंत दर खाली आला. त्यांना एकरी सहा लाख रुपयांचे उत्पन्न ढोबळी मिरचीतून मिळाले. पीक व्यवस्थापनावर एकरी एक लाख 25 हजार रुपयांचा खर्च झाला. 
4) शेडनेट उभारणीकरिता लोखंडी पाइपऐवजी बांबूचा उपयोग केला, त्यामुळे अवघ्या सव्वापाच लाख रुपयांत त्यांनी तीन एकर शेडनेट उभारले आहे.

टोमॅटो लागवडीतही सातत्य

धवड यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन यंदाच्या जुलै महिन्यात तीन एकरांवर पाच फूट बाय एक फूट अंतरावर टोमॅटो लागवड केली. सप्टेंबरपासून टोमॅटो उत्पादनास सुरवात झाली. सध्या एकरी 70 टन टोमॅटोचे उत्पादन त्यांना मिळाले आहे. अजून तोडणी सुरू आहे. कमीत कमी 60 रुपये, तर जास्तीत जास्त 1200 रुपये प्रति क्रेट (24 किलो) असा दर त्यांना मिळाला. टोमॅटो पिकाचा लागवडीपासून ते तोडणीपर्यंत एकरी दोन लाख 25 हजार रुपयांचा खर्च झाला.

सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन

धवड यांनी एक एकर क्षेत्राचे भाग पाडून त्यामध्ये वांगी, पालेभाज्या, कांदा, मुळा, बीट, मिरची यांची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आहे. या पिकांना शेणखत, शेणस्लरीचा वापर केला जातो. कीड, रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकांच्या वापरावर त्यांचा भर आहे. अमरावतीमधील स्वतःच्या बंगल्यात धवड सेंद्रिय भाजीपाल्याची विक्री करतात. परिसरातील नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळतो.

शेतकऱ्यांचा घेतला सल्ला


धनंजय धवड यांच्या पत्नी कल्पना या होमिओपथिक व्यवसायात आहेत. त्यांचेही शेती व्यवस्थापनात सहकार्य मिळते. गेल्या तीन वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील खडक ओझर (ता. चांदवड) येथील शेतकरी भाऊसाहेब श्रावण पगार, रवींद्र पवार (सातमाने), तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील विठ्ठल भोसले यांचे डाळिंब पीक व्यवस्थापन, तर ज्ञानेश्‍वर शिंदे (अडगाव, जि. नाशिक) यांचे ढोबळी मिरची व्यवस्थापनात मार्गदर्शन होते, असे धवड सांगतात.

शेतीचे नियोजन

1) संपूर्ण 29 एकर क्षेत्राला ठिबक सिंचन. 
2) पाण्याच्या उपलब्धतेसाठी दोन विहिरी, एक कूपनलिका. 
3) कृषी विभागाच्या अनुदानातून दीड एकर क्षेत्रावर एक कोटी लिटरचे शेततळे 
4) शेणखत व गोमूत्राच्या उपलब्धतेसाठी 14 जनावरांचे संगोपन, जानावरांसाठी चारा लागवड. 
5) पंचायत समितीच्या योजनेतून दोन गोबरगॅस, गोबरगॅसमधून निघणारी स्लरी डाळिंब बागेसाठी वापरली जाते. 
6) शेत मजुरांना गोबरगॅसचा फायदा. 
7) सौरदिव्यांच्या माध्यमातून पारंपरिक विजेला पर्याय शोधण्याचा प्रयत्न 
8) ढोबळी मिरची व टोमॅटो रोपे स्वतःच्या रोपवाटिकेत तयार केली. 
9) एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर. प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर 
10) गरजेनुसार यांत्रिकीकरणाचा वापर.

संपर्क : धनंजय धवड : ९८२३०७४३११

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate