दहीटणे गावात वाढले उत्पादन, झाले फायदेच फायदे
कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरने (केव्हीके) दहिटणे (ता. बार्शी, जि. सोलापूर) हे गाव दत्तक घेतले आहे. सुधारित वाणांचा वापर तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापनाचे संपूर्ण मार्गदर्शन करून केंद्राने गावात आदर्श सामूहिक शेतीचे उदाहरण घडवले आहे.
प्र. अ. गोंजारी, अमोल शास्त्री, डॉ. ला. रा. तांबडे
सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे गावात सोयाबीन, कांदा, तूर व ऊस ही मुख्य पिके आहेत. हे गाव कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतल्यापासूनच येथील शेतकऱ्यांना गटशेतीसाठी सतत प्रोत्साहन दिले. तरुण शेतकऱ्यांचा त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यात शहाजी काशीद, प्रवीण चेट्टी, नाना दळवी, सागर काशीद, नागनाथ साठे, दत्तात्रय राऊत, सुधीर साखरे आदींचा समावेश होता. गावात नाबार्ड अंतर्गत शिवतेज फार्मर्स क्लब स्थापन झाला.
गटशेतीची गरज का वाटली?
पारंपरिक शेती करताना सुधारित पद्धतीने शेती करावी, असे मनोमन प्रत्येकाला वाटायचे; पण त्यासाठी नेमके काय करावे हे लक्षात येत नव्हते. केव्हीकेच्या प्रेरणेला "ऍग्रोवन'मधील गटशेतीच्या यशोगाथाही उत्साहित करीत होत्या. त्यातूनच प्रगतीचा मार्ग एकत्र येण्यात दडले असल्याचे शेतकऱ्यांना समजले.
सोयाबीन पिकाची गटशेती
केव्हीकेने गावात 2012 मध्ये सोयाबीन, हरभरा, भुईमूग या पिकांत उत्पादन वाढीसाठी आद्यरेखा प्रात्यक्षिके घेतली. दहिटणे गावात कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. खरिपात पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची लागवड 500 ते 600 एकरवर व्हायची. हेक्टरी 8 ते 12 क्विंटल इतकेच उत्पादन व्हायचे. आर्थिक लाभाचे प्रमाण नगण्य होते. सन 2010 नंतर अवर्षण परिस्थिती जाणवत होती. सन 2011-12 मध्ये सरासरीपेक्षा (600 मि.मी.) 30 ते 40 टक्के कमी झाला. शेतकऱ्यांना 2011 व 2012 मध्ये सरासरी 4 ते 5 क्विंटल प्रति एकर एवढे कमी सोयाबीन उत्पादन मिळाले. उत्पादकता कशी वाढविता येईल, या विषयी शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उभे होते. मात्र गटशेतीतून त्यांना उत्तरे व पुढे यश मिळाले.
या गोष्टींचा केला वापर
कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पादनासाठी सुधारित जातींचा वापर, मूलस्थानी जलसंधारण, एकरी मर्यादित रोपांची संख्या राखणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, जीवाणू संवर्धकांचा वापर, कीड- रोग नियंत्रण.
केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. ला. रा. तांबडे, विषय विशेषज्ज्ञ अमोल शास्त्री आणि प्रदीप गोंजारी यांचे मार्गदर्शन. त्यासाठी केव्हीकेच्या प्रक्षेत्रावर मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम.
1) सुधारित बियाण्यांचा वापर : शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम एम.ए.यू.एस.-158 व जे.एस.-9305 या जातींचे बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध केले. जिल्हा परिषदेचे (सोलापूर) कृषी विकास अधिकारी मदन मुकणे यांचे सहकार्य झाले. अनुदानावर 1740 रुपये प्रति 30 किलोची पिशवी 1380 रुपयांत उपलब्ध झाली. शिवतेज गटाचे शहाजी काशीद, प्रवीण चेट्टी यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांकडून पैसे जमा केले. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणे पोच झाले.
2) जीवाणू संवर्धकांचा वापर : ना नफा ना तोटा तत्त्वावर महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून तीन क्विंटल जीवाणू खते केव्हीकेमार्फत पुरवण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोयाबीनसाठी गटामार्फत जीवाणू खते खरेदी करणारे जिल्ह्यातील किंवा कदाचित महाराष्ट्रातील हे एकमेव गाव असावे.
3) अवर्षण आपत्तीकडे संधी म्हणून पाहून सर्वांना मूलस्थानी जलसंधारण करणे सक्तीचे केले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर पेरणीनंतर भारी जमिनीत 10 x 10 मी. अंतरावर डुब्याच्या मदतीने चौक्या टाकावयास सांगण्यात आले. जेणेकरून जास्तीत जास्त पाणी मुरण्यास मदत झाली. सततच्या संततधार पावसाने जास्त झालेले पाणी बाहेर काढण्यासही मदत झाली.
4) उशिरा सुरू झालेला पाऊस आणि संपत आलेली सोयाबीन पेरणीची वेळ यांचा सुवर्णमध्य काढण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने पेरणी केली. दोन ते चार दिवसांच्या कालावधीत गावात 500 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली. याचा आणखी फायदा म्हणजे 200 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 50 कि. युरिया प्रति एकर पेरणी वेळी देणे शक्य झाले. ट्रॅक्टरच्या मदतीने पेरणी केल्याने दोन ओळींतील योग्य अंतर (18 इंच) 45 सें.मी. राखता आले. विरळणीची गरज भासली नाही. जुलैत चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने हुलकावणी दिली. या वेळी नुसत्या दोन-तीन कोळपण्यांचा फायदा झाला.
काढणी व मळणी - गटातील शेतकऱ्यांनी कंबाइंड हार्वेस्टरच्या मदतीने काढणी व मळणी केली. यामुळे मजुरांच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करणे शक्य झाले. पारंपरिक पद्धतीने काढणी व मळणीच्या खर्चाच्या तुलनेत एकरी 1200 ते 1500 रुपयांची बचत झाली.
सोयाबीन लागवडीचा सरासरी आर्थिक ताळेबंद - (सर्व एकरी)
बियाणे, रानबांधणी, पेरणी, रासायनिक, जीवाणू व विद्राव्य खते, आंतरमशागत, खुरपणी, कीडनाशके,
काढणी, मळणी असा सर्व मिळून - 10 हजार 540 रु. खर्च
- उत्पादन - 11 क्विंटल (सरासरी)
- सर्वसाधारण मिळालेला दर - प्रति क्विंटल - 3350 रु.
- निव्वळ नफा - 26 हजार 310 रु.
गावपातळीवरील फायदा
गटशेतीमधून मिळालेले एकूण उत्पन्न सरासरी 11 क्विंटल प्रति एकर प्रमाणे 383 एकरांसाठी 4 हजार 213 क्विंटल मिळाले. काही शेतकऱ्यांनी दरवाढीसाठी सोयाबीनची साठवणूक केली.
गटशेतीमुळे निव्वळ नफ्यात झालेली एकूण वाढ ही काही लाख रुपयांच्या घरात जाते.
हे फायदे तर आवर्जून सांगण्यासारखे
- जे. एस. 93-05 व एम.ए.यू.एस.-158 या सोयाबीनच्या सुधारित जाती 90 ते 95 दिवसांत परिपक्व होतात, त्यामुळे कोरडवाहू भागात त्यांचा कालावधी लवकर संपतो, त्यामुळे अवर्षण परिस्थितीपासून बचाव होतो व पीक हाती लागते. या जातीच्या शेंगा पक्व झाल्यावर फुटत नाहीत, त्यामुळे हातातोंडाला आलेल्या पिकाचा नुकसानीपासून बचाव होतो.
- जीवाणू खतांच्या बीजप्रक्रियेमुळे मुळांची संख्या व त्यावरील गाठींमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली, त्यामुळे कमी पावसातही पीक तग धरून राहिले. हवेतील नत्र स्थिरीकरणाचे प्रमाण वाढले. जमिनीच्या सुपीकतेमध्येही वाढ.
- एकात्मिक अन्नद्रव्य व फवारणीद्वारे अन्नद्रव्यांचा वापर केल्याने सोयाबीनच्या आकारात, वजनात व तेलाच्या प्रमाणात वाढ झाली.
- सांघिक भावना वाढीला लागली. पुढे सामूहिक पद्धतीने कांदा पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व ठिबक सिंचनाच्या वापरामध्ये वाढ, तर पूर्वहंगामी ऊस लागवडीमध्ये ऍसिटोबॅक्टर आणि युरिया-डीएपी ब्रिकेट व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर सुरू.
- गावात सोयाबीन पिकाखालील क्षेत्र 550 ते 600 एकर एवढे असते. यंदाच्या खरिपात सुमारे 383 एकरांवर म्हणजे 64 टक्के क्षेत्र नव्या वाणाखाली व्यापले गेले, त्यामुळे गावच्या सोयाबीन उत्पादकतेत वाढ झाली.
प्रयोगातून साध्य अन्य गोष्टी
1) एकत्रित निविष्ठा खरेदीतून बचत. प्रत्येक शेतकऱ्याच्या एकरी सोयाबीन उत्पादकतेत वाढ.
2) बांधावरील खत योजनेचा गावातील 83 शेतकऱ्यांना लाभ. सर्वांकडे मिळून 54 हजार रुपयांची बचत.
3) एकत्रित बियाणे खरेदीमध्ये प्रति किलो 12 रुपयांची याप्रमाणे एकूण 355 शेतकऱ्यांची एक लाख 37 हजार 880 रु. बचत.
4) पूर्वी एकरी तीन ते सहा क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळत नव्हते. आता एकरी 7 ते 14 क्विंटल इतके उत्पादन झाले. पूर्वी खर्च व उत्पन्न सारखेच राहत होते.
5) गावात याआधी न झालेला जीवाणू संवर्धकाचा वापर कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्यामुळे झाला.
पुढील पिके घेतानाही शेतकरी कोणत्या निविष्ठा वापराव्यात असे विचारू लागले.
6) दहिटणे गावातील शेतकरी एकत्रित बियाणे खरेदीसाठी करीत असलेली धावपळ पाहून भागातील कळमण, कवठाळी, दारफळ (गावडी) (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकऱ्यांनीही गावात एकोपा साधण्याचा प्रयत्न करून केला. बांधावरील खत योजनेचा फायदा घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहलीच्या माध्यमातून गावाला भेट देऊन सोयाबीन पीक प्रयोगाची पाहणी केली.
- गटातील प्रवीण चेट्टी यांना एकरी 15 क्विंटल एवढे भरघोस उत्पादन मिळाले. त्याची प्रेरणा अनेकांना मिळाली.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)
संपर्क - 1) शहाजी काशीद - 9527023383
शिवतेज फार्मर्स क्लब, दहिटणे
2) प्रवीण चेट्टी - 8390734221
शिवतेज फार्मर्स क्लब, दहिटणे
3) प्रदीप गोंजारी - 9422370798
विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार), कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर
4) अमोल शास्त्री - 9422647721
विषय विशेषज्ञ (कृषिविद्या), कृषी विज्ञान केंद्र
माहिती संदर्भ : अॅग्रोवन