"जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करूनही सोडावे सकलजन' राष्ट्रसंतांच्या याच विचारसरणीला प्रेरक असे कार्य जिजगाव (ता. भामरागड, जि. गडचिरोली) येथे सुरू आहे. आदिवासी बहूल या गावात सीताराम मडावी या शेतकऱ्याने पुढाकार घेत गावातील शेतकऱ्यांपर्यंत सुधारित लागवड पद्धती व यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान प्रसाराची मोहीम राबविली आहे. त्यांच्या या प्रयत्नातूनच भाताच्या उत्पादकता वाढीस हातभार लागला आहे.
भामरागड परिसरात भात (धान) हे महत्त्वाचे पीक आहे. काही वर्षांपूर्वी या पिकावर लष्करी अळीचाप्रादुर्भाव झाला होता. तालुका कृषी विभागातर्फे परिसरात या किडीच्या नियंत्रणासाठी पत्रकाद्वारा जाणीवजागृती करण्यात आली. असेच एक पत्रक त्या वेळी तालुक्यातील जिजगाव या दुर्गम गावातील सीताराम मडावी यांच्या वाचनात आले. ते पहिल्यांदाच कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले.
रोवणी केलेल्या धानाची रोपे त्यांनी सोबत नेली होती. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी श्री. चिमलवार यांनी त्यांना नियंत्रणाचे उपाय देताना सोबतच भाताच्या "एसआरआय' या सुधारित भात लागवड पद्धतीची माहिती दिली. सन 2007-08 मध्ये हैदराबाद येथील आचार्य रंगारेड्डी विद्यापीठात त्यांनी त्या विषयीचे प्रशिक्षण घेतले.
किडीच्या प्रादुर्भावामुळे आधीच नाराज असलेल्या मडावी यांच्या पत्नीच्या नाराजीत या नव्या लागवड पद्धतीविषयी ऐकताच आणखीच भर पडली. मात्र घरातूनच होणाऱ्या या विरोधाला न जुमानता सीताराम यांनी 2006 मध्ये एसआरआय पद्धतीने भात लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी या पद्धतीविषयी जाणीवजागृतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता कृषी सहायक लव्हाळे यांना काही वेळा घरी परतण्यासाठी वाहन मिळत नसल्याने ते रात्री सीताराम यांच्या घरीच मुक्कामी थांबत. त्यांचे हे प्रयत्न पाहता आपणही या तंत्रज्ञानाच्या प्रचार प्रसारार्थ काही तरी करावे, असा विचार सीताराम यांच्या मनात घोळू लागला.
कृषी विभागाच्या वतीने आयोजित बंगळुरू, केरळ, दक्षिण भारतातील अभ्यास सहलींमध्ये सीताराम सहभागी झाले. नवे काही करण्याच्या जिद्दीने या सहलींत ते सहभागी व्हायचे. देशभरातील शेतकऱ्यांनी कष्टाने शेती पिकवून कशी प्रगती साधली, हे अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकताना प्रेरणा आणि उत्साह संचारला. गडचिरोलीसारख्या आर्थिकदृष्ट्या मागास जिल्ह्यात आपण काही अंशी बदल करू शकलो तरी शेतकऱ्यांचे आयुष्यमान बदलेल हा विचार मनात घर करू लागला, त्यामुळे अभ्यास दौऱ्यावरून परतल्यावर सुधारित शेती पद्धतीविषयी जागृती सुरू केल्याचे सीताराम म्हणाले. आता तालुक्यातील जिजगावसह गुरनूर, मनीराजाराम, गेऱ्हा, बामनपल्ली, इचली या गावांतही सह एसआरआय पद्धतीनेच भात लावला जातो.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून जिजगावात एसआरआय लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. बियाणे, जैविक खते यांचे वाटप करण्यात आले. गेल्या वर्षीपासून या भागात दुबार हंगामाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून होत आहे. आजवर दुबार हंगामाखाली शून्य हेक्टर क्षेत्र असताना गेल्या वर्षी ते बारा हेक्टरपर्यंत नेण्यात कृषी विभागाला यश आले. हरभरा, ज्वारी, मका लागवड करण्यात आली होती.
सीताराम यांना पारंपरिक लागवड पद्धतीतून दीड क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. सुधारित पद्धतीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये उत्पादन वाढून हेक्टरी 54 क्विंटल म्हणजे एकरी 21 क्विंटलपर्यंत उत्पादनवाढ त्यांना मिळाली आहे. गावातील अन्य शेतकऱ्यांचेही भाताचे उत्पादन 10 ते 15 क्विंटलने वाढले आहे. सीताराम यांना 2013 मध्ये हेक्टरी 48 क्विंटल तर 2012 मध्ये 54 क्विंटल उत्पादन मिळाले.
पारंपरिक पद्धतीत बियाणे दर एकरी 16 ते 20 किलो होता. एकरी 15 ते वीस हजार रुपयांचा खर्च होतो. एसआरआय पद्धतीत एकरी दोन किलोपर्यंतच बियाण्यांची आवश्यकता भासते. या पद्धतीत पाच एकरांत सात ते दहा हजार रुपयांपुढे खर्च जात नसल्याचे सीताराम म्हणतात. संकरित जातींचीच लागवड ते करतात. जिजगाव परिसरात व्यापारी प्रति खंडीने (प्रति दीड क्विंटल) भाताची खरेदी करतात. त्याला तीन हजार रुपये दर मिळतो.
एकलव्य कृषी विकास शेतकरी समूहाची स्थापना सीताराम यांच्या पुढाकाराने झाली आहे. समूहात 15 जणांचा समावेश असून, महिना प्रति व्यक्ती वीस रुपयांची बचत केली जाते. आसआरआय पद्धतीद्वारा उत्पादकता वाढीचा हेतू साध्य झाल्यानंतर आता रोवणीकरिता यंत्रांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी यंत्राचा पुरवठा 90 टक्के अनुदानावर करण्यात आला आहे. पॉवर टिलर, धान रोवणी-कापणी, युरिया-डीएपी ब्रिकेट अप्लीकेटर असा सारा संच येथील शेतकऱ्यांना "मानव विकास मिशन'मधून पुरविला जाणार आहे. चार लाख 29 हजार रुपयांचा हा संच असून, त्याकरिता दहा टक्के वाटा समूहाचा राहील. समूहाचे अध्यक्ष सीताराम मडावी तर सचिव लक्ष्मणसिंग मडावी आहेत. "आत्मा' अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समितीचेही सीताराम अध्यक्ष आहेत.
प्रयोगशीलतेचा वारसा जपणाऱ्या जिजगावने अनेक यंत्रणांचे लक्ष्य आपल्याकडे वेधले आहे. त्यातूनच बियाणे क्षेत्रातील एका कंपनीने गावात यंदा धान बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 50 हेक्टरचे उद्दिष्ट त्याकरिता निश्चित करण्यात आले आहे. 25 हेक्टर क्षेत्राकरिता आजमितीस नोंदणी पूर्णत्वास गेल्याचे तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत सांगतात. क्विंटलमागे 400 रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न यातून होणार आहे.
जिजगावात जिरायती शाश्वत शेती विकास कार्यक्रमातून दोन सामूहिक शेततळी खोदण्यात आली आहेत. शेततळ्यासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्याने मत्स्यपालन करावे, त्यातील उत्पादित माशांची विक्री त्यानेच करावी, तर पाण्याचा वापर सामूहिकरित्या करण्याचा निर्णय ग्रामसभेत सर्वांनुमते घेण्यात आला. भविष्यात धान खरेदी तसेच भरडाई केंद्र सुरू करण्याचा मनोदय आहे.
पूर्वी जिजगावात धानाचे घरचेच बियाणे वापरले जायचे. कसाबसा उत्पादन खर्च निघायचा. नंतरच्या कालावधीत वाफ्यावर रोवणी लागवड सुरू झाली; परंतु त्यात लागवड अंतर राखले जात नसल्याने या पद्धतीतही उत्पादकता अपेक्षित नव्हती. आता एसआरआय पद्धतीत रोपवाटिका तयार केली जाते.
रोप सहा ते 12 दिवसांचे झाल्यानंतर त्यांची शेतात पुनर्लागवड होते. 25 बाय 25 सेंटीमीटरवर एक रोप लावले जाते. लागवड अंतर योग्य राखले जात असल्याने रोपांमध्ये हवा खेळती राहून फुटवे भरपूर मिळतात. पूर्वी एकरी बारा ते तेरा क्विंटलची उत्पादकता आता सरासरी तीस क्विंटलपर्यंत पोचली आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नगर जिल्ह्यातील वाकी या आदिवासी गावात प्रभाताई फलक...
आदिवासी जीवनाची परंपरा आणि रूढी, त्यांची सांस्कृति...
आदिवासी जमाती प्रमाणपत्र वाटपाचा अभिनव उपक्रम.
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चाकोरे ग...