অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केली जलसंकटावर मात

केली जलसंकटावर मात

नाला रुंदी-खोलीकरण कार्यक्रम राबवला लोकसहभागातून

इच्छाशक्‍तीच्या बळावर असाध्यही साध्य करता येते. कायम दुष्काळाच्या झळ सोसणाऱ्या गांगनेर (ता. मौदा, जि. नागपूर) गावाने हाच विश्‍वास आपल्या कामातून निर्माण केला आहे. सामूहिक प्रयत्नांतून येथील गावकऱ्यांनी जलसंकटावर मात केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील हिवरा (गांगनेर) गटग्रामपंचायतीत समावेशीत गांगनेरची लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास. गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता कन्हान नदीच्या खोऱ्यात असलेल्या नाल्याच्या काठावर विहीर खोदण्यात आली आहे. त्यातील पाण्याचा उपसा करीत ते पाणी गावात उभारण्यात आलेल्या टाकीत पोचविले जाते. तेथून गावाला नळाद्वारा पाणीपुरवठा होतो. पावसाळ्याचे काही दिवस परिस्थिती चांगली राहत असली तरी त्यानंतरच्या कालावधीत जलस्रोत कोरडे पडत असल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येत होती. वर्षानुवर्ष अशीच स्थिती भागात कायम असताना या जोखडातून ग्रामस्थांची सुटका व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय सत्येकार यांनी पुढाकार घेतला.

ग्रामसभेत झाले कामावर शिक्‍कामोर्तब

26 जानेवारी, 2013 रोजी गावच्या आमसभेत सत्येकार यांनी या विषयीचा मुद्दा उपस्थित केला. तत्कालीन सरपंच मंगला वासनिक यांनी गावातील पाणीसंकट सोडविण्यासाठीच्या या मुद्याला अनुमोदन दिले. जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर पाणी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला; परंतु प्रशासकीय स्तरावरून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून देणगीदारांच्या माध्यमातून हे काम तडीस नेण्याचा निर्धार करण्यात आला. तशा व्यक्‍तींची शोधाशोध सुरू झाली. इच्छा तेथे मार्ग या धर्तीवर आपले योगदान देण्यासाठी अनेकांनी तयारी दर्शविली. सुमारे 65 हजार रुपये लोकवर्गणीदेखील अल्पावधीत गोळा झाली.

विरोध मावळला

नाला रुंदी- खोलीकरणाचे काम करणे आवश्‍यक होते, त्यामुळे होणाऱ्या फायद्याची जाणीव ग्रामस्थांना करून देण्यात आली. त्यानंतरही काहींनी या कामाला विरोधाची भूमिका ठेवली. नाल्याच्या काठावर भगवान मेश्राम यांची शेती आहे. खोलीकरण व रुंदीकरणामुळे शेतीचा भाग नाल्यात धसेल आणि नुकसान होईल, असे त्यांना वाटत होते; परंतु जलपुनर्भरणामुळे नुकसान होण्याऐवजी शेतीची उत्पादकता वाढण्यासच मदत होईल, असे त्यांना पटवून देण्यात आले. त्यांचा विरोध मावळला. काम पूर्ण झाल्यानंतर नाल्यात साठलेल्या पाण्याचा उपयोग त्यांनी उन्हाळ्यात पीक घेण्यासाठी केला. नाला रुंदी-खोली विस्तारीकरणानंतर त्यातील पाण्याचा उपयोग करून घेणारे ते परिसरातील पहिलेच शेतकरी ठरले. त्यांच्यानंतर अनेकांनी थेट नाल्यातून पाण्याचा उपसा करणे सुरू केले.

आणि कामाला सुरवात झाली

लोकवर्गणी तसेच देणगीदारांनी खड्डे खुदाई, टिपर, ट्रक आदींची सोय केल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. गावातील शेकडो हात या कामात राबू लागल्याने कामाने आता लोकचळवळीचे रूप घेतले. 12 फूट खोल व 102 फूट रुंद असे नाला विस्तारीकरणाचे काम त्यातून झाले. नदीतून निघालेल्या गाळाचा वापर करीत पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. काही गाळ शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन टाकण्यात आला. त्याद्वारा जमिनीची सुपीकता वाढविण्याचा प्रयोगही या भागात पहिल्यांदाच झाला. नाला रुंदी-खोलीकरण झालेल्या परिसरात पाण्याचा संचय झाल्याने शेतकऱ्यांत समाधान पसरले आहे.

गांगनेरच्या विहिरी भरल्या तुडुंब

कन्हान खोऱ्यातील गावालगतच्या नाल्यात पाणी तर साठले. परिणामी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींसोबतच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींची पातळीही वाढली. शेतातील विहिरींतून अवघा दहा फुटांचा दोर बांधत पाणी उपसा करणे शक्‍य झाले. पावसाळ्यातदेखील असा प्रकार घडेल, अशी कल्पना होत नसताना भर उन्हाळ्यात जणू हा चमत्कार घडल्याचे पाहून अनेकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले.

पीक उत्पादक वाढीस चालना

सोयाबीन, भाजीपाला, भात यासारखी पीक पद्धती या भागात आहे. या पिकांच्या पोषक वाढीला पाणी उपलब्ध झाले. नागपूरपासून अवघ्या काही किलोमीटरवर हे गाव असल्याने या भागात भाजीपालाही घेतला जातो. आता पिकांची उत्पादकता एक ते दोन क्‍विंटलने वाढण्यास चालना मिळणार आहे.

"ऍग्रोवन'ने दिली प्रेरणा

हिवरेबाजारसह अन्य गावांनी घडवलेल्या यशोगाथा "ऍग्रोवन'मधून सातत्याने प्रकाशित होतात. त्यापासूनच आपणास प्रेरणा मिळाल्याचे सत्येकार यांनी सांगितले. लोकसहभागातून समस्या सोडविणाऱ्या गावांपासून इतरांनाही ऊर्जा मिळावी यासाठी अनेक गावांमध्ये "ऍग्रोवन' पोचविण्यावर त्यांनी भर दिला आहे, त्यासोबतच अनेक व्यासपीठांवर ते ऍग्रोवन वाचनाचा आग्रहदेखील धरतात.

कन्हान नदीच्या खोऱ्यात असलेल्या गांगनेरने काळाची पावले ओळखत लोकशक्‍तीच्या बळावर पाणी संकटावर मात केली. मात्र याच गावापासून काही अंतरावर असलेल्या अनेक गावांतही अशी सुधारणा होणे गरजेचे असल्याचे सत्यकार म्हणाले.

कन्हान नदीच्या खोऱ्यात गाव असतानाही उन्हाळ्यात गावात पाणीसंकट गडद होत होते. गावात 50 हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले; परंतु उन्हाळ्यात पाणी कपात किंवा विहीर अधिग्रहणासारख्या पर्यायांचा विचार करावा लागे. नाला रुंदी-खोलीकरणामुळे उन्हाळ्यातही नाल्याच्या पात्रात पाणी साठून राहिले. त्याचा उपयोग शेतीसाठी होत आहे.
- संजय सौंसरे
उपसरपंच, गांगनेर, ता. मौदा, जि. नागपूर.
"दर वर्षी दिवाळीपासून गावाला पाणीटंचाईचे चटके बसायचे. जलस्रोत असलेल्या ठिकाणावरून पाणी आणण्याचे काम घरातील महिलांनाच करावे लागते, त्यामुळे पाणीटंचाईची सर्वाधिक झळ महिलांनाच बसत होती. गेल्या वर्षांपासून समस्येचे निदान शोधता आल्याने या महिलांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.
- श्‍वेता सहारे
ग्रामस्थ, गांगनेर
धानाचे (भात) पऱ्हे सर्वदूर कोमजण्याच्या तक्रारी आहेत. पाऊस नसणाऱ्या वर्षात आमच्या गावातदेखील अशीच परिस्थिती होती. या वर्षी मात्र सुमारे 250 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांची सोय नाला रुंदी-खोलीकरणातून उपलब्ध झालेल्या पाण्याच्या बळावर करता आली. माझ्याकडे साडेतीन एकर शेती असून, त्यात धान व सोयाबीनसारखी पिके घेतो. धानाचे पऱ्हे (रोपवाटिका) तयार केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय नाल्यातील संचित साठ्यातून होऊ शकली.

संपर्क- संजय सत्येकार- 9270086396

-------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate