शेतीतील बेभरवशाच्या उत्पन्नाची जोखीम नको म्हणून अनेक जण नोकरीला प्राधान्य देतात. लातूर जिल्ह्यातील औसा येथील बालाजी माळी यांनी मात्र अभ्यास, ज्ञान घेण्याची आस, कष्ट व पिकांचे नियोजन करण्याची क्लृप्ती यातून शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते व कुटुंबाला सुखी-समाधानी ठेवता येते हे सिध्द केले आहे. गुलाबासह फुलशेती त्यांना फायदेशीर ठरली आहे.
गाव, घर न सोडता आई-वडिलांना आधार देत शेतीच करायची असे ठरवून वयाच्या तिशीतील बालाजी नारायण माळी (फुटाणे) कामास लागले. औसा (जि. लातूर) हे त्यांचे गाव. वडिलोपार्जित त्यांची सात एकर शेती. वडील पारंपरिक शेती करीत. त्यातून चार-पाच जणांचे कुटुंब गरिबीचे चटके सहन करीत कसेबसे उदरनिर्वाह करीत होते.गावालगत रस्त्याकडेच्या तीन एकरच्या जिरायती शेतीत बोअर घेतले.
अंदाजे तीनशे फुटांवर चांगले पाणी लागले; परंतु उसासारख्या पिकाचा मोह बालाजी यांनी धरला नाही. सुरवातीला 12 गुंठे क्षेत्रावर गुलाबाचे नियोजन केले. खात्रीशीर नर्सरीतून 25 रुपयाला एक याप्रमाणे कलमे आणली. शेत हलके असले तरी ते निचरा होणारे होते. त्यात नांगरून, कुळवून मशागत केली. दहा ट्रॉली शेणखत टाकले. गादी वाफे बनवून त्यावर ठिबक अंथरले. लागवड करण्यापूर्वी डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट, फोरेट, कार्बेनडॅझीम खणलेल्या खड्यात टाकून त्यात मागील वर्षी 12 जूनला 660 कलमे लावली. रस शोषणाऱ्या किडी व अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या तर रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या गरजेनुसार आठवड्याला वा पंधरा दिवसाला फवारण्या घेऊन कलमे जोमदार वाढवली. ऍग्रोवन तसेच अन्य कृषी विषयक मजकुराने मोलाची माहिती पुरविली. येणाऱ्या संकटातून, अडीअडचणीतून बालाजी शिकत राहिले. कृषी खात्याच्या संपर्कात राहिल्याने योजनांची माहिती कळली.
पुढे दर दोन महिन्याला छाटणी करून फुटवे वाढवली. सुमारे सहा महिन्यांनंतर टपोरे गुलाब मिळू लागले. सुरवातीला एका कलमापासून दररोज एखादे फूल मिळे. छाटणी, खते, कीडनाशके फवारणी, ठिबक सिंचन, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांतून कलमांचे पोषण झाले. सशक्त फुटवे आल्याने पुढे दर दिवशी दोन-तीन फुले मिळू लागली. वर्षातील किमान दोनशे दिवस फुले मिळत राहिली.
मार्केटचे मोठे ठिकाण म्हणजे लातूर हे 20 किलोमीटर अंतरावर असल्याने बालाजी सुरवातीला स्वतः तोडणी व पॅकिंग करून दररोज सकाळी फुले मंडईला देण्याऐवजी मुख्य विक्रेत्यांना पुरवत. हंगाम नसलेल्या काळात 100 ते 150 रु. प्रति शेकडा तर हंगामात लग्नसराई, सणावारांचे दिवस व निवडणुकांच्या काळात 300, तर काही वेळा 500 रु. प्रति शेकडा भाव मिळाला. सरासरी भाव प्रति फूल दोन रुपये हमखास मिळाला. वर्षातले दोनशे दिवस 650 कलमांना प्रति कलम सरासरी दोन फुले धरली तरी हजार फुले हमखास मिळत म्हणजे दोनशे दिवस जरी धरले तरी दोन लाख फुले गेल्या वर्षी मिळाली. यातून बालाजी यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामध्ये त्यांनी गलांडाचे आंतरपीक घेऊन 15 हजार रुपयांचे उत्पन्न बोनस मिळविले. रान तयार करण्यापासून खते, कलमे, कीडनाशके, पाणी, ठिबक, प्रवासभाडे, स्वतःची मजुरी धरली, तर तो खर्च असा एकूण 50 हजार रुपयांपर्यंत आला. कृषी विभागाकडून 10 हजार रुपये अनुदान मिळाले. एकूण हिशोब विचारात घेता सुमारे साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न 12 गुंठ्यात एका वर्षात मिळाले. पूर्वानुभव नसताना निरीक्षण, कष्ट व अभ्यासातून जे काही साध्य झाले ते बालाजी यांना पुढील शेतीसाठी प्रेरणादायी ठरले.
खते देणे, कीडनाशक फवारणी, छाटणी, रोग-किडी आदींबाबत ज्ञान वाढल्याने बालाजी त्यांचा आत्मविश्वास दुणावला. परिसरातील अन्य तरुण शेतकरीही बालाजी यांचे अनुकरण करीत असून, बरेच जण त्यांचे मार्गदर्शनही घेत आहेत. ही बाब समाधान देणारी आहे, त्यामुळे नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय चुकला नाही हे त्यांनी अनुभवातून समवयस्क मित्रांना दाखवून दिले आहे. आज परिसरातील लोक गुलाबवाला बालाजी म्हणून त्यांना ओळखत आहेत.
(लेखक लातूर कृषी विभागांतर्गत कार्यरत आहेत.)
संपर्क - बालाजी नारायण माळी (फुटाणे) - 9767520329
मु. पो. औसा, ता. औसा, जि. लातूर.
- रमेश चिल्ले - 9422610775
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...