অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चवदार, दर्जेदार काकडी

दुष्काळाने यंदाच्या वर्षी साऱ्यांनाच जेरीस आणले; मात्र पाण्याचे नियोजन, मेहनत व अनुभवाच्या जोरावर दैठणे गुंजाळ (ता. नगर) येथील सुभाष अहिलाजी गुंजाळ यांनी डाळिंबात काकडीचे आंतरपीक घेऊन हा प्रयोग चांगलाच यशस्वी केला आहे. 
नगर शहरापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर व आदर्शगाव हिवरेबाजारच्या उशाला दैठणे गुंजाळ हे गाव आहे. येथील सुभाष गुंजाळ यांची वडिलोपार्जित 23 एकर व आदर्श गाव हिवरेबाजारच्या परिसरात दहा एकर अशी 33 एकर शेती आहे. त्यातील बहुतांश शेती माळरान व खडकाळ आहे. मुळात नगर व पारनेर तालुक्‍यात पाण्याचे कायम दुर्भिक्ष. गुंजाळ यांची शेती असलेल्या भागात पावसाळ्यातही पर्जन्यमान अल्प असते, त्यामुळे या भागातील शेती पावसावरच अवलंबून असते.
बाजरी, ज्वारी, मटकी, मूग, कपाशी, फारतर तूर अशी पावसावर येणारीच पिके प्रामुख्याने घेतली जातात. गुंजाळ गेल्या अठरा वर्षांपासून वेगळ्या व फायदेशीर पिकांचा शोध घेऊ लागले. स्वतः निरक्षर असले तरी पुणे, सातारा, कोल्हापूर आदी भागांत शेतीत वेगळा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला त्यांनी भेटी दिल्या. पिकांचे नियोजन, व्यवस्थापन, उत्पादित केलेल्या मालाला बाजार कोठे व कसा मिळवायचा आदींची माहिती त्यांनी घेतली. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांतूनच त्यांना प्रगतीची वाट सापडली. सुरवातीला संत्रा- मोसंबीची लागवड त्यांनी केली. खडकाळ जमिनीतूनच ते नवी वाट शोधत राहिले.

काकडीच्या लागवडीचे नियोजन

गुंजाळ तसे सुमारे 11 वर्षांपासून काकडीचे पीक घेतात. एकरी 15 टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. काही वेळा त्याहून अधिक उत्पादनही त्यांनी घेतले आहे. यंदाची परिस्थिती मात्र दुष्काळी होती, पीक जगवणेही मुश्‍कील होते, तरीही मागील अनुभव पणास लावून काकडीचे नियोजन गुंजाळ यांनी केले. डाळिंबाची लागवड करायची होतीच, त्यातच काकडीचे आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला.
फेब्रुवारीत सुरवातीला तीन एकर शेताची नांगरट करून रोटाव्हेटर फिरवल्यानंतर ठिबक सिंचनचे पाइप अंथरले. आठ ब्रास शेणखत, दोन क्विंटल डीएपी, एक क्विंटल युरिया, दोन क्विंटल पोटॅश, दोन क्विंटल सूक्ष्म अन्नद्रव्य घटकयुक्त खत, चार क्विंटल निंबोळी पेंड टाकली. त्यानंतर बेड तयार केले. त्यावर ठिबक पसरून डाळिंबाची लागवड केली. त्यानंतर आंतरपीक म्हणून चार दिवसांनी काकडीच्या बियाण्यांची लागवड केली. 
लागवड झाल्यानंतर सुमारे चाळीस दिवसांनी काकडी तोडणीसाठी आली. झाडांच्या वाढीसाठी सुरवातीला 19-19-19 हे विद्राव्य खत दिले. फुले व कळी येऊन ते पोसण्यासाठी 12- 61-0 हे खत ठरावीक दिवस दिले. तोडणी सुरू असतानाही पुढे अन्य विद्राव्य खतांचा वापर सुरू ठेवला. 
उन्हाळ्याचे दिवस असल्याने काकडीला पुरेसे पाणी मिळावे, भर उन्हात गारवा कायम राहावा, यासाठी सुरवातीला महिनाभर सकाळी आठ वाजता ठिबकच्या माध्यमातून पाणी दिले. 
तीन एकराला एक तासात दिवसाला साठ हजार लिटर पाणी दिले जायचे. काकडीची तोडणी सुरू झाल्यावर सकाळी- संध्याकाळी असे तीन तास पाणी दिले जायचे. पूर्ण पीक हाती येईपर्यंत पाणी किती लागेल याचे गुंजाळ यांनी नियोजनच केले होते. काकडीवर किडी- रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीडनाशकांच्या फवारण्याही केल्या. एकूण नियोजनातून गुंजाळ यांनी दुष्काळात माळरानावर काकडी फुलवली.

उत्पादन व उत्पन्न

डाळिंबाची झाडे लहान असेपर्यंत काकडीचे आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला होता, त्यादृष्टीने तीन एकरांवर काकडी घेताना प्रारंभी नांगरटीला 3000 रु., रासायनिक खते 18 हजार, शेणखत 20 हजार रु., जैविक खते- कीडनाशके 13 हजार रु., रोटाव्हेटर, बेड तयार करणे, लागवड व इतर मजुरीला 40,000 रुपये असा खर्च आला. बियाण्याच्या एका पॅकेटचा दर 450 रुपयांप्रमाणे 10 हजार 800 रुपये खर्च आला. तीन एकरांत काकडीचे पीक हाती येईपर्यंत वाहतुकीसह एकूण खर्च सुमारे एक लाख 10 हजार रुपये झाला. तीन एकरांत सुमारे 55 टन काकडीचे उत्पादन मिळाले.

नगरच्या बाजारातच मागणी

गुंजाळ यांनी रासायनिक खतापेक्षा शेणखताच्या वापरावरच भर दिला. प्रत चांगली असल्याने नगरच्या बाजारातच काकडीला चांगली मागणी राहिली. प्रति किलो सरासरी 12 रुपये दर मिळाला. यंदाच्या दुष्काळात अन्य ठिकाणी मालाचे शॉर्टेज असल्याने दर चांगला मिळाला. किमान दर 11 रु., तर कमाल दर 22 रुपये मिळाला. तीन एकरांत सहा लाख साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वाया जाता साडेपाच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. एकरी नफा सुमारे एक लाख 83 हजार रुपये मिळाला. उन्हाळ्यात काकडीला अधिक मागणी असते हे हेरूनच घेतलेले काकडीचे पीक गुंजाळ यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरले. शेतात तोडणी होत होती तशी लगेच बाजारात विक्री होत राहिली. लग्न व अन्य समारंभातील जेवणावळीसाठी थेट गुंजाळ यांच्या शेतातूनच अनेकांनी काकडीची खरेदी केली.

सव्वादोन कोटी लिटरचे शेततळे

उन्हाळ्यात पाणीटंचाईशी तोंड द्यावे लागत असताना पिके पाण्यावाचून वाया जातात, हा गुंजाळ यांचा अनुभव असल्याने त्यांनी सव्वा एकरावर सव्वादोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे, त्यासाठी 16 लाख 76 हजार रुपयांचा खर्च केला. पावसाळ्यात विहिरीतून सलग दीड महिन्यात विद्युतपंपातून पाणी सोडून शेततळे भरून घेतले. त्याच पाण्याचा यंदाच्या उन्हाळ्यात वापर करून काकडीसह डाळिंब, संत्रा अशी फळबाग जगवली. दोन विहिरी व तीन बोअरही त्यांच्याकडे आहेत, त्याचेही काही पाणी उपयोगी ठरले.

तेवीस एकर फळबागेला ठिबक सिंचन

गुंजाळ यांच्याकडे असलेल्या तेवीस एकर डाळिंब, संत्र्याच्या फळबागेला ठिबक सिंचन केले आहे. त्यांच्याकडील शेततळ्यातून फळबागेला ठिबकच्या माध्यमातून दिवसाला किती लिटर पाणी लागेल याचा आराखडाच तयार केलेला आहे. त्याच नियोजनातून ते पिकांना पाणी देतात. त्यांचे बंधू राजू गुंजाळ हे देखील त्यांच्या निर्णयानुसार नियोजन करतात.

परिसरातील शेणखताची खरेदी

शेणखताचा वापर केला तर शेतीमालाची गुणवत्ता सुधारते, त्याला मागणीही राहते. याची कल्पना असल्याने शेणखताचा वापर करण्यावर गुंजाळ भर देतात. आपल्याकडे एवढ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध नसल्याने दैठणे गुंजाळ, हिवरेबाजार व परिसरातील गावात कोणी शेणखत विक्री करत आहे का, याचा शोध घेत ते खरेदी करतात.

ऍग्रोवन वाचून घेतो

माझ्या घरी दररोज ऍग्रोवन येतो. मी स्वतः निरक्षर आहे; मात्र आदर्श शेती, शेतकऱ्यांच्या यशकथा "ऍग्रोवन'मधून दररोज प्रसिद्ध होतात. मला वाचता येत नसले तरी त्यातील यशकथांची तसेच फळबागांविषयीची माहिती माझ्या मुलांकडून माहीत करून घेतो. ऍग्रोवनमधील मार्गदर्शन उपयुक्त ठरले आहे. 
- सुभाष गुंजाळ

गुंजाळ यांचा शेतकऱ्यांना सल्ला

  • पाणीबचतीतून, कमी पाण्यावर चांगले
  • उत्पादन व उत्पन्न मिळेल अशा नियोजनावर भर हवा.
  • पावसाळ्यात पाण्याची साठवण करण्यावर भर द्यावा.
  • ठिबकचा वापर करत पाणीबचतीचे सूत्र स्वीकारावेच लागेल.
  • दोन तास विद्युत मोटार चालली तर ठिबकवर दोन एकर डाळिंब,
पाच एकर सीताफळ, तीन एकर संत्रा, दहा एकर आंबा जगू शकतो. 


संपर्क - सुभाष गुंजाळ - 9422187617 
दैठणे गुंजाळ (ता. नगर)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate