অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश

चाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश

महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी असणाऱ्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत चाळीसगांव तालुक्यात प्रथम टप्प्यात एकूण 24 गावांची निवड करण्यात आलेली होती. त्यानुसार गावाच्या गरजेनुसार पाण्याचा ताळेबंदावर आधारीत आराखडा तयार करुन चाळीसगांव तालुक्यात एकुण 940 कामे ही विविध तालुकास्तरीय यंत्रणांमार्फत आराखड्यात घेऊन एकूण 767 कामे ही पूर्ण करण्यात आलेली आहेत.

या कामांसाठी एकूण 13.24 कोटी रुपयाची कामे प्रस्तावीत करण्यात आलेली होती, तथापि विविध निधीच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 11.22 कोटी इतक्या रकमेची कामे पुर्ण करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या गावामध्ये 1228 टीसीएम एवढा पाणीसाठा झाला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आर.एस.राजपूत यांनी दिली. कृषी विभाग, ग्राम पंचायत यंत्रणा, लघु सिंचन विभाग, वन विभाग, स्थानिक स्तर इत्यादी विभागांनी विविध कामांच्या माध्यमातून निवडलेल्या 24 गावात गावाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी साठा निर्माण होईल अशी कामे करुन गाव पुर्णत: टंचाई मुक्त झालेली असून त्यामुळे सर्वाना पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी विविध विभागा कडील योजना,अशासकीय संस्था व लोकसहभाग यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. समन्वयाने राबविण्यात आलेल्या ह्या अभियानाचा हा पहिला टप्पा यशस्वी झाल्याचे चित्र या गावामध्ये भेट दिल्यास नक्कीच निदर्शनात येते.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर तालुका स्तरीय समिती गठित करण्यात आली. त्यात सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारी यांनी काम पाहिले. या अभियानांतर्गत लोकसहभागातून 6 कामे करण्यात आली, त्यात गाळ काढणे, नाले खोलीकरण, रुंदीकरणाची कामे करण्यात आली. तालुक्यातील खेडगाव येथील नारळी नदीपात्राचे खोलीकरण लोकसहभागातून करण्यात आले या आदर्श कामाची दखल स्वत:जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली असून त्यांनी कार्यस्थळी भेट देवून ग्रामस्थांचे कौतूक केले. या नदीपात्रातून 18 हजार 800 घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला. या गाळाची अंदाजित शासकीय किंमत 5 लाख 96 हजार आहे. त्याचप्रमाणे तांबोळा येथील ब्रिटीश कालिन बंधाऱ्यातून सुमारे 5 हजार 260 घनमीटर गाळ काढून बंधाऱ्याचे खोलीकरण लोकसहभागातून करण्यात आले. हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांनी वाहून नेला त्यामुळे सुमारे 75 हेक्टर शेतजमीन सुपीक झाली आहे.

जलयुक्त अभियानांतर्गत झालेल्या कामामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळाल्यामुळे शेतीमालात दुप्पटीने वाढ झाली साहजिकच त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे जास्तीचे मिळाले. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हे अभियान संजीवनी ठरले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या गावामध्ये कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून 2 शेततळे, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 6 शेततळे, मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 12 असे एकूण 20 शेततळे तयार करण्यात आली आहे. या वर्षाच्या चांगल्या पर्जन्यमानामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावामध्ये बागायती क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी मुबलक पाणी मिळत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामात चाळीसगाव तालुक्याने आघाडी घेतली असून जळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला असल्याची माहिती श्री.राजपूत यांनी दिली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून जलसिंचन क्रांती घडून येणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांच्या मनात निर्माण करण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे. पाणी टंचाई आणि दुष्काळ या प्रश्नांना कायमची मुठमाती देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त ठरणार असून त्यामुळे संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम होणार यात शंका नाही. पहिल्या टप्प्यात पूर्ण केलेल्या कामाचे यश विहिरी, नद्या, नाले, बंधाऱ्यामध्ये निर्माण झालेल्या जलसाठ्याद्वारे दिसू लागले आहे. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या चांगल्या यशामुळे दुसऱ्या टप्प्यात सुरु होणाऱ्या कामांना ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

लेखक - निलेश किसन परदेशी
चाळीसगाव जि.जळगाव

स्त्रोत - महान्युज

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate