অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ

जळगावच्या केळी निर्यातीला लाभली कोल्हापूरची साथ

जळगाव जिल्हा हा केळी उत्पादन करणारा जिल्हा म्हणून राज्यात लौकीक असून येथील केळीचा रंग आकार आणि चव पाहता येथील केळी ही निर्यातक्षम असल्याचे नेहमीच म्हटले जाते. या केळीच्या निर्यातीला आता कोल्हापूरकरांची साथ लाभल्याने ही जळगावची केळी आता निर्यात होऊ लागली आहेत. त्यामुळे जळगावच्या केळी उत्पादकात समाधानाची भावना आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे पन्नास हजार हेक्टरमध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. रावेर यावल, चोपडा हे तालुके प्रामुख्याने केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. यात भर म्हणून जळगावच्या जैन इरिगेशच्या माध्यमातून टिश्यू कल्चर प्रणालीची केळीची रोपे केळी उत्पादकांना सहज उपलब्ध होत असल्याने जिल्ह्यातील केळी उत्पादनात भरच पडली आहे. हा केळी उत्पादक जिल्हा असला तरी केळी निर्यातीचे प्रयत्न यापूर्वी फारसे यशस्वी झाले नव्हते.

यामुळे केळी उत्पादकात काहीशी नाराजी होती. या पार्श्वभमीवर कोल्हापूरच्या संजीवनी ॲग्रो या शेतकरी सदस्य असलेल्या सोसायटीने जळगाव जिल्ह्यात येऊन केवळ सहा महिन्यात 120 कंटेनर केळी ही विविध देशात यशस्वीरित्या निर्यात करत जळगावच्या शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहेत. जळगावच्या केळीला निर्यातीसाठी मिळत असलेला प्रतिसाद पाहता आता कोल्हापूरकर रावेर तालुक्यात तांदलवाडी जवळ केळी प्रक्रिया केंद्र उभारत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील 108 शेतकरी सदस्य असलेली संजीवनी ॲग्रो ही संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने केळी व अन्य पिकांबाबत काम करते. तेथील केळीची निर्यात देखील ही संस्था करत असते. या संस्थेचे कार्यकारी संचालक बाबासाहेब आडमुठे यांना जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी पिकवत असतांना जळगावहून केळी का निर्यात होत नाही याचे नवल सतत वाटत होते. त्यांनी या संस्थेचे एक संचालक प्रमोद चौगुले यांना जळगाव जिल्हयात जाऊन तेथील केळी निर्यात का होत नाही, या बाबत अभ्यास करण्यास सांगितले.

प्रमोद चौगुले यांनी जळगाव जिल्हयात येऊन विविध केळी बागात फिरून, उत्पादकांना भेटून या बाबत सखोल निरीक्षण करीत अभ्यास केला. जळगावहून यापूर्वी चार वेळा केळी निर्यातीच प्रयोग झाला. मात्र ती केळी डाग पडल्याने नाकारली गेली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. केळीला डाग का पडतात याचा शोध घेता केळीची बागेत तोड केल्यानंतर ट्रॅक्टरच्या माध्यमातून अन्यत्र नेली जाऊन नंतर इतरत्र पॅकींग केले जात असल्याचे लक्षात आले. केळीची ही वाहतूक करतांना केळी घासली जातात त्यामुळे डाग पडतात तसेच खोडाला लागलेले सर्व केळीचे घड राहू दिले जात असल्याचे त्यांना दिसून आले.

प्रमोद चौगुले यांनी जळगावच्या केळी उत्पादकांना विश्वसात घेऊन कोल्हापूर ॲग्रो या आपल्या संस्थेमार्फत केळी निर्यातीची तयारी दर्शवली. केळीची रकम देखील तोड होताच देऊन करत त्यांनी विश्वास संपादन केला. नंतर तांदलवाडी परिसरात टिश्यूकल्चर असलेली केळीची बाग निवडली. बागेत खोडाला लागलेल्या घडांपैकी वर असलेले आठ ते नऊ घड ठेवून खालचे घड कापून टाकले. तयार केळी बागेत कापल्यानंतर तेथेच बागेत पॅकींग केले. आणि केळी निर्यातीसाठी मुंबईला पाठवून दिल. 12 एप्रिल पासून सप्टेंबर पर्यंत 120 कंटेनर इराण इराक, दुबई, मलेशिया, फ्रान्स आदी देशात रवाना केले गेले असून एकही कंटेनर रिजेक्ट झालेला नसल्याचे प्रमोद चौगुले यांनी बोलतांना सांगितले. यामुळे आता रावेर तालुक्यातील तांदलवाडी परिसरातील शेतकऱ्यात या कामाबाबत कोल्हापूरच्या संस्थेबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे.

या विश्वासातून गेल्या वर्षी तांदलवाडी परिसरात 5 लाख 82 हजार केळीची खोडे लावली गेली होती तर यंदा तब्ब्ल 11 लाख खोडे लावली गेल्याचे आणि बागेत केळी कापली गेल्यानंतर लगेच दोन दिवसात पैसे मिळत असल्याने केळी उत्पादक समाधानी असल्याचे प्रमोद चौगुले यांनी सांगितले. जळगाव जिल्हयातील शेतकरी हा अत्यंत मेहनती, प्रयोगशील असल्याचे आपल्याला जाणवले असल्याचे चौगुले सांगतात. तांदलवाडी परिसरातून केळी निर्यातीसाठी तांदलवाडीचे माजी आमदार राजाराम गणु महाजन यांचे मोलाचे सहाय्य मिळत असल्याचे प्रमोद चौगुले यांनी स्पष्ट करत यंदा 500 कंटेनर केळी निर्यातीचा मानस बोलून दाखवला.

जळगावची केळी परदेशात रवाना होत असतांना होत असलेल्या येथील शेतकऱ्यांना पूर्वी झालेल्या चुका दाखवल्या गेल्याने यातून केळी उत्पादकांचा फायदा झालेला आहे. आता कोल्हापूरचे प्रमोद चौगुले हे आपल्या सोबत तीन भागीदारांना घेऊन एकदंत ॲग्रो नावाने तांदलवाडी परिसरातील गाते शिवारात एकात्मिक शीतसाखळी या घटकांतर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र, पूर्व शीतकरणगृह आणि एकात्मिक पॅकींग हाऊस उभारत केळी प्रक्रिया केंद्र सुरू करत आहेत. यातून केळी उत्पादकांना मोठा लाभ होईल असा विश्वास ते व्यक्त करतात. विशेष म्हणजे केळी खराब होणार असतील तर त्याचे चिप्स बनवण्याचा उद्योग सुरू करणार असून प्रतिदिन 2 टन चिप्स बनवली जाईल, असे चौगुले यांनी सांगितले. सहकार्याची भावना मनात असली तर कोल्हापूरची संस्था जळगावला धावून जाते यापेक्षा आणखी चांगले दुसरे उदाहरण देता येणार नाही.

लेखक - विजय पाठक
जेष्ठ पत्रकार जळगाव
९३७३३६७३७४

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 6/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate