অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्रकड्रायव्हर यशस्वी शेतकरी

ट्रकड्रायव्हर यशस्वी शेतकरी

जिद्द, चिकाटी, मेहनत व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. लातूर जिल्ह्यातील कोळपे येथील सोमनाथ मल्लिकार्जुन अंबेकर पूर्वी ट्रकड्रायव्हर होते. आज मात्र ते यशस्वी शेतकरी म्हणून परिसरात ओळखले जातात. भाजीपाला पिकांना मुख्य पिके बनवीत त्यांनी आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला आहे. 
लातूर जिल्ह्यातील कोळपे येथील सोमनाथ मल्लिकार्जुन अंबेकर यांची यशकथा प्रेरणादायी आहे. त्यांची सुमारे दोन हेक्‍टर 30 गुंठे शेती आहे.

सोमनाथ यांचे आई-वडील त्यात पारंपरिक पिके घ्यायचे. त्यातून त्यांनी घर सांभाळले. मुलांना मोठे केले. जिरायती शेतीत मर्यादा होत्या. चार पैसे कधी शिल्लक राहिले नाहीत. उदरनिर्वाहाची सोय झाली की देवाचे आभार मानायचे. मोठा मुलगा सोमनाथ दहावी पास झाला. पुढे महाविद्यालयात अकरावीची फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे घरची जनावरे घेऊन ती चरायला घेऊन जाणे व शेतात वडिलांना मदत करणे, ही कामे सोमनाथ करू लागले.

ट्रक ड्रायव्हरची कारकीर्द

सन 1990 मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी एक घटना घडली. लातूर-नांदेड रोडवर अंबेकर यांच्या शेताजवळच्या रस्त्यावर भाजीपाला वाहतूक करणारा ट्रक पंक्‍चर झाला. ड्रायव्हरने पंक्‍चर काढण्यासाठी शेजारी गुरं राखणाऱ्या मुलांना मदतीला बोलावले. त्यात सोमनाथही होता. त्या वेळी तो गृहस्थ सहज म्हणाला, "गुरं कशाला राखता? माझ्याकडे नोकरी करता का? पुढं ड्रायव्हरही व्हाल.' परिस्थितीला कंटाळलेला सोमनाथ क्‍लिनर म्हणून काम करायला तयार झाला. पुणे जिल्ह्यात कुंजीरवाडी येथे त्याची नोकरी सुरू झाली.
हरहुन्नरी सोमनाथ काही कालावधीतच ट्रक चालवायला शिकला. मधल्या काळात आईवडिलांना जमेल तशी आर्थिक मदत करीत होता. भावालाही दहावीपर्यंत शिक्षणासाठी मदत केली. पुढे सोमनाथ यांचे लग्न झाले. मात्र 2005 च्या सुमारास वडिलांचे निधन झाले. त्या वेळी नोकरी सोडून गावी यावे लागले. घरी आल्यावर बहिणीचे लग्न केले. आता कौटुंबिक जबाबदारीसोबत शेतीचीही जबाबदारी अंगावर होती. सोमनाथ यांनी त्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरवात केली.

शेतीत प्रगतीकडे वाटचाल

अनेक वर्षे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केले होते. आता पूर्ण वेळ शेतकरी होणे गरजेचे होते. त्या दृष्टीने सोमनाथ यांनी शेतात पाण्याची सोय करण्याला प्राधान्य दिले. ट्रकमालकांनी शेतात बोअर घेण्यासाठी दोन लाख रुपयांची मदत केली. पाणी बरे लागले. सुरवातीला सोयाबीन, तूर आदी पारंपरिक पिके घेतली.

आता शेतीत पुढे जाणे गरजेचे होते. शेतीतील अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घेण्यास सुरवात केली.
त्यातून सन 2008 च्या सुमारास टोमॅटो पीक घेतले. त्या वेळी प्रतिकूल हवामानामुळे पिकाची स्थिती अनेक ठिकाणी प्रतिकूल होती. आवक घटली होती. त्यामुळे किलोला 40 रुपयांपर्यंत दर टोमॅटोला मिळाले.

सोमनाथ यांना हा हंगाम अतिशय फायदेशीर ठरला. सुमारे आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळाले.
या प्रयोगातून त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. हळूहळू काकडी, कलिंगड, खरबूज आदी पिकांचे प्रयोग त्यांनी सुरू केले. आणि आज हीच त्यांची प्रमुख पिके झाली आहेत.

सोमनाथ यांची आपल्या भावासोबत संयुक्त शेती आहे. भाऊ, भावजय व आपल्या पत्नीसह ते शेतात राबतात. पूर्वी "ड्रायव्हर' व्यवसायात हैदराबाद, केरळ, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश भागात फिरताना काही भाजीपाला व्यापारी, ड्रायव्हर यांच्या ओळखी झाल्या. त्यातून स्वतःच्या भाजीपाला विक्रीसाठी मदत होऊ लागली. गाव परिसरातील भाजीपाला शेतकऱ्यांच्या विशेषतः टोमॅटो उत्पादकांच्या गटशेतीत ते सामील झाले. आता काही समस्यांमुळे ही गटशेती थांबवावी लागली आहे.

असे असते पिकांचे नियोजन

सोमनाथ यांचे पीकनिहाय थोडक्‍यात नियोजन सांगायचे, तर टोमॅटो पीक उन्हाळी व पावसाळी असे दोन हंगामांत घेतले जाते. वर्षभरातील बहुतांश काळ या पिकाचा प्लॉट सुरू असतो. गावरान टोमॅटो पिकाचे एकरी 25 ते 30 टन, तर संकरित टोमॅटोचे त्यांनी 40 ते 50 टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे. मागील वर्षी त्यांना दीड एकरात या पिकापासून साडेआठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. अर्थात दर वर्षी एवढेच उत्पन्न मिळेल असे नाही. अनेक वेळा दर घसरतात. हाती काहीच लागत नाही.
मात्र वर्षभर सतत टोमॅटो असल्याने, एखादा हंगाम नुकसानीत गेला तरी दुसऱ्या हंगामात फायदा होऊ शकतो. काकडी सुमारे दीड एकरांवर असते. त्यातून एका एकरात एक लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळतो. हंगामानुसार किलोला 10 ते 20, 25 रुपये दर मिळतो. सन 2012 मध्ये त्यांनी कलिंगडाचे एकरी 22 टनांपर्यंत उत्पादन घेतले होते. यंदाच्या गारपिटीचा तडाखा सोमनाथ यांना सोसावा लागला. टोमॅटो, काकडी व कलिंगडाचे सुमारे पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. नागपूर, नांदेड, पुणे आदी मार्केटला माल पाठवला जातो.

वेगवेगळ्या मार्केटला माल पाठवताना विक्रीतील बारकावे लक्षात येऊ लागले. मधल्या काळात गटशेती सक्रिय असताना स्वतःच्या तसेच सदस्य शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी रोपवाटिकाही सुरू केली. शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढवताना बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या स्थानिक शाखेचे व्यवस्थापक सुधीर कुलकर्णी यांनी सोमनाथ यांची धडपड पाहून त्यांना सुमारे वीस लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले.

आता या साऱ्या कर्जाची परतफेड करणे सोमनाथ यांना शक्‍य झाले आहे. त्यांच्याकडे आज 22 कायमस्वरूपी मजूर आहेत. एक काळ असा होता, की अकरावीसाठी फी भरायला पाचशे रुपये नव्हते, त्यामुळे गुरे राखावी लागली होती. ट्रकक्‍लिनर व्हावे लागले होते. गावात कुणी किराणा उधार देत नव्हते. शेती व रोपवाटिका व्यवसाय यातून सोमनाथ यांनी स्वतःच्या हिमतीवर ही परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आज ते चारचाकी गाडीतून फिरतात. त्यांची मुले चांगल्या शाळेत शिकतात. शेतात टुमदार घर व गावात स्लॅबचे घर बांधले. संरक्षित पाण्यासाठी त्यांनी मोठे शेततळेही घेतले आहे. एकहजार चौरस फुटांचे पॅकहाऊस घेतले आहे. दहावी पास ट्रकड्रायव्हर ते एक यशस्वी शेतकरी हा त्यांचा प्रवास निश्‍चितच प्रेरणादायी आहे. मेहनत करण्याची वृत्ती, चिकाटी व अभ्यासाची तयारी असल्यास यश तुमच्यासोबत चालत असते, हे त्यांच्या उदाहरणावरून दिसून येते. शेती यशस्वी करायची असेल, तर पूर्ण वेळ त्यासाठी देण्याची तयारी पाहिजे, असे ते म्हणतात.

संपर्क- सोमनाथ अंबेकर- 9420435899
(लेखक लातूर जिल्हा कृषी विभागांतर्गत कृषी पर्यवेक्षक आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate