অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॉलिहाऊसचे गाव - हमीदपूर

शेतऱ्यांनीक साधला पीकबदल,पिकवताहेत रंगीत ढोबळी मिरची

 

 

नगर तालुक्‍यातील हमीदपूर तसे दुष्काळी गाव. पारंपरिक पिकांवर भर; पण बदलता काळ व शेती यांचा वेध घेत येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पॉलिहाऊस शेतीतून पीकबदल साधला असून, हायटेक शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. "रंगीत ढोबळी मिरचीचे हमीदपूर' अशी गावाची परिसरात ओळख निर्माण होऊ लागली आहे. जवळपासच्या गावांनाही पॉलिहाऊस उभारणीची प्रेरणा मिळाली आहे. 

नगर-कल्याण रस्त्यावर नगरपासून सुमारे दहा-बारा किलोमीटरवर हमीदपूर आहे. या भागात पावसाचे प्रमाण अल्प असल्याने कायम दुष्काळी स्थिती असते. येथील गावकऱ्यांची रोजगारासाठी भटकंतीही कायम असते. पावसावर व अल्प पाण्यावर अवलंबून असलेली ज्वारी, बाजरी, हरभरा अशी येथील पारंपरिक पिके. बदलत्या काळाची व शेतीची गरज लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने गेल्या वर्षी ऋषिकेश व जयकिसान अशा दोन शेतकरी गटांची स्थापना केली. पारंपरिक पिकांतून फारसे काही हाती लागत नाही असे लक्षात येताच नव्या प्रयोगांचा, तंत्रज्ञानाचा शोध सुरू केला. 

"होमवर्क' महत्त्वाचे ठरले

दरम्यान, हमीदपूरच्या शेतकरी गटातील सुमारे 40 सदस्यांनी अभ्यास सहलीत खंडाळा (ता. नगर) येथील मदन चौधरी यांच्या पॉलिहाऊसला भेट देऊन रंगीत ढोबळीचा प्रयोग पाहिला. तेथेच या प्रयोगाची प्रेरणा मिळाली. 
प्रयोगाचे अर्थशास्त्र, मार्केट यांचा सविस्तर अभ्यास केला. त्यातून हे पीक घेण्याचे नक्की झाले. त्यानंतर बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्रात या पीक पद्धतीचे पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. तळेगाव दाभाडे येथील प्रशिक्षण केंद्रातूनही प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. पॉलिहाऊस उभारणी, ढोबळी मिरची लागवडीला आवश्‍यक पोषक जमीन, पिकाचे व्यवस्थापन आदी सर्व बाबींचा अभ्यास त्यातून झाला. 
तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, पर्यवेक्षक एस. डी. चाफे, कृषी सहायक कैलास पवार यांचेही सातत्याने मार्गदर्शन झाले. 

रंगीत ढोबळी मिरचीची लागवड

पॉलिहाऊसची उभारणी करून "एकमेकां साह्य करू' या उक्तीप्रमाणे जयकिसान गटातील चार, तर ऋषिकेश गटातील दोन शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्येकी 10 गुंठ्यांत संकरित व दोन रंगांतील लाल व पिवळ्या अशा ढोबळी मिरचीची व गुलाबाची लागवड करीत पीकबदल साधला. पॉलिहाऊस उभारणीसाठी आदर्श गाव हिवरेबाजार येथील राष्ट्रीयकृत बॅंकेने कर्ज दिले. शेतजमीन काळी असल्याने सुरवातीला दीड लाख रुपये खर्च करून लाल माती टाकली. तीन बाय दीड फुटाचे बेड करून एप्रिल 2013 मध्ये लागवड केली. एप्रिल-मे या उन्हाळ्याच्या काळात पाणी कमी पडल्याने मिरची जगेल की नाही, याची चिंता सतावू लागली. तरीही हार न मानता सुमारे दोन ते तीन महिने टॅंकरच्या पाण्यावर मिरची जगवली.

व्यवस्थापन

मिरचीची व गुलाब लागवडीआधी प्रति दहा गुंठ्यांत दहा ट्रॅक्‍टर शेणखताचा वापर झाला. निंबोळी पेंड, डीएपी या खतांच्या वापरासोबत फॉर्मेलिनचा वापर माती निर्जंतुक करण्यासाठी झाला. कोळी, फुलकिडी, पांढरी माशी या किडी, तर करपासारख्या रोगांचा धोका ओळखून प्रतिबंधक फवारण्यांवर भर दिला. आवश्‍यकतेनुसार शेंडा वाढ, फळवाढीसाठी ठिबक सिंचनातून खतांचे डोस दिले. दर चार दिवसाला पिकाची गरज ओळखून पाणी दिले. उन्हाळ्यात गंभीर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने पावसाळ्यात पॉलिहाऊसच्या छतावर पडणारे पाणी वाया जाऊ न देता ते साठवण्यासाठी पॉलिहाऊसशेजारीच छोटेसे शेततळे केले. ते गरजेनुसार वापरात आणले.

पुणे-मुंबईला पाठवली ढोबळी मिरची

तोडणी हंगाम सुरू झाला तसे शेतकरी अधिक सक्रिय झाले. दर चार ते पाच दिवसांनी एकाच दिवशी सर्वांची तोडणी होईल असे नियोजन केले. सध्या प्रतवारी करून एकाच वाहनातून रंगीत ढोबळी मिरची गुलटेकडी (पुणे) व वाशी, दादर (मुंबई) येथे विक्रीस नेली जात आहे. मुंबई मार्केटला पुण्याच्या तुलनेत थोडा दर जास्त मिळत आहे. आतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याकडील सुमारे चार टन मिरचीची विक्री झाली आहे. दर प्रति किलो 35 रुपयांपासून ते 65, 70, 80 रुपये व गणेश उत्सवात कमाल 130 रुपये दर मुंबई मार्केटला मिळाला. आतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला 10 गुंठ्यांत तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. त्यासाठी एक लाख रूपयांपर्यंत उत्पादन खर्च आला. पॉलिहाऊस उभारणी, नेट, माती, ठिबक आदी फौंडेशन खर्च सुमारे दहा लाख रुपये आला. गुलाबाला नगरला चांगला बाजार व मागणी असल्याने तेथेच विक्री करणे पसंत केले. प्रति फूल साधारण तीन रुपये दर मिळाला.

"एकमेकां साह्य करू'

पॉलिहाऊस उभारणीसाठीचे काम तळेगाव येथील कंत्राटदाराला दिले. बेड तयार करण्यापासून लागवड व अन्य कामांसाठी बाहेरचे मजूर न लावता गटातील सर्व शेतकऱ्यांनी एकमेकांना मदत केली. प्रत्येक घरातील महिला सदस्याने पुरुषांच्या बरोबरीने काम करत सामूहिक शेतीचा आनंद घेतला. मिरची तोडणीपासून प्रतवारी, क्रेट भरण्याचे कामही एकत्रित येऊन सुलभ झाले.

मान्यवरांकडून प्रशंसा

राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे प्रधान सचिव (कृषी) सुधीरकुमार गोयल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, नगरचे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, "आत्मा'चे प्रकल्प संचालक शिवाजी आमले, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर आदींनी हमीदपूरच्या पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांच्या प्रयत्नांची व प्रयोगाची दखल घेऊन त्यांचे कौतुक केले आहे.

हमीदपूरचे रंगीत ढोबळी मिरची उत्पादक असे-

  • संदीप भास्कर कांडेकर
  • संजय कांडेकर
  • राजेंद्र कांडेकर
  • किशोर खेसे
  • संजय कांडेकर
  • राधाकिसन पानसरे
  • आशाबाई कांडेकर
  • गुलाब उत्पादक
  • बापू कांडेकर
  • संतोष कांडेकर

शेतकरी गटाने केला रस्ता

हमीदपूर गावातील पॉलिहाऊस प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील भागातून शेतकरी येऊ लागले; पण रस्ता नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. यामुळे शेतकरी गटाने दीड ते दोन लाख रुपये खर्च करून अर्धा किलोमीटरचा रस्ता तयार केला. त्या कामात श्रमदानही केले.
फोटो ओळी 

संपर्क 
- संजय कांडेकर - 9763031379 
सचिव, जयकिसान शेतकरी गट 
- बापू कांडेकर- 9423427617 
सचिव, ऋषिकेश शेतकरी गट

लेखक : सूर्यकांत नेटके

माहिती संदर्भ : - अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate