অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा

जोंधळखिंडीच्या तरूणाने पॉलिहाऊसमधून मिळवला लाखोंचा फायदा

सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी हा भाग तसा दुष्काळीच. पावसाची अनिश्चितता नेहमीचीच. अशा दुष्काळी भागात एका तेजस्वी युवकाने इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे. नोकरीच्या मागे न लागता काळ्या आईची सेवा करण्याचा निर्णय घेऊन केवळ दोन ते तीन वर्षांत विचारपूर्वक नियोजन केल्याने लाखोंचा फायदा मिळवला. तेजोमय घाडगे हे त्या युवकाचे नाव. खानापूर तालुक्यातील जोंधळखिंडी येथून सुरू झालेला हा प्रवास आता परराज्यात पोहोचला आहे.

तेजोमय घाडगे यांचे शिक्षण शेती अभ्यासक्रमाची पदवी आणि त्यानंतर एम.बी.ए. असे आहे. त्यांचे नोकरीत मन रमले नाही. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळाले आणि तोच त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरला. तेजोमय घाडगे यांनी पॉलिहाऊसची हायटेक शेती सुरू केली. त्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाकडून 50 टक्क्यांप्रमाणे 4 लाख 72 हजार रुपयांचं अनुदान त्यांना मिळाले.

2015 साली तेजोमय घाडगे यांनी 10 गुंठ्यामध्ये त्यांचे पहिले पॉलीहाऊस उभे केले. त्यासाठी जवळपास 13 लाख रुपये खर्च आला. यामध्ये ठिबक सिंचन, खते, औषधे, माती, शेणखत, पाण्याची टाकी या सगळ्या खर्चांचा समावेश आहे. त्यानंतर त्यांनी या हरितगृहामध्ये रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. त्यानंतर शेतातील बोअरवेलच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन, 10 गुंठे क्षेत्रात आणखी 2 पॉलीहाऊस सुरू केले. त्यात भर म्हणून 20 गुंठ्यामध्ये एक शेडनेट हाऊसही उभारले आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यामुळे घाडगे यांना वार्षिक 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.

याबाबत तेजोमय घाडगे म्हणाले, सुरुवातीलाच बसलेल्या आर्थिक फटक्याने मला थोडी निराशा आली. मात्र, खचून न जाता मी नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला. पॉलीहाऊस उभारणी आधी मी माळावर गाळाची माती, चांगले कुजलेले शेणखत, भाताचे तूस आणि जैविक खतांचे योग्य मिश्रण टाकले. या 3 पॉलिहाऊसला एकूण 15 हजार लिटर पाणी लागते. मात्र, चोख व्यवस्थापन केले आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या मदतीचा हातभारही माझ्यासाठी मोलाचा ठरला. सध्या माझे वडील गौतम घाडगे हे शेती पहात आहेत आणी मी स्वत: विक्रीचे नियोजन करीत आहे.

तेजोमय घाडगे हे आता फुल पिके आणि परदेशी भाजीपाल्याचे उत्पादनही घेत आहेत. त्यातून चांगला नफा कमावत आहेत. त्याचबरोबर आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान रुजवत आहेत.

जोंधळखिंडीपासून सुरू झालेला हा प्रवास आज तेजग्रो इंडिया प्रा.लि. कंपनीपर्यंत स्थिरावला आहे. या कंपनीच्या माध्यमातून तेजोमय अनेक शेतकऱ्यांना पॉलिहाऊस उभारण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. घाडगे यांना जागर बळीराजाचा शेती सन्मान पुरस्कारासह अन्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एकूणच निसर्गाच्या लहरीपणाचे आव्हान स्वीकारून जिद्दीने काम करणाऱ्या या तेजोमय घाडगे यांच्याकडून इतरांना निश्चितच प्रेरणा मिळत आहे.

- संप्रदा द. बीडकर

माहिती स्रोत: महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate