অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड

ज्योतीच्या कार्याने पसरला संपन्नतेचा उजेड

उंबरठ्या बाहेरच जग जगणाऱ्या ज्योती नाकाडे या युवतीने पुरुषांची मक्‍तेदारी असलेल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. दुचाकीने तालुक्‍याच्या ठिकाणी दूध पोहचविण्यासोबतच ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून शेतीची मशागत व इतर कामेही ती लिलया पार पाडते. शहरात बाईक चालविणाऱ्या मुली पाहताना नवल वाटणार नाही परंतू गावात आजही मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला नाही. त्यामुळेच तिचे हे काम अनेकांसाठी भुवया उंचावणारे ठरले. कुटूंबाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे मात्र ज्योतीने टिकांकडे दुर्लक्ष करीत आपले काम चालविले आहे.

ज्योतीचे वेगळे विश्‍व...

सावनेर (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथील प्रभाकर नाकाडे यांना पाचही मुली. त्यातील दोन मुलींचे लग्न झाले आहेत. कुटूंबाची केवळ तीन एकर शेती. त्यातून भविष्यातील गरजांकरिता पैसा उभा राहणार नाही, याची जाणीव प्रभाकर नाकाडे यांना झाली. त्याच जाणीवेतून त्यांनी शेतीपूरक दूग्ध व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता बडनेरा (जि. अमरावती) येथील गुरांच्या बाजारातून गावरान म्हशींची खरेदी करण्यात आली.

ज्योतीने उजळले घर...

प्रभाकर नाकाडे यांनाच शेती व शेतीपूरक व्यवसायाची कामे करावी लागत होती. दूधाळ जनावरांचे दूध काढण्यापासून ते नांदगाव खंडेश्‍वर येथे संकलन केंद्रावर पोहचविण्यापर्यंतच्या कामाचा त्यात समावेश होता. त्यांची मुलगी ज्योतीचे शाळेत असताना कबड्डी खेळात नैपुण्य होते. कबड्डी खेळासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. याच ज्योतीने वडीलांसह कुटूंबियांचे जीवनमान प्रकाशमान करण्यासाठी पुढाकार घेतला. वडील वृध्दापकाळाकडे झुकत असल्याने त्यांच्याकडून शारीरिक कामे होत नसल्याचे ज्योतीच्या लक्षात आले. त्यानंतर ज्योतीच्या वडीलांच्या शेतीकामात मदतीसाठी सरसावली. ज्योतीचे शिक्षण कला शाखेत झाले आहे. तिने वडिलांच्या या व्यवसायात मदत करणे सुरु केले. या कुटूंबियांकडे 12 गावरान दूधाळ म्हशी आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या दूधाची विक्री नांदगाव खंडेश्‍वर येथे तालुक्‍याच्या ठिकाणी होते. प्रभाकर नाकाडे यांना दुचाकी चालविता येत नाही. परिणामी दूध पोचते करण्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतू त्यांची मुलगी ज्योती हिने कोणाच्याही मदतीशिवाय दुचाकी चालविणे शिकत नांदगावला दूध पोचविणे सुरु केले. वडिलांनी देखील तिच्या या कार्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे तिचा हुरूप आणि उत्साह वाढतच गेला. गत 2 वर्षांपासून तिचे या कार्यात सातत्य आहे. त्यांच्याकडील 12 म्हशींपासून सरासरी 96 लिटर दूध संकलीत होते. 50 रुपये प्रती लिटर दराने त्याची विक्री केली जात असल्याचे ज्योतीने सांगितले. सुरवातीला या दूधाची विक्री शासकीय दूध संकलन केंद्राला होत होती. परंतू त्या ठिकाणी अपेक्षित दर मिळत नसल्याने आता घरोघरी जाऊन दूध विक्रीवर भर दिला असल्याचे ज्योतीने सांगितले.

ट्रॅक्‍टर चालविण्यात हातखंडा

ज्योतीची दिनचर्या पहाटेच सुरु होते. वडीलांकडून जनावरे तसेच उघड्यावरील गोठ्याची स्वच्छता झाल्यानंतर ज्योती दूधाळ जनावरांचे दूध काढते. त्यानंतर पहाटे सहा वाजताच ती दुचाकीला कॅन लटकवित नांदगावकडे रवाना होते. काकांकडून तिने ट्रॅक्‍टर चालविण्याचे कौशल्य प्राप्त केले. आज घरच्या ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून शेती मशागतीचे काम ती हंगामात करते. त्यासोबतच शेतीच्या इतर कामात तिची सचोटी आहे. त्यामुळे मजुरांवरील खर्चात मोठी बचत झाली आहे. ज्योतीला ट्रॅक्‍टर चालविताना पाहून देखील गावातील अनेकजण थक्‍क झाले. शहरात मुली, महिलांनी बाईक चालविणे सर्वमान्य किंवा कौतुकाचा विषय नसला तरी ग्रामीण भागात मात्र आजही असे विषय चर्चेचे ठरतात. त्यामुळेच ज्योतीच्या सारख्या सर्वसामान्य घरातील या मुलीच्या असामान्य कर्तुत्वाची देखील चर्चा होऊ लागली. गावातील अनेकांनी तिची कौतुक केले तर तिच्या कुटूंबियांना तिचा अभिमान वाटतो. ज्योती ही आमची मुलगी नाही तर मुलगाच असल्याचे तिचे वडील प्रभाकर व आई कांताबाई सांगतात. घरातील मुलाची उणीव ज्योतीने भरुन काढली, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले. मुलींनी आज अनेक क्षेत्रात अटकेपार झेंडे गाडले आहेत. त्यामुळे ज्योती करीत असलेल्या कामाला आम्ही देखील समर्थन करण्याचा निर्णय घेतला. असे निर्णय गावस्तरावर घेताना आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, समाजातील कथीत धुरीणांच्या टिकेला देखील सामोरे जावे लागते. आम्ही त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच आज ज्योती हा धाडसी बाणा अंगी भिनवू शकली, याचा आम्हाला अभिमान असल्याचे ही तिच्या पालकांनी सांगितले.

 

ज्योती नाकाडे
9158945205

शब्दांकन : चैताली बाळू नानोटे,
निंभारा, पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

स्त्रोत - महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate