অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झिरो बजेट नैसर्गिक शेती

झिरो बजेट नैसर्गिक शेती

ऑगस्ट 2014 हे वर्ष माझ्यासाठी एक अविस्मरणीय वर्ष. या वर्षी मला कृषीॠषी आ.सुभाष पाळेकर गुरूजींच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती आंदोलनाची माहिती मिळाली. मी 2014 पूर्वी,जवळपास सहा वर्षापासून शेंद्रीय पद्धतीने आमची वडलोपार्जित 10 एक्कर शेती करत होतो. रासायनिक शेतीचे घातक परिणाम. त्यामुळे जीव,जमीन,पाणी, हवा यात होणारे प्रदुषण याची पुसटशी कल्पना आम्हाला आली होती, म्हणूनचं आम्ही शेंद्रीय शेतीकडे वळलो होतो. पण 2014 साली कृषीॠषी आ. सुभाष पाळेकर यांच्या कार्याची माहिती मिळाली. एक देशी गाय सांभाळून, साधारणपणे 30 एक्कर शेती कुठलेही खत, किटकनाशक न वापरता करता येते. शेतीत पिकवलेले सर्व अन्नधान्य हे शंभर टक्के विषमुक्त व पौष्टिक असते.
दरवर्षी मिळणार्‍या पिकाच्या उत्पादनात कुठल्याही प्रकारची घट होत नाही. पाळेकरांच्या या शेतीपद्धतीमुळे पर्यावरणाचे कुठलेही नुकसान होत नाही. आज मानव निर्मित सर्व पर्यावरण विषयक  समस्यांवर ही शेती म्हणजे राबबाण उपाय आहे. अशी अनेक प्रकारची माहिती मला झिरो बजेट नैसर्गिक शेती बद्ल मिळाली होती.. गेल्या सहा-सात वर्षापासून मी सेंद्रीय शेती करत होतो. पण मला शेतीत म्हणावा तसा फायदा तर मिळतचं नव्हता. उलट यात दिवसेेंदिवस माझे अर्थिक नुकसान होत आहे. हे, माझा अनुभव व हिशेबाच्या वहित मांडलेले आकडे सांगत होते.
परिणामी जेंव्हा पाळेकरांच्या एका गायीच्या शेती विषयी ऐकले, तेंव्हा हे तंत्रज्ञान जाणून घ्यायची प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली. आणि 20 ऑगस्ट 2014 रोजी ही संधी मला मिळाली. पुण्यधाम आश्रम, पिसोली,पुणे कृषीॠषी आदरणीय सुभाष पाळेकर सरांचे ‘झिरो बजेट  नैसर्गिक शेतीचे’ नऊ दिवसीय शिबीर आहे, हे कळले. या शिबीराचे आयोजन प्रख्यात शास्त्रज्ञ विजय भटकर यांनी केले होते. मी व माझे वडिल सु.मा. कुलकर्णी दोघांनी ताबडतोब हे शिबीरात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्यात,विदर्भात हजारो शेतकरी आत्महत्या करत होते. शेतीवरील प्रचंड खर्च, त्यातून होणारे प्रचंड कर्ज हे या आत्महत्यामागील एक विदारक वास्तव आहे. हे आम्हाला शेती करताना जाणवले होते. शेती ही शून्य खर्चाची झाली तर नक्कीच शेतकरी जीव वाचू शकेल. तो कर्जमुक्त होऊ शकले. त्यासाठी पाळेकर गुरूजी सांगत असलेली ‘शून्य खर्चाची नैसर्गिक शेती’ हा मार्ग असू शकेल, असे वाटत होते.
20 मार्च रोजी शिबीराचे उद्घाटन झाले तेंव्हा मी पहिल्यांदा कृषीॠषी सुभाष पाळेकरांना पाहात होतो. सर्व साधारण शेतकरी दिसतात तसेच पाळेकर सरांचे व्यक्तिमत्व, अंगात खादीचा कुर्ता, पैजामा असा कार्यकर्त्याला साजेशा पोशाख, कृश शरिरयष्टी,  डोळ्यात आणि चेहर्‍यावर ज्ञानाचे, आत्मविश्‍वासाचे तेज, वयाची 60 ओलांडलेला ही व्यक्ती म्हणजेचं कृषीॠषी सुभाष पाळेकर. यांनीचं शून्य खर्चाच्या नैसर्गिक शेतीचे तत्वज्ञान मांडले आहे. हे तंत्रज्ञान किती खरे, किती फसवे या बद्दल अनेक शंका होत्या.
उद्घाटनाचा कार्यक्रम संपला. स्टेज रिकामे झाले. खुर्च्या काढून तेथे एक फळा व एक खुर्ची ठेवण्यात आली. त्या मागोमाग पाळेकर गुरूजी स्टेजवर आले. त्यांनी बोलायला सुरवात केली आणि माझ्या सगट समारे बसलेल्या हजार-दोन हजार शेतकर्‍यांचे प्राण कानात एकवटल्या गेले.
पाळेकर गुरूजी सांगत होते, बिना पावसाची शेती होते का? जंगलातील झाडे का वाळत नाहीत? मराठवाड्यात दृष्काळ आहे, तेथील झिरो बजेट करणार्‍या शेतकर्‍यांच्या मोसंबी,संत्रीच्या बागा का वाळल्या नाहीत? देशातील सर्वांत जास्ती धरणे महाराष्ट्रात पण मग गावा गावात टँकर का? ऊसाला पाणी पाहिजे हे साफ खोटे आहे. दहा टक्के पाण्यात ऊस येतो. हा माझा अनुभव आहे. आमचे झिरो बजेट शेती करणारे शेतकरी फक्त दहा टक्के पाण्यावर ऊसाचे विक्रमी उत्त्पादन घेतात. मग महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या का करतो आहे? कुठे तरी शेतीचे नियोजन चुकत आहे. आज महाराष्ट्रातील ऊस उत्त्पादक शेतकरी रासायनिक पद्धतीने ऊस घेतो, तेंव्हा 100 टक्के पाणी वापरतो. तोच ऊस जर झिरोबजेट पद्धतीने घेतला तर 90 टक्के पाणी वाचते.  ते वाचणारे 90 टक्के पाणी उर्वरित दृष्काळग्रस्त महाराष्ट्राला देता येईल.
आमचे झिरो बजेटचे तंत्र देशातील लाखो शेतकरी आज वापरत आहेत. शून्य खर्च करून नैसर्गिक पद्धतीने भघोस उत्त्पन्न घेत आहेत. हे सगळे कसे शक्य होते. हेच आपण येत्या नऊ दिवसात समजून घेणार आहोत. सकाळी 9 वाजता मी शिबीराला सुरवात करील आणि रात्री 8, 9 दहा किंवा कधी अधिक वेळ हे शिबीर सुरू राहील. कारण हा विषयचं तसा आहे. तो समजला तर तुमचे जीवन बदलून जाईल. तुम्ही थकाल. पण मी थकणार नाही. ”
पाळेकर गुरूजींचे हे म्हणणे शंभर टक्के खरे होते. नऊ दिवस कसे गेले. ते कळले नाही. या नऊ दिवसात शेती या विषयाचे मला प्रचंड ज्ञान मिळाले. तरीही मन भरले नव्हते. हिच अवस्था या शिबीरास उपस्थित दिड-दोन हजार शेतकरी, आय.टी. इंजिनिअर , उपस्थित बुद्धिवंत यांची होती. सरांनी नऊ दिवस दिलेल्या ज्ञानाने, त्यांच्या अभ्यासाने, शेतीवरील संशोधनाने सर्वजन मंत्रमुग्ध झाले होते. अनेकांनी शेवटच्या दिवशी रासानिक शेती सोडून दिली होती आणि संपूर्ण पणे झिरो बजेट नैसर्गिक शेतीची कास धरली होती. तर अनेक सुशिक्षित,उच्च शिक्षित आय.टी इंजिनिअर, तरूण विद्यार्थी यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रचार-प्रसार करण्याचा दृढ संकल्प घेतला होता.
2016 मध्ये भारत सरकारने कृषीॠषी सुभाष पाळेकर सरांना पद्मश्री पुरस्कार देऊ सन्मानित केले आहे. या पुरस्कारा पूर्वी  विश्‍वस्तरीय ‘बसवश्री’ पुरस्काराने सरांचा गौरव करण्यात आला होता. सरांपूर्वी नेल्सन मंडेला,दलाई लामा, अण्णा हजारे, वंदना शिवा यांना हा पुरस्कार मिळाला आहे. या सर्व पुरस्कारांपेक्षा सरांना त्यांच्या लाखो चहात्या शेतकर्‍यांनी ‘कृषीॠषी’ ही पद्वी दिली आहे. लोकांनी पद्व्या दिल्याचे व त्या पद्वीने लोकांनी त्या व्यक्तीस संबोधलेले प्रसंग स्वातंत्र्यपूर्व इतिहासात अनेक पाहिला मिळतात. पण स्वातंत्र्योत्तर काळात असे प्रसंग क्वचितच दिसतात.
आज देशा-विदेशात 45 ते 50 लाख शेतकरी पाळेकर सरांनी सांगिलेली झिरो बजेट नैसर्गिक शेती करत आहेत. झिरो बजेट नैसर्गिक शेतीमुळे या शेतकर्‍यांचे जीवन तर बदलले आहेच. त्याचं बरोबर जीव, जमीन, पाणी, अन्न, हवा, हे घटक प्रदुषित होत होते, त्यात जे विष मिसळले जाते होते. ते मिसळले जाणे देखील काही प्रमाणात बंद झाले आहे.
बी.एस्सी.अ‍ॅग्री असलेल्या सुभाष पाळेकरांनी तरूणपणीचं अद्यसत्यग्रही विनोबा भावे यांच्याकडून प्रेरणा घेवून मोठ्या पगाराची सरकारी नौकरी न करता गावाकडे जावून स्वतःची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे वडिल, घरचे लोक नाराज झाले. वडिलांचा विरोध असताना, तो न जुमानता त्यांनी जमीनीचा एक तुकडा घेवून विद्यापीठात घेलेले ज्ञान प्रत्यक्षात कृतीत आण्यास सूरवात केली. पण विद्यापीठात दिलेले रासायनिक शेतीचे ज्ञान हे शाश्‍वत शेतीचा मार्ग दाखवणारे नाही, हे त्यांच्या लक्षात आले. काही वर्ष रासायनिक खते वापरल्यानंतर चांगले उत्पन्न आले, मात्र पाच-सहा वर्षानंतर हे उत्पन्न घटू लागले. जमीन नापिक होऊ लागली. यामुळे ते अस्वस्थ झाले. विद्यापीठात घेतलेले ज्ञान चूकीचे व खोटे ठरत होते. त्यांनी या समस्ये विषयी विद्यापीठातील त्यांच्या गुरूंना प्रश्‍न केला. त्यावर खताची मात्रा वाढवा हा पर्याय त्यांनी सांगितला. पण तो पर्याय त्यांच्या मनाला पटला नाही. यामुळे उत्पन्न तर तेवढेच येणार होते. पण उत्पादन खर्च मात्र वाढणार होता. त्याचं बरोबर जमीन प्रदुषित होऊन त्यातील जिव,जंतू मरणार होते.
अति रासायनिक खत वापरल्यामुळे पिकांना न लागणारे विषारी खत पाण्यात मिसळले जाणार आणि पाणी प्रदुषित करणार हे सारे त्यांच्या लक्षात आले. परिणामी शाश्‍वत शेतीसाठी रासायनिक शेती हा योग्य मार्ग नव्हे. त्यासाठी दुसरा पर्याय शोधला पाहिजे, आणि त्या दिवसापासून सुभाष पाळेकर यांचे प्रचंड संशोधनाचे कार्य सुरू झाले. भूक, तहान विसरूनते या कार्यात मग्न झाले. 1988 ते 1996 या कालावधीत त्यांनी प्रचंड संशोधन केले. त्यासाठी प्रसंगी शेती, पत्नीचे दागिने विकावे लागले, गहाण ठेवावे लागले. या त्यांच्या कार्यात त्यांच्या दिवंगत पत्नी स्व. चंदा पाळेकर या त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहील्या. समाज, नातलग, मित्रपरिवार यांनी त्यांना वेडे ठरवले. पण पाळेकरांनी या कशाचीही परवा केली नाही. शेवटी त्याच्या प्रयत्नाला यश आले. शाश्‍वत व आत्महत्यामुक्त अशा ‘झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा’ मार्ग त्यांना मिळाला.
गेल्या 20-30 वर्षापासून त्यांनी देशा-विदेशात झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या प्रचार-प्रसारासाठी हजारो शिबीरे घेतली आहेत. त्यांची इंजिनिअर झालेली दोन मुले देखील मोठ्या पगाराच्या नोकर्‍या न करता पाळेकर गुरूजीं बरोबर हे कार्य करत आहोत. कृषीॠषी सुभाष पाळेकर करत असलेले हे कार्य भारतीय शेतकरी, शेती, यांच्यासाठी महत्वाचे आहेच. पण जिव,जमीन,पाणी,अन्न,हवा यातील वाढत्या प्रदुषणाला रोकण्यासाठी महत्वाचे आहे. इंटरनेटवर, युटयुब, फेसबुक, व्हॉटस्प अशा इलेक्ट्रॉनिक्स मिडियावर सरांची अनेक भाषणे, माहिती आज उपलब्ध आहे. त्यामुळे जगातील हजारो शेतकर्‍यांपर्यंत हे नैसर्गिक शेतीचे पर्यावरणपूरक ज्ञान पोहोंचत आहे. सरांना जगातून लाखो अनुयायी मिळत आहेत.
कारण ही शेती फक्त शेतकर्‍यांसाठी उपयुक्त नाही, तर या पृथ्वीवर प्रदुषणाने त्रस्त प्रत्येक व्यक्तीसाठी उपयोगी आहे. रासायनिक, शेंद्रीय शेतीचे दुष्परिणाम म्हणून अन्न,पाणी,जमीन, हवा प्रदुषित होत आहे. त्यामुळे मानवाच्या अन्नात विष मिसळले जात आहे. ते विष मिसळल्यामुळे आईच्या दुधापासून ते अन्नपदार्थ, भाजा-फळे सर्वत्र हे विष आढळते आहे. परिणामी आजचा समाज असंख्या अजारांनी ग्रस्त आहे. यातून जर मानव जातीला सुटका करून घ्यावयाची असेल तर कृषीॠषी सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती शिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही.
आ.पाळेकर सर नेहमीचं सांगतात की, जंगलातील झाडाला पाणी कोण देते? त्याला खते कोण घालते? त्याचे निंदण-खुरपण, मशागत कोण करते? कोणीचं करत नाही. तरी त्या झाडाला एक्सपोर्ट कॉलेटीची फळे, हजारोच्या संख्येने कशी येतात ? मग हेच तंत्र आपण आपल्या शेतात, बागेत, कुंडीत का आणू शकत नाहीत? ते अशक्य आहे का ? बिलकूल नाही. हे तंत्र शिकायचे असेल तर जीवनात किमान एकदा तरी कृषीॠषी पाळेकर गुरूजींचे एक तरी शिबीर प्रत्येकाने करावे अथवा त्यांच्या 14 भाषांमध्ये प्रकाशित पुस्तके तरी नक्की वाचावित.
लेखक - उन्मेष गौरकर,
नांदेड


© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate