অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा

टंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा

सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी...वर्षाचे पर्जन्यमान केवळ चारशे मिलीमीटर...जलयुक्तची कामे झाली. मात्र पावसाअभावी नाला कोरडा....विहिरी डिसेंबरनंतर तळ गाठतात....शेतकऱ्यांनी कष्टाने निसर्गाशी जुळवून घेतलेले...अशा परिस्थितीत शासनाची ‘मागेल त्याला शेततळे’ योजना आली अन् शिवाराचे रुप पालटले. जिथे खरिपाचे पीक टिकविण्याचे मोठे आव्हान होते तिथे डाळिंबाच्या बागा उभ्या राहिल्या आहेत.

साधारण दोन हजार लोकसंख्येच्या या गावात 675 हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे. मात्र पाण्याअभावी बाजरी, कुळीथ, मका आणि काही प्रमाणात मूग अशीच पिके खरिपात घेतली जात असत. रब्बीत तुरळक प्रमाणात कांदा, गहू, हरभरा पीक घेतले जात असे. पावसाअभावी विहिरींचे पाणी लवकर अटत असल्याने काहीवेळा शेवटचे पाणी न मिळाल्याने पिकांचे नुकसानही होत असे. मात्र गेल्या वर्षापासून ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत 78 आणि काही खाजगी शेततळी तयार झाल्याने ही परिस्थिती बदलली आहे.

वावी मंडळात पावसाअभावी हिरवे गवतही शिवारात दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय समितीने या भागात शेततळे मंजूर करण्याकडे विशेष लक्ष दिले. गावात एकूण 125 ऑनलाईन अर्जापैकी 78 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली. त्यासाठी शेतकऱ्यांना 39 लाखांचे अनुदान देण्यात आले. तीन शेतकऱ्यांना प्लास्टिक कागदासाठी अनुदान देण्यात आले. कृषी पर्यवेक्षक डी.एस.देशमुख आणि कृषी सहाय्यक एल.बी.मलिक यांनी शेतकऱ्यांना योजनेची माहिती दिली आणि शेततळी उभारण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यामुळे शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

शेतकरी विहिरीचे पाणी आटण्यापूर्वी शेततळी भरून घेतात. काही शेतकरी टँकरद्वारे बाहेरून पाणी आणून शेततळे भरतात. पाणी आणण्याच्या खर्चाच्या तुलनेत शेतातील उत्पन्न अधिक असल्याने शेतकऱ्यांना शेततळे फायदेशीर ठरत आहेत. नवनाथ कहांडळ यांनी शेततळ्यात पाणी भरण्यासाठी 40 हजार रुपयांचा खर्च केला आणि त्यांना वांग्यापासून सात लाखांचे उत्पन्न मिळाले.

इतरही शेतकऱ्यांनी पाण्याची अशाचप्रकारे व्यवस्था करून शेततळ्यातून उत्पन्न वाढविले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व कळल्यामुळे गावातील बहुतांशी शेती ठिबकवर होत आहे. कृषी विभागाने 12 शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी अनुदानदेखील दिले आहे.

गावात जलयुक्तची कामे करण्यासाठी चांगला लोकसहभाग मिळाला. पाऊस चांगला झाला तर यापेक्षा अधिक उत्पन्न मिळेल, असा विश्वास सरपंच अण्णासाहेब कहांडळ यांनी व्यक्त केला. गावात डाळिंबाचे क्षेत्र या दोन वर्षात 69 हेक्टरने वाढले आहे, तर भोपळ्याचे क्षेत्र 68 हेक्टरने वाढले आहे. याशिवाय गहू, हरभरा, कांदा, मिरची, वांगी अशी पिकेही शिवारात दिसू लागली आहेत. शेततळ्यामुळे गावाचे अर्थकारण खऱ्या अर्थाने बदलले आहे.

प्रभाकर साळुंखे, मंडळ कृषी अधिकारी- सिन्नर तालुक्यातील एकूण 1042 शेततळ्यापैकी 676 केवळ वावी मंडळात आहे. राज्यात एका मंडळातील ही सर्वाधिक शेततळ्यांची संख्या आहे. टंचाईला सामोरे जाणाऱ्या भागासाठी शेततळे खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहेत.

संजय कहांडळ, शेतकरी- शेतकऱ्यांनी निसर्गाशी जुळवून घेतले आहे. मात्र शेततळ्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बागायती शेती करणे शक्य झाले आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे बागायती करण्याचे धाडस करता आले.

-डॉ.किरण मोघे

माहिती स्रोत: महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate