অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डाळिंब शेती - चांगले उत्पादन

साक्री शहराच्या (जि. धुळे) उत्तरेस पेरेजपूर रस्त्यावर मनोजकुमार देसले यांच्या "भास्करराव फार्म'ची भव्य कमान आपले स्वागत करते. आत चौफेर नजर टाकल्यानंतर एखाद्या कंपनीत येत असल्याचा अनुभव येतो. सुंदर टुमदार घरालगत गाईंचा मुक्त संचार गोठा, आजूबाजूला डाळिंबाची विस्तीर्ण बाग, शेततळे, शेताच्या मधोमध गस्ती मनोरा, गणवेशधारी मजुरांचे शिस्तबद्ध काम. अभ्यास, शिस्त, गुणवत्ता या त्रिसूत्रीच्या जोरावर या तरुणाने डाळिंब शेतीतून गुणवत्तापूर्ण उत्पादन व क्षेत्रविस्तार करीत आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचा नमुनाच सादर केला आहे.

"बी.ई. मेकॅनिकल' झाल्यानंतर पेरेजपूर येथील मनोजकुमार देसले यांनी गुजरात राज्यात बांधकाम क्षेत्रात कार्यरत काकांसोबत व्यवसाय केला. दरम्यान, घरची सात एकर वडिलोपार्जीत शेतीत डाळिंबाचे पीक होते. ही जमीन सटाणा तालुक्‍यातील एका शेतकऱ्याला कसण्यासाठी दिली होती. मनोज यांनी वर्ष 2000 मध्ये स्वत:च पूर्ण वेळ डाळिंब शेतीत उतरण्याचे ठरविले. उच्च शिक्षणामुळे शेतीकडे पाहण्याची दृष्टी ही पूर्णत: उद्योजकाची ठेवायची आणि त्याच पद्धतीने डाळिंबाचे उत्तम व्यवस्थापन करून उत्पादन घ्यायचे हे त्यांनी आधीपासूनच ठरविले होते. सन 2002 मध्ये सात एकरांवर डाळिंब लावले. सुरवातीच्या टप्प्यात व्यवसायातील पैसा शेतीत गुंतवला. हळूहळू उत्पादन सुरू झाले. टप्प्याटप्प्याने जमीन विकत घेऊन डाळिंब क्षेत्र वाढविण्यावर भर दिला. सन 2002 ते 2014 पर्यंत 70 एकर क्षेत्र झाले. गेल्या 12 वर्षांत क्षेत्रात दहा पटीने वाढ करण्यात यश मिळवले. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या जनाबाई भास्करराव देसले या त्यांच्या मातोश्री आणि उच्चशिक्षित पत्नी सौ. श्‍वेता यांचीही त्यांना डाळिंब उद्योगात साथ मिळते आहे.

डाळिंब शेतीतील दृष्टिक्षेप


डाळिंब - 70 एकर (एकूण क्षेत्र - 84 एकर) 
लागवड अंतर : 14 बाय 11 फूट 
चारा पिके : 14 एकर 
भाडेपट्ट्यावर कराराने घेतलेले क्षेत्र : 40 एकर (यातही डाळिंब पीक) 
डाळिंब वाण : भगवा 
जमिनीचा प्रकार : काळी मध्यम 
जलस्रोत : शेततळे (क्षमता दीड कोटी लीटर), 4 विहिरी, बोअरवेलला पाणी (530 फूट खोल)
  • गेल्या वर्षी 70 एकरांपैकी 43 एकरांवर आंबेबहार.
  • त्यातून एकूण 318 टन उत्पादन मिळाले.
  • मागील 10 वर्षांपासून एकरी सरासरी आठ उत्पादनांत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न.
  • झाडाच्या सशक्तीकरणावर सर्वाधिक भर दिला
  • गेल्या वर्षी प्रति किलो 55 ते 75 रुपये व सरासरी 65 रुपये दर मिळाले.

मनोजकुमार यांच्या डाळिंब शेतीची वैशिष्ट्ये

  • शेताच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतंत्र कार्यालय
  • मध्यवर्ती (सेंन्ट्रलाइज्ड) ठिबक सिंचन यंत्रणा
  • स्वतंत्र "ट्रान्स्फार्मर'ची व्यवस्था
  • मजुरांसाठी 20 खोल्यांची स्वतंत्र निवासव्यवस्था
  • 35 फूट उंचीचा "वॉच टॉवर' (दूरवर लक्ष ठेवण्यासाठी उंच मनोर

व्यवस्थापनातील विशेष

  • आंबेबहारावर भर, त्यामुळे नैसर्गिक चांगली फूट मिळते.
  • प्लॉटनिहाय छाटणीचे चांगले नियोजन
  • बाग संपूर्णपणे स्वच्छ ठेवण्यावर भर
  • दर दोन वर्षांनी माती व पाणी परीक्षण
  • घरच्या गाईंपासून मिळालेल्या शेणावर आधारित गांडूळखताचा वापर, दर महिन्यातून एकदा शेणस्लरीचा वापर
  • विद्राव्य खतांबरोबरच सूक्ष्म व दुय्यम खतेही दिली जातात
  • आतापर्यंत एकही झाड मररोगाने गेले नाही
  • हवामान व गरजेनुसार पाणी व्यवस्थापनावर भर
  • रोग-किडींसाठी प्रतिबंधात्मक नियंत्रणावर भर
  • फवारणीपूर्व पाण्याचा सामू तपासून पाहिला जातो
  • बागेत मधमाश्‍या वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग
निंबोळी, करंज, शेंगदाणा आदी पेंडी व मासोळी खाद्यांचा वापर 
दर महिन्यातून एकदा स्लरी दिल्याने झाडाची मुळे सक्रिय राहून त्याचा उत्पादनासाठी लाभ होतो 
पाच वेगवेगळ्या प्रकारच्या स्लरींचा आलटून पालटून वापर.
स्लरीचा प्रकार ---- वर्षभरात एकूण स्लरींचे प्रमाण 
1) मुख्य अन्नद्रव्य स्लरी ----- 4 वेळा 
2) दुय्यम अन्नद्रव्य स्लरी ----- 2 वेळा 
3) सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी ------ 2 वेळा 
4) कडधान्य स्लरी --------- 2 वेळा 
5) जिवाणू स्लरी---------- 2 वेळा
स्लरीसाठी डाळिंब बागेच्या प्रत्येक टप्प्यात 200 लीटर क्षमतेच्या टाक्‍या आहेत. स्लरी कोणत्याही प्रकारची असो त्यात 20 किलो शेण आणि 10 लिटर गोमूत्र आवर्जून प्राधान्याने घेतले जाते. 
होल्स्टिन फ्रिजीयन जातीच्या 35 गाईंचा मुक्तसंचार पद्धतीचा गोठा आहे.
अभ्यास आणि नियोजन हा यशाचा पाया 
रोज सकाळी लवकर उठून रोजचे नियोजन 
पुढील आठवड्याचे नियोजन आधीच तयार 
आपल्या क्षेत्रात "मास्टरी' हवीच हा नेहमीचा आग्रह 
नवे प्रयोग आणि तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी "ऍग्रोवन'चे नियमित वाचन 
चांगले प्रयोग पाहण्यासाठी देशभरातील डाळिंब बागांना नियमित भेटी 

मनोजकुमार यांच्याकडून शिकण्यासारखे



अभ्यासूपणा 
व्यावसायिक दृष्टिकोन 
शिस्तबद्ध नियोजन 
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

ऍग्रोवन महासरपंच परिषदेत "बी. ई. मेकॅनिकल सरपंच'


बी. ई. मॅकेनिकलची पदवी घेतलेल्या देसले यांनी मागील वर्षी सरपंच म्हणून पेरेजपूरचा कारभारही पाहण्यास प्रारंभ केला आहे. नुकत्याच जळगाव येथे भरलेल्या "ऍग्रोवन सरपंच महापरिषदेत' त्यांनी उच्चशिक्षित सरपंच म्हणूनही लक्ष वेधून घेतले होते. त्यातून मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीच्या आधारावर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापरिषदेने त्यांचा आत्मविश्‍वास वाढविला आहे. अखिल भारतीय डाळिंब उत्पादक महासंघाचे ते सदस्य आहेत. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या संपर्कात राहून चर्चासत्रे घेण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. 

संपर्क ः मनोजकुमार देसले- 9922375991

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत:अग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate