অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिरचीची शेती व जीवनात गोडवा

विदर्भ, मराठवाडा आणि आंध्र प्रदेशच्या सीमारेषेवर वसलेल्या लिंगी गावातील श्रीनिवास सिंगडवार गेल्या दहा वर्षांपासून मिरचीची शेती करतात. हे पीक आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य देणारे ठरले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्वतःच्या शेतीसोबत मक्‍त्यानेही शेती घेऊन मिरचीला कापूस पिकाची जोडही सिंगडवार यांनी दिली आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि आंध्र प्रदेशच्या सीमारेषेवर असलेले किनवट तालुक्‍यातील (जि. नांदेड) लिंगी हे पंधराशे लोकवस्तीचे छोटेसे गाव. या भागात कपाशी, ज्वारी, तूर, हरभरा, सोयाबीन यांसारखी पारंपरिक पिके घेतली जातात; मात्र अलीकडील काळात बाजारपेठ तसेच शेतीत होणारे बदल लक्षात घेऊन अनेक शेतकरी पीकबदलाकडे वळू लागले आहेत. ज्या भागात केवळ पारंपरिक पिकेच घेतली जातात, तेथे शेतकरी संकरित भाजीपाला किंवा फळपिके घेताना दिसत आहेत.

लिंगी गाव हे महाराष्ट्राचे दोन भाग व आंध्र प्रदेशच्या सीमेजवळ असल्याने येथील श्रीनिवास सिंगडवार यांनी तीन बाजारपेठा आपल्या शेतीमालाला चांगला फायदा करून देऊ शकतील असा विचार केला. त्यादृष्टीने मिरची पिकाची निवड त्यांनी केली. गेल्या दहा वर्षांमध्ये मिरचीच्या सातत्यपूर्ण लागवडीतून आज त्यांनी आपल्या कुटुंबाला चांगला आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. बाजारपेठेत मागणी असणारे वाण, खते, पीक संरक्षण व बाजारपेठेची योग्य सांगड घालून हे पीक नेहमीच किफायतशीर ठेवले आहे.

मिरचीची लागवड

लिंगी गावाची भौगोलिक स्थिती सांगायची तर विदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्‍यापासून 40 किलोमीटर, मराठवाड्यातील किनवट तालुक्‍यापासून 39 किलोमीटर, तर आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यापासून 36 किलोमीटर अंतरावर हे गाव वसले आहे. या भागातील जमीन काळी म्हणजेच भारीची म्हणून ओळखली जाते. पारंपरिक पिके घेण्याकडेच इथल्या शेतकऱ्यांचा कल असतो. बारमाही पाणी उपलब्ध नसते.

खरीप हाच मुख्य हंगाम असतो. कापूस, सोयाबीन, तूर ही मुख्य पिके असतात. रब्बीत हरभरा व गहू केला जातो. लिंगी गावाचे बरेचसे व्यवहार यवतमाळ जिल्ह्याला जोडलेले आहेत. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी 911 मि.मी. आहे. यंदा सुमारे 850 मि.मी.च्या दरम्यान पाऊस झाला. या वर्षी यवतमाळ जिल्ह्याचे आठ लाख 67 हजार हेक्‍टर खरिपाचे नियोजन आहे. त्यात कापूस लागवडीचे चार लाख हेक्‍टरवर यंदा नियोजन आहे. उन्हाळ्यात ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, तेथे ठिबक सिंचन, स्प्रिंकलरचा वापर केला जातो. 
पालेभाज्या घेणारेही शेतकरी आहेत. संत्रा, मोसंबीही काही प्रमाणात घेतली जातात.

लिंगी गावातील श्रीनिवास सिंगडवार यांनी वयाच्या 17 व्या वर्षापासून वडिलांकडून शेतीची धुरा आपल्या हाती घेतली. त्यांचे एकूण क्षेत्र 10 एकर आहे. मात्र, त्यांनी मक्‍त्यानेही 30 एकर शेत कसण्यासाठी घेतले आहे. त्यांच्या स्वतःच्या शेतात मात्र कापूस घेण्यावरच भर दिला जातो. मक्‍त्याने घेतलेल्या शेतात कापूस आणि मिरची असे नियोजन ठेवले आहे. आपल्या पारंपरिक पीक पद्धतीत बदल साधताना, मिरची पिकाची निवड करण्याचे कारण सांगताना सिंगडवार म्हणाले, की या पिकात दर चांगले मिळतात. अलीकडील काही वर्षांपासून किलोला 10 रुपये किमान दर हाती लागला आहे. तीन बाजारपेठा जवळ आहेत. हे पीक वर्षभरासाठी आर्थिक हातभार चांगले लावते, असा आमचा अनुभव आहे. दरवर्षी सुमारे किमान दीड एकर क्षेत्रावरील मिरचीचे क्षेत्र वाढवून अलीकडील काळात त्यांनी सुमारे तीन एकर क्षेत्रावर या पिकाचे नियोजन केले आहे.

गादी वाफ्यावर रोपांची उगवण

लागवडीपूर्वी रोपेनिर्मिती करण्यावर सिंगडवार यांचा भर असतो. त्यांचे यंदाचे प्रातिनिधिक उदाहरण सांगायचे तर यवतमाळ येथून त्यांनी संकरित वाणाची पाकिटे खरेदी केली. तीन फूट रुंद आणि दहा फूट लांब अशा आकाराचे गादीवाफे तयार केले. त्यामध्ये बियाणे लावून रोपे वाढवली. सुमारे 40 दिवसांनंतर तीन बाय दीड फूट अंतरावर पुनर्लागवड केली. यात दोन वेळा निंदणी, फवारणी, खते यांचे व्यवस्थापन केले. 

पाण्याचे नियोजन

सिंगडवार यांच्या शेतात विहीर आहे. मात्र, पाण्याची कमतरता भासत असल्याने मांडवी आणि पाटोदा धरणांतील कालव्यांतून पिकांना दांड पद्धतीने तसेच स्प्रिंकलरने आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्यात येते. 
मिरचीवर फुलकिडे, फळे पोखरणारी अळी आदी किडींचा प्रादुर्भाव होतो, त्यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते. खतांमध्ये 10:26:26, पोटॅश, सुपर फॉस्फेट आदींचा वापर होतो.

ऑगस्टच्या दरम्यान मिरचीचा तोडा सुरू झाला. त्यानंतर सातत्याने दहा ते पंधरा दिवसांच्या फरकाने मे महिन्यापर्यंत तोडे घेण्यात आले. तीन एकर क्षेत्रात एकूण सुमारे 1200 क्विंटल उत्पादन हाती आले आहे. 
दररोज पाच ते सात क्विंटल मिरची बाजारात विक्रीसाठी नेण्यात आली. मिरचीला प्रति किलो पाच रुपयांपासून ते आठ रुपये, 15 रुपये ते आतापर्यंत उन्हाळ्यात सुमारे 40 ते 45 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

मिरची ठरले किफायतशीर पीक


सिंगडवार म्हणतात, की मिरचीतून दरवर्षी सर्व खर्च वजा जाता सुमारे दीड लाख रुपयांचा नफा मिळतो. यंदाच्या वर्षी त्यात वाढ होईल. त्यांचे कापूस उत्पादनही एकरी आठ ते 12 क्विंटलच्या दरम्यान आहे. यंदा त्यांना कापसाला प्रति क्विंटल तीन हजार ते आताच्या काळात सुमारे चार हजार रुपये दर मिळाला आहे. आर्थिक आधार म्हणून मिरचीला कापूस पिकाची चांगली जोड मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 
संपर्क - श्रीनिवास सिंगडवार - 94040685929404068592
लिंगी, ता. किनवट, जि. नांदेड 

तज्ज्ञांनी दिल्या मिरची पिकातील टिप्स

1) लावणी वेळेवर होणे गरजेचे. 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान लागवड फायदेशीर.
2) लावणीचे अंतर - दोन ओळींतील अंतर किमान चार ते पाच फूट, दोन रोपांतील अंतर दीड फूट ठेवावे. 
3) उंच गादीवाफा करणे, ठिबक सिंचन, फर्टिगेशन करणे महत्त्वाचे. 
4) पिकाला बांबूचे स्टेकिंग करणे महत्त्वाचे. 
5) पॉलिमल्चिंग फायदेशीर - मिरचीमध्ये फुलकिडे व लाल कोळ्यांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो, यांचे वास्तव्य पानांच्या खालील बाजूस असते. पॉलिमल्चिंगमुळे सूर्यकिरणे परावर्तित होतात, त्यामुळे या किडींचे वास्तव्य कमी होऊन प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. मल्चिंगमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. 
6) किडी- रोगांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर महत्त्वाचा ठरतो. 
7) नियमित तोडे करणे गरजेचे. 

आर. एम. पाटील, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, 
कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार 
संपर्क - 98507688769850768876

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate