विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यात प्रामुख्याने रेशीमच्या चार प्रकारापैकी फक्त टसर कोसा उत्पादन पारंपारिकरित्या गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. परंतू महाराष्ट्राच्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात हजारो शेतकरी तुतीची लागवड करुन लाखोंचे रेशीम उत्पादन घेत आहेत. विदर्भाच्या काही जिल्ह्यात दुसऱ्या प्रकारचे तुती रेशीम केले जाते. सन २०१६-१७ मध्ये भंडारा जिल्ह्यात प्रथमच तुती लागवडीस सुरुवात केली आहे.
भंडारा जिल्ह्यात पवनी व लाखांदूर तालुक्यातील ४ गावातील ३३ शेतकऱ्यांनी ३३ एकर क्षेत्रात तुती लागवड करुन तुती उद्योगास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील शेतकरी अनिल धोंडूजी हटवार यांनी त्यांचे स्वत:च्या शेतात ऑगस्ट २०१६ मध्ये एक एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली. याबरोबरच गावातील व शेती विकासाच्या शासकीय विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते स्वत: पुढाकार घेऊन यशस्वी करतात. त्याच धर्तीवर त्यांनी त्यांच्या शेतात तुतीची लागवड केली. शेणखत व रासायनिक खताचा वेळेवर वापर करुन आंतर मशागतीचे कामे वेळेत पूर्ण केल्याने तसेच योग्य संगोपन केल्याने शेतात तुतीची बाग साडेतीन महिन्यात बहरली.
जिल्हा रेशीम कार्यालयाकडून अनिल हटवार यांना 200 अंडीपुंज संगोपणासाठी देण्यात आले. तसेच १६ ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीत रेशीम विभागाचे प्रकल्प अधिकारी पी.जी. शिरसाठ यांचे मार्फत त्यांनी रेशीम अळी संगोपनाबाबत योग्य प्रशिक्षण घेतले. याचा लाभ त्यांना झाला असून १४४ किलो गॅम तुती रेशीम कोष तयार झाले. हे कोष त्यांनी भंडारा येथील व्यापारी खेमचंद सोनकुसरे यांना प्रतीकिलो 400 रुपये प्रमाणे विकले. यातून त्यांना ५२ हजार २०० रुपये नफा मिळाला.
पुन्हा एकदा तुती रेशीम लागवड जोमाने करावी असे मनोमन त्यांनी ठरविले असून यासाठी त्यांना रोजगार हमी योजेनचे उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा रेशीम अधिकारी चंद्रकांत बडगुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वेळोवेळी भेट व सहकार्यातूनच हे शक्य झाले असल्याचे अनिल हटवार यांनी सांगितले.
अनिल यांना एका महिन्यात ५२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांना खात्री झाली की, रेशीम शेती व्यवसाय शेतकऱ्यांना १०० टक्के परवडणार आहे. तुती रेशीम लागवडीस लागणारी मजूरी व खर्च मग्रारोहयो मार्फत अदा करण्यात आल्याने महिनाभरात ५२ हजार निव्वळ उत्पन्न मिळाले. याचे अनुकरण मासळ गावातील शेतकऱ्यांनी करावे. तुती रेशीम लागवड करुन आपली आर्थिक उन्नती साधावी, असे अनिल नेहमी सांगतात. या व्यवसायात हमखास रोजगार असून दुसऱ्याकडे काम मागण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही, स्वत:च्या शेतात स्वत: काम केल्यास मग्रारोहयो अंतर्गत मंजूरी सुद्धा मिळते. त्यामुळे या व्यवसायाकडे गावकऱ्यांनी वळावे, असे कळकळीचे आवाहनच अनिल यांनी केले आहे.
अनिलच्या या आवाहनास सार्थ प्रतिसाद देऊन तसेच त्याचा रेशीम उद्योग बघून सन २०१७-१८ या वर्षात पवनी व लाखांदूर तालुक्यातील ५० शेतकऱ्यांनी ५० एकर क्षेत्रात तुती लागवड करण्यासाठी नाव नोंदणी केली असून यामुळे विदर्भातील ४ टसर जिल्ह्यांपैकी भंडारा जिल्हा तुती रेशीम उत्पादनात यशस्वी होऊ शकतो, असे अनिल हटवार, जिल्हा रेशीम कार्यालय व आसगांवकर फार्मर प्रोड्युसर कंपनी आसगाव यांनी सिद्ध करुन दाखविले आहे.
रेशीम सोबतच तुती लागवडीसाठी जिल्ह्यातील वातावरण पोषक असल्याने शेतकऱ्यांनी तुती लागवडीकडे वळावे. एका महिन्यात ५० हजाराच्यावर उत्पन्न मिळते. तसेच लागवडीवरील मजूरी व खर्च मग्रारोहयोतर्फे करण्यात येत असल्याने शेतकऱ्यास उत्पादन वाढीसाठी उपयुक्त व्यवसाय आहे. - चंद्रकांत बडगुजर, जिल्हा रेशीम अधिकारी
|
---|
लेखक: रवी गिते
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याती...