অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

थर्मोकोलच्या पॉटमध्ये स्ट्रोबेरी

सातारा जिल्ह्यातील भिलार येथील किसन भिलारे यांनी स्ट्रॉबेरी पिकात व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे मजल्यांची शेती (एकावर एक कुंड्या अशी रचना) असा प्रयोग केला आहे. शेतीचे पडत चाललेले तुकडे, त्यामुळे दिवसेंदिवस कमी होणारे शेती क्षेत्र, पाणी व मजूर समस्या आदी गोष्टींवर मात करण्यासाठी हा प्रयोग त्यांना फायदेशीर ठरत आहे. स्ट्रॉबेरीची उत्पादनवाढही त्यांनी या पद्धतीतून घेतली आहे. देशातील असा हा पहिलाच प्रयोग आहे, असा भिलारे यांचा दावा आहे.

प्रस्तावना

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका पर्यटन व स्ट्रॉबेरी पिकासाठी सर्वत्र परिचित आहे. तालुक्‍यातील पाचगणीच्या पश्‍चिमेला पाच किलोमीटरवर भिलार गाव आहे. गावात स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या गावातील किसन भिलारे यांनी "इंजिनिअरिंग डिप्लोमा' पूर्ण केला आहे. ते बांधकाम व्यावसायिक असले तरी शेतीशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे. त्यामुळे प्रयोगशील वृत्ती ठेवूनच ते शेतीतही आघाडीवर राहिले आहेत.
भिलारे यांची वडिलोपार्जित सहा एकर शेतजमीन होती. कुटुंबाचे विभाजन झाल्यावर त्यांच्या वाट्याला दोन एकर जमीन आली. सन 1992 च्या सुमारास महाबळेश्‍वर तालुक्‍यात स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यास सुरवात झाली. सुरवातीस ही शेती थोड्या प्रमाणात केली जात होती. सन 1994 च्या सुमारास तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी प्रक्रियेसाठी कारखानदारांकडून उचलली गेली नाही, त्यामुळे ती अक्षरशः फेकून द्यावी लागली. या काळात स्ट्रॉबेरी उत्पादक आर्थिक अडचणीत आले. भविष्यात अशी परिस्थिती टाळण्याच्या दृष्टीने भिलारे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून श्रीराम फळप्रक्रिया - फुलेप्रक्रिया संस्था स्थापन केली. त्यातून स्ट्रॉबेरी पिकाचे मूल्यवर्धन व्हावे असा प्रयत्न होता. आज महाबळेश्वर सहकारी फळे - फुले व भाजीपाला खरेदी - विक्री या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. संस्थेच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीस सातत्याने चांगला दर मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
किसन भिलारे जागतिक किंवा देशपातळीवरील स्ट्रॉबेरीची मागणी व दर यांच्यावर लक्ष ठेवतात. संस्थेच्या माध्यमातून एकत्र माल मिळत असल्याने व्यापारीही सातत्याने संपर्क ठेवून असतात. संस्थेचे शेतकरी सदस्य एकूण उत्पादनातील 85 टक्के उत्पादन खाण्यासाठी विक्रीस पाठवतात. उर्वरित (अखेरच्या हंगामातील) 15 टक्के माल प्रक्रिया उद्योगासाठी संस्थेकडे दिला जातो.

कमी क्षेत्रात अधिक उत्पादनाचा पर्याय

पिकाचे उत्पादन वाढवणे शक्‍य असते; पण मुळातच कमी असलेले आपले क्षेत्र वाढवण्यावर मात्र मर्यादा असतात. हे ओळखून यावर काही उपाय शोधता येतो का, यासंदर्भाने किसन यांनी "इंटरनेट'वर शोध सुरू केला. त्यांना अमेरिकेत मातीविना शेती म्हणजेच "व्हर्टिकल ग्रोइंग' वा फार्मिंग पद्धतीने म्हणजे एकावर एक पद्धतीने रोपांची कुंड्यांत रचना करून स्ट्रॉबेरीची शेती केली जाते याची माहिती मिळाली. त्यानंतर या पद्धतीची सविस्तर माहिती घेतली. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमवही केली. त्याप्रमाणे नियोजनाअंती सन 2012 मध्ये दोन गुंठे क्षेत्रावर या पद्धतीने लागवड करण्याचा निर्णय घेतला.

अशी आहे व्हर्टिकल फार्मिंग पद्धत

1) या पद्धतीत एकावर एक या पद्धतीने कुंड्यांची रचना केली जाते. या कुंड्यांना लोखंडी बारचा आधार दिला आहे. कुंड्या थर्माकोलच्या असून एका बारवर त्या पाच ते सहाच्या संख्येने रचल्या आहेत. खालून सर्वांत पहिली कुंडी जमिनीपासून 18 इंच उंचीवर आहे. त्यानंतर वरती चढत जाणाऱ्या प्रत्येक दोन कुंड्यांमध्ये 10 इंचांचे अंतर आहे. सर्वांत वरील कुंडीनंतर आठ इंचावर पीव्हीसी पाइप असून त्याला ठिबक सिंचनाची लॅटरल जोडली आहे. त्याचबरोबर तुषार सिंचनाची सोयही करण्यात आली आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी सर्वप्रथम सर्वांत वरच्या भागातील कुंडीत येते. त्यानंतर ते प्रत्येक खालच्या कुंडीत पोचते. सर्वांत तळाच्या कुंडीतून ते खाली जमिनीत जाते. या क्षेत्रात जमिनीवर नेहमीच्या पद्धतीने मुळा, गाजर, लसूण, झेंडू, कोबी, फ्लॉवर आदी पिके किसन यांनी घेतली आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्यास तुषार सिंचनाद्वारे पाणी दिले जाते.
2) प्रत्येक कुंडी टॉपला नऊ बाय नऊ इंच क्षेत्रफळाची आहे. त्याची खोली 10 इंचांची आहे. प्रत्येक कुंडीची रचना करताना त्याचे चार कोपरे बाहेर राहतील याप्रमाणे रचना केली आहे. प्रत्येक कुंडीत चार रोपे बसवण्यात आली आहेत. दोन ओळींतील व दोन लोखंडी बार यांतील अंतर तीन फूट ठेवण्यात आले आहे. दोन गुंठे क्षेत्रात सुमारे 1600 कुंड्या बसविण्यात आल्या आहेत. या कुंड्यांत कोकोपीटचा वापर केला आहे.

उत्पादन व पद्धतीचे फायदे

  1. व्हर्टिकल फार्मिंग पद्धतीने पहिल्या वर्षी प्रति झाड 750 ग्रॅम एवढे स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळाले. दुसऱ्या वर्षी ते एक किलोपर्यंत गेले. पारंपरिक स्ट्रॉबेरी शेतीत हेच उत्पादन अर्धा किलोपर्यंत मिळते.
  2. म्हणजेच पारंपरिक पद्धतीत एकरी सुमारे 25 हजार रोपे लावली जातात. त्यातून सुमारे साडेबारा टन उत्पादन मिळते. त्या तुलनेत व्हर्टिकल फार्मिंग पद्धतीत उत्पादन दीडपट ते दुपटीपर्यंत जाऊ शकते.
    किसन यांना या पद्धतीसाठी लोखंडी सळी सहा हजार रुपये, दोन गुंठ्यांसाठी 1600 कुंड्या बसवण्यात आल्या आहेत. प्रति कुंडी 40 रुपये याप्रमाणे 64 हजार रुपये, पीव्हीसी पाइप चार हजार रुपये, ठिबक सेट दोन हजार रुपये, स्प्रिंकलरसाठी दीड हजार रुपये, कोकोपीट सहा हजार, जी आय वायर तीन हजार, मजुरी तीन हजार असा मिळून दोन गुंठे क्षेत्रासाठी 90 हजार रुपये खर्च आला; परंतु यातील बहुतांशी खर्च दीर्घकाळासाठीचा आहे. सुमारे साडेचार टन उत्पादन मिळाले आहे. सरासरी 50 रुपये दर मिळाला आहे.

  3. पारंपरिक स्ट्रॉबेरी लागवडीच्या तुलनेत या पद्धतीत ठिबक सिंचनाचा खर्च कमी येतो.
  4. फळांचा दर्जा उच्च प्रतीचा मिळतो.
  5. मातीविना शेती असलेल्या व्हर्टिकल फार्मिंग रचनेमध्ये कोणत्याही रोपाचा मातीशी संपर्क येत नाही, त्यामुळे मातीतून उद्‌भवणाऱ्या रोगांना आळा घालण्यात आला आहे.
  6. मजुरीच्या खर्चात बचत झाली आहे.
  7. त्याच क्षेत्रात आंतरपिके घेणे शक्‍य होऊ शकते.

किसन भिलारे - 9422038474
------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate